रवलीन कौर
- प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूत सामावलेले आहे, विमानांपासून ते टूथब्रशपर्यंत.
- मात्र, प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तू आणि सेवांचा एक संपूर्ण जीवनचक्र असतो, जो केवळ कचऱ्याद्वारेच नव्हे तर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाद्वारेही पर्यावरणावर परिणाम करतो आणि हवामान बदलाला कारणीभूत ठरतो.
- हरितगृह वायू उत्सर्जनात सुमारे ३.७ % हिस्सा प्लास्टिक तयार करणाऱ्या कारखान्यांचा आहे. जर सध्याचा वेग कायम राहिला, तर २०६० पर्यंत हा आकडा वाढून ४.५ % होईल, असा अंदाज आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये जिनेव्हा येथे १० दिवस चाललेल्या जागतिक प्लास्टिक करार चर्चेदरम्यान यवेट अरेलानो यांच्या नाकातून दोनदा रक्त आले. टेक्सासमधील ह्यूस्टन शहरात राहणाऱ्या मेक्सिकन-अमेरिकन अरेलानो यांनी सांगितले, “हे नेहमीच होतं. याशिवाय मला एक्झिमा आणि हार्मोनल असंतुलनाचीही समस्या आहे. जर मी खूप जास्त संसाधनं आणि पैसा खर्च केला नाही, तर मी कधीच आई होऊ शकत नाही.” त्यांनी पुढे सांगितले, “खरं तर, माझ्या त्वचेच्या आजारामुळेच मी माझ्या शेजाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली आणि तेव्हाच मला कळलं की तेही याच त्रासांशी झुंज देत आहेत.”
हजारो मैल दूर, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही परिस्थिती काहीशी अशीच आहे. २०२४ च्या मध्यात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आढळले की गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील दहेजजवळील लखीगाम गावात श्वसन, त्वचा आणि ऐकण्याशी संबंधित आजार सामान्य आहेत. येथे ५००० लोकसंख्येमध्ये कर्करोगाची किमान ५० प्रकरणे समोर आली आहेत. मच्छीमारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘समस्त भरूच जिल्हा मच्छीमार समाज’ या संस्थेचे अध्यक्ष आणि वकील कमलेश माधीवाला म्हणतात, “हे सगळं कोळसा वाहून नेणाऱ्या उघड्या कन्वेयर बेल्टमुळे होत आहे. संपूर्ण गाव काळ्या राखेनं माखलेलं असतं आणि आवाज व दुर्गंध इतके जास्त असतात की दरवाजा बंद केल्याशिवाय झोपणं अशक्य आहे.”
ह्यूस्टन शिप चॅनल (जिथे अरेलानो राहतात) आणि तेथून १४,००० किलोमीटर दूर असलेल्या लखीगाम येथील लोकांमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे या दोन्ही ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या बिघाडाचे मोठे कारण म्हणजे प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्यांतून होणारे प्रदूषण.
समुद्रात कासवांचे गळे आवळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या छायाचित्रांनी प्लास्टिक कचऱ्याच्या मुद्द्याकडे मोठे लक्ष वेधले असले, तरी प्लास्टिकचा उगम म्हणजे प्लास्टिक पॉलिमर तयार करणारे कारखाने आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण लोकांच्या नजरेपासून दूर राहिले आहेत.

नॉर्वेतील ‘ग्रिड अरेन्डाल’ या ना-नफा संस्थेच्या वरिष्ठ तज्ज्ञ ईवा रुसेवस्का यांनी प्लास्टिक कचरा आणि उत्सर्जनाच्या दुहेरी परिणामाचा उल्लेख करत सांगितले, “प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूत सामावलेले आहे, विमानांपासून ते टूथब्रशपर्यंत. मात्र, प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तू आणि सेवांचा एक संपूर्ण जीवनचक्र असतो, जो केवळ कचऱ्याद्वारेच नव्हे तर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाद्वारेही पर्यावरणावर परिणाम करतो आणि हवामान बदलाला कारणीभूत ठरतो.” आकडेवारीनुसार, एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात सुमारे ३.७ % हिस्सा प्लास्टिक तयार करणाऱ्या कारखान्यांचा आहे. जर सध्याचा वेग कायम राहिला, तर २०६० पर्यंत हा आकडा वाढून ४.५ % होईल, असा अंदाज आहे.
प्लास्टिक कसे तयार होते?
जग, ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा आणि कच्चे तेल यांसारख्या जीवाश्म इंधनांचा त्याग करून नवीकरणीय स्रोतांकडे वळत असताना आणि वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करत असताना, पेट्रोलियम रिफायनऱ्या आता प्लास्टिक, खत, टायर आणि कृत्रिम तंतू यांसारख्या पेट्रोकेमिकल्सकडे त्यांच्या ‘प्लॅन बी’ म्हणून पाहू लागल्या आहेत. जगातील सुमारे ९९ % प्लास्टिक हे जीवाश्म इंधनांपासूनच तयार केले जाते. त्याचे उत्पादन दहेज आणि ह्यूस्टन शिप चॅनलसारख्या मोठ्या रिफायनऱ्यांमध्ये होते.
कच्चे तेल प्रत्यक्षात हायड्रोकार्बनचे मिश्रण असते, जे फक्त हायड्रोजन आणि कार्बन अणूंनी बनलेले संयुग असतात. जमीन किंवा समुद्रातून काढल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेले जाते, जिथे ते भट्टीत गरम केले जाते. त्यानंतर या मिश्रणाला ‘अंशात्मक आसवन’ (फ्रॅक्शनल डिस्टिलेशन) नावाच्या प्रक्रियेतून नेले जाते, ज्यामुळे हायड्रोकार्बन वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये विभक्त होतात. यात गॅसोलीन, केरोसीन, नेफ्था, हलके तेल आणि जड तेल यांचा समावेश होतो.
प्लास्टिक मुख्यत्वे दोन कच्च्या पदार्थांपासून तयार होते. नेफ्था (कच्च्या तेलाचा एक घटक) आणि नैसर्गिक वायू. यांच्यावर प्रक्रिया केल्यावर एथिलीन, प्रोपिलीन आणि स्टायरीन यांसारख्या हलक्या वायूंची निर्मिती होते. त्यानंतर या वायूंना रासायनिक प्रक्रियेद्वारे एकत्र करून पॉलीप्रोपिलीन, पॉलीइथिलीन, पीईटी आणि पॉलीस्टायरीन यांसह विविध पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या बहुतांश प्लास्टिकच्या निर्मितीसाठी मूलभूत घटक म्हणून वापरले जातात. जगभरातील प्लास्टिकचे वार्षिक उत्पादन १९५० मध्ये दोन दशलक्ष टन होते, जे २०२५ मध्ये वाढून ४०० दशलक्ष टन झाले आहे. आजपर्यंत जितके प्लास्टिक तयार झाले आहे, त्यातील सुमारे निम्मे उत्पादन २००२ नंतर झाले आहे.
याची किंमत कोण भोगणार?
‘फेन्सलाइन वॉच’च्या संस्थापक अरेलानो सांगतात, “२०१७ पर्यंत मला अजिबात कल्पना नव्हती की माझं संपूर्ण आयुष्य प्लास्टिकमुळे प्रभावित झालं आहे. मी माझ्या समुदायाला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांविरुद्ध आणि जवळच्या एथिलीन प्लांटमधून येणाऱ्या दुर्गंधी व तेथे होणाऱ्या स्फोटांविरुद्ध लढा देत होते, पण याचा प्लास्टिकशी संबंध आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटायचं की तेथे इंधन/पेट्रोल तयार केलं जात आहे.” त्यांची ही संस्था ह्यूस्टन शिप चॅनलच्या आसपास जीवाश्म इंधनाशी संबंधित संरचनांच्या विषारी परिणामांविरुद्ध काम करते. ह्यूस्टन शिप चॅनलला जगाची “ऊर्जा राजधानी” असेही म्हटले जाते.
अरेलानो म्हणाल्या, “इतक्या मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरले जात आहे हे समजल्यावर मला खूप राग आला.” ह्यूस्टन शिप चॅनल हे अमेरिकेतील सर्वात मोठे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे, जिथे एक्सॉनमोबिल, शेल आणि डॉव यांसारख्या ६०० कंपन्या आहेत. टेक्सासहून लुईझियानाकडे जाणारा रस्ता ‘कॅन्सर अॅली’ला जाऊन मिळतो, जो तेथील २०० पेट्रोकेमिकल प्लांट्समुळे कॅन्सरच्या उच्च प्रमाणासाठी कुप्रसिद्ध आहे.
एमनेस्टी इंटरनॅशनलच्या २०२४ च्या एका अहवालात या परिसरातील हवेमध्ये बेंझीन आणि टोल्यूनि यांसारखे व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स (VOC), मिथेन आणि कार्बन डायऑक्साइडसारखे हरितगृह वायू तसेच प्रदूषण करणारे पार्टिक्युलेट मॅटर आढळल्याचे नमूद केले आहे. २०२१ पासून ह्यूस्टन शिप चॅनलमध्ये किमान १५ रासायनिक स्फोट, आग आणि विषारी पदार्थांच्या गळतीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. एका स्वतंत्र अभ्यासात डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि नाकातून रक्त येणे यापासून ते दमा, अॅनिमिया, मुलांमध्ये होणारा ल्यूकेमिया, कॅन्सर, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, वंध्यत्व आणि अगदी मृत्यूसारख्या गंभीर धोक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
जरी अमेरिकेतील प्रभावित समुदायांचे जिनेव्हा येथे झालेल्या करार चर्चेत काही प्रमाणात प्रतिनिधित्व होते, तरी भारत आणि ग्लोबल साउथमधील लोक अनुपस्थित होते , जसे या प्रदेशातील प्लास्टिक उत्पादनाच्या आरोग्यावरील परिणामांवर केलेले अभ्यासही अनुपस्थित आहेत. माधीवाला सांगतात, “लखीगाम सर्वेक्षण तेव्हा करण्यात आलं, जेव्हा दहेज येथे ९.८ किमी लांबीच्या उघड्या कन्वेयर बेल्टमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाला कंटाळून लोकांनी खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. ही बेल्ट कोळसा, जिप्सम, पॉलीप्रोपिलीन आणि प्रोपिलीन वाहून नेते.”
पारंपरिक उपजीविकेवर मुख्यतः शेती आणि मासेमारीवर होणारे नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. शेतजमिनी खारट होत आहेत आणि रसायनांच्या गळतीमुळे समुद्र प्रदूषित होत आहे. माधीवाला सांगतात, “दहेजहून भडभूत (प्रस्तावित बॅरेज) पर्यंतच्या १० किनारी गावांमध्ये पगडिया मच्छीमारांची (पायदळ मासेमार) संख्या मागील १०-१२ वर्षांत निम्म्यावर आली आहे. पूर्वी १०,००० हून अधिक ग्रामस्थ खोल समुद्रात न जाताही चांगली कमाई करत होते. पण आता दहेज बंदरापर्यंतचे पाणी (जिथपर्यंत ते मासेमारीसाठी जात होते) दूषित पदार्थांनी भरलेले आहे, त्यामुळे त्यांचे उत्पन्न प्रभावित झालं आहे.”
खंभातच्या आखाताजवळील ‘दहेज’ हे भारत सरकारने २००७ मध्ये नियोजित केलेल्या चार पेट्रोलियम, रसायन आणि पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्रांपैकी (PCPIR) पहिले कार्यरत क्षेत्र आहे. येथे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ओएनजीसीसोबत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अदानी पेट्रोनेट यांसारख्या खासगी कंपन्यांसह सुमारे १८० कार्यरत आणि ६५० बांधकामाधीन औद्योगिक युनिट्स आहेत. गुजरातमधील मच्छीमार संघटना समस्त मच्छीमार समाजचे सचिव उस्मानगनी शेरासिया यांनी दावा केला, “कंपन्यांच्या डिसॅलिनेशन प्लांटमधून बाहेर पडणारा अतिशय खारट अपशिष्ट दहेजच्या दलदलीत आढळणाऱ्या प्रमुख मासळी कोळंबीला मारत आहे.”

भारतात काय चित्र आहे?
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ % पेक्षा अधिक आयात करतो, त्यामुळे बहुतेक पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स किनारी भागात आहेत. गुजरातच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे जाताना कच्छच्या आखाताच्या एका भागात पेट्रोकेमिकल जेटींच्या रांगा दिसतात. याची सुरुवात जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजपासून होते, जी जगातील सर्वात मोठी एकल-साइट रिफायनरी आहे. त्यानंतर वाडिनार येथील नायरा एनर्जी लिमिटेड (भारताची दुसऱ्या क्रमांकाची मोठी रिफायनरी) आणि मग सलाया येथील एस्सार पोर्ट येते.
जामनगर जिल्ह्यातील पर्यावरण कार्यकर्ते जयेंद्रसिंह केर म्हणतात, “या कंपन्यांनी मिळून सिक्का ते सलाया पर्यंत संपूर्ण किनारा व्यापला आहे. लहान पगडिया मच्छीमारांसाठी मध्ये ये-जा करण्यासाठी जवळजवळ कोणताही मार्ग उरलेला नाही. यांपैकी बहुतांश मच्छीमार आता मजूर बनले आहेत — काहीजण अनेक दिवस समुद्रात राहणाऱ्या मोठ्या बोटींवर काम करतात, तर काही पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये मजुरी करतात.”
केर यांनी सांगितले की बंदरावर येणाऱ्या जहाजांमधून ‘बॅलस्ट वॉटर’ (जहाजाचा समतोल राखण्यासाठी टाकीत भरलेले पाणी) समुद्रात सोडले जाते तेव्हा किनारी पाण्याचे तापमान बदलते आणि मोठ्या प्रमाणात मासळी मरते. दुसरीकडे, या कारखान्यांतून होणाऱ्या रसायनांच्या गळतीमुळे शेती पूर्णपणे तोट्याची ठरली आहे. केर यांचा दावा आहे की वाडिनारजवळील गावांमध्ये भूजल प्रदूषित झाले आहे. “मान्सूनमध्ये लोक एक पिक घेतात, पण त्यानंतर सिंचनासाठी हे पाणी वापरले तर पिके जळून जातात.”
या बहुतेक रिफायनऱ्या ‘कच्छचे आखात मरीन नॅशनल पार्क’च्या जवळ आहेत, जिथे प्रवाळांच्या ५२ प्रजाती आढळतात. केर यांच्या मते, तेलगळतीमुळे ‘टार बॉल्स’ तयार होतात, जे सागरी पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. मात्र जामनगरमध्ये कोणताही विरोध दिसत नाही. नवी दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’चे कार्यक्रम व्यवस्थापक (घनकचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी) सिद्धार्थ घनश्याम सिंह म्हणाले, “गुजरातमध्ये डॉक्टर स्थानिक लोकसंख्येच्या आरोग्यावर रिफायनऱ्यांचा परिणाम याबाबत बोलण्यास तयार नाहीत, कारण मोठ्या कंपन्या त्यांच्यावर मानहानीचा खटला भरतील अशी त्यांना भीती आहे. तथापि, त्यांनी पेट्रोकेमिकल प्लांट्सच्या दुष्परिणामांना पूर्णपणे नाकारलेलेही नाही.”
जगभरातील संशोधनही या भीतीला पुष्टी देतात. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या रिसर्च फेलो आणि ‘सायंटिस्ट्स कोअॅलिशन फॉर अॅन इफेक्टिव प्लास्टिक ट्रीटी’च्या सदस्या मेगन डीनी सांगतात, “युरोप, तैवान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासांमधून दिसून येतं की पेट्रोकेमिकल कारखान्यांच्या जवळ राहणाऱ्या लोकांमध्ये ल्यूकेमिया होण्याचा धोका ३० % जास्त असतो.” आणखी एका अभ्यासानुसार, २०१५ मध्ये प्लास्टिक तयार करताना आणि त्याची विल्हेवाट लावताना निर्माण झालेल्या प्रदूषणकारी सूक्ष्म कणांमुळे जगभरात सुमारे १,५९,००० मृत्यू झाले होते.
वादाचे मूळ
‘ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी’ (जागतिक प्लास्टिक करार) संदर्भातील चर्चांमध्ये प्लास्टिकवर कडक कायदे करण्याचे प्रयत्न कोणत्याही निष्कर्षाशिवाय किंवा सहमतीशिवाय संपले. यामागील मुख्य कारण म्हणजे देशांमध्ये प्लास्टिक उत्पादनाबाबत असलेले मतभेद. ‘इंटरगव्हर्नमेंटल नेगोशिएटिंग कमिटी’ (आयएनसी ५.२) च्या बैठकीच्या अंतिम सत्रापूर्वीच्या सत्रात अध्यक्ष लुइस वायस वाल्डिविइसो यांनी एक मसुदा सादर केला. या मसुद्यात प्लास्टिक उत्पादन मर्यादित करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर बंधनकारक उपायांचा उल्लेख नव्हता.
एका बाजूला सौदी अरेबिया, रशिया, कुवैत, इराण आणि भारत यांसारख्या तेल आणि पेट्रोकेमिकलसमृद्ध देशांनी या भूमिकेचे समर्थन केले, तर १०० हून अधिक देशांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्याला “अस्वीकार्य, असंतुलित आणि कमकुवत” असे संबोधले. अमेरिकेने प्लास्टिक उत्पादनावर मर्यादा घालण्यास विरोध केला आणि इतर देशांनाही उत्पादन मर्यादेचा करार नाकारण्याचे आवाहन केले. अरेलानो म्हणाल्या, “अमेरिकेने दादागिरीसारखे वर्तन केले. ते अडथळे निर्माण करत आहेत हे आम्हाला स्पष्ट दिसत होतं.”
संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेने नोव्हेंबर २०२२ मध्ये आयएनसी (समिती) स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा उद्देश प्लास्टिकच्या “संपूर्ण जीवनचक्रा”दरम्यान (उत्पादन (अपस्ट्रीम) ते त्याच्या डिझाइन आणि वापर (मिडस्ट्रीम) आणि शेवटी कचरा व्यवस्थापन (डाउनस्ट्रीम) पर्यंत) प्रदूषण कमी करणे हा होता. तथापि, ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध प्लास्टिकशी जोडलेले आहेत, असे देश प्लास्टिक प्रदूषणाला केवळ “कचरा व्यवस्थापन” समस्या म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

सेंटर फॉर इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंटल लॉ (CIEL) चे वरिष्ठ मोहीमकर्ता (प्लास्टिक करार) धर्मेश शाह म्हणतात, “हवामान लक्ष्य साध्य करण्यासाठी प्लास्टिक उत्पादनावर मर्यादा घालणे अत्यंत आवश्यक आहे. जर प्लास्टिक याच वेगाने तयार होत राहिलं, तर तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी आपल्या हातात उरलेल्या ‘कार्बन बजेट’पैकी एक-तृतीयांश हिस्सा हा उद्योग एकटाच संपवेल.” ते पुढे म्हणाले, “या कराराचा मुख्य उद्देश फक्त प्लास्टिकची साफसफाई असू शकत नाही. आपण पाण्याचा नळ उघडा ठेवून जमिन कोरडी ठेवू शकत नाही.” परिषदेत जीवाश्म इंधन उद्योगाचे समर्थन करणारे २३४ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यामुळे ‘हितसंबंधांचा संघर्ष’ असल्याचे सूचित होते.
चुकीच्या दिशेने धाव
२०२४ च्या आकडेवारीनुसार, जगातील ६६ % प्लास्टिक फक्त सात देशांमध्ये तयार होते. चीन, अमेरिका आणि सौदी अरेबिया मिळून निम्म्याहून अधिक प्लास्टिक तयार करतात, तर भारताचा वाटा केवळ ४ % आहे. ग्रीनपीसच्या एका अहवालानुसार, २०२२ मध्ये प्लास्टिक कराराची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सात सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली उत्पादन क्षमता १.४ दशलक्ष टनांनी वाढवली आहे. आणखी एका अभ्यासानुसार, २०२४ मध्ये किमान १५ देशांनी पेट्रोकेमिकल कंपन्यांना एकूण ४५ अब्ज डॉलर्सची सबसिडी दिली.
भारतीय कायद्यानुसार, रिलायन्ससारख्या कंपन्यांना ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’मध्ये अनेक विशेष सवलती मिळतात. यामध्ये १० वर्षांपर्यंत करसवलत आणि उत्पादन शुल्क व सीमाशुल्कातून सूट यांचा समावेश आहे.
‘इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अॅनालिसिस’ (IEEFA) च्या पेट्रोकेमिकल तज्ज्ञ स्वाती शेषाद्री म्हणतात, “थोडक्यात सांगायचं तर करदात्यांनाच त्या कामासाठी पैसे द्यावे लागत आहेत ज्यामुळे प्रदूषण पसरते. कंपन्या मात्र त्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा खर्च उचलण्याची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत.”
IEEFA च्या एका विश्लेषणानुसार, २०२० पासून जागतिक आर्थिक मंदीमुळे पेट्रोकेमिकल बाजारात ‘अतिरिक्त पुरवठा’ (ओव्हर-सप्लाय) निर्माण झाला आहे. या विश्लेषणात नमूद केले आहे की पेट्रोकेमिकल उद्योग, जो कधीकाळी जीवाश्म इंधन कंपन्यांसाठी “भविष्यातील आधार” किंवा नफ्याची हमी मानला जात होता, तो आता स्वतःच मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे.
व्यापाराच्या आकडेवारीनुसार, आता पॉलिमर उत्पादन आशिया-पॅसिफिक प्रदेशाकडे सरकत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे येथे पर्यावरणीय नियमांची कमकुवत अंमलबजावणी आणि भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांमधील मोठी मागणी. अहवालात म्हटले आहे, “कच्च्या प्लास्टिकच्या जागतिक व्यापारात आशियाचे वर्चस्व आहे, ज्यात ११ निर्यातक आणि १८ आयातदार देशांचा समावेश आहे. संकुचित होत चाललेल्या बाजारपेठा आणि वाढता पॉलिमर साठा यामुळे यावर अवलंबून असलेले विकसनशील देश मोठ्या आर्थिक जोखमीचा सामना करत आहेत.”
प्लास्टिकचा वापर मागणी वाढल्यामुळे नाही, तर पुरवठा खूप जास्त असल्यामुळे वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या घटत्या विक्रीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या आक्रमकपणे नवीन बाजारपेठा शोधत आहेत. शेषाद्री म्हणाल्या, “जर प्राथमिक प्लास्टिक पॉलिमरचे उत्पादन, वापर आणि व्यापार यांचे नियमन केले गेले नाही आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कायदेशीर करार फक्त उत्पादनाच्या रचनेवर आणि कचरा व्यवस्थापनावरच केंद्रित राहिला, तर त्याचा परिणाम समस्या संपवण्याऐवजी तिचे केवळ रूपांतर होण्यातच होईल.”
मूळ लेखाची लिंक : https://india.mongabay.com/2025/09/communities-near-petrochemical-plants-pay-the-price-for-plastic-convenience/
(सौजन्य - mongabay india, अनुवाद - प्रतिक पुरी)






