अविनाश गवळी
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेल्या अफगाणिस्तानमध्ये धार्मिक कायद्याच्या गप्पा मारणाऱ्या तालिबानच्या छत्रछायेखालीच एक अशी प्रथा सुरू आहे ज्यात शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचं शोषण होतं. या प्रथेचं नाव आहे ‘बच्चाबाजी’ किंवा ‘बच्चा/बचा पार्टी’. बच्चा या फारसी शब्दाचा अर्थ मुलं असा आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमाभागात आणि काही मध्य आशियाई प्रदेशांत “बच्चा बाजी” नावाची एक प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे. बच्चा म्हणजे लहान मुलगा आणि बाजी म्हणजे खेळ किंवा नाच. पण प्रत्यक्षात हा खेळ नसून, तो उमलत्या वयातील मुलांवर लादलेला एक अमानवी अत्याचार आहे, तोही समाजाच्या डोळ्यांसमोर, उघडपणे आणि अत्यंत निर्धास्तपणे.
या प्रथेमध्ये निवडले जातात ते गरीब, अनाथ किंवा पूर्णपणे असहाय मुलगे. त्यांना फक्त स्त्रियांचे कपडे घालून नाचायला लावले जाते, एवढाच हा प्रकार नाही. त्या मुलांना अगदी नवतरुण मुलीसारखे तयार केले जाते, मेकअप केला जातो, डोळ्यांत काजळ भरलं जातं, ओठ रंगवले जातात, दागिने घातले जातात. काही ठिकाणी नाकात नथ घालण्याची किंवा नथ उतरवण्याची जी पद्धत स्थानिक स्त्री-परंपरांमध्ये आहे, तीच पद्धत या मुलांवरही लादली जाते. म्हणजेच, त्यांची ओळख, लिंगभाव आणि बालपण सगळं पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असतो.

हे इथंच थांबत नाही, तर पार्टी संपताना उपस्थित पाहुणे या मुलांसोबत एक रात्र घालवण्यासाठी बोली लावतात. या व्यवसायासाठी मुलांवर नियंत्रण असणाऱ्याला प्लेबॉय म्हणतात. हेच प्लेबॉय पाहुण्यांना मुलं पुरवण्याचं आणि त्यासाठीचे आर्थिक व्यवहार पाहतात.
हे सगळं “नृत्य” किंवा “मनोरंजन” म्हणून मांडलं जातं, पण प्रत्यक्षात तो सत्तेचा, भीतीचा आणि शोषणाचा खेळ असतो. या मुलांना विरोध करण्याची, नकार देण्याची किंवा पळून जाण्याची मुभा नसते. कारण समोर असतात स्थानिक युद्धसरदार, प्रभावशाली लोक, श्रीमंत व्यापारी किंवा राजकीय पाठबळ असलेली माणसं. संस्कृतीच्या नावाखाली चालणारी ही प्रथा प्रत्यक्षात बाल लैंगिक शोषणाचाच एक प्रकार आहे.
अफगाणिस्तानमध्ये देहव्यापारावर बंदी, बच्चाबाजी कशी सुरू?
अफगाणिस्तानमध्ये कायद्याने बच्चा बाजीवर बंदी आहे, हे कागदोपत्री खरं आहे. पाकिस्तानमध्येही बाल लैंगिक शोषण हा गंभीर गुन्हा मानला जातो. पण सीमाभागात, जिथे बंदुका कायद्यापेक्षा जास्त ताकदवान आहेत, तिथे हे कायदे निष्प्रभ ठरतात. जे कायदे या मुलांचं संरक्षण करायला हवेत, तेच कायदे प्रभावशाली लोकांसमोर गप्प बसतात.
अफगाणिस्तानमध्ये देहव्यापारावर बंदी आहे. आधीच्या सरकारनेही यावर कायदेशीर बंदी घातली होती आणि तालिबान्यांकडून ज्या धार्मिक शरिया कायद्याच्या अंमलबजावणीचा दावा केला जातोय त्यालाही हे मान्य नाही. असं असतानाही आधीही कायदेशीर शिक्षेची तरतूद करुनही हा प्रकार चालायचा आणि आताही तालिबान्यांकडून यासाठी कठोर आणि हिंस्र शिक्षा असतानाही हे प्रकार सुरूच आहेत. विशेष म्हणजे धार्मिक गप्पा मारणाऱ्या तालिबान्यांपैकी काही जण या प्रथेला पारंपारिक धार्मिक प्रथा असल्याचं सांगतात. सैन्यात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या मते, या प्रथेत प्रत्येकाचे स्वतःचे हितसंबंध आहेत. काहींना तर मुलींपेक्षा मुलं अधिक आवडतात. हे अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. यात 13 ते 20/25 वर्षांच्या मुलांचा वापर होतो.

“गरीब घरातील किशोरवयीन मुलं पैशांसाठी अडकतात”
आर्थिक पातळीवर दिवाळखोरीच्या स्थितीत असलेल्या अफगाणमधील अनेक किशोरवयीन मुलं पैशांसाठी यात अडकतात. अनेक मुलं तर यातून पैसे कमावून चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, भविष्यात मोठं व्हायचं आहे असंही म्हणतात. मात्र, त्यांना हा पुन्हा माघारी न येता येणारा सापळा असल्याची जाणीव फार उशिरा होते. या संपूर्ण रॅकेटमध्ये एक मोठी साखळी असते. छोटे मोठे दलाल गरजू मुलांचा शोध घेतात. त्यांना हेरून पैशांचं आमिष दाखवतात. यानंतर त्यांच्यावर काही लोक असतात ते या मुलांना आणखी पुढे पाठवतात. हा संपूर्ण धंदा मुलांच्या शोषणाचा असला तरी हे दलाल मात्र आपण गरजू मुलांना मदत म्हणून हे करत असल्याचा दावाही करतात.
दुकानांबाहेर जिथं किशोरवयीन मुलं गोळा होतात अशा ठिकाणी जाऊन दलाल या मुलांशी आपली ओळख वाढवतात. त्यानंतर निमित्त काढून त्यांच्या घरात काही अडचण आहे का, त्यांना कशाची कमतरता आहे का? अशी चौकशी करतात. यात जो मुलगा आपली अडचण बोलून दाखवतो त्याला हे दलाल मदतीचं आमिष दाखवून हे काम करायला लावतात. मुलांचं वय 20-25 वर्षांच्या वर गेलं आणि त्यांची या व्यवसायात गरज उरली नाही की आम्ही या तरुणांना त्यांचं आयुष्य स्थिर करण्यासाठी मदत करतो. त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत करतो, असंही या व्यवसायातील दलाल दावा करतात. अफगाणमधील लोकही लग्नावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. त्यामुळे लग्नासाठी आर्थिक मदतीच्या आश्वासनानं पालकही अनेकदा मुलांना या व्यवसायात जाण्यापासून रोखत नाहीत.
सुरुवातीला हे दलाल मुलांना काम देतो म्हणून आपल्याकडे बोलावतात. त्यांना काही दिवस नाचण्याचं, मुलींची वेशभुषा आणि मेकअप अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. या सापळ्यात अडकलेल्या मुलांना याचा त्रास होत नाही का असं विचारल्यास होतो, पण पैशांची गरज जास्त महत्त्वाची असल्याचं ते कबूल करतात. या मुलांना बच्चा पार्टित नाचताना दारुही पाजली जाते. यासाठी पार्टितील पाहुण्यांकडून जबरदस्तीही होते.
बच्चाबाजीच्या डीव्हीडीचं मोठं मार्केट
बच्चाबाजी / बच्चा पार्टीचे व्हिडीओ तयार करुन त्याच्या डीव्हीडी देखील विकल्या जातात. बाजारात या डीव्हीडींना मोठी मागणी आहे. अनेक मुलांच्या अशा डीव्हीडीही तयार केल्या जातात. या डीव्हीडींना मोठा ग्राहकवर्गही आहे. महिलांना घरात बंदिस्त करणाऱ्या अफगाण समाजात महिलांना पर्याय म्हणून लहान मुलांचं शोषण होतं. या मुलांनाच मुली/महिलांचे कपडे घालून नाचवलं जातं, गुलाम केलं जातं, लैंगिक शोषण होतं आणि टोक म्हणजे या मुलांच्या हत्याही होतात. काही लोक हा बच्चाबाजीचा प्रकार पाकिस्तानमधून अफगाणमध्ये आल्याचं बोलतात.

लोकनियुक्त अफगाण सरकारने या बच्चा पार्ट्यांवर बंदी घातली होती. मात्र, उच्च पदस्थ, मोठ्या हुद्द्यावर काम करणारे कमांडर यानंतरही अशा बच्चा पार्ट्यांच्या आयोजनात सहभागी असल्याचं काही सैनिकांनी सांगितलंय. कायदेशीर पातळीवर बंदी असली तरी त्याची अंमलबजावणी करणारी पोलीस यंत्रणा कसं काम करते यावरच हे अवलंबून राहतं. त्यामुळे इथं कायदेशीर बंदी असली तरी हा प्रकार सर्रास चालताना दिसतो. हे सरकारलाही माहिती आहे, मात्र कुणीही यावर बोलायला तयार होत नाही.
“हस्तक्षेप करू नका, ही त्यांची संस्कृती आहे.”
या सगळ्यात जगाची भूमिका अधिक अस्वस्थ करणारी आहे. जेव्हा अमेरिकन आणि NATO फौजा अफगाणिस्तानात तैनात होत्या, तेव्हा अनेक सैनिकांनी नंतर कबूल केलं की त्यांनी अशा घटना पाहिल्या. त्यांना माहिती होतं की काय चाललं आहे. पण तरीही त्यांना सांगितलं गेलं, “हस्तक्षेप करू नका, ही त्यांची संस्कृती आहे.” संस्कृतीचा हा युक्तिवाद इथे ढाल बनला, गुन्ह्यांना वाचवण्यासाठी.
मानवाधिकार, स्त्रियांचे हक्क, बालसुरक्षा यावर भाषणं करणाऱ्या महासत्तेने इथे नैतिक सोयिस्करपणा निवडला. कारण स्थानिक सत्ताधाऱ्यांना दुखावणं, राजकीयदृष्ट्या परवडणारं नव्हतं. त्याची किंमत मोजली गेली, त्या मुलांनी.
जगभरात लागू असलेले आंतरराष्ट्रीय कायदे स्पष्ट सांगतात की संमती वयाखालील कोणत्याही व्यक्तीवर असा अन्याय हा गुन्हाच आहे. संयुक्त राष्ट्रांचा बालहक्क करार, मानवाधिकार कायदे, युद्धकाळातील संरक्षणाचे नियम, सगळेच याला बेकायदेशीर ठरवतात. त्यामुळे बच्चा बाजी ही कोणत्याही अर्थाने “स्थानिक परंपरा” ठरू शकत नाही. ती फक्त आणि फक्त एक गुन्हेगारी प्रथा आहे.
‘’द डान्सिंग बॉईज ऑफ अफगाणिस्तान’’
क्लोव्हर फिल्म्स आणि अफगाणिस्तानचे पत्रकार नजीबुल्ला कुरेशी यांनी 'द डान्सिंग बॉयज ऑफ अफगाणिस्तान' डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. जी यूकेमध्ये दाखवली गेली आणि पुढच्याच महिन्यात अमेरिकेत प्रसारित झाली. द हफिंग्टन पोस्टचे पत्रकार निकोलस ग्राहम यांनी या माहितीपटाचे "आकर्षक आणि भयावह दोन्ही" अशा भाषेत कौतुक केले. या डॉक्युमेंट्रीमध्ये काही वर्षांपूर्वी या प्रथेचा बळी गेलेल्या मुलाने एक इंटरव्यू दिला होता. तो म्हणतो की, मी या वाईट लोकांच्या तावडीतून कसाबसा बाहेर पडलो. मी संरक्षणासाठी पोलिसांकडे गेलो पण पोलिसांनी परत मला त्या लोकांच्या हवाली केले. त्या लोकांच्या अत्याचाराने मी बेजार झालो होतो. त्या लोकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करून अक्षरशः माझी गुद्दद्वाराला इजा केली होती. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. पण जखम भरून यायला वेळ लागला.

खरी अडचण ही नाही की कायदे नाहीत. खरी अडचण आहे ती इच्छाशक्तीची. गरीब मुलांचे आयुष्य स्वस्त समजणारी मानसिकता, शक्तिशाली लोकांना दिली जाणारी माफी, आणि “आपण बघ्याची भूमिका घेऊ” अशी जागतिक पातळीवरची शांतता, यामुळेच ही प्रथा टिकून आहे. आज प्रश्न असा आहे की, जर एखाद्या समाजात लहान मुलांचं बालपण हिरावून घेतलं जात असेल, तर जग फक्त संस्कृतीचा मुखवटा लावून गप्प बसू शकतं का?






