टीम बाईमाणूस
- बिहारच्या औरंगाबादमध्ये पाच अल्पवयीन दलित मुलींनी विष प्राशन केले, ज्यात चौघींचा मृत्यू झाला, तर एक मुलगी वाचली.
- ही घटना गावाबाहेर जाता कामा नये यासाठी पोलीस यायच्या अगोदर एकाच चितेवर चौंघीचे अंतिम संस्कार करण्यात आले.
- घटना घडल्यानंतर गावातील सगळे पुरुष फरार झाले असून, गावात स्मशानशांतता पसरली आहे.
‘’२९ जानेवारीचा तो दिवस होता… संध्याकाळी माझ्या चार मैत्रिणींसोबत मी गावापासून एक किलोमीटर दूर असलेल्या एका तलावाजवळ गेली होती. आमच्या गप्पा सुरू होत्या, त्याच दरम्यान आम्ही पक्ष्यांना मारण्यासाठी जे विषारी द्रव्य वापरलं जातं ते प्यायलो आणि लगेचच आमची तब्येत बिघडायला सुरूवात झाली. काही कळायच्या आतच माझ्या चारही मैत्रिणी जागीच मृत झाल्या. मी ते विष अगदी थोडसंच घेतलं होतं, आणि लगेच थुकूनही टाकलं होतं, त्यामुळे मी वाचले… मैत्रिणींच्या मृत्यूनंतर मी अतिशय घाबरली आणि तिथून पळ काढला, घरी आली…’’
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील हसपुरा गावात एका दलित वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची ही प्रतिक्रिया… ही मुलगी जी धक्कादायक घटना सांगतेय ती
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील हसपुरा परिसरातील एका दलित वस्तीत घडली. एकाच गावात राहणाऱ्या पाच मैत्रिणींनी विष प्राशन केलं, या सगळ्या अल्पवयीन मुली होत्या, ज्यात चार मुली जागच्याजागी दगावल्या आणि एक त्वरित उपचार मिळाल्यामुळे वाचली. या सगळ्या मैत्रिणी अवघ्या १० ते १४ वर्षांच्या होत्या.
पुढे तर हे प्रकरण अधिकच गंभीर झाले. गावातील चार मुली विष प्यायल्याने मृत झाल्या ही घटना कळताच गावकऱ्यांनी पोलीस आणि इतर कुणालाही न कळवता शवविच्छेदनाच्या अगोदरच या चारही मुलींवर सामूहिक अंतिम संस्कार करून टाकले. गावातील ही घटना बाहेरच्या कुणालाही कळता कामा नये असा फतवाच गावाने काढला आणि त्यासाठी तातडीने बैठकही बोलावली.
हे सगळं अतिशय संशयास्पद होतं. मात्र ही घटना उघडकीस आलीच. जेव्हा पोलीस या गावात चौकशीसाठी शिरले तेव्हा गावातील सगळे पुरुष हे गायब झाले असून एकही महिला या घटनेबद्दल बोलायला तयार नाहीये.

घटना हसपुरा पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या बिगहा गावाची आहे. १ फेब्रुवारीला हसपुरा पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळाली. जेव्हा पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश कुमार चौकशीसाठी गावात पोहचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या मुलीनी एकत्र विष प्राशन केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आणि मुलींवर अंत्यसंस्कार झाले आहेत. या सगळ्या अल्पवयीन मुली दलित समाजाच्या होत्या.
दै. भास्करच्या रिपोर्टनुसार गावापासून एका किमी अंतरावर असलेल्या एका तलावाजवळ या मुलींचे मृतदेह सापडले. विनोद राजवंशी, सीता राजवंशी, वीरेंद्र राजवंशी, नंदू राजवंशी अशी या मुलींच्या पालकांची नावे आहेत. यापैकी विनोद राजवंशीची मुलगी वाचली आहे.
या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही जणं सांगतात की, या मुलींना त्यांच्या घरातील मोठ्यांनी मुलांसोबत जास्त मिसळल्याबद्दल आणि मुलांशी बोलल्याबद्दल कडक शब्दांत हटकले होते. या रागावण्यामुळे दुखावलेल्या पाचही मुलींनी शेतात जाऊन विष खाल्ले. यामध्ये 4 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर, एक मुलगी सुदैवाने वाचली असून तिनेच या भीषण वास्तवाचा उलगडा केला.
गावात अशीही कुजबुज आहे की, या मुलींच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. अगदी अंत्यसंस्कार करायलाही पैसे नव्हते म्हणून एकाच चितेवर चौघींचे अंतिम संस्कार करण्यात आले.
पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोलिसानी या घटनेची कसून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील कोणीही बोलायला तयार नाहीत. गावातील सगळी पुरुष मंडळी फरार झाली असून महिलाही काही बोलत नाहीत. या घटनेची सगळ्या बाजूने चौकशी करण्यात येत आहे. शाळेमध्ये किती दिवसांपासून मुली जात नव्हत्या याचीही माहिती घेतली जात आहे. गाव पूर्ण रिकामं असून जिथे प्रेत जाळण्यात आले तिथे फॉरेंसिक पथकाची पाहणी सुरू आहे. या सगळ्या मुली पाचवी पर्यंत शिकल्या होत्या, कारण गावात पुढचे शिक्षण घेण्यासाठी शाळा नाहीये. या सगळ्या मुली घरकामात मदत करायच्या, त्यांची घरं एकमेकांना लागूनच होती. जी मुलगी वाचली आहे तिच्या घराला कुलुप आहे.






