संजना खंडारे
- पालघर जिल्ह्यात होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर शेती, जंगल आणि सामूहिक आयुष्याशी जोडलेला उत्सव आहे. वारली, कातकरी आणि इतर आदिवासी समाजात होळीपासून संपूर्ण सणचक्राची सुरुवात होते.
- प्रत्येक सण पावसाच्या लयीशी, पिकांच्या वाढीशी आणि निसर्गपूजेशी घट्ट जोडलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे पावसाची वेळ, प्रमाण आणि स्वरूप अनिश्चित झाले आहे.
- पालघरमधील आदिवासी जीवनात हवामान बदलामुळे परंपरा आणि सणसंस्कृतीवर कसा परिणाम होत आहे, याचा वेध घेणारा हा ग्राउंड रिपोर्ट.
पालघर जिल्ह्यात होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तो शेती, जंगल आणि सामूहिक सहभागाचा उत्सव आहे. डोंगरकपारीतील पाड्यांमध्ये होळीच्या आधी लाकूड गोळा केलं जातं, ग्रामदेवतेची पूजा केली जाते आणि रात्री होळीकुंडाभोवती गावकरी एकत्र येतात. पालघरमधील वारली, कातकरी आणि इतर आदिवासी समाजात होळी म्हणजे नव्या कृषीचक्राची चाहूल. काही ठिकाणी कच्च्या आंब्यांची पूजा केली जाते, तर काही भागात होळीच्या दुसऱ्या दिवशी सामूहिक नृत्य आणि ‘तारपा’ वादन होते. पण गेल्या काही वर्षांत या सणाची लय बदलत चालली आहे.
यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्येच तापमान वाढले आहे. हिवाळा लवकर संपला, पाण्याची टंचाई काही भागांत आधीच जाणवायला लागली आहे. रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. परिणामी, होळीचा उत्साहही काही ठिकाणी मर्यादित राहतो. “पूर्वी होळी म्हणजे पिकाच्या समाधानाचा सण होता,” असे जव्हार तालुक्यातील एका वारली आदिवासी शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
होळी संपताच ‘आखाती’ (अक्षय्य तृतीया) येते. त्यानंतर माघ महिन्यात ‘बीज सण’ साजरा होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘कवळी भाजी’ सण येतो. नागपंचमीपासून तारपा वादनाला सुरुवात होते आणि दसरा-दिवाळीपर्यंत ते चालते. ‘नवा खाणं’ सणात नव्या तांदळाचे पोहे किंवा खीर देवाला अर्पण केल्याशिवाय कोणी खात नाही. दिवाळीचा पहिला दिवस ‘वाघबारस’ म्हणून साजरा केला जातो.
(Photo Credit : PARI)
हे संपूर्ण सणचक्र पावसाच्या लयीत बांधलेले आहे. मात्र गेल्या काही वर्षात पावसाचा पॅटर्न बदलला. कधी जून कोरडाच जातो, तर कधी एकदम मुसळधार पाऊस पडून पिकं आणि रानभाज्या वाहून जातात. याचा थेट परिणाम पालघरमधल्या आदिवासींच्या सणांवर होतोय. सणासाठी लागणारी ‘कवळी भाजी’ वेळेवर उगवत नाही. त्यामुळे सण मोठ्या उत्साहात न साजरा होता, फक्त नावापुरता किंवा प्रतीकात्मक राहतो.
हवामान बदलाचा परिणाम इथे केवळ आर्थिक नाही, तर सांस्कृतिकही आहे. आदिवासी जीवनात शेती, निसर्ग आणि सण ही एक साखळी आहे. पाऊस विस्कळीत झाला की शेती बिघडते, शेती बिघडली की सणांचा उत्साह कमी होतो आणि काही वेळा सण साजरेच होत नाहीत. पालघरमधील हवामान बदलामुळे आदिवासी परंपरांवर कसा परिणाम झाला, याचा वेध घेणारा हा ग्राउंड रिपोर्ट.
पालघर आणि आदिवासी संस्कृती
पालघर हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील कोकण पट्ट्यातील आदिवासीबहुल जिल्हा असून येथे वारली, कातकरी, कोळी महादेव, ठाकर आदिवासी आणि कोंकणी आदी जमाती मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. डोंगर, जंगल आणि पावसावर अवलंबून असलेली शेती हे या भागाचं वैशिष्ट्य आहे. येथील सण-उत्सव हे शेतीच्या चक्राशी घट्ट जोडलेले आहेत. पेरणी, रोपांची वाढ, कापणी किंवा नव्या धान्याचा पहिला घास, प्रत्येक टप्प्याला सांस्कृतिक अर्थ आहे.
निसर्गपूजा ही त्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असून गावदेवी, वनदेवता आणि पावसाला विशेष महत्त्व दिलं जातं. पाऊस हा केवळ पिकांसाठी आवश्यक घटक नसून तो जीवन, अन्न आणि परंपरांचा आधार मानला जातो. त्यामुळे पावसाची वेळ, प्रमाण आणि लय यावरच आदिवासींच्या सणांचा उत्साह आणि नियोजन ठरतं. पालघरच्या डोंगररांगांमध्ये अजूनही तारप्याचे सूर ऐकू येतात. पण ज्यावेळी निसर्गाची वेळच बदलते, तेव्हा संस्कृती आणि परंपरेचीही वेळ बदलते.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जांभूळविहीर येथे राहणारे रवी बुधर हे वारली आदिवासी समजातून येतात. ते सध्या जि.परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात,
"पालघर असो किंवा कोणताही आदिवासी जिल्हा असो, आदिवासींचं जीवन शेती आणि निसर्गाशी घट्ट जोडलेलं आहे. शेतीचा प्रत्येक हंगाम, प्रत्येक ऋतू आणि त्यानुसार साजरे होणारे सण हे निसर्गाशी संवाद साधणारे असतात. माघ महिन्यात वारली आणि कातकरी समाजात ‘बीज सण’ साजरा केला जातो. पिकलेलं धान्य घरात आलं की नारायणदेवाला म्हणजे पावसाच्या देवाला तांदळाचे किंवा नाचणीचे ‘उंडे’ करून नैवेद्य दाखवतात. त्यात गूळ किंवा खोबरं टाकतात आणि देवाचे आभार मानतात की, 'त्याच्या कृपेने पाऊस चांगला पडला आणि भरघोस पीक आलं.' त्यानंतर होळी येते, मग ‘आखाती’ (अक्षय्य तृतीया) सण येतो. त्या दिवशी मका किंवा नागली मातीच्या करंडीत (मातीच्या भांड्यात) पेरून त्याच्या उगवण्यावरून वर्षभराच्या पिकाचा अंदाज घेतला जातो. काही आदिवासी समाजांमध्ये पूर्वजांना ‘ईर’ म्हणून अग्यारी दिली जाते म्हणेजच घरासमोर दिवा लावला जातो. म्हणजेच पूर्वजांनी जी शेती जपली त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. "
वाघबारस : निसर्गपूजा, संरक्षण आणि बदलते वास्तव
पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील वारली आदिवासी समाजात दिवाळीचा पहिला दिवस ‘वाघबारस’ म्हणून साजरा केला जातो. वाघोबा ही वनदेवता मानली जाते. गोधन, पिके आणि जंगलाचे रक्षण व्हावे म्हणून या दिवशी वाघोबाची पूजा केली जाते. गोधन म्हणजे गावातील गायी, बैल, वासरे आणि इतर पाळीव जनावरे जी शेतीकाम, दूध, शेणखत आणि उपजीविकेचा आधार असतात.
आदिवासी समाजात गोधन हे संपत्तीचे आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी गावकरी शेतकाम बंद ठेवून मंदिराजवळ एकत्र येतात, गोधनाला ओवाळतात, चांगल्या पिकासाठी आणि रोगराईपासून संरक्षणासाठी प्रार्थना करतात. मात्र हवामान बदलामुळे या परंपरेच्या मुळावर परिणाम होताना दिसतो. पालघरमध्ये पावसाचे अनियमित चक्र, अतिवृष्टी किंवा दीर्घ कोरडे कालखंड यामुळे शेती उत्पादन घटते. चाऱ्याची टंचाई निर्माण होते, पाण्याअभावी जनावरे अशक्त होतात आणि काही ठिकाणी विक्रीस काढावी लागतात.

त्यामुळे गोधनाची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर जंगलातील जैवविविधता घटल्याने जनावरांसाठी उपलब्ध नैसर्गिक चारा आणि औषधी वनस्पतीही कमी झाल्या आहेत. परिणामी, गोधनाच्या रक्षणासाठी साजरा होणारा वाघबारस सण पूर्वीइतक्या उत्साहात साजरा होत नाही. काही ठिकाणी तो केवळ प्रतीकात्मक पूजेपुरता मर्यादित राहिला आहे. कारण ज्या गोधनासाठी हा सण आहे, त्याचे अस्तित्वच आता अधिक असुरक्षित झाले आहे.
हवामान विभागाची नोंद काय सांगते?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाच्या वेळ, प्रमाण आणि वितरणामध्ये लक्षणीय बदल दिसून आले आहेत. गेल्या पाच वर्षात पाऊस उशिरा दाखल झाला, तर काही काळात अल्पावधीत अतिवृष्टीची नोंद झाली. काही आठवड्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर काही भागांत तुटवडा राहिला. तापमानातील चढ-उतारही वाढलेले दिसतात. या अनियमिततेमुळे पेरणी उशिरा होणे, कापणीनंतर अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
पालघर जिल्ह्याबाबतची अधिकृत व अद्ययावत पर्जन्यमान माहिती IMD च्या संकेतस्थळावर ( https://mausam.imd.gov.in ) जिल्हानिहाय हायड्रोमेट डेटा पोर्टलवर (https://hydro.imd.gov.in/hydrometweb/) तसेच IMD मुंबई विभागाच्या संकेतस्थळावर ( https://mausam.imd.gov.in/mumbai/ ) उपलब्ध आहे.
"पाऊस बदलला की परंपराही बदलतात" - कीर्ती वरठा
पालघरच्या आदिवासी भागात सण आणि शेती यांचं नातं इतकं घट्ट आहे की पावसात थोडाही बदल झाला तरी त्याचा थेट परिणाम सणांवर दिसून येतो. पेरणी उशिरा झाली की सणही पुढे ढकलले जातात. अतिवृष्टी झाली तर भाताचे पीक सडते आणि सण साध्या स्वरूपात पार पडतात. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक ताण वाढतो आणि सामूहिक जेवणावळी, नृत्य-कार्यक्रम मर्यादित होतात.

पालघर मधील वारली समाजातील कीर्ती वरठा या गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासी समाजातील सण, उत्सव, परंपरा जपण्यासाठी काम करत आहेत. त्या सांगतात,
"आमच्या भागात शेती म्हणजे मुख्यतः भातशेती. दिवाळीच्या दरम्यान ‘खल्याचा देव’ ही आदिवासींमध्ये महत्त्वाची पूजा असते. भात घरात आणल्यानंतर ‘खलं’ स्वच्छ करून तिथे पूजा केली जाते. पण जर खूप पाऊस पडला तर भाताचे पीक खराब होते. भात पिकलाच नाही किंवा उशिरा पिकला, तर ‘खल्याचा देव’ही उशिरा होतो किंवा कधी कधी होतच नाही. हवामानाचा थेट परिणाम आमच्या रीतिरिवाजांवर होतो."
त्या पुढे सांगतात की,
"होळीला आंब्याची पूजा करूनच आंबा खाल्ला जातो. मात्र गेल्या काही वर्षात आंब्याच्या झाला मोहरही उशिरा येतोय. किंवा खायला आलेले आंबे अचानक आलेल्या पावसाने जमिनीवर पडतात आणि सडतात. आमचे सण जमिनीशी आणि निसर्गाशी जोडलेले आहेत. पण मोठे प्रोजेक्ट, विस्थापन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे परंपरा मागे पडत आहेत. हवामान बदल आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. संस्कृती टिकली तर पर्यावरणही टिकेल,”.
परंपरेसमोर उभं राहिलं हवामानाचं आव्हान
पालघरच्या आदिवासी भागात शेती ही बाजारपेठेसाठी नव्हे, तर जगण्यासाठी केली जाते. त्यामुळे पिकावरच सणांचा उत्साह अवलंबून असतो. जव्हार तालुक्यातील टोळीपाडा गावचे पोलीस पाटील विलास भूयळ सांगतात,
“आमच्याकडे शेती ही जगण्यापुरती असते. भात, कंदमुळे, चवळी, करवंद जे मिळतं ते घरासाठी आणि थोडंफार विक्रीसाठी. त्या पैशांत आम्ही होळी, दिवाळी साजरी करतो. आमच्यामध्ये होळी आणि दिवाळीला तारपा नृत्याला खूप महत्त्व असतं. दोन-तीन दिवस पाड्यांवर लोकं एकत्र येतात.” पूर्वी सोंगाड्यांना भात दिला जायचा मात्र आता पैसे दिले जातात. कारण आम्हालाच घरात धान्य पुरत नाहीये तर सोंगाड्याला कसं देणार. रानमेवा ही आता मिळत नाही. पूर्वी दिवाळीपर्यंत पीक हातात यायचं. आता भात शेतातच कुजतो. पारंपरिक बियाणं टिकत नाही, परिणामी तारपा नृत्य, सामूहिक जेवण आणि पारंपरिक विधी हळूहळू कमी होत चालले आहेत."
उत्पन्न घटलं, स्थलांतर वाढलं - सणांवर परिणाम
पालघरमधील पर्यावरण अभ्यासक सौरभ महाडिक सांगतात,
“गेल्या काही वर्षांत पालघर भागामध्ये पाऊस अनिश्चित झाला आहे. त्यामुळे शेतीतील कामे लांबणीवर पडतात. काही शेतकऱ्यांना पूर्वीसारखे उत्पन्न मिळत नाही. परिणामी अनेकजण आपले गाव सोडून बोईसर येथील एमआयडीसी किंवा इतर औद्योगिक भागात स्थलांतर करतात. स्थलांतर झाल्यामुळे अनेकदा लोक सणांसाठी गावाकडे येत नाहीत आणि सामूहिक पद्धतीने साजरे होणारे सण हळूहळू लोप पावत चालले आहेत. लोकांच्या स्थलांतराला हवामान बदल कारणीभूत आहेच; त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीनुसार लागणाऱ्या सोयीसुविधांचा अभावही त्यामागे आहे. सोयीसुविधांचा अभाव, बदलतं हवामान आणि शेतीत घटलेलं उत्पादन या सर्व घटकांचा थेट परिणाम आदिवासींच्या सणसंस्कृतीवर होत आहे.”

‘नॉन-इकॉनॉमिक लॉस अँड डॅमेज’ : पालघरच्या सांस्कृतिक अस्तित्वावरचा परिणाम
पालघर जिल्ह्यात अलीकडच्या काळात पावसाच्या अनियमित पद्धती, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि लांब कोरडे कालखंड यामुळे शेतीचक्र विस्कळीत होत आहे. या बदलाचा परिणाम केवळ भातशेती किंवा उत्पन्नावर मर्यादित नाही, तर तो आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनावरही उमटताना दिसतो. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलासंदर्भातील बैठकींमध्ये मांडली जाणारी ‘नॉन-इकॉनॉमिक लॉस अँड डॅमेज’ ही संकल्पना अशाच प्रकारच्या सांस्कृतिक नुकसानीकडे लक्ष वेधते.
हवामान बदलामुळे जेव्हा जंगलातील जैवविविधता कमी होते, वनसंपदा घटते किंवा गोधनाची संख्या घटते, तेव्हा या सणांचा मूळ आशयच बदलू लागतो. हे नुकसान आर्थिक मोजमापात मावणारे नाही. ते श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक ओळख यांचे नुकसान आहे. त्यामुळे पालघरमध्ये हवामान अनुकूलनाच्या धोरणांमध्ये केवळ शेतीपुरते उपाय न पाहता, स्थानिक संस्कृती आणि परंपरांचे संरक्षण यालाही समान महत्त्व देणे आवश्यक ठरते.
(Sanjana Khandare is a mentee at the Climate Change Media Hub of the Asian College of Journalism. The program is supported by Interlink Academy, Germany.)
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate Change & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






