टीम बाईमाणूस
- व्यवस्थेविरुद्ध देशातील तरूणाईच्या संतापाचा आवाज बनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत.
- खुद्द अभिजीतनेच एक्सवर (द्विटर) धमकीच्या मेसेजचा स्कीनशॉट शेअर करत ही माहिती दिली.
- त्यामुळे अभिजीत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
व्यवस्थेविरुद्ध देशातील तरूणाईच्या संतापाचा आवाज बनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत. खुद्द अभिजीतनेच एक्सवर (द्विटर) धमकीच्या मेसेजचा स्कीनशॉट शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे अभिजीत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्या वेळी देशातील बेरोजगार तरूणांची तुलना कॉक्रोच (झुरळ) आणि पॅरासाईटशी (परजीवी) केल्यामुळे देशभरातील तरूणाईत निर्माण झालेल्या संतापाचे प्रतिक म्हणून अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी या अनोख्या आणि देशातील सर्वात मोठ्या डिजिटल राजकीय व्यंगात्मक चळवळीची स्थापना केली. अवघ्या आठवडाभरातच कॉक्रोच जनता पार्टीने देशातील सत्ताधारी भाजपसह प्रमुख राजकीय पक्षांनाही मागे टाकत इंस्टाग्रामवर २०. २ मिलीयन (२ कोटी २ लाख) फॉलोअर्स मिळवले. त्यामुळे देशातील प्रमुख राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे.
देशात वाऱ्यासारख्या पसरत चाललेल्या आणि अनेक सेलिब्रेटींसह नामांकित व्यक्तींचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. स्वतः अभिजीत दिपके यांनीच एक्सवर (द्विटर) धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत 'Receiving death threats now' (आता जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत) असे म्हटले आहे. अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केल्यानंतर गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिका आणि शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘’पेसा मिलेगा तुझे ये अकाऊंट बंद करदे वरना बीजेपी में आ…’’
अभिजीत दिपके यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून धमकी देण्यात आली आहे. 'हाय सुन.... पेसा मिलेगा तुझे ये अकाऊंट बंद करदे वरना बीजेपी में आ... वरना अमेरिका मे भी मरवा देंगे तुझे...' असे इंग्रजी लिपीत टाइप केलेल्या या हिंदी संदेशात म्हटले आहे. दुसराही एक धमकीचा मेसेज अभिजीत दिपकेंना मिळाला आहे. त्यात 'अभी तो नंबर मिला है... तेरा घर मिलने में देर नहीं हैं... कहां रहेता है इंडिया में ही ना?' अशी धमकी या दुसऱ्या संदेशात देण्यात आली आहे.

नेटकरी संतप्त, आता सायबर पोलिसांकडे लक्ष
अभिजीत दिपकेंनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स आणि नेटिझन्सची तीव्र संताप व्यक्त केला आहे. वैचारिक मतभेदांमधून थेट जीवे मारण्याची धमकी देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करत या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.
अभिजीत दिपकेंना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात तातडीने सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करावा आणि अभिजीत दिपके यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. आता सायबर पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अभिजीतच्या आईवडिलांना अटकेची भीती
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यात असलेले अभिजीतचे वडिल भगवानराव दिपके आणि आई अनिता दिपके यांना अभिजीतला अटक केली जाण्याची भीती वाटू लागली आहे. अभिजीतच्या आईवडिलांची मराठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या दोघांनीही ही भीती बोलून दाखवली.
अभिजीतने राजकारणात पडायला नको, असे मला वाटते. त्याने चांगले शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षा देऊन एखादा अधिकारी व्हावे, अशी माझी इच्छा होती. राजकारण आमचा पिंड नाही. माझ्या ३५ वर्षांच्या नोकरीच्या काळात राजकारण्यांचा अनेकवेळा संबंध आला, मात्र मी कुणाच्याही जवळ गेलो नाही, असे भगवानराव दिपके म्हणाले. तुम्हाला अभिजीतबद्दल भीती आणि चिंता वाटते काय? असे विचारले असता, त्याच्या अकाऊंटचे कितीही फॉलोअर्स असले तरीही सध्याचे जे राजकारण आपण पाहतो, त्यामुळे भीती वाटणे स्वाभाविकच आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक होण्याची भीती आम्हाला वाटते. आम्ही वृत्तपत्रात अशा काही घटना वाचल्या आहेत, असे भगवान दीपके म्हणाले.
अभिजीत हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्हाला त्याची काळजी वाटते. वर्तमानपत्रात आम्ही वाचतो की, राजकारणाशी संबंधित लोकांना अटक करतात. तो एक-दोन वर्षापासून अमेरिकेत असल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. पण आता तो भारतात परतला तर त्याला उचलतील की या? अशी भीती वाटते. आमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती राजकारणात नाही. त्याने राजकारणापासून दूर रहावे. आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे आणि त्याने घरी सुरक्षित परतावे, असे आई म्हणून मला मनोमन वाटते, असे अनिता दिपके म्हणाल्या.
आता डिजिटल मुस्कटदाबीचे प्रयत्न
अवघ्या चार दिवसांतच सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स कमावणाऱ्या सीजेपीची डिजिटल मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया हँडल बॅन केले जाऊ शकतात, अशी भीती अभिजीत दिपके या तरूणाने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली होती. त्यानंतर तासाभरातच सीजेपीचे एक्सवरील (द्विटर) हँडल बंद करण्यात आले असून त्यावरचा मजकूर पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर वारंवार पासवर्ड रिसेटचे पॉपअप येत आहेत. अकाऊंट हॅक करण्याचा हा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर आमची लोकप्रियता त्यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे. जर हॅकिंग नाही जमलं तर ते आमचे अकाऊंट बॅन करतील. महिनाभरापूर्वीही त्यांनी हेच केले होते. आम्ही काय करतोय याकडे आयबी आणि इतर संस्था लक्ष ठेवून आहेत, असे आम्हाला कळले आहे, असे अभिजीत म्हणाला होता. त्यानंतर तासाभरातच सीजेपीचे एक्स (द्विटर) हँडल बंद करण्यात आले. त्यानंतर एक्सवर Cockroach is Back (@Cockroachisback) नावाने एक्सवर नवीन हँडल सुरू करण्यात आले.

कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स हँडल बंद करण्यात आल्यानंतर इंस्टाग्रामवरील हँडलही हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा अभिजीत दिपकेने एक्सवर स्क्रीनशॉट शेअर करत केला आहे. सीजेपीच्या इंस्टाग्राम हँडलवरही पासवर्ड रिसेटचे पॉपअप येत असल्याचे अभिजीतने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजित दिपके आहे तरी कोण…?
अलीकडेच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ‘’काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. नंतर मग हेच तरुण माध्यमं, समाजमाध्यमं आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात. समाजात अनेक परजीवी वावरत असून ते सतत व्यवस्थेला टार्गेट करत असतात.’’
याचाच निषेध म्हणून अभिजीत दिपकेेने तरुणांचा संताप व्यक्त करण्यासाठी १६ मे २०२६ रोजी 'कॉकरोच जनता पार्टी'ची ऑनलाइन घोषणा केली. समाजमाध्यमांवर नुसतीच टीका करण्याऐवजी, या अपमानास्पद झुरळ या शब्दालाच अभिजितने आपले हत्यार बनवले. एका उपहासात्मक मीम पेजच्या स्वरूपात सुरू झालेल्या या प्रयोगाने काही तासांतच एका राजकीय चळवळीचे रूप धारण केलंय.
अभिजीत दिपकेे हा मूळचा हिंगोलीचा असल्याचं सांगितलं जातंय. तो एक राजकीय रणनीतीकार आणि डिजिटल मीडिया कॅम्पेनर आहे. पत्रकारितेचे आणि पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेतलेल्या अभिजीतने, तळागाळातील तरुणांचे प्रश्न, व्यवस्थेचा नाकर्तेपणा आणि बेरोजगारीसारखे गंभीर मुद्दे मांडण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' या उपहासात्मक राजकीय चळवळीची स्थापना केली. पारंपारिक राजकारणाला फाटा देत, त्याने डिजिटल प्लॅटफॉर्म्स, मीम कल्चर आणि उपहासात्मक कंटेंटचा अत्यंत अचूक वापर करून ही चळवळ उभी केली आहे.

त्याने त्याचे पदवीचे शिक्षण पुण्यातून पत्रकारितेत पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. तिथे सध्या तो बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतोय. २०२० ते २०२३ या काळात तो आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया आणि आयटी सेलसोबत जोडलेला होता. २०२० च्या दिल्ली निवडणुकीत आपच्या बाजूने सोशल मीडियावर जे मीम्स आणि डिजिटल कॅम्पेन चालवले गेले, त्यामागे अभिजीतचा मोठा वाटा होता. तर जून २०२१ ते मे २०२४ पर्यंत दिल्ली शिक्षण विभागाचा कम्युनिकेशन्स ॲडव्हायझर म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली.






