भरत सुंदरेसन
- क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी आली आहे. मुंबई क्रिकेटमधील खेळाडू अनिल गुरव यांचे ३१ मार्च रोजी निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईचा व्हिव रिचर्डस असंही त्यांना म्हटलं जायचं.
- सचिन तेंडुलकरने ज्या बॅटने पहिली सेंच्युरी मारली ती बॅट अनिल गुरव यांनी त्याला दिली होती.
- मृत्यूपर्यंत मुंबईचं उपनगर असलेल्या नालासोपारा इथे २०० स्क्वेअर फूटांच्या खोपटात त्यांचं आयुष्य गेलं.
- ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २०१३ मध्ये अनिल गुरव यांचा शोध घेत मुंबईचं नालासोपारा गाठलं होतं. अनिल यांच्या भावविश्वाचा घेतलेला त्यावेळचा हा आढावा.
नियती आणि माणसाच्या मधील सीमारेषा अस्पष्ट असतात… त्या कधीच पुसल्या जात नाही हे खरंय! आयुष्य एक प्रवास आहे आठवणींचा, प्रेमाचा, अन संघर्षाचा... अन् अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. अशा ह्या अनुभवानेच आपण शिकतो, घडतो. आजूबाजूला जे घडत असत ते कधी अनाकलनीय असत, कोणाचं नशीब कधी झळकेल कधी दगा देईल आपण कधी सांगू शकत नाही.
ही अशीच एका शापित अश्वत्थामाची कहाणी… हा अश्वत्थामा कालपर्यंत शापित जगत होता. कधीही न सुटणाऱ्या जन्मांतराच्या चक्रात, जखमी अवस्थेत, पश्चा:तापदग्ध दुबळ्या मनानं, केवळ त्रिशंकुवत जगणंच !… नियतीचा खेळ असाही असतो !
मुंबईचा विव्हियन रिचर्ड म्हणून ज्याला म्हणायचे, ज्याचा कट आणि हुक शॉटच्या प्रेमात सारं शिवाजी पार्क होतं, महान क्रिकेट प्रशिक्षक अण्णा वैद्य सरांचा हा मूळ शिष्य, रमाकांत आचरेकर सरांचा सर्वात आवडता खेळाडू, सचिन ज्याचा फॅन होता आणि त्या सिनियर खेळाडूला तो 'सर ' म्हणून रिस्पेक्ट द्यायचा, तो शापित खेळाडू म्हणजे 'अनिल गुरव'...
‘इंडियन एक्स्प्रेस’ने २०१३ मध्ये अनिल गुरव यांचा शोध घेत मुंबईचं नालासोपारा गाठलं होतं. अनिल यांच्या भावविश्वाचा घेतलेला आढावा.
एका ‘न’ घडलेल्या सचिनची कहाणी…
मुंबईच्या क्रिकेटची ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियमपासून अनेक किलोमीटर दूर नालासोपारा इथे एका ‘न घडलेल्या सचिनची’ कहाणी नांदते आहे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी नालासोपाऱ्यातल्या या खोपटातल्या खाटेवर तुम्हाला अनिल गुरव भेटतील. दारुचा भपकारा त्यांच्या भवताली बसलेल्या लोकांना येतो. त्यांच्या डोळ्यात हरवलेलं स्वप्न दिसतं. त्यांचे भेदक बोलके डोळे एका न उलगडलेल्या वाटचालीचं द्योतक आहेत. अनेक वर्ष सरली पण गुरव यांची स्मरणशक्ती शाबूत आहे. मुंबईतल्या मैदानांमध्ये गुरव यांची बॅट बोलायची. त्यांना मुंबईचा व्हिव रिचर्डस म्हटलं जायचं. सुनील गावस्कर यांच्यानंतर मुंबईने भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर दिला. वांद्र्यातल्या त्या कुरळ्या केसांच्या मुलाला क्रिकेटचे बारकावे सांगितल्याचं गुरव यांना आठवतं. तो विलक्षण प्रतिभासंपन्न होता असं गुरव सांगतात. गुरव यांनीच दिलेल्या बॅटने खेळून सचिनने पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं.
(Photo credit: The Indian Exepress)
भरारी घेऊ पाहणारी कारकीर्द अशी विस्कटत गेली याचेही तपशील गुरव यांच्या डोक्यात फिट्ट आहेत. अनेक गोष्टी त्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. त्यांचा भाऊ वाम मार्गाला लागला आणि सगळ्यांचं नुकसान झालं.
मुंबईतल्या मैदानापांसून नालासोपारा बरंच दूर आहे. चर्चगेट स्टेशनमध्ये तुम्ही स्लो लोकल पकडलीत तर २६वं स्थानक म्हणजे नालासोपारा. तिथवर गर्दीतून पोहोचणं हेच एक दिव्य आहे. नालासोपाऱ्यात उतरल्यानंतर जवळच गजबजलेलं मार्केट आहे. तुलिंगे नाक्याला जाणारा रस्ता मात्र खड्ड्यांनी भरलेला आहे. गच्चगोळ अशा रस्त्याने तुम्ही गेलात तर त्र्यंबक बंगला ही खूण लक्षात ठेवा. त्याच्या बाजूलाच झोपडपट्टी सुरू होते. तिथून वाट काढत पुढे चालत राहिलात की कुत्रे आणि भरभरून वाहणारा नाला तुमचं स्वागत करतो. त्यातूनच पुढे जात तुम्ही खोली नंबर ५ गाठा.
‘अनिल गुरव म्हणजे तो दारुडा क्रिकेटपटू’ असेच वस्तीतली लोक म्हणतात
परिसरातल्या काहीजणांना गुरव क्रिकेट खेळायचे हे माहिती आहे. मात्र त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांना फारशी माहिती नाही. त्या सगळ्यांसाठी ४८ वर्षांचे गुरव म्हणजे सतत दारुच्या नशेत असलेले गृहस्थ.
आता जरी गुरव यांची ओळख अशी असली तरी एकेकाळी मुंबई क्रिकेटमधल्या अत्यंत गुणवान खेळाडूंमध्ये त्यांची गणना होत असे आणि फारच मोजक्या खेळाडूंना मिळणारा मान गुरव यांना मिळाला होता. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांनी गुरव बॅटिंग करत असताना स्टंप्स्वर नाणं ठेवलं होतं. फारच मोजक्या खेळाडूंच्या बाबतीत आचरेकर गुरुजींनी असं केलं होतं. सचिनला हा मान मिळाला होता, त्याआधी गुरव यांना.
(Photo credit: The Indian Exepress)
गुरव जसं त्या काळाबद्दल सांगू लागतात, सतत कुणीतरी डोकावतं. मागे बाहेर भांडणं-वादावादी सुरू असतं. काही गुरव यांच्याकडे पाहून छद्मी हसतात. काहींना गुरव यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आणि काहीही बोलतोय अशी मान डोलावून निघून जातात. काहीजण तर दारुच्या नशेत कहाण्या रचून सांगतो असं म्हणून सोडून द्यायला सांगतात. गुरव या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात.
आसपासची मुलं गुरव यांना क्रिकेट खेळायला बोलावतात पण त्यांचा टिंगलटवाळीही करतात. दारू मिळावी यासाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी त्यांच्यात कुजूबज चालते. गटार साफ करायला लावलं तरी करतील किंवा घरातल्या ट्रॉफ्या विकायला लागल्या तरी विकतील. गुरव बोलत राहतात.
८० च्या दशकात अनिलची बॅटिंग बघायला मुंबईकर लोटायचे
२५ वर्षांपूर्वी गोष्टी खूप वेगळ्या होत्या. फ्लिकचा फटका कसा लगावला किंवा खणखणीत षटकार कसा चोपला हे आठवून सांगताना त्यांचे डोळे लकाकतात. गुरव खेळायला उतरले की भवताल जागा होई. गुरव कटचा फटका खेळत तेव्हा चेंडू गवताला झिणझिण्या आणून सीमारेषेपलीकडे जात असे. हूकच्या फटक्यासह लगावलेला उत्तुंष षटकार चाहत्यांमध्ये जल्लोषाची लाट उडवून देत असे. ८०च्या दशकात गुरव बॅटिंगला उतरले की मुंबई क्रिकेटला पुढचा सुनील मिळाला अशा चर्चा सुरू होत. गुरव यांच्या कट्टर चाहत्यांमध्ये तेंडुलकर आणि कांबळी यांचा समावेश होता. हे दोघे तासनतास गुरव यांची बॅटिंग बघत असत. सचिनला माझा कट आणि हूकचा फटका प्रचंड आवडत असे. जोरकस फटके कसे खेळावे याविषयी त्याने मला विचारलं होतं असं गुरव सांगतात.
मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि सचिनचे स्नेही राजेश सुतार गुरव यांच्या दमदार खेळाबद्दल सांगतात. आचरेकर सरांच्या शिष्यांपैकी गुरव भारतासाठी खेळणार असंच आम्हाला वाटायचं. मुंबईचा व्हिव रिचर्ड्स असं त्यांना म्हटलं जात असे. सचिनलाही त्यांची बॅटिंग आवडायची असं सुतार सांगतात.
आचरेकर सरांचा नियम धुडकावून गुरव टेनिस बॉलच्या स्पर्धांमध्ये खेळत असत. ही बंडखोरी दिसायची. मुंबईतल्या मैदानांवर अनेक क्रिकेटपटू घडवणारे मंगेश भालेकर गुरव यांच्याबद्दल सांगतात. लोक ऑफिसला दांडी मारुन गुरव यांचा खेळ पाहायला येत असत इतकी त्यांची क्रेझ होती.
‘’सचिनने माझी बॅट मागितली, मी म्हटलं शोतक ठोक, त्याने ठोकलं…’’
गुरव यांच्या काळातच सचिन मोठा होऊ लागला. मात्र मुंबईतल्या शाळांमध्ये, U19 संघाची शान गुरव होते. सचिनला बॅट दिली त्या प्रसंगाबद्दल गुरव सांगतात- ‘मी सचिनच्या संघाचा कर्णधार होतो. ससानिअन क्लबकडून आम्ही खेळायचो. त्याला माझ्या बॅटने खेळायचं होतं पण तो मितभाषी आणि लाजाळू होता. त्याने विचारलं नसतं. रमेश परब यांच्यामार्फत त्याने विचारणा केली. रमेश परब आता आंतरराष्ट्रीय सामन्यांचे स्कोअरर आहेत. मी बॅट द्यायला राजी झालो पण एक अट ठेवली की त्याने मोठी खेळी करायची. त्याने अट मान्य केली आणि माझ्या एसजी बॅटने त्याने पहिलंवहिलं शतक झळकावलं’.
गोष्ट सांगतानाच गुरव यांनी दीर्घ उसासा टाकला. डागाळलेल्या दातांआडून स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं. गुरव म्हणाले, तुम्ही विचार करा. सचिन मला सर म्हणायचा.
(Photo credit: The Indian Exepress)
मुंबईतल्या शाळांसाठी खेळताना गुरव यांनी १३५ धावांची दिमाखदार खेळी साकारली होती. एका महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांनी ही खेळी केली. त्या सामन्यात गुरव यांनी सुलक्षण कुलकर्णी आणि तत्कालीन मोठ्या खेळाडूंना मागे टाकलं. सुलक्षण आता नाणावलेल्या प्रशिक्षकांपैकी एक आहेत.
गुरव भरारी घेणार असं चित्र असतानाच आयुष्याने वेगळं वळण घेतलं. गुरव यांची वाट भरकटणं आणि सचिन मोठा होत जाणं हे एकाच वेळी होणं हा नियतीने रचलेला योगायोग म्हणायचा. सचिन हा नेहमीच विलक्षण प्रतिभाशाली खेळाडू होता. त्याच्या भात्यात सगळे फटके होते. टेंपरामेंट होतं. त्याचं नशीबही चांगलं होतं- आयुष्यात योग्य गोष्टी योग्य वेळी घडत गेल्या. त्याच्या घरचं वातावरण चांगलं होतं. ते खूप महत्त्वाचं असतं. गुरव पुढचं बोलण्याआधी थोडं थांबतात.
अनिल गुरवचा भाऊ ‘शार्प शुटर’ बनला आणि सगळं गणित फिसकटलं
गुरव क्रिकेटची मैदानं गाजवत असताना त्यांचा भाऊ अजित परळ परिसरातला शार्प शूटर म्हणून कुख्यात झाला होता. गुरव सुरुवातीला परळ भागातच राहायचे. चांगल्या संधीच्या शोधात गुरव यांनी पश्चिम रेल्वेऐवजी न्यू इंडिया अॅश्युरन्स कडून खेळायला सुरुवात केली. गुरव क्रिकेटच्या मैदानात यशोशिखरं गाठत असताना त्यांच्या भाऊ मात्र पोलिसांच्या रडारवर आला. अजितच्या शोधात पोलीस गुरव यांच्या घरी थडकू लागले. आता मोठं नाव कमावलेले पोलीस अधिकारी आमच्या घरी येऊ लागले. अजित कुठाय विचारू लागले. प्रश्नांची सरबत्ती करून ते मला घेऊन जात असत. मला बेदम मारत असत. सुदैवाने क्रिकेटच्या वर्तुळात माझं नाव होतं. कोणीतरी मदतीला धावून येत असे. एकदा त्यांनी मला इतकं मारलं की मला साधं उभंही राहता येईना.
गुरव यांची आई त्यांच्याबरोबर राहतात. बोलता बोलता त्या गुडघ्यांना लागलेला मार दाखवतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अनिल चांगलं क्रिकेट खेळायचा त्यामुळे लोक त्याला ओळखत. क्रिकेट खेळतानाचे फोटो दाखवून त्याची सुटका होई. पण माझ्याकडे तो पर्याय नव्हता. काही दिवस ते तुरुंगात डांबत. काही वेळेला महिनाभरही.
ज्या ज्या पोलीस स्थानकात त्यांना नेण्यात आलं त्यांची नावं गुरव सांगतात. ‘क्रिकेट खेळणं हळूहळू कठीण होऊ लागलं. मैदानात खेळायला उतरताना मला भीती वाटू लागली. पोलीस येऊन पकडतील अशी भीती असे. अजितपासून सुटका व्हावी यासाठी अनिल आणि त्यांची आई नव्वदच्या दशकात नालासोपाऱ्यात आले. पोलिसांचा ससेमिरा इथपर्यंत पोहोचणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण पोलीस इथेही पोहोचले’, असं गुरव सांगतात.
‘’भावाच्या प्रतापामुळे पोलीस मला खुप मारायचे’’
‘अजितही इथे येऊ लागला. आईला भेटायला यायचा. बहुतेकवेळा रात्री अपरात्री यायचा. तो आला की मी दुर्लक्ष करायचो. अजित एकदा आला तेव्हा जे घडलं ते अनिल यांच्या डोक्यातून गेलेलं नाही. अजित येणार हे कळल्याने पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांच्या पाच गाड्या, २०हून अधिक पोलीस यांनी आमच्या घराला वेढा दिला. मी जेवत होतो. मला काही कळायच्या आधी माझ्या डोक्याला रिव्हॉल्वहर लावण्यात आलं. त्यांना असं वाटलं की मीच अजित आहे. त्यांनी आईला बाजूला ढकललं. अजित सुटला, मी अडकलो’.
‘पोलीस मला घेऊन गेले. लॉकअपमध्ये कुख्यात गुन्हेगारांच्या संगतीत रात्र घालवली. मला बांधण्यात आलं होतं. बेदम मारलं. त्यांनी माझा पाय तोडला. त्यावेळी जो छळ झाला तो मी विसरू शकत नाही’, असं गुरव सांगतात. त्यादिवशी आईने मटण केलं होतं. बोलता बोलता गुरव डोकं खाजवू लागले. त्यांचे डोळे लाल झाले पण डोळ्यातून पाणी आलं नाही.
(Photo credit: The Indian Exepress)
१९९४ पर्यंत अनिल यांनी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून खेळताना नाव कमावलं. कंपनीचं नाव मोठं होतं. त्याआधारे अनिल यांनी पोलिसांना हे सांगितलं की भावाबरोबर त्यांचे कोणतेही संबंध नाहीत. पोलिसांचा ससेमिरा तेव्हापासून संपला असं अनिल आणि त्यांची आई सांगते. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डनुसार अजित आजही फरार आहे. अनिल आणि त्याच्या आईने त्याला अनेक वर्षात पाहिलेलं नाही. पोलिसांचा मार खाण्याचे दिवस संपले तसं अनिल यांची क्रिकेट कारकीर्दही ओसरणीला लागली. दारुचं व्यसन लागलं. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत ते क्लार्क म्हणून रुजू झाले. मात्र त्यांचं आयुष्य भरकटलं.
‘’आचरेकर सर म्हणायचे, मी तुला खेळायला शिकवलं, दारू प्यायला नाही’’
आचरेकर सरांशी संपर्क तुटला असं गुरव सांगतात. आचरेकर गुरुजींनाच पहिल्यांदा गुरव यांच्यातलं क्रिकेट नैपुण्य हेरलं होतं. मात्र पाच वर्षांपूर्वी एका स्थानिक सामन्यात गुरुजींची आणि त्यांची भेट झाली. ‘दुपारची वेळ होती, मी प्यायलो होतो. आम्ही दोघांनी एकमेकांना ओळखलं नाही. मात्र थोड्या वेळात त्यांना मी कोण हे लक्षात आलं. ते म्हणाले, खेळायला शिकवलं मी, दारु प्यायला नाही. तू ही काय अवस्था करून घेतली आहेस’,? असं गुरुजींनी विचारलं. गुरव यांनी बोलता बोलता डोळे मिटले.
कौटुंबिक प्रश्नांमुळे गुरव यांच्या क्रिकेट कारकीर्दाला फटका बसला हे खरं पण मोठ्या सामन्यात गुरव लौकिकाला साजेसा खेळ करू शकले नाहीत हेही खरं असं सुतार सांगतात. गुरव एरव्ही खोऱ्याने धावा करायचे पण निवडसमितीचे सदस्य सामना बघायला आले की गुरव यांच्या धावा आटत असत.
‘’अनेक कात्रणे आणि पदकं गादीखाली पडून आहेत’’
आणखी एक आठवण गुरव यांना व्यथित करते. ‘पश्चिम आणि उत्तर रेल्वे असा सामना दिल्लीतल्या करनेल सिंग स्टेडियम इथे सुरू होता. वर्ष होतं १९८६. या सामन्याला निवडसमितीचे सदस्य उपस्थित होते. रेल्वेच्या रणजी संघात निवड होण्यासाठी मला एका शतकाची आवश्यकता आहे असं सदस्यांनी सांगितलं होतं. मी ८४ धावांवर खेळत होतो. खेळपट्टीवर स्थिरावले होतो. दुर्गा प्रसाद गोलंदाज होता. मी क्रीझमधून बाहेर निघालो. मिडविकेटच्या दिशेने एक विचित्र फटका खेळलो, असा फटका जो मी कधीच मारत नाही. विकेटकीपरने स्टंपिंग केलं. तो फटका आजही झोपेत आठवतो. त्या फटक्याने माझं आयुष्य बदललं’, असं गुरव सांगतात.
त्यांचं नाव छापून आलेल्या बातम्यांची कात्रणं तसंच प्रमाणपत्रं गुरव यांनी जपून ठेवली आहेत. काही फाईलींमध्ये बंद आहेत तर काही त्यांच्या उशीखाली आहेत. त्यांच्यासाठी हा सुकून कोपरा आहे. बायकोविषयी बोलताना गुरव सांगतात- ती आग आहे. त्यांच्या मुलांनी गुरव यांनी एकेकाळी मैदानं कशी गाजवली याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. आजूबाजूच्या वातावरणात त्या गोष्टी ऐकीव बनून राहिल्या आहेत. यश दहा वर्षांचा आहे. अनिकेत १८ वर्षांचा आहे.
‘अनिकेत दिवसभर नसतो, रात्री परत येतो. बारावीच्या परीक्षेत त्याने ८५ टक्के गुण मिळवले’, असं गुरव अभिमानाने सांगतात. ‘वांद्रे इथल्या एमएमके कॉलेजमध्ये मी बँकिंग इन्शुरन्समध्ये पदवीचं शिक्षण घेत आहे. ३ वाजता दुपारी मी नॅशनल इंडिया अॅश्युरन्स इथे ट्रेनीशिपसाठी जातो. तिथून साडेआठ वाजता निघतो. बाबांच्या नावामुळे मला तिथे काम करायला मिळत आहे. पण मी त्यांच्याशी बोलत नाही. त्यांच्यासंदर्भात छापून आलेल्या बातम्या मी वाचल्या आहेत. पण मी त्याविषयी फार विचार करत नाही’, असं अनिकेत सांगतो. अनिकेतला बुद्धिबळ खेळायला आवडतं. नालासोपारा परिसरातल्या स्पर्धांमध्ये तो सहभागी होतो.
त्या खोपट्यात गुरव आपल्या आईबरोबर असतात. ‘मी ऐन भरात असताना खेळताना अचूक निर्णय घेतले. गोलंदाज कितीही भारी असे मी त्याची पर्वा केली नाही. कोणता फटका खेळायचा याचं माझं नियोजन चोख असे. कोणता चेंडू सोडायचं हेही ठरलेलं असे. पण आयुष्यात मात्र माझे निर्णय चुकत गेले. सचिनसारखा मित्र मला लाभला होता. पण मी त्याला सोडून चुकीच्या संगतीत गेलो. तिथेच सगळं फिरलं’.
‘’सचिनकडून मला माझी बॅट परत हवी होती’’
कारकीर्द, आयुष्य उतरणीला लागलेलं असताना गुरव यांची सचिनशी भेट झाली. मरिन लाईन्सच्या इस्लाम जिमखान्यात भेट झाली. ‘मी निघत असताना गडबड गोंधळ पाहिला. सचिन गाडीत शिरत होता. भोवती १० सुरक्षारक्षक होते जे गर्दीला आवरत होते. त्याने मला पाहिलं आणि बोलावलं. आम्ही अवघी काही मिनिटं बोलू शकलो. त्याने मला घरी बोलावलं’. गुरव काही दिवसांनी सचिनच्या घरी पोहोचले. मात्र सचिन आदल्या दिवशी इंग्लंडला रवाना झाला होता.
(Photo credit: India news)
‘माझा जाण्याचा उद्देश हा होता की माझी बॅट परत घ्यावी. एसजीची ती बॅट त्याने मला परत दिली नाही. ती बॅट माझी होती. निवृत्तीनंतर त्याला भेटायची इच्छा आहे. तेव्हा बॅट परत द्यायला सांगेन. आता तो ती बॅट वापरण्याची शक्यता नाही’, असं गुरव सांगतात.
गुरव आता नव्याने आयुष्याची सुरुवात करू पाहत आहेत. नालासोपाऱ्यात अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्थेच्या उपक्रमाचा ते भाग झाले आहेत. एकावेळी एकच ही घोषणा त्यांच्या लक्षात राहिली आहे. सकाळी उठून स्वतला बजावायचं की आज मी दारु पिणार नाही. हे रोज स्वतला सांगायचं- बजावायचं. दिवस उजाडतो, पुढे सरकू लागतो. वानखेडे स्टेडियमवरच्या प्रकाशमान टॉवरबोल्टपासून पासून खूप दूर. सावल्या मोठ्या पडू लागतात. गुरव अचानक पैसे मागतात. आज आपके नाम पे एक ९० एमएल. आज तुमच्यासाठी हा दारुचा प्याला. तुम्हाला आश्चर्य वाटत नाही. गुरव यांच्यामागच्या स्टंप्सवर आचरेकर गुरुजींनी ठेवलेलं ते नाणं कधीच पडून गेलं आहे.
(सौजन्य - ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १७ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘Before Sachin, there was Anil Gurav. The coin was placed on his stumps first’ या लेखाचा मराठी अनुवाद.)






