- जंगल आणि डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर ‘मधुपर्यटन’ ही संकल्पना रुजावी या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग विभागाने ‘मधाचे गाव’ ही संकल्पना साकारण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे मधाचे गाव तयार केलं आणि मे 2022 साली देशातील पहिलं मधाचे गाव साकारण्यात आलं…
-आर्थिक स्तरावर मधाचे गाव हा प्रयोग अल्पावधीतच झाल्याचे लक्षात येताच खादी ग्रामोद्योग विभागाने मांघरच्या धर्तीवर राज्यात आणखी १६ जिल्ह्यांत मधाचे गाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.
-दरवर्षी 26 जानेवारीला दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात यंदा देशातील पहिले मधाचे गाव मांघर गावावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता.
थोडक्यात काय तर देशातील पहिले मधाचे गाव म्हणून साऱ्या पंचक्रोशीत मांघरचे नाव दुमदुमायला लागले आहे. मात्र इतके असूनही ज्यांची यशोगाथा या निमित्ताने मांडली जात आहे त्या मधाच्या गावातील रहिवासी मात्र प्रचंड धास्तावले आहेत, निराश आहेत आणि नावारुपाला आलेला मधाचा व्यवसाय उभा करण्यासाठी धडपडत आहेत.
देशातील पहिल्या मधाच्या गावाला वातावरण बदलाचा फटका
हे असं अचानक मांघर गावात काय घडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे वातावरण बदलामुळे उद्भवलेलं नैसर्गिक संकट. या गावातील रमेश जाधव हे पारंपारिक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात. गेली चाळीस वर्षे त्यांनी सातत्याने या व्यवसायात टिकून मध निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. वातावरण बदलाचा कधी नव्हे एवढा फटका यावर्षी बसल्याचे ते सांगतात.
‘बाईमाणूस’ शी बोलताना रमेश जाधव म्हणतात, "माझ्याकडे जंगलात ठेवलेल्या बावीस पेट्या (मधमाशी) आहेत. यावर्षी कारवीचा बहर म्हणावा असा नव्हता. त्याला कारण म्हणजे यावर्षी पाऊस लांबला, त्यानंतर जोरदार वारे सुरू झाले होते. वारे आणि पाऊस यामुळे मधमाश्या बाहेर पडू शकल्या नाहीत. असं असतानाच अमेरिकन फाऊलब्रुड हा रोग आला. त्यामुळे वर्षाला माझे उत्पादन निम्म्याने कमी झालं आहे."
(Ramesh Jadhav Photo)
‘अमेरिकन फाऊलब्रुड’ रोगामुळे मध उत्पादनात लक्षणीय घट
साधारणतः मांघर किंवा महाबळेश्वरच्या परिसरातील मधाचे उत्पादन हे प्रामुख्याने जांभूळ, हिरडा, गेळा, पिशा, व्हायटी, कारवी,आखरा या वनस्पतींच्या फुलोऱ्यापासून घेण्यात येते. जांभळाचा हंगाम काळ लक्षात घेतल्यास हा साधारणतः मार्च दरम्यान असतो. हिरड्याचा एप्रिलमध्ये, गेळा या वनस्पतीचा मे महिन्यात, पिशा या वनस्पतीचा डिसेंबर, व्हायटीचा हंगाम काळ नोव्हेंबर - डिसेंबर तर आक्रा या वनस्पतीचा हंगाम काळ जानेवारी फेब्रुवारी दरम्यान असतो. पावसाचे चार महिने सोडले तर बाकी महिन्यांत मधमाश्यांना मध गोळा करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या वनस्पतीचा फुलोरा असतोच.
या वनस्पतींपैकी कारवी या वनस्पतीचा फुलोरा सात ते आठ वर्षांतून एकदाच येतो. तो साधारण ऑगस्ट व सप्टेंबर दरम्यान असतो. गतवर्षी म्हणजेच 2024 साली कारवी फुलण्याची वेळ होती. मात्र लांबलेल्या पावसाने म्हणावा असा बहर कारवीला आला नाही. त्यातच असा एक रोग ज्याने मधमाश्यांना पोळ्याच्या बाहेर पडूच न देता संपवले. अमेरिकन फाऊलब्रुड हा तो रोग.
आपण आयात केलेल्या मेलिफेरा या मधमाश्यांच्या कॉलनीतून भारतात हा रोग पसरल्याचे सांगितले जाते. मांघर परिसरातील मधमाश्यांच्या पोळ्यांना या रोगाचे संक्रमण झाले आणि तीस ते चाळीस टक्के एवढी लक्षणीय घट मधाच्या उत्पादनात नोंदवली गेली. 
(Honey Bees Photo with flower)
हवामान बदलामुळे मधाच्या चवीत लक्षणीय बदल
येणारे प्रत्येक वर्ष हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरत आहे. अति उष्णतेचे देखील विपरीत परिणाम मधाच्या उत्पादनावर होतात. महाबळेश्वर येथील वातावरण मधाच्या निर्मितीसाठी पोषक आहे परंतु वाढत्या तापमानामुळे देखील निर्माण होणाऱ्या मधाच्या गुणवत्तेत कमालीचा फरक जाणवतो. अति उष्णतेमुळे मधाचा सुगंध नाहीसा तर होतोच पण मधाच्या चवीत देखील लक्षणीय असा बदल जाणवतो.
अमेरिकन फाऊलब्रुड हा रोग व सरासरीच्या तुलनेत पावसाचे वाढलेले प्रमाण किंवा अतिवृष्टी यामुळे मधाच्या उत्पादनात झालेली घट याबद्दल मांघर येथील मधपाळ सखाराम गणपत रींगे सांगतात, " खादी व ग्रामोद्योग मंडळाने आयोजित केलेले मधमाशी पालनाचे प्रशिक्षण पूर्ण करून मी हा व्यवसाय सुरू केला.यंदाचा हंगाम जरा तोट्यातच गेला. कधीही पडणारा पाऊस आणि हा रोग यामुळे जरा नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते मात्र आम्हाला तशी कोणतीच सुविधा मिळत नाही. शासनाने आमच्याकडेही लक्ष द्यावे कारण आमच्यापैकी बरेच जण फक्त याच व्यवसायावर अवलंबून आहेत."
मधमाश्याच्या पोळ्याला अमेरिकन ‘फ्राऊलब्रुड’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्याचा फटका मध उत्पादनाला झाला आहे. मांघरमधून वर्षाला पंधरा हजार किलो मध देशातील विविध बाजारपेठेत पाठवला जातो. या फ्राऊलब्रुड रोगामुळे या उत्पादनात 30 ते 40 टक्के घट झाली आहे. मांघर या गावातून दरवर्षी १५ हजार किलो मध देशभरातील वेगवेगळ्या बाजारपेठेत पाठवले जाते, पण यंदा या उत्पादनावर गंभीर परिणाम झालाय. पावसाळा सरल्यानंतर यंदा मधमाश्यांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगाने घेरले आहे.
या रोगामुळे मधमाश्या पोळ्यातच मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे फ्राऊलब्रुडने मध संकलित होण्याला बाधा येऊ लागली आहे अशी माहिती मांघरचे सरपंच गणेश जाधव यांनी दिली. फ्राऊलब्रुड या संकटाबरोबर पाऊसाची उघडीप लवकर न झाल्याने जंगलातील फुलोराला त्याचा फटका बसला आहे. दर सात वर्षांनी येणाऱ्या कारवीच्या फुलझाडामुळे मधमाश्यांना मिळणाऱ्या मधामध्ये अडथळा आला आहे. फुले आल्यानंतरही पावसाने उघडीप घेतली नव्हती. त्याचा फटका मध उत्पन्नाला बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
(Sakharam Ganpat Ringe Photo)
मांघर गावाची गोष्ट…
पश्चिम घाटाच्या संलग्न पर्वतरांगांमध्ये असलेल्या एका विस्तीर्ण पठारावर वसलेले महाबळेश्वर हे प्रसिद्ध गिरिस्थान घनदाट वनश्रींनी वेढलेले आहे. त्यामुळे या परिसरात जांभूळ, ओक, हिरडा, अंजन, आंबा, बेहडा, वरस, कारवी अशा वनस्पती विपुल प्रमाणात आढळतात. या वनस्पती वैविध्यामुळे येथील आसपासच्या परिसरात मधमाशी पालन हा शेतीला पूरक असलेला व्यवसाय बऱ्याच काळापासून केला जातो. नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या बाबतीत ' देशात पहिले ' अभिनव असे काहीतरी करून दाखवण्याचा मान महाराष्ट्राने बऱ्याचवेळा मिळवलेला आहे. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे मे 2022 साली महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून देशातील पहिले मधाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील मांघर घोषित केले गेले.
महाबळेश्वर पासून तापोळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यापासून खालच्या बाजूला दहा किमी वर वसलेलं मांघर हे जेमतेम 100 उंबरा असलेले, अत्यंत घनदाट झाडीत वसलेलं हे टुमदार गाव. ज्ञात माहितीनुसार गेल्या पन्नास वर्षांपासून या गावात व्यावसायिक मधमाशी पालन केलं जातंय व त्यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग गावकऱ्यांनी सुकर केलेला आहे.
मांघर या गावातील पारंपारिक मधमाशी पालन व्यवसाय व येथील परिसरातील वैविध्य असलेल्या वनस्पतींचा वर्षभर राहणारा फुलोरा विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघर घोषित केले गेले. गावातील बहुतांश कुटुंबात मधमाशी पालनाचा व्यवसाय केला जातो. वर्षाला जवळपास दहा ते पंधरा हजार किलो मधाचे उत्पादन मांघरमध्ये केले जाते. या मधावर होणारी प्रक्रिया, पॅकेजिंग व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मधुसागर ही शेतकऱ्यांनी स्थापन केलेली सहकारी संस्था कार्यरत आहे. सहकारातून साधलेली समृद्धी म्हणून या संस्थेकडे आपण पाहू शकतो. 
(Manghar Village Photo PAN)
मधाचे गाव नेमकं काय करतं?
मांघर या गावात उत्पादित होणाऱ्या मधाची वैशिष्ट्ये म्हणजे हा मध सेंद्रिय आहे असा दावा येथील मध उत्पादक करतात. मधपाळांनी आपापल्या पेट्या जंगलात, कडेकपारीत ठेवून दिल्या आहेत. निसर्गात वाढणाऱ्या वनस्पतींच्या फुलोऱ्यातून मधमाश्या मध गोळा करतात. यातून परागीभवन देखील मोठ्या प्रमाणात वाढते. परिसरात असणारी जैवविविधतेत आणखी वृध्दी करण्याचे काम या मधमाश्या करतात. पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेल्या मधाच्या निर्मितीमुळे हा मध सेंद्रिय आहे असे मानले जाते. या उत्पादित झालेल्या मधाचे ब्रॅण्डिंग महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व मधुसागर नावाची सहकारी संस्था देखील करत आहे.
महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी व मधपाळांनी एकत्र येत 1955 साली महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी संस्थेची स्थापना केली. हीच संस्था मधुसागर या नावाने देखील ओळखली जाते. आसपासच्या 110 खेडेगावातील 1700 शेतकरी या संस्थेचे सभासद आहेत. मांघर येथे उत्पादित होणारा मध ' मधाचे गाव मांघर ' या नावाने विक्रीसाठी या संस्थेकडून उपलब्ध केला जातो. मधावरील प्रक्रिया व त्याचे आकर्षक असे पॅकेजिंग व विक्री या संस्थेमार्फत केली जाते. मांघरचे सर्वच मधपाळ या संस्थेचे सभासद आहेत.
(Honey Bottel Photo with Ganesh Jadhav)
मधाच्या उत्पादनातून देशपातळीवर मांघरचे नाव झाले असले तरी इतर अनेक उपक्रमांतून या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार असे दहा पेक्षा जास्त पुरस्कार गावाला मिळालेले आहेत. गावचे सरपंच गणेश जाधव यांनी गावच्या या यशाबद्दल सांगताना म्हणतात की, "निसर्गाचा समतोल राखत शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशी पालनातून मांघरने ही किमया साधली आहे.आम्ही तुलना करणार नाही पण ग्राहकांनीच आमच्या मधाची गुणवत्ता पाहून खरेदी करावी.पर्यावरणातील बदल झपाट्याने होत आहेत.त्याचा फटका आमच्या मधाच्या उत्पादनात घट होऊन झाला आहे.त्यासाठी आम्हीदेखील काय उपाययोजना करता येतील हे पाहतोय.मला सांगायला आनंद होतोय की, आमच्या कार्याची दखल घेत 2025 सालच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत मांघरचा चित्ररथ असणार आहे."
तर अशा या स्वच्छ व सुंदर मांघर गावातील सगळेच मधपाळ स्वतःच्या उन्नती सोबतच गावचे देखील नाव होण्यासाठी व ग्राहकांना दर्जेदार मध उपलब्ध होण्यासाठी कष्ट करत आहेत.आगामी काळात भीती फक्त एवढीच आहे की, तीव्र वातावरणातील बदलांमुळे वनस्पतींचा बहर कमी होऊन मधमाश्यांना कोठून फुलांपरी या मकरंद मिळावा? असा प्रश्न पडेल की काय याची चिंता सर्वांनाच सतावत आहे.
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






