डॉ. रेखा शेळके
- आवाज नसलेल्यांचा 'आवाज', 'लोकांसाठी, लोकांच्या माध्यमातून आणि लोकांनी चालवलेला रेडिओ.
- कम्युनिटी रेडिओची संकल्पना अनेक ठिकाणी प्रत्यक्ष अवतरली आहे.
- आजच्या रेडिओ दिनानिमित्त या रेडिओची ओळख...
आजचा दिवस तसा नेहमीसारखाच सुरू झाला होता. एमजीएम परिसराची निगुतीने स्वच्छता करणाऱ्या लंका मावशी नेहमीप्रमाणे पहाटेच हातात झाडू घेऊन हॉस्टेलमध्ये दिसल्या. मी सहज विचारलं, "मावशी, आज इतक्या लवकर कामाला लागलात?" त्यावर मावशींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं, त्या उत्साहाने म्हणाल्या, "मॅडम, आज मला कार्यक्रम करण्यासाठी आपल्या एमजीएम रेडिओवर बोलावलंय! तुम्ही नक्की ऐका बरं का आज आम्ही रेडिओवर गाणी गाणार आहोत."
..आणि खरोखरच, जेव्हा 'एमजीएम रेडिओ ९०.८ एफएम वर लंका मावशीच्या स्वरातली लोकगीतं घुमली, तेव्हा केवळ त्यांचंच नाही तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक महिलांचे चेहरे अभिमानाने उजळून निघाले. हा अनुभव म्हणजे कम्युनिटी रेडिओ या माध्यमाची खरी ताकद आहे.
आजच्या डिजिटल आणि हाय-टेक युगात, जिथे इंटरनेटचा बोलबाला आहे, तिथे आजही कम्युनिटी रेडिओ आपली वेगळी ओळख जपत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील 'MGM 90.8 FM' हे त्याचं उत्तम उदाहरण. 'लोकांसाठी, लोकांच्या माध्यमातून आणि लोकांनी चालवलेला रेडिओ' या संकल्पनेला या स्टेशनने खऱ्या अर्थाने मूर्त रूप दिलं आहे.
कम्युनिटी रेडिओ म्हणजे काय?

भारतात कम्युनिटी रेडिओचा प्रवास सहज सुरू झालेला नाही. १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत हवेतील लहरी (Airwaves) या सार्वजनिक मालमत्ता असल्याचं घोषित केलं. या निर्णयामुळे रेडिओवरील सरकारची मक्तेदारी संपली आणि सामुदायिक तसेच खासगी प्रसारणासाठी मार्ग मोकळा झाला. २००२ मध्ये सरकारने कम्युनिटी रेडिओसाठी पहिलं धोरण जाहीर केलं. मात्र सुरुवातीला परवानगी फक्त आयआयटी, आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांपुरती मर्यादित होती.
२००६मध्ये धोरणात बदल करून स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि सामाजिक संस्थांना परवानगी देण्यात आली. यानंतर ग्रामीण भारतात कम्युनिटी रेडिओचा खऱ्या अर्थाने प्रसार सुरू झाला. भारतातील पहिलं नोंदणीकृत स्टेशन म्हणजे चेन्नईतील अण्णा विद्यापीठाचं अण्णा FM' होय.
२०२६ पर्यंत भारतात ४८० पेक्षा जास्त कम्युनिटी रेडिओ स्टेशन कार्यरत आहेत आणि ही संख्या १००० पर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. ही स्टेशने अहिराणी, गोंडी, बुंदेली, संथाली, कोकणी, मराठी बोली अशा स्थानिक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करतात. त्यामुळे लोकांना 'आपलंच माध्यम' असल्याची भावना निर्माण होते. आज अनेक कम्युनिटी रेडिओ स्टेशन मोबाइल अॅप्स आणि इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. त्यामुळे गावचा आवाज आता जागतिक पातळीवर ऐकू जात आहे.
कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यासाठी काय करावे?
भारतात कम्युनिटी रेडिओ सुरू करणे ही एक कायदेशीर प्रक्रिया असून त्यासाठी साधारण एक ते दोन वर्षे लागू शकतात. स्टेशन उभारणीसाठी सरकारकडून ५०% ते ७५% पर्यंत अनुदान दिलं जातं. उपकरणे, प्रशिक्षण आणि तांत्रिक मदतीमुळे लहान संस्थांनाही रेडिओ सुरू करणं शक्य होतं. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या Broadcast Seva पोर्टलवर नोंदणी करावी लागते. गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून सुरक्षा 'ना हरकत' घ्यावी लागते.
दूरसंचार विभागाकडून ठराविक फ्रिक्वेन्सी दिल्या जातात उदा. 90.8 FM, 90.4 FM, 87.7 FM. सरकारसोबत अधिकृत कायदेशीर करार करावा लागतो. SACFA क्लिअरन्स घ्यावी लागते. रेडिओ टॉवर किंवा अँटेना उभारण्यासाठी अंतिम तांत्रिक परवानगी आवश्यक असते. कम्युनिटी रेडिओंना सरकारकडून मर्यादित जाहिराती दिल्या जातात. त्यातूनच रेडिओ आपला खर्च भागवतात.

अनेक रेडिओना 'युनिसेफ' च्या माध्यमातून समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प दिले जातात व त्यासाठी निधीही मिळतो. या प्रकल्पांद्वारे रेडिओ कार्यक्रम तर करतातच; पण ग्रामीण भागात, झोपडपट्ट्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन साक्षरता मोहिमा राबवतात. यामुळे बालविवाह रोखणे, माता-बाल आरोग्य, लसीकरण, सकस आहार यावर विशेष जनजागृती झाली आहे. स्थानिक भाषेत सांगितलेल्या कायदेशीर व आरोग्यविषयक माहितीमुळे समाजात जागरूकता आणि सामाजिक भीती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून बालविवाह रोखल्याच्या नोंदी आहेत. गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व काळजी, लसीकरण, आहार याबाबत माहिती मिळाल्याने त्यांच्या आरोग्याबद्दल सकारात्मक बदल दिसून येतो.
आज ग्रामसेवक किंवा तहसीलदार रेडिओवर येऊन प्रश्नांची उत्तरे देतात तेव्हा प्रशासनाबद्दलची भीती कमी होऊन विश्वास वाढतो. सरकारी योजनांचे फॉर्म कसे भरायचे, अनुदान कोणाला मिळते याची माहिती मिळाल्याने एजंटांकडून होणारी फसवणूकही कमी झाली आहे. जिथे मोठी माध्यमं पोहोचत नाहीत, तिथे कम्युनिटी रेडिओ लोकजागृतीची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतातील कम्युनिटी रेडिओ चळवळ ही खऱ्या अर्थाने प्रसारणातील क्रांती आहे. ग्रामीण भागात, शहरी उपेक्षितांमध्ये आणि वंचित समुदायांमध्ये माहिती, शिक्षण आणि बदलाचा प्रकाश पोहोचवणारे हे माध्यम आज सर्वसामान्यांचा आवाज बनले आहे.

आवाज नसलेल्या अनेकांचा आवाज म्हणजे कम्युनिटी रेडिओ
'कम्युनिटी रेडिओ हा आवाज नसलेल्या अनेकांचा आवाज आहे,' ही ओळ भारतातील अनेक रेडिओ स्टेशनांच्या यशोगाथांना साजेशी आहे. गुड़गाव की आवाज (हरियाणा) हे स्टेशन शहरी वंचित आणि स्थलांतरित कामगारांच्या जगात डोकावून त्यांच्या समस्या मांडते. गुडगावच्या चकचकीत उंच इमारतीमागे लपलेल्या संघर्षांना हे रेडिओ व्यासपीठ देते. मधुबन कम्युनिटी रेडिओ प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या आध्यात्मिक संस्थेशी संलग्न स्वयंसेवकांच्या टीमद्वारे चालवले जाते. अध्यात्म, आरोग्य आणि सामाजिक जागृती यांचा सुंदर संगम साधत हे स्टेशन श्रोत्यांना सकारात्मक ऊर्जा देते.
संगम रेडिओ (तेलंगण) हे भारतातील पहिले पूर्णपणे दलित महिलांद्वारे चालवले जाणारे कम्युनिटी रेडिओ आहे. युनेस्कोने याचा सन्मान केला आहे. 'भारतातील पहिले दलित महिलांचे स्वतःचे रेडिओ केंद्र' असे याचे वर्णन केले जाते. या महिलांनी पारंपरिक गीते, आरोग्य टिप्स आणि स्थानिक समस्यांवर कार्यक्रम करून समाजात मोठा बदल घडवला आहे.
रेडिओ बुंदेलखंड (मध्य प्रदेश) हे मुख्यतः जलसंधारण, हवामान बदल आणि स्थानिक संस्कृती जतनासाठी अग्रेसर आहे. 'रेडिओ बुंदेलखंड'च्या उपक्रमांनी विकेंद्रीकरणाला खरे अर्थ प्राप्त करून दिले आहे. दुष्काळग्रस्त भागात जलसुरक्षा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे स्टेशन मैलाचा दगड ठरले आहे. अल्फाज-ए-मेवात (हरियाणा) हे स्टेशन मेवात भागातील महिलांना शिक्षण, आरोग्य, हक्क आणि घरगुती हिंसाचाराविरोधात जागरूक करते. महिला आरजे आणि श्रोत्यांच्या सहभागाने ही रेडिओ केंद्रे महिलांना बाहेरील जगाशी जोडते आणि त्यांच्या संघर्षांना आवाज देते.

वसुंधरा वहिनी (बारामती, महाराष्ट्र) हे कृषी आणि ग्रामीण विकासावर केंद्रित आहे. कृषी विज्ञान केंद्राद्वारे चालवले जाणारे हे केंद्र शेतकऱ्यांना आधुनिक शेती, हवामान माहिती आणि स्थानिक संस्कृती जतनासाठी मार्गदर्शन करते. गणित शिकवणे, उखाणे, सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे महिलांचेही सक्षमीकरण होते. सर्वसामान्यांच्या आवाजाला व्यासपीठ मिळून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा सन्मान होत असल्याने या माध्यमाचं खऱ्या अथनि सार्थक होतं.
(लेखिका छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठ कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या प्राचार्य आहेत.)
सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स






