संजना खंडारे
- बदलापूर येथे गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर काढणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
- मुख्य आरोपीच्या घरातून सोनोग्राफी अहवाल, खोटी प्रतिज्ञापत्रे आणि १० लाखांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
- या रॅकेटचा विस्तार केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
“घर चालवण्यासाठी पैसे हवे होते… त्यांनी सांगितलं काही मोठं नाही, छोटंसं इंजेक्शन आहे,” असं सांगताना बदलापूरमधील एका पीडित महिलेचा आवाज अजूनही थरथरतो. काही हजार रुपयांच्या आशेने तिने होकार दिला, पण त्यानंतर तिच्या शरीरावर काय प्रक्रिया झाली, याची तिला पूर्ण कल्पनाही नव्हती. काही दिवसांनी ती असह्य वेदनांनी त्रस्त झाली आणि अखेर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तिथेच उघड झाला एक थरारक आणि अमानुष प्रकार अंडाशय तस्करीचा. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर काढणी करून तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
प्रकरण कसे उघड झाले?
बदलापूरमधील अंडाशय तस्करी प्रकरणाचा उलगडा हा एका सर्वसामान्य, गोरगरीब महिलेच्या धाडसामुळे झाला. संबंधित पीडित महिला ही बदलापूर परिसरातीलच रहिवासी असून आर्थिक अडचणीत सापडलेली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती कामधंदा शोधत होती. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपी महिलांनी तिला पैशांचे आमिष दाखवले. आरोपी महिलेने तिला “सोप्या वैद्यकीय प्रक्रिये”च्या नावाखाली २० हजार रुपये मिळतील असे सांगितले. तिच्या शरीरातून “फक्त एक छोटा भाग” काढला जाईल आणि त्याचा भविष्यात काहीही परिणाम होणार नाही, असं तिला पटवून दिलं. वैद्यकीय भाषेतील गुंतागुंतीची माहिती न देता तिला फक्त पैशांचे आश्वासन देण्यात आले. तिला काही इंजेक्शन्स देण्यात आली. ही इंजेक्शन्स डॉक्टरांच्या थेट देखरेखीशिवाय देण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर बेकायदेशीर सोनोग्राफी करून तिला आयव्हीएफ सेंटरमध्ये नेण्यात आलं.

प्रक्रियेनंतर काही दिवसांनी संबंधित महिलेला तीव्र पोटदुखी, अशक्तपणा आणि अनियमित रक्तस्त्रावाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला तिने हे दुष्परिणाम सामान्य समजून दुर्लक्ष केले. मात्र वेदना असह्य झाल्यानंतर ती उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या शरीरावर शस्त्रक्रियेचे स्पष्ट चिन्ह दिसले. अधिक चौकशी केल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितला. या माहितीच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने तात्काळ बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यांत लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी तपास सुरू केला. महिलेच्या जबाबावरून ज्युवेली गावातील सुलक्षणा गाडेकर या महिलेचं नाव समोर आले. पुढील तपासात तिच्या साथीदारांचा सहभाग उघड झाला आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.
ज्युवेली ते उल्हासनगर - रॅकेटमागील महिलांची साखळी उघड
तपासात ज्युवेलीमध्ये राहणारी सुलक्षणा गाडेकर हिचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले. ती बदलापूरमधील नॅनो सिटी परिसरात राहात होती. तिच्यासोबत उल्हासनगर येथील अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या दोन महिलांचा सहभाग असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी तिन्ही महिलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महिलांना कसं जाळ्यात ओढलं?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला गोरगरीब व आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करत होत्या. त्यांना प्रत्येकी अंडाशयामागे २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवलं जात असे. मध्यस्थी करणाऱ्या महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत होते. सुलक्षणा गाडेकर हिने गर्भाशयात स्त्रीबीज वाढीसाठी लागणारी इंजेक्शन्स स्वतःच्या घरात साठवून ठेवली होती. ती महिलांना घरी बोलावून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही इंजेक्शन्स देत असे. त्यानंतर बेकायदेशीरपणे सोनोग्राफी करून घेतली जात होती. स्त्रीबीजाची वाढ झाल्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये नेलं जाई. ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्यांच्या अंडाशयांची काढणी केली जात असून त्यानंतर हे अंडाशय इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवलं जात असल्याचा आरोप आहे.
घरावर छापा; धक्कादायक साहित्य जप्त
पोलिसांनी मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर हिच्या राहत्या घरावर छापा टाकत तपासाला वेग दिला. या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक पुरावे हाती लागले. घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, विविध महिलांचे सोनोग्राफी अहवाल, खोटी प्रतिज्ञापत्रे, संबंधित महिलांचे छायाचित्रे तसेच इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांमधून बेकायदेशीर वैद्यकीय प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर आलीये. याशिवाय, सुमारे १० लाख रुपयांहून अधिक किंमतीचा औषधसाठाही पोलिसांनी जप्त केले असून या औषधांचा नेमका वापर कशासाठी केला जात होता, याचा तपास सुरू आहे. या रॅकेटचा विस्तार फक्त बदलापूरपुरता मर्यादित नसून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अंडाशयांची विक्री केली जात होती. त्यामुळे हे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

प्राथमिक तपासात सुमारे ३०० हून अधिक महिला या रॅकेटच्या जाळ्यात अडकल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर हा आकडा खरा ठरला, तर हे राज्यातील सर्वात मोठ्या आरोग्य तस्करी प्रकरणांपैकी एक ठरू शकते. पीडित महिलांपैकी अनेकांना प्रक्रियेचे पूर्ण परिणाम, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम किंवा भविष्यातील गुंतागुंत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, अशी शक्यता तपासात वर्तवली जात आहे.
बड्या डॉक्टरांचा सहभाग? तपासाची साखळी वाढली
या अंडाशय तस्करी प्रकरणात केवळ काही महिलांपुरतेच रॅकेट मर्यादित नसून काही बड्या डॉक्टरांचा किंवा आयव्हीएफ सेंटरचा सहभाग असण्याची शक्यता तपासात नाकारता येत नाही. पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके स्थापन करून सखोल तपास सुरू केला असून आरोग्य विभागानेही संबंधित कागदपत्रांची छाननी हाती घेतली आहे. या रॅकेटमागे नेमकं कोण आहे? औषधांचा वापर कशासाठी केला जात होता? आणि आणखी कोणकोण सहभागी आहेत?
याची उत्तरे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे खासगी आयव्हीएफ केंद्रांच्या कार्यपद्धतीवर आणि वैद्यकीय प्रक्रियेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिलांच्या आरोग्यासारख्या संवेदनशील विषयात आर्थिक लोभापोटी गुन्हेगारी पातळीवर पोहोचलेला हा प्रकार अत्यंत चिंताजनक असून गोरगरीब महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दक्षिण भारतातील अंडाणू दान गैरप्रकार
चेन्नई येथे २०१२ साली एका १७ वर्षीय मुलीचा अंडाणू दान प्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर संबंधित आयव्हीएफ केंद्रावर गंभीर आरोप झाले. अल्पवयीन मुलीकडून वारंवार अंडाणू घेण्यात आल्याचा संशय व्यक्त झाला होता. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आणि अंडाणू दान प्रक्रियेवरील नियम अधिक कडक करण्याची मागणी झाली. चेन्नई आणि हैदराबाद येथे अंडाणू दान संदर्भातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आले होते. माध्यमांमधील अहवालांनुसार, काही आयव्हीएफ केंद्रांवर अल्पवयीन मुलींकडून किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांकडून वारंवार अंडाणू घेण्यात येत असल्याचे आरोप झाले.
नियमांनुसार अंडाणू दानासाठी वयाची मर्यादा, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि दानांमधील अंतर निश्चित असते. मात्र काही प्रकरणांत या नियमांचे उल्लंघन करून महिलांकडून वारंवार अंडाणू घेण्यात आले. आर्थिक मोबदल्याच्या आमिषामुळे अनेक महिलांनी आरोग्य धोक्यात घालून प्रक्रिया केल्याचे समोर आले. तज्ज्ञांच्या मते, वारंवार हार्मोनल इंजेक्शन्स आणि अंडाणू काढण्याची प्रक्रिया केल्यास महिलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय देखरेख आणि कायदेशीर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे ठरते.
अंडाशय तस्करी आणि अंडाणू दान यात नेमका काय फरक आहे?
अंडाणू दान ही कायदेशीर आणि नियमनबद्ध वैद्यकीय प्रक्रिया आहे. त्यासाठी संबंधित महिलेची लेखी संमती, वैद्यकीय तपासणी, मानसोपचार सल्ला, आणि शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आवश्यक असते. आयव्हीएफ उपचारासाठी अंडाणू दान केले जाते आणि त्यामध्ये संपूर्ण अंडाशय काढले जात नाही; फक्त परिपक्व अंडाणू सुरक्षित पद्धतीने घेतले जातात.

याउलट, अंडाशय तस्करी हा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर गुन्हा आहे. यात महिलांची फसवणूक करून किंवा चुकीची माहिती देऊन शस्त्रक्रियेद्वारे अंडाशय काढले जातात. अशी प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या धोकादायक असून महिलांच्या भविष्यातील प्रजननक्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम करू शकते.
कायद्यानुसार नियम काय सांगतात?
भारतामध्ये सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) आणि सरोगसी प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या नियमांनुसार,
- अंडाणू दान करणाऱ्या महिलेचे वय २३ ते ३५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- एक महिला फक्त एकदाच अंडाणू दान करू शकते.
- दानापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी आणि मानसोपचार समुपदेशन आवश्यक आहे.
- लेखी आणि माहितीपूर्ण संमती (Informed Consent) बंधनकारक आहे.
- अधिकृत आणि नोंदणीकृत ART क्लिनिकमध्येच प्रक्रिया केली जाऊ शकते.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर, क्लिनिक किंवा संबंधित व्यक्तींवर दंड आणि कारावासाची तरतूद आहे.






