‘नेमेची येतो पावसाळा’ म्हटल्याप्रमाणे 08 मार्च ला दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील जागतिक महिला दिन थाटामाटात साजरा होतोय. भांडवलशाही जगात कुठल्याही मोठ्या चळवळीचे अंतर्बाह्य बाजारीकरण करण्याची अफाट क्षमता असणारी अनेक इंजिने सतत कार्यरत असतात. भारतासारख्या विषमतेचा मापदंड असणार्या देशात तर अशी इंजिने सांस्कृतिक राजकीय आर्थिक अश्या सर्व क्षेत्रात धडाडीने धूर सोडत असतात. त्यातूनच मग कोट्यवधी रुपये खर्चून विविध सोहळे साजरे केले जातात.
कॉर्पोरेट क्षेत्रात जोरदार सेलिब्रेशन राबवले जाते. अमेझोन फ्लिपकार्ट सारख्या शॉपिंग पोर्टल्स वर महिला दिनानिमित्त खास डीसकाऊंट मोहिमा राबवल्या जातात. बीजेपीचे आयटीसेल प्रचारक #SheInspiresUs सारख्या हॅशटॅग मोहिमा राबवतात. एका दिवसासाठी काही महिलांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे ट्विटर हॅंडल चालवायला दिले जाते. हॅशटॅग चालवला की अर्धे काम फत्ते झालेले असते अश्या जमान्यात आपण वावरत असतो. ऐरवी हेच आयटीसेल प्रचारक अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणार्या, बेधडक लिहिणार्या, बोलणार्या, चालणार्या कित्येक महिलांचे अगणित ट्रोल अकाउंट्स द्वारे चारित्र्यहनन, खच्चीकरण आणि प्रतिमभंजन करण्यात पुढे असतात. गौरी लंकेश पासून ते स्वरा भास्कर, दीपिका पादुकोन पर्यंत कित्येकींचा धसका आयटीसेल च्या हजारो अकाउंट्सने नेहमीच घेतलेला असतो.

महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्तीचा भोंगा देशभरात वाजवला जातो. जाहिरातबाजीवर तग धरून राहिलेल्या सरकारला असे भोंगे वारंवार वाजवणे भागच असते. ‘देश की बेटी खडी तो जीत बढी’ सारख्या टॅगलाईन्स मंत्रालयाद्वारे चालवल्या जातात. त्यातही राजकीय पक्षाचा प्रचार कसा नीट होईल हेच आधी बघितले जाते. आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय दिवे लावले आहेत ह्याचे सरकारी टेंभे दरवर्षी मिरवले जातात. सारे काही आलबेल असल्यासारखे रंगबेरंगी कोलाजवाले चित्र उभे केले जाते. भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्था एक चळवळ अशी सहजपणे मारून टाकतात.
ती मेलेली फारसे कुणालाही लक्षात येत नाही. एका दिवसाचा ते एका आठवड्याचा महोत्सव साजरा होतो. आकाशात तुंबळ मनोहारी दारूकाम रंगते. फटाकेबाजी संपल्यावर आकाश पुन्हा काळेकुट्ट होऊन जाते. भारतासारख्या देशात वर्षानुवर्षे हेच सुरू असते. नुसते हॅपी वुमन्स डे चे मेसेज केले की इथल्या समाजाचे परमकर्तव्य पार पडलेले असते. धर्मजातीव्यवस्थेने पोसलेल्या विषमतेच्या गुणसूत्रांनी बरबटलेल्या सामाजिक मुळापर्यंत जायचे धाडस ना इथला समाज करतो ना इथला मिडिया ना इथले राज्यकर्ते कधी तसे धाडस दाखवतात.
युनायटेड नेशन्स ने 1975 सालापासून 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला तेव्हा महिलांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाबद्दल जगाला जाणीव करून देणे आणि सर्वंकष समानतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे हा त्यामागचा मूळ उद्देश होता. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात तिथल्या पुरोगामी स्त्रीवादी चळवळींनी वेळोवेळी ह्या मूळ उद्देशाबाबत विविध स्तरावर मंथन घडवून आणले. ही प्रक्रिया केवळ एका दिवसापुरती नव्हती तर त्याबद्दल वारंवार तिथल्या समाजाने प्रगल्भतेने आपल्या जाणिवा-नेणिवांच्या कक्षा रुंदावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
महिलांचे शोषण आजही जगभरात सुरूच आहे. मात्र युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात त्या शोषणाच्या वास्तवाची किमान दखल तरी घेतली जाते. भारतीय समाजमन मात्र ह्याबाबतीत अद्यापही प्रचंड मागासलेले आणि भयंकर सुस्तावलेले आहे. त्यातूनच महिला दिन हा महिलांच्या सामाजिक अवकाशाबद्दल मंथन घडवून आणण्याचा दिवस न ठरता तो वंडरवुमन, सुपरवुमन अश्या शब्दांच्या सुशोभीकरणाचा दिवस ठरतो.

महिला दिन आला की वंडरवुमन, सुपरवुमन, नारीशक्ति, मातृशक्ती अश्या लादलेल्या व्याख्यांची तोरणे लावणे, बाईच्या संदर्भाने येणार्या विविध कौटुंबिक नात्यांची उजळणी करून तिला थोर सांस्कृतिकपणाचा मुलामा चढवणे, कुटुंबव्यवस्थेतल्या तिच्या दुय्यम ठरवेलल्या स्थानाचे नात्यांची माळ घालून उदात्तीकरण करणे असे प्रकार समाजमनावर बिंबवले जातात. अश्या तर्हेने बाईला आधी माणूस म्हणून कधी बघणार हा प्रश्नच इथली पितृसत्ताक जातीधर्मव्यवस्था मोडीत काढते. महिलांच्या होणार्या शोषणाला असंख्य भरजरी विशेषणांचा मुलामा फासून एका दिवसापुरते बाईचे दैवतीकरण करणे आणि शोषणाची व्यवस्था जैसे थे टिकवून ठेवणे हे भारतीय पुरुषी विकृतीचे राजकारण आहे.
भारतासारख्या देशात महिलांचे शोषण हे बहुपदरी आहे. त्याला धार्मिक आणि जातीय संदर्भ आहेत. भारतातली माध्यमे सरकारच्या सोबतीने विविध क्षेत्रातल्या महिलांच्या प्रगतीबद्दल आलेख हिरीरीने मांडत असले तरी ह्या सोहळ्यात दलित आणि बहुजन महिलांचे स्थान नेमके काय आहे? प्रगतीबद्दल बोलताना शोषणाबद्दल बोलणे मात्र टाळले जाते. त्याबद्दल इथला समाज आणि माध्यमे कुठवर मूग गिळून गप्प बसणार आहेत? हिंदू पितृसत्ताक धर्मसंस्कृतीच्या उतरंडीत सर्वात तळाशी असणार्या दलित महिलांचे प्रश्न टीव्ही चॅनेलवर, रेडियो शो वरच्या पॅनलमध्ये चर्चेला कधी येणार आहेत? जागतिक महिला दिन म्हणजे फक्त कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्या स्त्रियांच्या सत्काराचा दिवस झालेला आहे काय?
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्या, तथाकथित आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेल्या महिला सुद्धा खर्या अर्थाने स्वतंत्र आहेत काय? त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याचे काय? पुरुषप्रधान अर्थव्यवस्थेत जास्त पगारावर काम करणार्या बाईचे सामाजिक स्थान सुद्धा कमी पगारावर वा अगदीच बेरोजगार असणार्या पुरुषापेक्षाही दुय्यम ठरवणारी संस्कृती भारताने राजरोस पोसलेली आहे हे वास्तव आहे. महिला दिन साजरा होत असताना वा होत नसतानाही – महिलांच्या बाबतीत घडणारा घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, आर्थिक कुचंबणा, मुलीने जातीबाहेर लग्न केले म्हणून सडक्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेतून, पुरुषी मालकीहक्काच्या विकृतीतून घडणारा हिंसाचार, जातपंचायतीचे फतवे, पोरीच्या जातीने जास्त शिकून काय करायचंय म्हणत बळजबरी लग्नाला भाग पाडणारा सामाजिक दबाव – ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांवर सातत्याने मंथन व्हायला हवे.

नुसताच आमची संस्कृती महिलांचा सन्मान करते हा पोकळ अभिनिवेश बाळगून उपयोग नाही. 08 मार्च चा जागतिक महिला दिन साजरा होताना पाकिस्तानात निघालेल्या ‘औरत मार्च’ वर इस्लामी कट्टरवाद्यांकडून दगडफेक होते. क्रीझगिस्तानात निघालेल्या मोर्चावर क्रिझगिस्तानी कट्टर राष्ट्रवादी मोर्चात घुसून महिलांना मारहाण करतात. इस्लामी राष्ट्रात महिलांवरील शोषणाच्या तुलनेत भारताचा इतिहास आणि वर्तमान फार उदार आहे असे तर अजिबातच नाही. शोषणाचा इतिहास आणि वर्तमान इथे अधिक धारदारच आहे. महिला दिनाच्या एकदिवसीय वा साप्ताहिक डामडौलापेक्षा त्या क्रूर इतिहासाबद्दल आणि भीषण वर्तमानबद्दल सातत्याने लिहिणे, बोलणे, सजग राहणे अधिक गरजेचे आहे.






