प्रेम नेहमीच सामाजिक बदलाचं एक प्रतीक राहिलेलं आहे. विभिन्न धर्म, जाति, समूह, वर्ग यांत प्रेम किंवा लग्न ही एक आव्हानात्मक गोष्ट असतेच पण एकमेकांशी जोडण्याचं हे एक मूलभूत साधन राहिलेलं आहे. सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यात प्रेमाचं योगदान मोठं आहे. पण अपंग व्यक्तींना प्रेम करणं हे एक जास्तीचं आव्हान नाही का? अपंग व्यक्ती अकार्यक्षम असतात असा समज असताना तर हे विशेषच जाणवतं. समाजात वावरताना अपंग व्यक्तींना एरव्हीही अनेक भेदभावांना सामोरं जावं लागतं. त्यांना नेहमी इतरांपेक्षा कमी समजलं जातं.
त्यांना आयुष्यात काही करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही, प्रेम प्रकरणात त्यांना प्रोत्साहन मिळत नाही तसंच कोणी त्यांच्यासोबत आहे ही गोष्टही समाज सहजपणे स्विकारू शकत नाही. समाजातील रुढीवादी विचारांमुळे असं एक वातावरण तयार झालंय ज्यात अपंगत्व म्हणजे जगण्याचा शेवट असंच समजलं जातं. त्यांना नेहमीच हे दर्शवण्यात येतं की ते जगण्यास नालायक आहेत. पण असं असलं तरीही असे अनेक लोक आहेत ज्यांनी याविरोधात लढा देऊन स्वतः आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि एक सामान्य आयुष्य ते आज जगत आहेत. पण त्याचवेळी अनेक अपंग व्यक्ती घरून किंवा समाजातून प्रोत्साहन न मिळाल्यामुळे निराश आयुष्य जगत आहेत. अशावेळी प्रेम त्यांच्यासाठी आशेचं एक साधन बनू शकतं.

अपंग व्यक्तींसाठी सौंदर्याची व्याख्याच नाही का?
सध्याच्या काळात अनेक लोक बाह्य सौंदर्य आणि बाजारी मानसिकता यावरूनच प्रेमाची कदर करताना दिसतात. हे एक कडू सत्य आहेच. शारिरीक सौंदर्य हा प्रेमाचा एक महत्त्वाचा निकष मानला जातो. पण सौंदर्याच्या या व्याख्येत अनेक लोक बसूच शकत नाही. कोणी सडपातळ, उंच, गोरा असेल तर तो देखणा समजला जातो. पण असं कोणी नसेल तर त्याला कोणी सुंदर म्हणत नाही. आपण कायम हे ऐकत आलोय की, “ती किती सुंदर आहे, तो किती देखणा आहे. सारं काही ठीक आहे पण तो किंवा ती अपंग आहे.” म्हणजे केवळ सुंदर असून चालत नाही तर ती व्यक्ती अव्यंगही लागते.
अपंग माणूस हा कितीही सुंदर असला तरी तो कुरूपच समजला जातो, असहाय आणि दुर्दैवी समजला जातो. असं का? अपंग व्यक्तींसाठी सौंदर्याची व्याख्याच नाही का? समाजात अपंगत्वाकडे दयाभावाने पाहिलं जातं. त्यांच्यासाठी सहानुभूती ठेवली जाते. खरंतर सहानुभूतीपेक्षा अपंगांसाठी समाजाने संवेदनशील होणं जास्त गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांना वेगळेपणाची जाणीव होणार नाही. हा एक महत्वाचा विषय आहे. यावर मुक्त चर्चा होणं गरजेचं आहे. कारण अपंगत्वाविषयीचा आमचा हा पूर्वग्रह त्यांच्या प्रेमात, लग्नात, एक अडचण म्हणून येतो आणि त्यांची नाती मोडली जातात. अपंगत्व आणि प्रेम या जोडीला लोक चकीत होऊन बघतात.
दिल्ली विश्वविद्यालयाचे विद्यार्थी दीपक अंध आहेत. ते म्हणतात, “मी लहान असताना माझी दृष्टी ठीक होती. पण वय वाढत गेलं तशी माझी नजर कमी होत गेली. ऑपरेशन करताना नस दाबली गेली ज्यामुळे मी कायमचा अंध झालो. माझ्यासाठी प्रेम मिळणं ही सोपी गोष्ट नाही. अनेक गोष्टींची भीति असते. कोणाला काही सांगण्याचाही संकोच होतो. माहिती नाही समोरची व्यक्ती कसा प्रतिसाद देईल ते. त्यामुळे अडचण तर नक्कीच आहे. तुम्हाला माहिती आहेच की आमचं एक वेगळंच जग असतं. सामान्य माणसं आमच्याशी तेव्हाच बोलतात जेव्हा आम्हाला काही मदत हवी असते. सध्या मी एकीच्या प्रेमात आहे. ती डोळस आहे, मी अंध आहे. माझ्या अंधत्त्वामुळे तिच्याशी जुळवून घ्यायला मला अर्थातच त्रास होतो. माझ्या भावना व्यक्त करताना मी गोंधळलेला असतो. कारण मला भीति वाटते की ती कसा प्रतिसाद देईल. मला तिच्याकडून प्रेम हवंय, सहानुभूती नकोय.”
चित्रपटांत तर अपंगत्वाची थट्टाच
प्रेमाची आपली समज, ते प्रकट करण्याची पद्धत, विचार यावर हिंदी चित्रपटांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. ‘हमको तुमसे प्यार है’ किंवा ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून अपंग व्यक्तींशी व्यवहार करताना सहानुभूती दाखवायला पाहिजे असं दाखवलं गेलंय. अनेक चित्रपटांत तर अपंगत्वाची थट्टाच केली जाते. उदा. ‘हाउसफुल थ्री’ चित्रपट घ्या. जिथं एक संवेदनशील विषय हास्यास्पद पद्धतीने हाताळला गेला आहे. समाज व चित्रपट यांच्यात फारसा फरक नसतो असं म्हटलं जातं.
प्रेमाविषयीची समाजाची धारणा अजूनही संकुचीतच आहे. अनेक पालकांना भीति असते की त्यांची मुलं कोणाच्या प्रेमात तर पडणार नाहीत ना? विशेषतः ग्रामीण भागात जर मुलं त्यांतही मुली कोणाच्या प्रेमात पडल्याचं दिसून आलं तर त्या मुलीचं लग्न लगेच लावून दिलं जातं. मुलींनी स्वतःच्या इच्छेनं आपला जोडीदार निवडावा हे अनेक जाति समूहांना आजही मान्य होत नाही.

या विषयी अंजू सांगते, “समाजात माझ्यासारख्या व्यक्तीला प्रेम मिळणं खूप कठीण आहे. त्यात मी एक मुलगी आहे. मुलींनी प्रेमात पडणं हा तर गुन्हाच समजला जातो आपल्याकडे. माझ्या घरच्यांची इच्छा आहे की मी अंध आहे तर निदान मी काही शिकावं आणि कुठे नोकरीला लागून घरच्यांसाठी पैसा कमवून आणावा. त्यांना हेच वाटतं की मला काहीच भविष्य नाही. माझ्याशी कोण लग्न करेल? अशात प्रेम आणि लग्न ही फार दूरची गोष्ट झाली. समाजानं खरं तर प्रेमाविषयी एक सामान्य मत बनवायला हवं, त्यासंबंधी आपली विचारधारा विकसीत करायला हवी, पण तसं होताना दिसत नाही.”
अंजू दिल्ली विश्वविद्यालयात शिकतेय. ती लहानपणापासूनच काही बघू शकत नाही. त्यावर काही उपायही नाही. पण आपलं अंधत्व ती आपल्या प्रगतीच्या आड येऊ देऊ इच्छित नाही. तिला शिक्षक व्हायचं आहे आणि स्वतःच्या पायावर जगायचं आहे. प्रेम ही स्वतःच एक क्रांतिकारी गोष्ट असते. ती अनेक चुकीच्या गोष्टी विचारांना नष्ट करते. समाजानं ठरवलं तर तो प्रेमाला एक सामान्य गोष्ट बनवू शकतो. सविता पदवीधारक आहे. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तिच्या डोळ्यांत त्रास झाला म्हणून तिचं ऑपरेशन करण्यात आलं पण त्यातच ती कायमची अंध झाली. आता ती छत्तीस वर्षांची आहे.
प्रेम हा शब्द ऐकताच ती हसू लागते. ती म्हणते, “माझ्यासाठी प्रेम म्हणजे केवळ दुःख आणि वेदनाच आहे, बाकी काही नाही. आत खूप काही वाटत असतं. पण कोणी स्वीकार करायला तयार नसतं. अनेकदा माझी टर उडवली जाते. त्यामुळे मी प्रेमाचा नाद सोडला आहे. तरीही कोणी चांगला मुलगा मिळालाच तर लग्न करण्याची इच्छा आहे माझी. एकदा सोयरीक झाली होती माझी. पण ती नंतर तुटली. माझ्या आईला मात्र माझं लग्न होऊ नये असं वाटतं. तिचा समज आहे की जे डोळस असतात तेही कधी आनंदी होऊ शकत नाहीत. मग मी तर अंधच आहे. मी कशी आनंदी होणार?”

परंपरा, सिनेमा आणि मनोरंजनातून प्रेमाची जी प्रतिमा तयार झाली आहे त्यात भारतीय समाजात प्रेम होणं, करणं, त्याला घरच्यांची मान्यता मिळणं यात कायमच अडचणी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपंग व्यक्तींच्या प्रेमात या अडचणी फारच असतात. हे बदलण्यासाठी आधी अपंगत्व म्हणजे अडचण नाही हे आपण समजायला शिकायला हवं. त्यावर दया, सहानुभूती दाखवणं बंद करायला हवं. अपंग व्यक्तींच्या मनात प्रेमाविषयी भीति असेल तर ती दूर करणं गरजेचं आहे.
ज्यामुळे ते सामान्यपणे इतरांसारखंच आपलं प्रेम व्यक्त करू शकतील. अपंग व्यक्ती आणि त्यांच्या अपंगत्वाविषयी एक चुकीची धारणा आपल्या समाजात आहे जी त्यांना असहाय समजते. त्याविरोधात, अपंग व्यक्तींनाही इतरांप्रमाणेच प्रेम करण्याचा अधिकार आहे, नात्यांमध्ये समानतेचा अधिकार आहे आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे सर्वांना समजणं गरजेचं आहे. अपंग आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या शारिरीक गरजा दाबून टाकायच्या हा त्यांच्या मूलभूत अधिकारावरचा घाला आहे. त्यामुळे आपल्याला एक असा सर्वसमावेशक समाज तयार करावा लागेल ज्यांत अपंग, अव्यंग, सारेच एकमेकांवर समान भावनेनं प्रेम करू शकतील आणि त्याचा सहजपणे स्विकारही होईल.
अनुवाद – प्रतिक पुरी
(सौजन्य – फेमिनिजम ऑफ इंडिया)






