टीम बाईमाणूस
- तथाकथित उच्चजातीय तरुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागातील केतन या दलित तरुणाची अतिशय क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे.
- मुंबईत कामाला असलेल्या केतनला त्याच्या प्रेयसीने फोन करून गावी बोलावलं आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियानी केतनची नखं उखडली, पायाला खिळे ठोकले, गुप्तांगाला जखमा केल्या!
- उत्तराखंड सरकारने केतनच्या कुटुंबाला आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली असून मुलीचे वडील यशवीर सिंह पंवार आणि आजोबा विद्या सिंह पंवार यांना अटक करण्यात आली आहे.
मला पाणी द्या, मी मरेन… हे केतनचे शेवटचे शब्द होते. पण त्याला पाणी दिले गेले नाही आणि तो वेदनांनी तडफडून मरण पावला. केतन उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागातील रहिवासी, दलित समाजाचा…
त्याने एक 'गुन्हा' केला होता. कोणता? तो टिहरी गढवाल भागातीलच खोलगढ येथील तथाकथित उच्च जातीच्या एका महिलेच्या प्रेमात पडला होता. केतन मुंबईहून परत आला होता आणि घरी आराम करत होता, तेव्हा त्याला त्याच्या प्रेयसीचा फोन आला, तिने त्याला भेटायला बोलावले होते. केतन आपल्या मित्राला सोबत घेऊन तिला भेटायला गेला आणि तो 'पकडला' गेला.
त्या महिलेच्या कुटुंबीयांनी केतन आणि त्याच्या मित्राला रात्रभर जनावरांसारखे मारहाण केली. केतन मरण पावला. त्याचा मित्र रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. केतनचे वडील सांगतात की, सकाळी त्यांना मुलाला घेऊन जाण्यासाठी फोन आला. ते पोहोचले, तेव्हा केतन आधीच मरण पावला होता. केतनला इतकी क्रूर मारझोड केली होती की, त्याची नखेसुद्धा उपटून काढण्यात आली होती.
उत्तराखंड सरकारने केतनच्या कुटुंबाला आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. पण केतनच्या मारेकऱ्यांची घरे बुलडोझरने पाडण्याचे धाडस या डबल इंजिनवाल्या उत्तराखंड सरकारमध्ये नाही. केतनच्या मारेकऱ्यांसाठी मोर्चा काढण्याचे किंवा त्यांना चकमकीत ठार मारून टाकण्याचे धाडस उत्तराखंड पोलिसांमध्ये आहे का? मरता मरता केतन पाणी मागत होता. ज्यांनी मारलं, ते कुठले पाणी देणार?

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत तरुणाचे वडील धनपाल लाल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, 8 जूनच्या सकाळी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव यशवीर सिंह पंवार असं सांगितलं. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की त्यांचा मुलगा केतन लाल आणि त्याचा मित्र दिवाकर डिमरी रात्रभर त्यांच्या ताब्यात होते आणि त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
माहिती मिळताच धनपाल लाल आणि इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. तिथे केतन आणि दिवाकर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. केतनची प्रकृती गंभीर होती आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्थानिक पातळीवरून मिळालेली माहिती आणि प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, केतनची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. रविवारी (7 जून) रात्री त्या मुलीच्या फोनवरून कॉल करून केतनला बोलावण्यात आलं होतं.
केतन आपला मित्र दिवाकर डिमरीसोबत तिथे गेला होता. ही गोष्ट मुलीच्या कुटुंबीयांना समजली, असं सांगितलं जात आहे. मृत केतनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर दोन्ही तरुणांना डांबून मारहाण करण्यात आली. जिल्हा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेचं संपूर्ण सत्य तपासानंतरच समोर येईल. याप्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस म्हणतात, हे प्रेमप्रकरण आहे…
हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे, असं टिहरी गढवालच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) श्वेता चौबे यांनी बीबीसीला सांगितलं. त्या म्हणाल्या, "मुलगीही अल्पवयीन आहे. हे प्रेमप्रकरण आहे. दोघेही फोनवर बोलायचे. मुलीच्या फोनवरूनच त्या मुलाला फोन आला होता. त्यानंतर तो आपल्या मित्रासोबत तिथे गेला होता. त्या तरुणाला ठरवून बोलावण्यात आलं होतं का, की मुलगी आणि त्या तरुणाला एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला होता, हा तपासातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनपाल लाल यांच्या तक्रारीच्या आधारे लंबगांव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हत्या आणि जात किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर झालेल्या गुन्ह्याबाबत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 103(1), 3(5) तसेच एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(2)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.घटना स्थळावरून वैज्ञानिक (फॉरेन्सिक) आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले असून साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
एसएसपी श्वेता चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुलीचे वडील यशवीर सिंह पंवार आणि आजोबा विद्या सिंह पंवार यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहाचे पोस्टमार्टम 3 डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे करण्यात आले असून त्याचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
अनुसूचित जाती आयोगाने स्वतःहून घेतली दखल
टिहरी येथील घटनेची उत्तराखंड अनुसूचित जाती आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. दलित तरुणाच्या हत्येचं हे प्रकरण गांभीर्याने घेऊन टिहरी गढवालच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे, असं आयोगाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आयोगाने पोलिसांना निष्पक्ष आणि जलद तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयोगाचे सदस्य राजेश सिंह राजा कोली म्हणाले, "अनुसूचित जाती समुदायातील लोकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचार आणि भेदभावाच्या प्रकरणांमध्ये आयोग संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करेल. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयोग परिस्थितीवर लक्ष ठेवेल."
(धनपाल लाल)
‘’अनुसूचित जातीचा असल्यामुळेच आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आलं’’
धनपाल लाल सांगतात की, मुलगा केतन हा 12वीचा विद्यार्थी होता आणि भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. मुलगा गमावल्याचं दुःख शब्दांत सांगता येणार नाही.
अनुसूचित जातीचा असल्यामुळेच आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप धनपाल लाल यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री केतन नेहमीप्रमाणे घरात होता आणि पालकांना सांगून तो झोपायला गेला होता. धनपाल लाल म्हणतात, "त्यानंतर तो घरातून कधी बाहेर गेला, हे आम्हाला माहीत नाही. मला वाटतं की, हा सुनियोजित कट असून मुलीकडून फोन करून माझ्या मुलाला बोलावण्यात आलं होतं."
धनपाल लाल यांचा आरोप आहे की, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना यशवीर सिंह पंवार यांचा फोन आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केतनचे हात-पाय तोडले आहेत, असं फोनवर सांगण्यात आलं.
ते सांगतात, "मी त्याला विचारलं की तुला अशा प्रकारे मारण्याचा अधिकार कुणी दिला? काही करायचंच होतं तर तू त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकला असतास." धनपाल लाल यांचा दावा आहे की, बोलताना फोन कॉल सुरूच ठेवला गेला होता आणि त्यांना त्यांच्या मुलाचा आवाज ऐकू येत होता. "माझा मुलगा ओरडत ओरडत म्हणत होता, 'पप्पा, या, मला वाचवा.'" धनपाल लाल सांगतात की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा केतनची अवस्था खूप गंभीर होती.






