क्रांती यादव
- कधी मोर्चा, कधी सोशल मीडिया आणि आता तर राज्य सरकारच्या अधिवेशनातही एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे ‘शेतकरी नवरा नको गं बाई’.
- राज्याच्या अनेक भागात आज हजारो शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुली न मिळणं ही एक ज्वलंत सामाजिक समस्या बनली आहे, मग तो शेतकरी बागायतदार असो वा शेतमजूर…
- याच पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागांत लग्नाचं वय उलटून गेलेल्या काही तरुण शेतकऱ्यांची आणि मुलींची भेट घेतली. सुयोग्य जोडीदार शोधणाऱ्या, भ्रमनिरास झालेल्या, घाबरलेल्या आणि भविष्याविषयी कमालीची अनिश्चितता असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.
'टू-बीएचके, थ्री-बीएचके फ्लॅटला ताजमहल म्हणून फसू नको,
दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे, तुझ्या बापाच्या घराला,
तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको…
'मोबाइलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही,
शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही.
रुजायचं असलं, भिजायच असलं तर हवी असते माती
अन् वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर,
आयुष्य करायचं असलं हिरवगार तर,
पोरी, शेतकरी पोराशी लग्न कर..!'
प्रा. संदीप जगताप यांची ही कविता अलीकडच्या काळात सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाली. शेतीचं आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व आणि तरुण शेतकऱ्यांच्या व्यथांना त्यांनी या कवितेतून वाट मोकळी करून दिलीये.
परंतू हजारो बिनलग्नाच्या शेतकरी तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या कवितेचा हा आर्त स्वर खरोखर ग्रामीण भागातील मुलींना ऐकू येतोय का…?

‘’कशासाठी आम्ही शेतकरी मुलांच्या गळ्यात माळ टाकायची. या शेतीमुळे माझ्या बापाचे अन् आईचे हाल मी जवळून पाहिलेत, मला माझ्या आईसारखं आयुष्य नाही जगायचं… निसर्ग झालाय बेभरवशाचा, त्यामुळं शेतीही आता झालीये बेभरवशाची, शेतीतून मिळणारं उत्पन्नदेखील बेभरवशाचं झालयं आणि शेतीची प्रतिष्ठा कधीच बाराच्या भावात गेलीये. लहानपणापासून गरिबीचेच चटके सहन करत आलीये, त्यामुळं आता शेतकरी नवरा नको गं बाई, असं म्हणणारी मीच नाही तर माझ्यासारख्या कैकजणी आहेत.’’
२४ वर्षाच्या अकोल्याच्या साक्षीचे हे जळजळीत उद्गार वरच्या कवितेला दिलेले एक प्रातिनिधिक उत्तर आहे. साक्षीची ही प्रतिक्रिया सध्याच्या सामाजिक वास्तवावर अचुक भाष्य करते. अलीकडच्या काळात शेतकरी मुलांची लग्न हा विषय ऐरणीवर आलाय, इतका की तो मोर्च्याच्या रुपाने, सोशल मीडियावर आणि थेट राज्याच्या अधिवेशनातही गाजतोय. ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पस्तीशी ओलांडलेली बिनलग्नाची शेतकरी तरुण गावागावांत आढळतात. बागायतदार असो, वा शेतमजूर… दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाचा असो वा समृद्ध अशा पश्चिम महाराष्ट्राचा, शेतकरी तरुणांचं लग्न न होणं किंवा लग्नासाठी मुलगी न मिळणं ही आता कौटुंबिक बाब न राहता एक ज्लवंत अशी सामाजिक समस्या बनली आहे.
‘मुख्यमंत्री साहेब, आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी द्या!'
‘शेतकरी नवरा नको गं बाई’ हा मुद्दा सर्वप्रथम चर्चेला आला तो २०२२मध्ये, जेव्हा सोलापूर शहरातील काही युवकांनी बाशिंग बांधून एक मोर्चा काढला होता. त्यानंतर राजेंद्र महाले या शेतकरी तरुणाने गुडघ्याला, कपाळाला आणि हाताला बाशिंग बांधून जळगावमध्ये ‘बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे' असा फलक घेऊन आंदोलन केलं. “मी दहा एकर बागायत शेतीचा मालक आहे, बीएससी ॲग्री झालंय; मात्र नोकरी नाही म्हणून मुलींकडून नकार येतो. शेतकऱ्यांच्या मुलांनी लग्न कोणाबरोबर करायचं?” असा सवाल राजेंद्रने व्यवस्थेला विचारला होता. आणि अगदी अलीकडेच जयपाल भांडारकर नावाच्या एका शेतकरी तरुणाने थेट ‘मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या, नाही तर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी द्या!' असा फलक हातात घेऊन तमाम प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतलं होतं.
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. असे आपल्याकडे पूर्वी मानले जात होते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी हे तत्व मानले आणि पाळले जात होते. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांना सर्वच बाबतीत प्राधान्य होते. एवढेच कशाला अलीकडच्या काळात नोकरी व्यावसायातील मुलांची लग्न जमवितानाही गावी शेती आहे का? हे पाहिले जायचे. हळूहूळ हे समीकरण बदलत गेले. तिसऱ्या स्थानावर असलेली नोकरी पहिल्या स्थानावर कधी आली ते कळलेच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल आता नोकरीकडे आहे. त्यामुळे लग्न करतानाही नोकरी हाच प्राध्यान्यक्रम लावला जातो आहे. मोठ्या बागायतदार मुलापेक्षा शहरात शिपाई अगर खासगी कारखान्यात छोटी-मोठी नोकरी करणारा मुलगा असला तरी चालेल, असे मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे.

शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली न मिळणं याची कितीही सामाजिक-आर्थिक-मानसिक कारणं असली तरी त्यामागचं मूळ कारण आहे की, शेतीतून होणाऱ्या कमाईवर आता कुणीच प्रपंच चालवू शकत नाही. हवामान बदलाचा शेतीवर झालेला गंभीर परिणाम हे त्याचं मूळ. वातावरण बदलांमुळे अवेळी पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी, अति उष्णतेची लाट, अचानक येणारे जोराचे पाऊस, त्यामुळे उद्भवणारा ओला दुष्काळ किंवा पावसाअभावी पडणारा कोरडा दुष्काळ अशा अनेक आपत्तींमुळे शेती आता शाश्वत राहिलेली नाही.
हवामान बदल आणि शेतकरी तरुणांची रखडलेली लग्नं
हवामानातील विविध घटकांपैकी पाऊस हा पीक वाढीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोरडवाहू शेतीमध्ये तर संपूर्ण पीक उत्पादन हे पावसांवर अवलंबून असते. बागायती शेतीही पावसाच्या जमिनीमध्ये भूजलाच्या स्वरूपात साठलेल्या किंवा वाहत्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे कमी व अनियमित पडणाऱ्या पावसाचे विपरीत परिणाम शेतीच्या उत्पादनावर झाल्याशिवाय राहत नाहीत. पावसानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे तापमान आहे. हवामानातील बदलत्या तापमानामुळे पिकांच्या वाढीच्या अवस्थेत विविध प्रकारचे अडथळे येतात. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून येतो. एखाद्या हंगामात अपेक्षित उष्ण किंवा थंड तापमानापेक्षा अचानक बदल होऊन वेगळेच वातावरण राहिल्यास त्याचे विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतात. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ होऊन भूजल पातळीत घट होते. सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो.
याच पार्श्वभूमीवर २०२६ च्या सुरुवातीला ‘बाईमाणूस’ने ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागांत लग्नाचं वय उलटून गेलेल्या काही तरुण शेतकऱ्यांची आणि मुलींची, त्यांच्या पालकांची भेट घेतली. आपल्याला सुयोग्य जोडीदार शोधणाऱ्या, भ्रमनिरास झालेल्या, घाबरलेल्या आणि भविष्याविषयी कमालीची अनिश्चितता असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.
'गावच्या गावात ट्रकभर पोरं लग्नाची राहिली आहेत’’
संध्याकाळची वेळ झाली की गावागावांतल्या नाक्यांवर, हनुमान मंदिराच्या ओट्यावर किंवा एसटी स्टँडच्या बाकड्यावर तरुणांची गदीं जमते. ही सगळी तरुण मुलं दिसायला धष्टपुष्ट, सुशिक्षित आणि त्यांच्याकडे हक्काची जमीनही आहे. पण त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र रिकामेपण जाणवतं. विशी ओलांडली, पंचविशी सरली आणि आता ती तिशी-पस्तिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. त्यांच्या गळ्यात लग्नाची माळ पडण्याऐवजी वयाची वाढती वर्षे गळफास बनत चालली आहेत. 'गावच्या गावात ट्रकभर पोरं लग्नाची राहिली आहेत, हे वाक्य आज ग्रामीण महाराष्ट्राचं सर्वात मोठं वास्तव बनलं आहे.

अकोला, जिथे मार्च महिन्यापासूनस सूर्य आग ओकायला लागतो त्या जिल्ह्यातील घुसर,लाखोंडा,दोनवाडा यासारख्या अनेक गावांत पस्तीशी ओलांडलेली १५ ते २० तरुणआहेत, त्यापैकी काहींनी तर आपलं लग्न होईल ही अशीदेखील आता सोडली आहे.
‘’मी घरातल्या विवाहसोहळ्यांना जाणं आता बंद केलंय,” दोनवाडा गावातील सोनू, वय ३५ सांगतो. त्याची शेती आहे आणि त्याने पदवीचं शिक्षण घेतलं आहे. “कारण दर वेळी मी दिसलो की लोक मला लग्न कधी करणार असं विचारत राहतात,” तो सांगतो. “वैताग येतो आणि ओशाळवाणं होतं. “मानसिक त्रासातून जाताना अनेक वाईट विचार मनात येतात. व्यसन करण्याची इच्छा होते पण डोळ्यासमोर आईवडील येतात.”
‘’माझी पाच एकर शेती आहे. मी बीए केलं. पुण्यात एक वर्ष नोकरी केली. पण शेती बघण्यासाठी कुणी नाही त्यामुळे परत आलो. आता कांदे, टोमँटो करतो. वर्षाला पाचेक लाख उत्पन्न काढत होतो. गेल्या दोन-तीन वर्षांत गारपिटीच्या पावसाने अतोनात नुकसान झालं. हे सगळं असंच सुरू राहणार असल्याची मुलींना आता खात्री पटल्यामुळे लग्नासाठी मुली मिळत नाहीत. कोणत्याही कंपनीला ५ हजारांवर कंत्राटी नोकरी असेल तरी चालेल, पण शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, असे लोक म्हणतात. माझे यंदा ३७ चालू आहे. नोकरी करणाऱ्या सगळ्या बरोबरीच्या मित्रांची लग्ने झाली. आता मी कुणाच्या लग्नालाही जात नाही. सगळेजण विचारत राहतात, काय अजून जमलं नाही का म्हणून... जमवण्यासाठी मात्र कुणी काहीच करत नाही. वाईट वाटतं.’’ विकास नावाचा तरुण सांगतो.
सोनू झटाले
“सरकार जिकडून तिकडून उद्योगपतींनाच वाचवतं. त्यांना लागणारा माल सरकार घेतो आणि त्यानुसार शेतकर्याला हमीभाव मिळतो. आत्ताच ओला दुष्काळ पडला, आमच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, पण वाचलं कोण, तर उद्योगपती. सरकारने बाहेरच्या देशातून कापूस मागवला. त्यामुळे आमच्या कापसाच्या किंमती आपोआप ढासळल्या. कापसाची आयात केली नसती तर आपल्या देशातील शेतकऱ्यांचा कापूस पुरला असता. त्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे हातात आलेल पीक गेलं. महागाई इतकी वाढतेय पण आमच्या शेतमालाचे भाव वाढत नाहीत. दहा वर्षांपूर्वी जे भाव होते तेच आजही आहेत.
आमचे हमीभाव आम्हाला ठरवू द्या. शेतकर्यांसाठी असलेल्या सरकारी योजनांमधून शासन भिक दिल्यासारखा पैसा देतं. योग्य हमीभाव दिला तर आम्हाला कर्जमाफी नको ना अतिवृष्टीची भरपाई. भारत नावापुरता कृषिप्रधान देश उरला आहे. शेतकऱ्याचा कोणत्याच प्रकारचा विचार केला जात नाही.” असा दोनवाडा गावातील अठ्ठावीस वर्षाचा ललित नावाचा शेतकरी तरुण सरकारच्या उदासीन धोरणाबद्दल आक्रोश व्यक्त करतो.
ग्रामीण भागात तरुणांची लैंगिक घुसमट आणि व्यसन
वर्षानुवर्षे सातत्याने विदर्भ-मराठवाड्यातील निसर्गाचं अनियमित चक्र, हवामान बदल, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, वाढतं तापमान, शेतीच नुकसान, अवकळी पाऊस,पिकाला योग्य हमीभव नसणे, पाणी टंचाई, कर्जबाजारीपणा, खत-बियाण्याच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी कोलमडून पडत आहे. गेल्या अकरा महिन्यात पश्चिम विदर्भात ९७३ शेतकरी आत्महत्या झाल्या, तर मराठवाड्यात १०१४ शेतकरी आत्महत्या झाल्या. गेल्या दशकभरात शेतकरी आत्महत्यांची वार्षिक सरासरी ९५६ एवढी आहे.

या भागातील प्रत्येक गावात वयाची पस्तीशी ओलांडलेले १० ते १५ तरुण आहेतच. काही गावात हीच संख्या ३० ते ३५ च्या घरातदेखील आहे. लग्न होत नसल्याने त्यांना नैराश्य, वैफल्य येऊ लागतं. त्यांना समजून घेणारं, त्यांच्याशी सामोपचाराने बोलणारं कोणीही नसतं. त्यामुळे हे तरुण व्यसनांच्या आहारी जातात. व्यसनी झाल्याने मग लग्न होण्यात अडचणी येतात आणि हे चक्र पुन्हा तसंच सुरू राहतं. वाढत्या वयाचं आणि म्हातार्या आई वडिलांचं टेंशन त्यांना येतं.
आपलं लग्न होणारच नाही या विचाराने, गावातील इतर लग्न झालेल्या मुलांशी स्वत:ची तुलना करत ते मनातून खचून जातात. तरुणांचा एकटेपणा प्रचंड वाढलेला आहे. त्यांच्या घरात कलह, आईवडिलांसोबत सतत वाद होत आहेत. वर्षाला एक सुद्धा स्थळ येत नाही. गावातील लोक वारंवार लग्नाबद्दल विचारतात. सततच्या या प्रश्नाला तोंड देण्यापेक्षा मुलं बाहेरील लोकांचा सहवास टाळतात. शेतीला निसर्गाची साथ नाही, पिकाला मिळणारा कमी हमीभाव आणि वारंवार लग्नासाठी येणारा नकार यामुळे गावोगावच्या अनेक तरुणांची अवस्था अक्षरश: दयनीय झाली आहे.
“शेतीची परिस्थिती अशीच राहिली तर गावं ओसाड पडतील. निसर्गाची साथ आम्हाला कधी असते तर कधी नसते. यावर्षी पिक जोमानं आलं तर पुढच्या वेळेस येईलचं असं नाही. त्यामुळे या गावातील मुलांना लग्नासाठी स्थळ येत नाहीत.” दोनवडा गावचे सरपंच श्रीकृष्ण झटाले आगतिकतीने सांगत होते.
शेतीसाठी हवामान पूरक नसल्याने शेतीतून येणार्या उत्पन्नाची खात्री नाही. त्यामुळे या भागातील तरुण शेतीचे एकेक तुकडे विकायला लागले आहेत. सर्वांचं लक्ष शहराकडे, नोकरीकडे, छोटामोठा व्यवसाय करण्याकडे असल्याचं दिसतं. सर्वांच्या घरी कमी जास्त शेती आहे. परंतु हे तरुण शेतीकडे आता दुर्लक्ष करत आहेत. मुलींचे आईवडील आणि मुली शेतकरी मुलांना लग्नासाठी नकार देतात. सध्या तर अशी परिस्थिती आहे की गावांमध्ये वर्षाला फारतर एखाददुसरं लग्न होतात. जवळपास प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे, सरपंच श्रीकृष्ण झटाले ‘बाईमाणूस’ला सांगत होते.
श्रीकृष्ण झटाले
मराठा मिलन वधू-वर सूचक संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता वाळुंज म्हणतात, वधू-वर सूचक संस्था चालवत असताना शेती करणाऱ्या स्थळांना मुलींचे पालक नाकारतात. हा एक सामाजिक प्रश्न आहे. यावर उपाययोजना करण्याचा विचार आम्ही करीत आहोत. शिपाई असला तरी, पण मुलींना नोकरीवालाच पती हवा अशी त्यांची स्पष्ट अट असते. शहरातील हवा ही दुसरी. सधन शेती असेल, गावाकडे बंगला, गाडी असेल तरी नको अशी धारणा वाढत आहे.
आज गावागावांत उपवर, लग्नाचं वय उलटून गेलेल्या तरुणांच्या झुंडीच्या झुंडी तयार झालेल्या आहेत. नव्वदीनंतर जन्माला आलेल्या या पिढीच्या कपाळावर नियतीने लैंगिक सुखासाठीचा भयंकर संघर्ष लिहून ठेवला आहे, अशी एक वेगळी बाजू युवा शेतकरी आणि पत्रकार सोमनाथ कन्नर उपस्थित करतात.
‘’हा तसा नाजूक विषय. त्यामुळे त्यावर उघड चर्चा होत नाही. एकूण लैंगिकतेशी संबंधित गोष्टींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजून परिपक्व नाही. त्यामुळे अशा विषयांवर दबक्या आवाजात चर्चा होते. वास्तविक हा विषय गंभीर आहे. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे ग्रामीण भागात गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. त्यातून ग्रामीण समाजाचे स्वास्थ्य हरवत चालले आहे. दिवसेंदिवस अविवाहित तरुणांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुर वर्गाने शेती कसत आपलं पूर्ण जीवन काढलं. त्यातून आयुष्यात फारसे बदल झाल्याचे दिसून येत नाही. ना जीवनमानाचा दर्जा सुधारला, ना आर्थिक परिस्थिती बदलली. त्यामुळे ग्रामीण भागाबद्दल बहुतांशी समाजामध्ये टोकाची नकारात्मक मानसिकता तयार झाली आहे. प्रत्येकाला जोडीदार हा शहरात राहणारा, नोकरी करणारा असा हवा आहे. सरकारी नोकरीची अपेक्षा वाढली आहे. एकरभर रान विकू पण मुलगी नोकरीवाल्यालाच देऊ, ही मानसिकता तयार झाली आहे.’’ असं सोमनाथ कन्नर सांगतात.

मोबाइलमुळे समाजमाध्यमं प्रत्येकाच्या हाती सहजपणे उपलब्ध झाल्याने चांगल्यासोबत वाईटही समोर येऊ लागलं. अनेक समाजमाध्यमांवर अश्लील कन्टेन्ट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. बहुतांश वेब सीरिज, चित्रपट, मालिका अश्लील कन्टेन्टशिवाय पूर्णच होत नाहीत, अशी स्थिती आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब यासारखी अनेक माध्यमं व त्यावरील उद्युक्त करणारा कन्टेन्ट वापरकर्त्याला तासनतास खिळवून ठेवतात. यातून कामुकता झिरपत जाते.
हा कन्टेन्ट कामगंध सापळ्यांसारखा तरुणांना आपल्या विळख्यात घेतोय. पॉर्न असो किंवा या वेब सीरिसच्या माध्यमातून दाखवला जाणारा सॉफ्ट पॉर्न असो, यातून वेगवेगळ्या अनैसर्गिक फॅन्टसी लोकांच्या डोक्यात फिरत असतात. तरुणांच्या डोक्यावर चोवीस तास या क्लिप्सचा मारा होतो. घोळक्या घोळक्याने उभ्या असणाऱ्या या तरुणांच्या गप्पा ऐकल्या तरी लक्षात येईल की यांच्या डोक्यामध्ये आ वासून उभी असलेली भूक नेमकी कोणती आहे ते. योग्य पार्टनर नसणे, प्रायव्हसी नसणे व योग्य लैंगिक ज्ञान नसणे, यामुळे या गरजा पूर्ण होऊ शकत नाही, असा धोका सोमनाथ कन्नर व्यक्त करतात.
‘मुलगी नको' ही मानसिकता प्रबळ
ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक सोमिनाथ घोळवे एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात. जालना, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम, अकोला आणि धाराशिव या जिल्ह्यांतील अनेकांकडून ऐकायला मिळतं की आजही बहुतांश कुटुंबांत मुलीचा जन्म मनापासून स्वीकारला जात नाही. खेडेगावातील बहुतेक कुटुंबांमध्ये मुलगाच हवा अशी इच्छा दिसते. पहिली मुलगी झाली तर दुसरी मुलगी होऊ दिली जात नाही. गर्भनिदान केंद्रात तपासणी करून गर्भपात केला जातो.
यासाठी डॉक्टरांनी पेरलेले मध्यस्थी, दलाल असतात. या दलालांचे गावपातळीपर्यंत संपर्क असतात.गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याला जवळपास ४० वर्षं झाली आहेत, तरीही या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. गावोगावी अनेक सोनोग्राफी सेंटरमध्ये मध्यस्थाच्या माध्यमातून जास्तीचे पैसे घेऊन गर्भलिंग निदान केलं जात असल्याचं समजतं. छुप्या (सांकेतिक) पद्धतीने गर्भलिंग निदान चालू असल्याचं खासगी चर्चेतूनही ऐकू येतं. पूर्वापार चालत आलेल्या भयंकर पद्धतीमुळे ग्रामीण भागात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे साहजिकच मुलांना मुली मिळणं अवघड झालं आहे.
शेतकरी आत्महत्या आणि मुलींचा नकार
शेतमालाला बाजारभाव नसणं, बाजारव्यवस्थेतली घसरण, शेती निविष्ठांचे भाव प्रचंड वेगाने वाढणं, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने खर्च वाढणं, शेतमजुरांची टंचाई, अशा अनेक कारणांनी शेतीत केली जाणारी गुंतवणूक वाढली; मात्र तेवढा वाढीव परतावा मिळत नाही. गेल्या ३० वर्षांत सिंचनाखालील शेतजमीन आक्रसत गेली. शेतीला शाश्वत पाणी मिळणं कमी झालं. पावसाच्या पाण्यावरचं शेतीचं अवलंबित्व वाढलं. परिणामी, शेती अधिकाधिक बेभरवशाची होत गेली. त्यामुळे शेतीतून मिळणारं उत्पन्नदेखील बेभरवशाचं झालं आणि शेतीची प्रतिष्ठा घसरली.

शेतकरी नवरा नको, अशी मानसिकता मुलींचीच नव्हे, तर त्यांच्या पालकांचीही झालेली दिसते. शेतीत वर्षाला लाखो रुपयांचं उत्पन्न घेणाऱ्या, चांगलं घरदार असलेल्या मुलांचीही लग्नं ठरत नाहीत. कोणत्याही शेतकऱ्याला आपला जावई शेतकरी नको असतो. शहरी नोकरीवाला हवा, गावाकडे राहणारा नको; मात्र सोबत शेतीही हवी, अशा त्यांच्या अटी असतात, असे सोमिनाथ स्पष्ट करतात.
अकोला जिल्ह्यातील लाखोंडा गावातील दोन मुलींचे वडील असणारे किशोर रामागरे सांगतात, “आज मुलगा-मुलगी असा भेद कमी झालाय. आम्ही मुलींना शिकवतो, मुली बाहेर शिकायला जातात. त्यांना आम्ही शेतीच्या कामाला जुंपलेलं नाही. शेतीतील कठोर परिश्रमामुळे मुलींना शेतकर्याशी लग्न करू वाटत नाही. पुरुष फक्त शेतातली काम करतात, घराकाम नाही करत. स्त्रीला जर शेती करायची असेल घरकाम आणि शेतात राबाव लागतं.’’
“आजही लोकांना दोन मुली झाल्या तरी मुलगा पाहिजे असतो पण मुलगा झाला तर मुलगी नको म्हणतात. मधल्या काळात गर्भपात खूप झाले. मुलांचं प्रमाण जास्त मुलींचे प्रमाण कमी झालं आहे. त्याचा हा सगळा परिणाम आहे’’ असा एक गंंभीर मुद्दा किशोर रामागरे स्पष्ट करतात.
लग्न करताना मुली पाण्याा विचार सगळ्यात अगोदर करतात
विदर्भ-मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. पाण्याची कमतरता असल्याने पाण्यासाठी किती तरी लांबच लांब पायपीट स्त्रियांना करावी लागते. त्यामुळे मुली दुष्काळग्रस्त भागात लग्नासाठी तयार नाहीत. दोनवाडा गावातील चोवीस वर्षाची वैष्णवी सांगते, “शेतकरी असल्याची किंमत मिळत नाही. स्वतःसाठी काय घ्यायचं म्हणलं तरी नवऱ्यासमोर हात पसरावा लागतो. शेती करणार्या माझ्या आईचे हाल मी पाहत आली आहे. तिच्या कामाचा कोणताही मोबदला नसतो, कोणत्याही निर्णयामध्ये आईचा सहभाग नसतो. त्यामुळे मी शिक्षण घेणार आहे. माझी स्वप्न मोठी आहेत.’’

गावाकडे मिळणाऱ्या करियरच्या कमी संधी
स्त्रियांच्या विविध प्रश्नावर काम करणाऱ्या लेखिका लक्ष्मी यादव सांगतात, “पूर्वीच्या काळी जेव्हा मुलींचे शिक्षण कमी होते तेव्हा मुलीचे लग्न ज्या कोणत्याही घरी लावून दिले जात असे त्या घरी ती मुलगी गपगुमान राहायला जात असे.पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व समजल्याने त्यांनी मुलींच्या शिक्षणावर काम केले. मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या. लग्नाच्या बाबतीत स्वत:ची मते मांडू लागल्या. महाराष्ट्रातील गाव अजूनही पितृसत्ताक व्यवस्थेचे पाईक असल्याने विवाहसंस्थेत नवरा, सासरचे, नातेवाईक आणि एकुणच समाज अजूनही जुन्या रूढी,परंपरा मानणारा आणि स्त्रियांवर बंधने टाकणारा आहे. गावाकडे मिळणाऱ्या करियरच्या, व्यक्तिमत्व विकासाच्या कमी संधी. यामुळेही मुली आणि त्यांच्या आईवडिलांचा ओढा शहराकडे आहे. त्यामुळे शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या मुलींनाही स्वातंत्र्य हवं आहे,त्यांना बंधनात आयुष्य काढायचं नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे कमी पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणचे पुरुष स्थलांतर करतात. लग्नानंतर मुलीनाही स्थलांतर करावे लागते. याउलट दुष्काळी भागातील मुलींची लग्न कमी वयात लावणे, किंवा दुष्काळी भागातील मुली इतर राज्यात लग्न करून पाठवून देणे, घरातील खायची तोंडे कमी करण्यासाठी त्यांचे बालविवाह करून देणे असे प्रकार चालतात. मुलींचे गरिबीमुळे शिक्षण थांबते. शेतीमध्ये शारीरिक कष्ट प्रचंड करावे लागतात. मुली आणि पालकांची त्यासाठी तयारी नसते.शिवाय पाऊस आणि वातावरणाचा भरवसा नाही. वातावरणीय बदलांमुळे कीड आणि रोगराई वाढली आहे.कितीही कष्ट केले तरी शेती परवडत नाही. त्यामुळे शेती करणाऱ्या मुलांना आपली मुलगी देण्यास पालक तयार होत नाहीत.
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






