भल्या पहाटे ती उठली. ‘राम आएंगे’ या सर्व दिशांनी कानावर आदळणाऱ्या भक्तीनादामुळे सर्वत्र एक वेगळाच उत्साह, चैतन्य जाणवत होते. व्हॉट्सॲप, द्विटर, इन्स्टाग्राम व फेसबुकवरील भक्ती सेल यांनी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याअगोदरच सोशल मीडियावर रामराज्य आणले होते. कामे सुरू होण्याअगोदर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे व्हॉट्स ॲपवरील भक्तीपर मेसेज वाचायला तिने सुरुवात केली. पुढच्या तेजस्वी पर्वाचे चित्र डोळ्यासमोर येऊन तिला गद्गदून आले.
सेलचे भक्तिपूर्ण मेसेजेस आणि वेळ पडल्यास अगदी आईबहिणींचा इतिहास काढणाऱ्या ट्रोलिंगमुळे खरोखरच जग सुधारते आहे, असा अभिमानही तिला क्षणभर वाटला. अन् अखेरीस तो क्षण आला. एखाद्या इव्हेंटप्रमाणे कव्हर केलेला सोहळा तिने भक्तिभावाने पाहिला. त्याबाबत सोशल मीडियावर आलेले सगळे काही फॉरवर्ड करण्याचे कर्तव्यही पार पाडले…
तेवढ्यातच ‘भूखमरी के इस समय में अनाज की बोरियों की जगह सिमेंट की बोरिओं का दान तुझे मुबारक हो…’, ‘तेरा मंदिर, तेरा राम, तेरा 2024 का इलेक्शन तुझे मुबारक हो…’ असे तावातावाने म्हणणाऱ्या ‘तिच्या’ व्हिडिओची द्विटरवरील फॉरवर्ड लिंक आली. इतक्या पवित्र दिवशी साक्षात विष्णूच्या अवताराच्या हेतूबर शंका उपस्थित करणारी ‘ती’ आहे तरी कोण, या प्रश्नाचे उत्तर अतिशय शिवराळ, अश्लील भाषेत त्या व्हिडिओखाली केलेल्या कमेंट मधून तिला मिळाले. तिने तो मेसेजही तत्परतेने फॉरवर्ड केला…

आता तिला डोळ्यासमोर दिसत होती, संध्याकाळी निघणारी भव्यदिव्य शोभायात्रा, अगदी नटूनथटून त्यात सामील झालेली समस्त जनता, रामराज्याच्या दिवाळीचे दिवे आणि फटाक्यांची दिलखेचक आतषबाजी. दुसरीकडे रामराज्याची मुबारक बात देणारी ‘ती’ मात्र द्विटरवर आपला व्हिडिओ न हटवता, न डगमगता ठामपणे शड्डू ठोकून उभी होती, शब्दांचे विखारी बाण झेलत, बाहेर झळाळणाऱ्या रोषणाईपासून दूर कुठेतरी कोपऱ्यातील मिणमिणत्या पणती खालचा अंधार अधोरेखित करत…
इकडे भव्यदिव्य शोभायात्रा संपली आणि एका ठिकाणी विशिष्ट समाजाकडून त्यांच्या भागातून शोभायात्रा जाताना दगडफेक करण्यात आली, असे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. त्यापाठोपाठ त्या समाजाबद्दलचा विखारसुद्धा फॉरवर्ड झाला. व्हॉट्सॲप हेच अंतिम सत्य मानणाऱ्या तिला अजून एक व्हिडिओ फॉरवर्ड झाला. यामध्ये अजून एक ‘ती’, ‘भ्रम का राज्य’ म्हणत कशा प्रकारे शोभायात्रेतील दगडफेक ही पूर्वनियोजित राजकीय स्टंट असू शकते, हे आपल्या उपहासात्मक संवादातून, हातातील बिडी ओढत सांगताना दिसली. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाबाहेरील हा मुद्दा पाहताना हिला क्षणभर आपल्या स्क्रीनचा रंग नेमका भगवा, निळा, हिरवा की पांढरा हेच निश्चित करता येईनासे झाले. नेहमीप्रमाणे सोपा मार्ग म्हणून हा व्हिडिओ बनवणारीवर हव्या त्या रंगाच्या ट्रोलिंगचे शिंतोडे मारणे आणि यासाठी नेहमीप्रमाणे मेसेज फॉरवर्ड करणे तिला औचित्याचे वाटले…
या सर्व घटनाक्रमामध्ये व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी व्यवस्थेला प्रश्न न करता नेमून दिलेल्या नियमांचे पालन करत जगणाऱ्या स्त्रीचा संघर्ष तर मोठा असतोच, पण त्यापेक्षाही मोठा संघर्ष प्रचलित व्यवस्थेच्या, प्रवाहाच्या विरोधात उभे ठाकणाऱ्या असहमतीदार स्त्रीचा असतो. यापूर्वीसुद्धा स्वतंत्र, स्पष्ट, परखड, निर्भयपणे व्यक्त होणाऱ्या स्त्रियांच्या अंगावर दगडधोंडे, शेणगोळे फेकले गेले. आजघडीला सोशल मीडियाच्या युगात या शेणगोळ्यांची जागा अश्लील, हिंसक ट्रोलिंगने घेतली आहे. मात्र तरीही न डगमगता आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अराजकावर काही स्त्रिया निर्भीडपणे विविध मार्गांनी आपली मते मांडताना दिसून येत आहेत.
वर नमूद केलेल्या द रँटिंग गोला आणि डॉ. मेदुसा या नावाने प्रोफाइल असलेल्या त्या दोघी. पाशवी बहुमताला न जुमानता मुख्य म्हणजे, सृजनशीलतेचा आविष्कार घडवत समाजामध्ये डोळस दृष्टिकोन निर्माण करण्याच्या धडपड करताना दिसत आहेत. त्यांच्या या धडपडीत जेवढे धाडस आहे, तितकीच राजकीय-सांस्कृतिक वर्चस्वातून आजच्या घडीला समाजात घडून येत असलेल्या दुभंगाबाबतची, अस्थिरतेबाबतची चीडही ठळकपणे जाणवत आहे

नेमके प्रोफाइल काय?
द रँटिंग गोला आणि डॉ मेदूसा हे प्रोफाइल द्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक व युट्यूब या सर्वच प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे. हे प्रोफाइल चालवणाऱ्या दोन तरुणी भवतालच्या अनागोंदी कारभाराला नजरेआड न करता उपहासात्मक विनोदाचा आधार घेत हसत हसवत आत्मभान जागवण्याचा प्रयत्न साध्या सोप्या भाषेत करताना दिसत आहेत. महत्त्वाचे हे आहे की, या दोन्ही तरुणी कोणत्याही विशिष्ट धार्मिक, वैचारिक, प्रादेशिक, राजकीय किंवा जातीय अस्मितेला केंद्रस्थानी धरून आपले अकाऊंट चालवत नाहीत. त्यांच्या व्हिडिओ किंवा रिल्समधील भाषा व मांडणी अगदी सर्वसामान्य युजरलाही समजून घेता येईल इतकी साधी सोपी आणि त्यांच्या संहिता त्यातला आशय व बारकावे खूप अभ्यासपूर्ण आहेत.
त्यातून त्यांच्या बुद्धिमत्तेचे तेजही झळकताना दिसते आहे. ब्लॅक ह्युमर हा त्यांचा हातखंडा विषय तर आहेच, पण या दोघीही नकला करण्यात वाकबगारही आहेत. कंगना रणौत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, (कु) प्रसिद्ध वृत्तनिवेदिका व केंद्र सरकारच्या अनुयायांप्रमाणे वागणाऱ्या अंजना कश्यप, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, यांच्या आवाजाची, देहबोलीची अगदी हुबेहूब नक्कल करत सध्याच्या वास्तव स्थितीवर या दोघी अत्यंत तिखट-तिरकस भाष्य करत आहेत. तसे करताना ‘शहाणे करून सोडावे, सकळ जन’ हा वसाही त्यांनी सोडलेला नाही.
संसदेत चर्चेदरम्यान राहुल गांधींनी दिलेल्या कथित फ्लाइंग किसच्या संदर्भात स्मृती इराणींनी केलेल्या आरोपांच्या वेळी ‘मिसोजिनी’ हा शब्द सर्वतोमुखी झाला. या शब्दाचा अर्थ मिमिक्री करत समजावून सांगताना मणिपूरच्या महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी नेमके सरकार मूग गिळून का गप्प बसले होते, असा खडा सवालही या दोघी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विचारत आहेत. सरकारच्या निर्णयांचे आंधळेपणाने समर्थन करणाऱ्या अंध भक्तांच्या टोळीला ‘विशिष्ट प्रजाती’ असे संबोधून सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ‘गोदी मीडिया’मध्ये विशिष्ट हेतू, प्रेरणा असलेल्या बातम्याच कशाप्रकारे निवडल्या जातात, मग ते आर्थिक अंदाजपत्रक असो किंवा शेतक-यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारने सीमेवर ठाकलेले खिळे, ज्या पद्धतीने या बातम्या पसरवल्या जातात, त्यावरही या दोघी आपल्या सादरीकरणातून कडक भाष्य करताना दिसतात. संबंधित वृत्तनिवेदिकेची भूमिका साकारताना, गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून व्हिडिओच्या शेवटी, ‘माझी खाण्याची वेळ झाली’, असे म्हणून डॉ. मेदुसाने पेडिग्री खाताना दाखवणे, हे म्हणजे कोणतेही अपशब्द प्रत्यक्ष न वापरता, अक्षरशः सत्ताधीशांना शालजोडीत देण्यासारखेच आहे.
संयम आणि सभ्यतेची सीमारेषा महत्त्वाची
द रॅटिंग गोला व डॉ. मेटुसा या दोघी जरी उपहास किंवा विनोदाद्वारे व्यक्त होत असल्या तरी अंगविक्षेप, बिभत्सपणा, चावटपणा, अश्लीलता यांपासून कोसो दूर आहेत. तरीही सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या देणाऱ्या त्यांच्या पोस्ट आणि व्हिडिओवर सत्तासमर्थक अंधभक्त नेहमीच असभ्यतेचे टोक गाठत प्रतिक्रिया देताना दिसतात. त्यात असेही अनेक ‘भाग्यवंत’ असतात, ज्यांना केंद्रीय मंत्र्यांपासून थेट लाडक्या पंतप्रधानांनी फॉलो केलेले असते.

अर्थातच या दोघींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांच्या समर्थकांना, चाहत्यांना जितकी उत्सुकता आहे तितकीच त्यांना विरोध करणाऱ्या विशिष्ट गटांमध्येही आहे. परंतु विरोधकांच्या उत्सुकतेमागचा हेतू अनेकदा संशयास्पद ठरतो. कारण चुकून कधी त्यांच्या आयुष्यातील असा एखाद्या नाजूक धागा, वर्म मिळाले तर या दोघींविरोधातले हत्यार बनू शकते हे दोघींच्या विरोधकांचे त्यामागचे आडाखे असतात. चारित्र्यहनन हा आता सार्वजनिक पातळीवरचा मुख्यतः सत्ताधारी वर्गातल्यांचा आवडता कुटीर उद्योग बनला, हेही एव्हाना सर्वश्रुत आहेच. यामुळेच या दोघी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, वास्तव्याचे ठिकाण, करिअर याबद्दल फारशा बोलताना दिसत नाहीत. म्हणूनच त्यांची ओळख आपणही त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर त्यांनी करुन दिलेल्या परिचयापुरती सीमित ठेवणे अपेक्षित आहे.
द रँटिंग गोला या द्विटर अकाउंट चालवणाऱ्या तरुणीचे मूळ नाव, शमिता यादव असून ती एक राजकीय सल्लागार म्हणून काम करते. आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर स्वतःची ओळख तिने ती, तिचे, रँटिंग, रोस्टिंग, राष्ट्रीय क्रीडापटू, हुकुमशाहीमधील विदुषकांशी विनोदाच्या माध्यमातून दोन हात करणारी… अशा मोजक्या पण प्रभावी शब्दांत करुन दिली आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे द रँटिंग गोला या आपल्या द्विटर अकाऊंटवरून सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या दांभिक वक्तव्यांचा ती खरपूस समाचार घेत असते. तसेच अंधभक्तांच्या मांदियाळीतील अभिनेत्री कंगना रणौतची मिमिक्री करत तिच्या सरकारच्या समर्थनार्थ केलेल्या विधानांचे विनोदी शैलीत वाभाडेही ती काढत असते. यात तिचे अभिनयकौशल्य, सृजनकौशल्य आणि संयमाचे पुरेपूर दर्शन घडत असते.
डॉ. मेदुसाने आपल्या द्विटर अकाउंटवर स्वतःचे वर्णन भाषा, उपहास, श्वानप्रेमी, स्त्रीवादी, जातपातविरोधी अशी करुन दिली आहे. ती सत्ताधाऱ्यांनी बदनाम केलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. तसेच भाषा विज्ञानाच्या अध्यापनाचे ती काम ती करते. कोरोना काळात पहिल्या लॉकडाउनमध्ये सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या स्वकेंद्रित धोरणांमुळे पसरलेल्या असंतोषाला व्यक्त करण्यासाठी डॉ. मेदुसाने युअर नेबरहुड टीचर, दुखदर्शन बार्ता व द्विटरवरील डॉ. मेदसा या अकाउंटवर नर्म विनोदाच्या माध्यमातून आपल्या खास शैलीत सरकार, प्रसारमाध्यमे यांच्याविरोधात जणू काही एक आंदोलनच सुरू केले. तिने घेतलेल्या मेदुसा या नावाचा अर्थही एक अत्याचाराला बळी पडल्यानंतर बनलेली एक शापित राक्षसी असा आहे. या मेदुसाकडे कुणी पाहिले, तर त्याचे रुपांतर दगडात होई, असे वर्णन ग्रीक साहित्यात आढळून येते.

दुखदर्शनः सत्ताशरण प्रसारमाध्यमांचा खरपूस समाचार
एका आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात दिवसभरात चालवल्या जाणाऱ्या बातम्यांची निवड व रणनीती आखली जात आहे व वाहिनीची वरिष्ठ व्यक्ती प्रशिक्षणार्थी वार्ताहराला सुरुवातीलाच ‘आर’ म्हणजे रिपोर्टिंग नव्हे तर ‘आर’ म्हणजे रेटिंग हे पक्के पाठ करून मगच बातम्यांची निवड करण्याचा घडा देतात. अर्थमंत्र्यांकडून सादर केले जाणारे बजेट, मॉब लिंचिंग, मणिपूर अत्याचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतक-यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने सीमेवर निष्ठुरपणे ठोकलेले खिळे, शेतकऱ्यांवर केलेला अश्रुधुराचा मारा, नीती आयोगाने दिलेला भूकबळींचा अहवाल यांपैकी कोणत्याही बातमीला एका टिकरपेक्षा जास्त महत्त्व न देता, रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिनचर्या काय होती, यावर एक विशेष भाग तयार करण्याचा सल्ला ती वरिष्ठ व्यक्ती देते.
एका दलित वराला घोडीवर बसला म्हणून मारहाण करणाऱ्या सवर्णाविरुद्ध बोलण्यापेक्षा मोदींचे अंगरक्षकही त्यांच्यासोबत मंदिर परिसरात लुंगी घालून कसे फिरत आहेत, हे दाखवणे रेटिंगसाठी महत्त्वाचे आहे हे ती चॅनेलमधली वरिष्ठ व्यक्ती वारंवार सांगत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन हे खलिस्तानी कृत्य आहे, हे पटवून देण्यासाठी ती फोटोशॉप, फेक न्यूज तयार करायला सांगत आहे. हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळते गोदी मीडियाच्या विरूद्ध आपल्या दुखदर्शन वार्ता या नावाने डॉ. मेदुसाने बनवलेल्या उपहासात्मक व्हिडिओंमध्ये.
केवळ बातम्याच नव्हे तर सोशल मीडिया, व्हॉट्सॲपवर अंधभक्तांकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या मेसेजेस्ना सत्य मानून ते फॉरवर्ड करणाऱ्यांची व त्या आधारे विधान करणाऱ्या सो कॉल्ड सेलिब्रिटींचीही शिकवणी द रॅटिंग गोला व डॉ. मेदुसा घेत असतात. कंगना रणौत, स्मृती इराणी या केवळ सरकारचे गुणगान करणाऱ्या मात्र महिलांच्या मुद्यांवर मौन बाळगणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची द रैंटिंग गोला हुबेहूब मिमिक्री करत त्यांना चांगलेच रोस्ट करते. म्हणजेच भाजून काढते.
काही दशकांपूर्वी कला, साहित्य, अभिनय क्षेत्रातील मान्यवर लोक जबाबदार राजकीय भूमिका घेताना दिसत असत. त्यांचा प्रभाव जनमानसावर निश्चितपणे पडत असे. मात्र सध्या अंधभक्तांना लाज वाटेल अशा पद्धतीने वागणारे तमाम सेलिब्रिटी व त्यांना आंधळेपणाने फॉलो करणारे फॉलोअर्स, हे देशासाठी घातक दृश्य आहे, हेच या दोघी आपल्या सादरीकरणातून दाखवून देण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत.

अंधभक्तांची शाळा..
हिंदू, मुस्लिम शीख, इसाई हम सब है भाई भाई… असा राष्ट्रवाद शिकवणाऱ्या व सर्व भारतीय माझे बांधव आहेत… या प्रतिज्ञेचे प्रतिध्वनी घुमवणाऱ्या शाळांवरसुद्धा धर्म व जातींचा पगडा बसत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव हे शब्दच सद्य शिक्षण व्यवस्थेच्या शब्दसंग्रहातून गायब होतात की काय अशी परिस्थिती असताना द नेबरहुड टीचरच्या माध्यमातून डॉ. मेदुसा विविध इंग्रजी संज्ञा, नाम, विशेषण, क्रियापद, वाक्प्रचार यांना भवतालच्या राजकीय घटनांमध्ये गुंफून अंधभक्तांची अक्षरशः शाळा घेत असते. जसे, चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेचे श्रेय घेण्यासाठी सरसावलेल्या समूहाला ‘क्रेडिट हॉग’ म्हणणे किंवा आजच्या काळातील प्रचलित विशेषण म्हणजे शांततापूर्ण आंदोलन, गोदी मीडिया, आंदोलनजीवी, मुस्लिम कॉमेडियन, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर शांत असलेल्या प्रसारमाध्यमांसाठी वापरलेल्या संज्ञा, ‘पनौती’ या शब्दाचे इंग्रजीतील भाषांतर व काही शब्दांच्या वारंवार होत असलेल्या वापराद्वारे प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियाद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या पूर्वग्रहदूषित संकल्पनांना दूर करण्याचा प्रयत्न डॉ. मेदुसा आपल्या व्हिडिओद्वारे करत असते.
साध्य किंवा फलित काय ?
उच्चशिक्षित, आर्थिक स्थैर्य असलेल्या, बुद्धिजीवी वर्गात मोडणाऱ्या या दोन तरूणींना कष्टकरी, शेतकरी, स्थलांतरित मजूर, ईशान्य भारतातील अत्याचारित स्त्रिया, लहान मुले, दलित यांच्याबद्दल इतकी कणव का वाटते, हा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत असतात. सत्ताधारी पक्ष व त्यांचे समर्थन करणाऱ्या सर्वच घटकांना आपल्या शैलीत अक्षरशः भाजून काढणाऱ्या या दोघी सुद्धा एखाद्या विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या राजकीय पक्षांकडून आर्थिक व अन्य लाभांच्या बदल्यात हे रोस्टिंगचे काम करत असतील, असेही अनेकजण बिनदिक्कतपणे कमेंटमध्ये सांगतात. त्यांचे विचार न पटणाऱ्या कट्टरतावाद्यांकडून त्यांना बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जातात, त्यांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाते, त्यांना विशिष्ट जातिवाचक शिवीगाळ केली जाते, त्यांचे दिसणे, पेहराव, रंग, शरीराची ठेवण यावरुन बॉडी शेमिंग केले जाते.
मात्र तरीही या टोळधाडीच्या विरोधात व्यक्त होणे त्या सोडत नाहीत, असे का? त्यांना कोणत्या पक्षाचा, राजकीय नेत्यांचा किंवा बाह्य शक्तींचा पाठिंबा आहे का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न युजर्स करतात. जगातील सर्वात सुरक्षित जागा असलेल्या घरात बसून माझ्या व्हिडिओवर आलेली एखादी धमकीवजा कमेंट बघून क्षणभर का होईना, मी येथे कुणी नाही ना अशी खात्री करुन घेण्यासाठी माझ्या आजूबाजूला बघते व माझे स्वतःचे आईवडील माझ्या विचारसरणीच्या विरोधात आहेत, असे मुलाखतीत सांगणारी द रँटिंग गोला दुसऱ्याच दिवशी आवाज उठवणारा नवीन व्हिडिओ अपलोड करते. या धमक्यांना तुम्ही घाबरत नाही का असे विचारल्यावर हे करण्याशिवाय आता पर्याय नाही असे या दोघी सांगतात.

‘नाही रे’ वर्गाच्या पाठीशी
कोरोनाच्या वेळी पहिल्या लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांचे लोंढे हजारो किलोमीटर चालत आपल्या गावी उपाशीतापाशी परतताना बघून डॉ. मेदुसा यांना आपण काहीच करु शकत नाही, या गोष्टीने प्रचंड अस्वस्थ केले. ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या दोन गटांमधील तफावत या काळात प्रकर्षाने समोर आली व आपल्या सुखसोयींनीयुक्त आयुष्याचा त्यांना तिटकारा वाटू लागला. व्यवस्थेच्या विरोधात कोणत्याही मागनि व्यक्त होणारी व्यक्ती ही प्रत्येक वेळी अगोदर त्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष बळी ठरलेली असतेच असे नाही.
त्या व्यवस्थेतील सर्व लाभ व फायदे उपभोगण्याची संधी स्वतःला मिळालेली असतानाही या व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या घटकांना मानाने जगण्याची संधी निर्माण करणे, ही या व्हिडिओ मागची मुख्य प्रेरणा असल्याचे दोघी सांगतात. रस्त्यावर उतरून आंदोलने, निदर्शने करणे यांच्याऐवजी त्यांनी शब्द आणि भाषेचा आधार घेऊन सोशल मीडियावर आपल्यापरीने आंदोलन उभारण्याची निवड केली आहे, हे तर उघच आहे.
सोशल मीडियावरचा प्रतिसाद
अर्थातच, द रैंटिंग गोला व डॉ. मेदुसा यांना ट्रोल करणारे युजर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अलीकडे तर द रॅटिंग गोलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली. मात्र बंदीला न जुमानता तिने नवीन अकाउंट तयार केले. यावर तिला विरोध करणाऱ्या युजर्सनी तिचे द्विटर अकाउंटही बंद होईल, असा इशारा दिला आहे. मात्र सार्वजनिक आयुष्यात भूमिका मांडणाऱ्या रवीश कुमार, प्रकाश राज व अन्य काही मान्यवरांनी द टिंग गोला व डॉ. मेदुसा यांच्या अकाउंटवर बंदी आणण्याच्या कृतीवर चिंता व्यक्त केली आहे.
अनेक अभ्यासकही या दोघींना सोशल मीडियावर फॉलो करतात व त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण-तरुणीसुद्धा या दोघींच्या विचारांना पाठिंबा देताना दिसतात. विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध चिंतन केल्या जाणाऱ्या व्यासपीठांवर या दोघींना आमंत्रित केले जाते.
यातील डॉ. मेदुसाने आपल्या द्विटर अकाऊंटवर छापलेल्या लॉरेल थेंचर युलरिच यांच्या, ‘शांत व चांगले वागणाऱ्या स्त्रिया क्वचितच इतिहास घडवतात, या विधानाचा आणि द रॅटिंग गोलाच्या ट्रिटरवरील पोस्टमध्ये दिलेल्या, ‘जर तुम्ही शांत राहण्याचा पर्याय निवडला, तर तुम्ही जुलूम करणाऱ्याची साथ देणार आहात हे लक्षात घ्या’ या बचनाचा संदर्भ घेत आजघडीला सोशल मीडियावर या दोघींसारख्या वास्तव, निर्भीड व मार्मिक भाष्य करणाऱ्या स्त्रियांचा वावर असणे किती गरजेचे आहे हे सुज्ञांच्या सहज लक्षात यावे.
(लेखिका शहरी आणि ग्रामीण महिलांशी निगडित विषयांच्या, प्रसार माध्यमविषय घडामोडींच्या अभ्यासक आहेत)
(सौजन्य : समतावादी मुक्त-संवाद मार्च 2024)






