-
मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांचं सोयाबीन पाण्याखाली गेलं. आणखी नुकसान नको म्हणून कोवळं सोयाबीनही शेतातून काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कमी आलेलं उत्पन्न आणि त्यातही पुरेसा नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
-
'पेरणीच्या वेळी पाऊस नीट पडत नाही. बरं, पडला तर कमी पडतो. मग सोयाबीनचे दाणेच भरत नाहीत. एखादवेळी जास्त पाऊस पडतो तर सोयाबीनचं पेरलेलं बी वाहून जातं. नंतरच्या काळात आभाळ आलं तर सोयाबीनवर अळी पडते. आता असा पाऊस पडतोय की सोंगण्याआधीच ते सोयाबीन सडून जातं. जास्त ऊन पडलं तर दाणे फुटतात. मग अशात काय करणार?'
"दोन तीन दिसाआधी पाऊस झाला. सोयाबीन सोंगायला आलं नाही. कोवळंच सोयाबीन सुरु केलं सोंगायला. खालच्या वावरात चिखलयं. धसकट घुसतेत पायात…" भल्या दुपारी, रखरखत्या उन्हात आपल्या सोयाबीनच्या शेतात बसून लताबाई मोरे दोन गोष्टी सांगत होत्या.
सोयाबीन सोंगणे म्हणजे शेतात जाऊन सोयाबीन काढणे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये या प्रक्रीयेला ‘सोंगणे’ असं म्हणतात.
पायात चिखलाने भरलेली चप्पल, डाव्या हातात जुनेपुराणे हातमोजे, उजव्या हातात विळा, अंगावर मळकी साडी, साडीवर जर्कीन आणि चेहऱ्यावर घाम…
दोन-तीन दिवस आधीच इथे पाऊस झालेला. पण आज मात्र कडक ऊन पडलेलं.
‘’सोयाबीन सोंगायला आलेलं नसतानाही ते का काढताय?’’
उन्हामुळे डोळे बारीक करून बघणाऱ्या 40 वर्षांच्या लताबाईं म्हणाल्या, 'पाऊस सुरुये ना! दोन तीन दिसापासून पाऊस सुरुये! आता जे सोयाबीन खराब झालं ते झालं, पण जे शेतात आहे ते तरी राहील ना! नुकसान तर झालंच आहे! त्याला कोण काय करणार!'
जालना जिल्हा… मराठवाड्यात इतर ठिकाणी झाला तसा इथेही ऑक्टोबर महिन्यात तुफान पाऊस झाला किंवा अधून मधून काही दिवस जोरदार फटकारे मारत राहिला असं देखील म्हणता येईल. कित्येक शेतकऱ्यांचं सोयाबीन पाण्याखाली गेलं. पण हे फक्त सोयाबीन सोंगण्याच्या वेळी झालं असं नाही. सोयाबीन पेरणीच्या वेळीही म्हणजे जूनच्या महिन्यात पावसाच्या लपंडावामुळे सोयाबीन उगवूनच आलेलं नव्हतं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. आता ते सोयाबीन गेल्या महिन्यापर्यंत काढणीला आलं नव्हतं. पण अवकाळी पावसाने नुकसान झालं. आणखी नुकसान नको म्हणून कोवळं सोयाबीनही सोंगल्या जात आहे. त्यामुळे आता कमी आलेलं उत्पन्न आणि त्यातही पुरेसा नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
आम्ही उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देत आहोत असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. दुसरीकडे राज्यभर सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रासलेला आहे. सरकारी दावे आणि शेतातील मूळ परिस्थिती यात मोठी तफावत दिसून येते. सोयाबीनला योग्य हमीभाव मिळण्याबाबत शेतकरी मागणी करत आहेत. पण यावर गांभीर्याने विचार करण्यास तसदी नसलेल्या सरकारला निवडणुकीच्या गोंगाटात हे काहीच ऐकू येत नाही की जाणीवपूर्वक हात वर केले जात आहेत? हे मात्र कळून येत नाही.
'वातावरण बदललं, पावसाचा भरोसा राहिला नाही'
घाईगडबडीत दिवस-दिवस आपल्या शेतातील सोयाबीन काढणाऱ्या लताबाईंसारख्या जालना भागात अनेक महिला आहेत. शेतीकामात प्रचंड शारीरिक कष्ट घ्यावे लागतात. पण या महिलांसाठी ही नवीन गोष्ट नाही. वयात आल्या तेव्हापासून त्या शेतात राबतात. गेल्या काही दशकांपासून बदलत चाललेल्या वातावरणाशी त्या अनभिज्ञ नाहीत. जालनाच्या खादगाव गावाच्या अर्धा एक किलोमीटरच्या परिघात फिरताना कासाबाई मोरे भेटतात. त्यांच्या सुनांसह त्या सोयाबीन काढत होत्या. कासाबाई म्हणाल्या, 'पहिलं टाईमावर पाऊस पडत होता, आता तसं नाही. बेटाइम पाऊस सुरूय. एक रोज पाऊस पडतो तर एक रोज कडक ऊन पडतं. त्यामुळे धाकापोटी काम करावं लागतं. आता ही सोयाबीन सुद्धा धाकामारीच काढणं सुरूय. ते बघा ना, काही झाडं कोवळीच आहेत! पण आता काय करता?
सगळंच कसं अवेळी होतंय हा प्रश्न पडलेल्या कासाबाई एकट्या नाहीत. सर्वच शेतकरी चिंतातुर आहेत, सरकार आणि निसर्गाकडे आस लावून आहेत.
चोहीकडून शेतकऱ्याचं मरण!
एकविसाव्या शतकाचं हे तिसरं दशक सुरु आहे. मानवाने जमिनीत उज्ज्वल भविष्य पेरलं, शेती विकसित झाली तेव्हा विकास उदयास आला. तेव्हापासून ते आजवर शेतीत नाना संशोधन आणि प्रयोग झाले. कमी क्षेत्रात विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची नावेही कानावर पडत असतात. पण नीट निरखून आणि एकूणच महाराष्ट्रात शेतीची वर्तमान स्थिती बघितली तर ती अतिशय गंभीर बनली आहे.
सोयाबीन 'सोंगत' असलेल्या महिलांपैकी एक सुमित्राबाईंनी सांगितलं, 'पेरणीच्या वेळी पाऊस नीट पडत नाही. बरं, पडला तर कमी पडतो. मग सोयाबीनचे दाणेच भरत नाहीत. एखादवेळी जास्त पाऊस पडतो तर सोयाबीनचं पेरलेलं बी वाहून जातं. नंतरच्या काळात आभाळ आलं तर सोयाबीनवर अळी पडते. आता असा पाऊस पडतोय की सोंगण्याआधीच ते सोयाबीन सडून जातं. जास्त ऊन पडलं तर दाणे फुटतात. मग अशात काय करणार?' 
'जर सोयाबीन इतकं नुकसान करतंय तर दुसरं पीक का घेत नाही?'
सकाळपासून सोंगत आलेल्या सोयाबीनच्या छोटछोट्या गंजांकडे बघत सुमित्राबाईंनी जरा श्वास घेतला आणि त्या लागलीच उत्तरल्या, 'दुसरं पीक येतच नाही आमच्या वावरात! सारं शेत चिभडतं आमचं! दुसरं काय लावणार? त्याला पाणी नाही काही नाही!'
शेत चिभडंतं म्हणजे शेत पाणी पकडून ठेवतं, त्याने पीक खराब होतं. ‘बाईमाणूस’च्या टीमने इतर ज्या ज्या महिलांशी संवाद साधला त्यांचाही सूर असाच काहीसा होता. त्या त्रस्त आहेत पण तरीही शेतीकाम करण्याशिवाय यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.
सोयाबीनचं आर्थिक गणित असं गंडलंय?
खादगावचे शेतकरी रामेश्वर मोरे यांनी हे आर्थिक गणित समजावून सांगितलं. सकाळी सहा पासून संध्याकाळी सात- आठ वाजेपर्यंत ते शेतीकामात असतात. सोयाबीनचा विषय काढल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी, चिंता आणि राग या गोष्टी एकाच वेळी दिसून येत होत्या. त्याचं कारण पुढे त्यांच्या बोलण्यातून कळलं. त्यांनी एक एकर क्षेत्रानुसार शेतीचं गणित सांगितलं.
ते म्हणाले, "एकरी २८ किलो बियाणं लागतं. बियांची बॅग तीन ते साडेतीन हजारांपर्यंत येते. पेरण्याआधी नांगरणी करावी लागते. त्यासाठी ट्रॅक्टरवाला १८०० रुपये घेतो. त्यानंतर खताची गोणी १५०० रुपयांना. राशन्यासह (पेरलेलं बी तेव्हाच मातीने झाकून टाकणे) पेरणी केली तर ट्रॅक्टरवाला एकरी हजार ते दीड हजार रु घेतो. शेतात खुरपणीसाठी मजूर लावले तर दोन दिवसाचे २ हजार घेतात. पुन्हा कोळपणीही आलीच. दोन वेळा त्याचे दोन-अडीच हजार गेले. त्यानंतर फुलगळ होऊ नये किंवा अळी पडू नये म्हणून फवारणी येते. त्यात दोन हजार खर्च होतात.
पुढे साडेचार हजार रु एकरने सोयाबीन सोंगायला घेतली. ती सोयाबीन उफनेरने काढून घेण्यासाठी एक क्विंटलमागे २०० ते ३०० घेतात. एकरी आपल्याला ५-६ क्विंटलवर सोयाबीनवर समाधान मानावं लागतं. त्यात गेले १५००. एकूण खर्च होतो साधारणपणे २० हजार. शासनाने यावर्षी सोयाबीनला ४८९२ रुपये इतका हमीभाव दिलाय. पण बाजार समित्यांमध्ये सोयाबीन साडेतीन हजार ते चार हजाराने घेतली जात आहे. पावसामुळे एकरी उत्पन्न फक्त ५ ते ६ क्विंटलवर आलं आहे. त्यात मिळणार २४ हजार. नावाला चार पाच हजार निघतात."
"या सगळ्यात घरातील आम्हा पुरुष आणि महिलांचा वेळ, घाम, श्रम खर्च झाले त्यानुसार हा आकडा बघितला तर थट्टा वाटते. आम्ही ट्रॅक्टर ऐवजी बैलांचा वापर करतो. मजूरही नसले तरी दहा ते पंधरा हजारही आले तर ते सगळ्या परिवाराला पुरणार कसे ?"
पुढे दीर्घ श्वास घेत ते म्हणाले, "आम्ही तरीही सोयाबीन पेरतो कारण आम्हाला वाटतं की योग्य वेळी पुरेसा पाऊस पडेल, भाव चांगला भेटेल. पण दोन्ही गोष्टींचं काही खरं नाही. मग शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार?" 
महिला शेतकऱ्यांच्या शारीरिक कष्टांची नोंद कुठे ?
शेतीकाम मुळात अवघड. त्यात माणसाचा कस लागतो. ऊन, वारा, पाऊस याकडे दुर्लक्ष करून या महिला 'आपल्या वाट्याला हे जन्मजातच आलंय' असं म्हणून राब राब राबतात. त्यात घरकाम वेगळं. सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्यांची कामे ठरलेली असतात. पेरणी, निंदणी, खुरपणी, सोंगणी वगैरे वगैरे. सकाळी घरकाम आटोपून कुणी सात-आठ तर नऊ-दहा वाजेपर्यंत शेत गाठतं. मग सावली पायाखाली येईस्तोवर काम करत करत न्याहारीची वेळ होते.
आम्ही या महिलांसोबत दिवसभर होतो. शेताच्या कडेला खूप जुनी ढासळलेली विहीर आणि त्या विहिरीला लागूनच भलं मोठं रामफळाचं झाड. या झाडाखाली सर्व महिलामंडळ एकत्रित जेवणासाठी बसलं होतं. एकमेकींनी आणलेल्या भाज्यांची चव घेत या महिला आभाळ चाळत बसलेल्या. तेवढ्यात सुमित्राबाईंच्या तळपायावर एक जखम दिसली. त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'धसकट लागलं काल. हे काय, हातपण चिरलेत.'
सोयाबीनच्या शेंगा वाळल्यावर त्या टोकाच्या बाजूने काटेरी होतात. त्यामुळे काढणीच्या वेळी हात ठिकठिकाणी चिरल्या जाणं साहजिक आहे. त्यामुळे या महिला हातमोजेदेखील वापरतात. पण तरीही इजा होतेच. बरं हे कामाच्या गडबडीत जाणवत नसलं तरी जेवतांना भाजी हाताला लागली की मग मुंग्या चावल्यासारख्या वेदना होतात. पण 'हे व्हायचंच' म्हणून या महिला याकडे दुर्लक्ष करतात.
त्यांना समोर उत्पन्न दिसतं. उत्पन्न चांगलं आलं तर वर्ष निघेल, दिवाळी गोड होईल या आशेवर त्या असतात. पीक कुठलंही असो त्याच्या मशागतीत महिलाच अधिक प्रमाणात होरपळून निघतात. शेतातून काढलेलं सोयाबीन कोरड्या जागेवर नेऊन सुकण्यासाठी ठेवावं लागतं. पण जराही आभाळ भरून आलं की लगेच गोळा करून त्याला झाकावं लागतं. पाऊस येणार नाही असा अंदाज असतांनाही रात्री अचानकच पाऊस हजेरी लावून जातो. पण वाळत घातलेलं सोयाबीन भिजतं. हे चक्र वर्षानुवर्षे वाढत चाललं आहे. पण जीवापाड मेहनत करूनही उत्पन्न असो किंवा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही.

सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत धादांत खोटं बोलतंय!
मराठवाड्यातील एकूणच शेतीप्रश्नांसंदर्भात शेतकरी नेते कालिदास आपेट यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की,"दरवर्षी सरकार सांगतंय की सोयाबीन उत्पादकांना, कापूस उत्पादकांना ज्या पिकांची आधारभूत किंमत जाहीर केली जाते ती उत्पादन खर्च + ५० टक्के नफा धरून दिली जाते. हे सरकार धादांत खोटं बोलतंय. सोयाबीनला ६९४५ रु प्रति क्विंटल आधारभूत किंमत असावी अशी शिफारस केलेली असतानांही केंद्र सरकारने ती फक्त ४८९२ रुपयांवर आणली. त्यातही, अनेक बाजारसमित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन घेतलं जात असूनसुद्धा त्या बाजार समित्यांवर कारवाई केली जात नाही आहे. जर शेतकऱ्याचं मरण थांबवायचं असेल तर देशभरातून सोयाबीनची विनाअट निर्यात सुरु करणं गरजेचं आहे."
शेतकरी 'राजा' राहिला नाही !
रात्री अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी अथवा अचानक पाऊस सुरु झाला तर रामेश्वर मोरे यांना शेत गाठावं लागतं. गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं शेत आहे. यात त्यांचा मुलगा आदित्यही त्यांच्याच सोबत शेतीकामात असतो. शेतीत फजिती सोडून काही राहीलं नसल्याचं ते म्हणतात.
वाळत घातलेल्या सोयाबीनजवळबसून ते आम्हाला म्हणाले, " लोक म्हणायचे आधी की शेतकरी राजाय म्हणून! पण आता शेतकरी राजा नाही राहिला. आता नोकरदार राजा झाला अन् शेतकरी परेशान आहे!'
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






