भंवर मेघवंशी
- 'कोणत्याही जातीचा व्यक्ती आरएसएसमध्ये सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असणं ही अडचण नाही’’ असे विधान मोहन भागवतांनी अलीकडेच केले.
- मात्र संघाचा हा दावा किती पोकळ आहे हे यापूर्वीच दलित समाजाच्या भंवर मेघवंशी यांनी दाखवून दिले आहे. I Could Not Be Hindu: The Story of a Dalit in the RSS या आपल्या आत्मकथनातून त्यांनी संघ आणि जातियता यावर गंभीर भाष्य केले आहे.
- त्यांनी किशोरवयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये प्रवेश केला आणि काही वर्षांतच हिंदू एकात्मतेच्या मोठ्या दाव्यांच्या आड असलेली जातीय परंपरा संघाच्या शाखेत प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका व्याख्यान मालिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं. ते म्हणाले की, 'कोणत्याही जातीचा व्यक्ती आरएसएसमध्ये सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असणं ही अडचण नाही. सोबतच, तो व्यक्ती ब्राह्मणच असावा ही पात्रता नाही'.
मात्र संघाचा हा दावा किती पोकळ आहे हे यापूर्वीच दलित समाजाच्या भंवर मेघवंशी यांनी दाखवून दिले आहे. I Could Not Be Hindu: The Story of a Dalit in the RSS या आपल्या आत्मकथनातून त्यांनी संघ आणि जातियता यावर गंभीर भाष्य केले आहे.
सरसंघचालक दलित व्यक्ती होऊ शकतो का?
राजस्थानच्या खेड्यातील कबीर-पंथी दलित कुटुंबात जन्मलेला भंवर मेघवंशी हा लेखक, सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार आणि आज दलित हक्कांच्या चर्चेतील अत्यंत प्रभावी आवाज आहे. पण त्यांच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी किशोरवयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये प्रवेश केला आणि काही वर्षांतच हिंदू एकात्मतेच्या मोठ्या दाव्यांच्या आड असलेली जातीय परंपरा संघाच्या शाखेत प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
शंभरीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंचतारांकित चिंतनाचा घाट घातलेला आहे. प्रसिद्ध-कुप्रसिद्ध चेहऱ्यांना आवतन देऊन संघाने आपल्या मान्यतेवर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. शिक्कामोर्तब तर झाले, पण विश्वासार्हतेचे काय? प्रामाणिकपाणबद्दल काय? या दोन प्रश्नांपासून संघाची अद्यापही सुटका झालेली नाही, होणारही नाही. कारण संघ स्वतःला इतरांमध्ये समान पातळीवर मिसळून टाकण्याऐवजी, इतरांनी संघाशी समरस व्हावे, अशी अपेक्षा धरतो. काळानुरूप संघ स्वतःत बदल घडवतो, म्हणूनच तो काठाबाहेर टिकून राहतो, हे विधान अनेक जण उद्धृत करताना दिसतात. हे तर खरेच की, आद्य धर्म म्हणून संघ स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, पण ब्राह्मणत्त्वाचा त्याग कधीच करत नाही. स्वतःमधल्या वर्चस्व भावनेला कधीच तिलांजली देत नाही. भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे असे विधान करतो, पण त्या प्रत्येकाला संघसंमतेची वागणूक देणार की समरसतेची अपेक्षा करणार याची संधी देता कायम ठेवतो.

म्हणूनच संघाने सर्व जाती धर्माचा स्वीकार करण्याची जाहीर भूमिका घेतली असली तरीही, सर्व जाती धर्मांचे संघात स्थान काय याबाबत पाळलेले मौन हे संघाच्या आजवरच्या वाटचालीतले ऐतिहासिक सत्य म्हणून समोर येताना दिसते.
याच ऐतिहासिक सत्याचे दाखले देणारे उतारे भंवर मेघवंशी लिखित आणि शेखर देशमुख अनुवादित "मी हिंदू असू शकत नाही : रा. स्व. संघातील दलिताचे आत्मकथन" (मधुश्री पब्लिकेशन,पुणे) या पुस्तकात प्रकाशित आहेत. काळाबरोबर संघाचे बाह्यरूप बदलते, मात्र गाभा तसाच राहतो, याचेच सूचन हे उतारे करताना दिसतात.
माझ्या गावात कारसेवकांची अस्थिकलश यात्रा…
अयोध्येतल्या राममंदिर आंदोलनात मरण पावलेल्या आणि भिलवाडा इथल्या मोर्चात मारल्या गेलेल्या दोन हिंदूंना हुतात्मा जाहीर करण्यात आले. आता त्या मारल्या गेलेल्या स्वयंसेवकांच्या अस्थी कलशांमध्ये घालून गावोगाव फिरवल्या जाऊ लागल्या. साधु-महंत, संघाचे पदाधिकारी, विहिंपचे नेते आणि तरुण स्वयंसेवक या अस्थिकलश यात्रेमध्ये सामील होते. एकेक गाव फिरून ही अस्थिकलश यात्रा एक दिवस माझ्या गावात येऊन थडकली. रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही वेळकाळ न पाहता या अस्थिकलश यात्रेचे भव्यदिव्य असे स्वागत केले. गावात यात्रा येणार म्हणून वस्तीतल्या मुला-मुलांनी अगोदरच सगळा परिसर पाना-फुलांनी सजवला होता. गावात अस्थिकलश यात्रा स्थिरावली, तसा ढोल-ताशे वाजवत, शंखध्वनी काढत, नाचत-गात 'न भूतो ना भविष्यति' म्हणता येईल अशा प्रकारे यात्रेत सामील असलेल्यांचा सत्कार घडवून आणला गेला.
सत्कार-स्वागताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जंगी सभा झाली. अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात मुलायम सिंग सरकारच्या पोलिसांनी ज्या क्रूरपणे कारसेवकांना वागणूक दिली होती, त्याचा एक व्हिडिओ या सभेत दाखवला गेला. त्यानंतर सभेस उपस्थित साधु-महंतांनी भिलवाड्यात आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या कथन केल्या. वस्तुतः यातल्या एकालाही आंदोलनाच्या दिवशी साधे खरचटलेही नव्हते, पण सगळ्यांनी भावुक होत अशी काही ओतप्रोत भाषणे केली, की उपस्थितांचे डोळे भरून आले.
खरे पाहता, मी स्वतः पोलिसांच्या अत्याचाराचा बळी ठरलो होतो. पण, नेत्यांनी ज्या मार्मिकपणे परिस्थितीचे वर्णन केले, ते तितक्या प्रभावीपणे तर मलाही जमले नसते. थोडक्यात, अत्याचाराच्या कहाण्या अशा लोकांनी प्रभावीपणे पुढे आणल्या, जे प्रत्यक्ष घटनेच्या प्रसंगी तिथे उपस्थितच नव्हते. कदाचित याच वाक्चातुर्याचे काटेकोर प्रशिक्षण आम्हाला संघाकडून मिळत असते. त्यात जे स्वतःला विद्वान मानणारे लोक असतात, ते हे सारे पटकन आत्मसात करतात. तसेही या देशात भूकबळीवरचे भाषण भुकेने व्याकूळ झालेल्यांपेक्षा त्यांची पोटे गच्च भरलेली असतात, तेच लोक अधिक प्रभावीपणे देत असतात. इथेही नेमके तेच घडत होते. हृदयाला हात घालणारी भाषणे सुरू होती. 'हिंदव: सोदरा सर्वे' चे (हिंदू-हिंदू भाई भाई) नारे दिले जात होते. हिंदू समाजात पसरलेल्या सामाजिक भेदभावावर जातीपातेवर प्रहार केले जात होते. हिंदूंची एकी आणि हिंदूंनी काहीही घडले तरीही एकत्रित राहायला हवे, या मुद्द्यांवर भर देऊन वंचित समाजातून आलेल्यांना आपण प्रेमभराने सामावून घेतले पाहिजे, असे आवाहन करून अखेर सभेचा समारोप झाला. एका अर्थाने, आमच्या दलित वस्तीतली ही संघाची पहिली सभा भलतीच यशस्वी ठरली.
संघाच्या स्वयंसेवकांना घरी जेवायला घेऊन गेलो आणि…?
सभा संपल्यानंतर जमलेल्या मान्यवरांना मी माझ्या घरी येऊन जेवण करण्याचा आग्रह केला. आम्ही पूर्वतयारी म्हणून सगळ्यांसाठी खीर आणि पुरीचे जेवण तयार ठेवले होते. अर्थात, स्वयंपाक सुरू असतानासुद्धा सवयीप्रमाणे माझ्या वडिलांनी खुसपट काढलेच होते. म्हणाले- 'कशासाठी स्वयंपाकाचे सामान खराब करतात. हे लोक आपल्याकडे जेवणाऱ्यांतले नाहीत. ढोंगी आहेत, हे सगळे. बोलतात एक आणि करतात भलतेच. त्यांच्या मनात आमच्याविषयी केवळ आणि केवळ विष भरलेले आहे...'

वडिलांचे ते बोल ऐकून माझ्या अंगाचा अक्षरश: तीळपापड झाला. अखेरीस सहन न झाल्याने आयुष्यात पहिल्यांदा सगळा धीर एकवटून मी वडिलांना चार गोष्टी ऐकवल्या. म्हटले- 'क्या जानते हैं आप संघ के बारे में? काय ठाऊक काय आहे, तुम्हाला संघाबद्दल. मी पाच वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या जिल्हा कार्यालयाचा प्रमुख आहे. कितीतरी स्वयंसेवकांच्या घरी जाऊन मी स्वतः जेवलो आहे. तुमच्या गावात चालतो, तसा आमच्या संघात जातिपातीतला भेदभाव चालत नाही. तुमच्याप्रमाणे स्पृश्यास्पृश्यता आम्ही पाळत नाही. ही सगळी काँग्रेसची देणगी आहे.' माझ्या त्या तावातावाने बोलण्यावर वडील म्हणाले- 'बेटा, काँग्रेस पक्ष आमच्यासारख्या छोट्या जातींसाठी आईच्या उदरासारखा आहे. तुला हे कधीच कळणार नाही. ही चांगलीच गोष्ट आहे, तुमच्या संघटनेत सगळ्या जाती एकसमान पातळीवर आल्या असतील, तर आनंदाने जेवण तयार करा, माझी त्याला काहीही हरकत नाही. उलट, त्यांना जेवू घालण्यात मलाही आनंदच वाटेल.'
हा आम्हा बाप-बेट्यांमधला युद्धविरामाचा क्षण होता. वादग्रस्त असूनही एका गोष्टीबाबत मी राजी होतो, आणि तेदेखील नाराज नव्हते. एकीकडे आमचे जेवण तयार होते, आणि अर्थातच जेवायला येणारेही तयार असणार होते.
मी तर काय, आनंदाने वेडापिसा झालो होतो. धावत-पळत कामे आटोपत होतो. त्या दिवशी अस्थिकलश यात्रेत आयुष्यात पहिल्यांदा आणि बहुधा अखेरचा म्हणता येईल, अशा प्रकारे मी देहभान विसरून नाचलो आणि गायलोदेखील होतो. सभेचे सूत्रसंचालनदेखील मीच केले होते. माझ्या उत्साहाने आणि आनंदाने जणू परिसीमा गाठली होती. मला तर असे वाटत होते, माझ्या घरी रामभक्त नव्हे, साक्षात प्रभू श्रीराम आले आहेत. प्रभू रामचंद्र शबरीची बोरे खाण्यासाठी तिच्या झोपडीत गेले होते, अगदी तसेच कृतकृत्य भाव माझ्या मनात त्या क्षणी उमटले होते. त्यातही, आणखी एका कारणासाठी मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज मी माझ्या काँग्रेसवादी वडिलांना खोटे पाडणार होतो. नव्हे, ते चांगलेच खोटे पडणार होते. त्यांचे समज, गैरसमज आज पार धुऊन निघणार होते. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या गावात मोठ्या तोऱ्यात मी हिंदुत्वाचा झेंडा रोवला होता. आज गावात सुफळ झालेली श्रद्धांजलीपर सभा एका अर्थाने, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने टाकलेले यशस्वी पाऊल होते. आजच मी माझ्या घराच्या भिंतीवर दोन स्टिकर्स लावली होती- 'गर्व से कहो हम हिंदू हैं' आणि 'बडे भाग्य से हम हिंदू है'.
‘’बंधू, खाना पॅक कर दो…’’ संघाचे कार्यकर्ते म्हणाले
अस्थिकलश यात्रेतल्या सभेनंतर घरी आलेल्या मान्यवरांना मी जेवण घेण्याचा जसा आग्रह केला, तसे ते थोडे अवघडल्यासारखे झाले. त्यांची द्विधा मन:स्थिती झाल्याचे दिसले. तेवढ्यात 'सेवा भारती'चे तत्कालीन जिल्हाप्रमुख नंदलाल आणि संघाचे एक पदाधिकारी मला इतरांपासून हळूच दूर घेऊन गेले. प्रेमाने त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. जेवणाच्या निमित्ताने मी केलेल्या तयारीचे तोंडभरून कौतुक केले. माझ्या कामाचे कौतुक झाल्यानंतर माझ्या संघाशी आणि राष्ट्राशी असलेल्या निष्ठेबाबतही त्यांनी मला प्रशस्तीपत्रक दिले. मग कुणाला ऐकू जाईल न जाईल, अशा रीतीने अत्यंत हळू आवाजात मला म्हणाले, 'बंधू, आपल्या समाजात असलेल्या सामाजिक विषमतेबाबत तुम्ही पुरते जाणून आहातच. संघाच्या आजवरच्या अथक प्रयत्नांनंतरही हिंदू समाज समरस होऊ शकलेला नाही. एरवी, तुम्ही म्हणाल, तेव्हा तुमच्यासोबत एकाच ताटात जेवण घेऊ आम्ही. परंतु, आज आमच्यासोबत साधू-महंत आणि इतर अन्य लोकही आहेत. त्यांना पूर्वकल्पना न देताच आम्ही वंचिताघरचे जेवण दिले आहे, ही गोष्ट ते स्वीकारणार नाहीत. तसे घडले तर ते नाराज होऊन अस्थिकलश यात्रा अर्धवट टाकून निघून जातील.'
पदाधिकाऱ्यांचे ते कठोर बोल ऐकून मी तर इतका गोठून गेल्यासारखा झालो. समजा, त्या क्षणी माझ्या अंगावर कुणी सपासप वार केले असते, तरीही रक्त बाहेर पडले नसते. मी अक्षरश: स्तब्ध झालो होतो. माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्या प्रसंगी, ना मी माझ्यावर झालेला आघात शब्दांत मांडू शकत होतो, ना त्यांचे म्हणणे मला कळत-समजत होते. पण त्याही सर्दवलेल्या क्षणांत त्यांचे एक वाक्य माझ्या ध्यानात राहिले. ते म्हणाले, 'तुम्ही असे करा, जेवण व्यवस्थित बांधून गाडीत ठेवायला सांगा. पुढच्या गावातला कार्यक्रम संपला, की सगळ्यांना जेवायला देऊन टाकू.’ याचा अर्थ स्पष्ट दिसत होता. हे पदाधिकारी जेवण दलिताघरचे आहे, हे सांगताच पुढल्या गावात गुपचूप सगळ्यांना ते वाढून देणार होते.
माझी अवस्था खूप अवघडल्यासारखी झाली होती. मी स्वतःच्याच घरात पराभूत मानसिकतेत वावरत होतो. अगदी काहीही न करता, माझे वडील जिंकत असल्याचे मला जाणवू लागले होते. या लोकांनी घरी जेवण का घेतले नाही, हा प्रश्न समजा, वडिलांनी विचारलाच तर त्यांना काय सांगावे, मी गोंधळात पडलो होतो. पण तरीही मन घट्ट करत मी जेवण बांधून देण्यास सुरुवात केली. घरच्या मंडळींनी याचे कारण विचारले, मी म्हणालो, 'भगवानपुरा गावात आणखी एक कार्यक्रम आहे, त्यांचा. आधीच त्यांना उशीर झालेला आहे. त्यामुळे भगवानपुऱ्यात गेले, की जेवतील सगळे.' खरेतर काहीतरी सांगून मी वेळ मारून नेली होती. माझ्यामागे लागलेल्यांचा तेवढ्यापुरता पिच्छा सोडवून घेतला होता. पण, या सगळ्या धकाधकीत मनातला उत्साह तळाला जाऊ लागला होता. जातीमुळे आपण हीन ठरलो, ही भावना मन कुरतडू लागली होती. माझ्या बाबतीत हे असे का घडते आहे, असा प्रश्न पुनःपुन्हा मनात येऊ लागला होता. संघात तर जातिभेद नाही. स्पृश्यास्पृश्यतादेखील पाळली जात नाही, संघ तर सगळ्या हिंदूंना एकसमान मानत आला आहे. सकल हिंदू समाजाचा विचार करत आलाय. असे असताना, हा असा दुटप्पी व्यवहार कसा काय घडला आहे? मला काही कळेनासे झाले होते.
‘’मी एक शिस्तबद्ध स्वयंसेवक असतानाही माझ्यासोबत असा भेदभाव का’’?
त्या सैरभर अवस्थेत मनात आणखी एक प्रश्न आला, मी तर एक शिस्तबद्ध स्वयंसेवक आहे. कट्टर कारसेवक आणि जिल्हा कार्यालय प्रमुखदेखील आहे. असे असताना माझ्यासोबत तर असा भेदभाव केला जात असेल, तर वंचित समाजातल्या इतरांना कसे वागवले जात असेल? प्रश्न मन पोखरून टाकणारा होता. त्या दिवशी पहिल्यांदा एक हिंदू म्हणून नव्हे, तर एक खालच्या जातीतली व्यक्ती म्हणून स्वतःला प्रश्न विचारले. पण त्या प्रश्नांवर जितका मी विचार केला, तितका अधिकाधिक त्यात गुरफटत गेलो. खरी गोष्ट ही होती, ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रात्र ठरली होती. सरता सरत नव्हती. डोळ्याला डोळा न लागता सरलेल्या त्या रात्री मला हेही ठाऊक व्हायचे नव्हते, की उद्याचा दिवस आणखी भयानक काहीतरी घेऊन उगवणार होता. अर्थातच, जे काही घडणार होते, त्याची तर मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

उगवणारा पुढचा दिवस माझ्यासाठी जणू महाविनाशाचा दिवस ठरणार होता. वैऱ्याची रात्र पुरती सरलीही नव्हती, तोच सर्वांग भाजून काढणारा तळपता सूर्य समोर हजर झाला होता. माझे सहकारी स्वयंसेवक पुरुषोत्तम श्रोत्रीय अस्थिकलश यात्रेसोबत प्रवास करत होते. सकाळी सकाळी ते आपल्या घरी परतले. माझ्या आंबेडकर वसतिगृहातल्या काळात ते माझे शेजारीसुद्धा होते. जात्याचे उत्तम कवी असलेले पुरुषोत्तम माझे घनिष्ठ मित्रही होते. आम्ही दोघेही आझादनगरात भरणाऱ्या शाखेत एकत्रच जात आलो होतो. सुख-दु:खाच्या गोष्टी एकमेकांना कळवत आलो होतो. अगदी घट्ट नाते तयार झाले होते, आमचे. हेच पुरुषोत्तम त्या सकाळी खिरीचे भांडे घेऊन घरी आले होते.
‘’माझ्या घरातील खीर-पुरी रस्त्यावर फेकून दिली’’
त्या क्षणी मला त्यांनी जे काही सांगितले, ते सारे अविश्वसनीय, अकल्पनीय असे होते. ते जे काही सांगत होते, ते ऐकताना माझ्यावर जणू लोखंडाचे घण पडत होते. पुरुषोत्तमजींनी आडपडदा न ठेवता, मला सांगितले, 'घरी आलेल्या मान्यवरांना तुम्ही जी खीर-पुरी बांधून दिली, ती त्यांनी भगवानपुऱ्याच्या वळणावर रस्त्याच्या कडेला फेकून दिली नि रात्रीचे जेवण कुणा रामस्वरूप शर्मा नावाच्या वैद्याच्या घरी जाऊन घेतले. मला हे सांगितले गेले, की ही गोष्ट तुम्हाला कळता कामा नये, परंतु, मला तुमच्याशी खोटे बोलायचे नाही. तुम्ही दिलेले जेवण खाल्ले गेले नाही, तर फेकून दिले गेले.' पुरुषोत्तमजींचे बोलणे ऐकूनही मी स्वतःची समजूत काढली. त्यांना म्हणालो, 'काही घडले तरीही, संघाचे स्वयंसेवक इतके जात्यांध नाही होऊ शकत, इतके खालच्या थराला नाही जाऊ शकत. तुम्ही माझी चेष्टामस्करी करण्यासाठी इतके मोठे खोटे माझ्याशी नाही बोलू शकत.'
माझ्या त्या निषेधाच्या सुरापुढे ते अधिकच ठाम झाल्याचे दिसले. म्हणाले, 'माझे म्हणणे पटत नसेल, माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल, तर माझ्यासोबत चला. स्वतःच्या डोळ्यांनी बघा, फेकलेले काहीतरी दिसेलच. पण मला विनाकारण बोल लावू नका.' त्यांच्या या बोलण्यावर तिरमिरीत सायकल काढली नि आम्ही दोघे भगवानपुऱ्याच्या वळणावर गेलो. तिथे बघितले. पुरुषोत्तमजींचे म्हणणे खरे ठरले होते. खरोखरच माझ्या घरून बांधून घेतलेले जेवण रस्त्यावर इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत पडून होते. मुंग्या, घुशी, कावळे, आणि कुत्र्यांनी त्या अन्नाचा आपापल्या परीने फडाशा पाडलेला दिसत होता. ते विदारक दृश्य पाहणे माझ्या तर सहनशक्तीपलीकडे होते. त्या रात्री अस्थिकलश यात्रा ब्राह्मणांचे गाव अशी ओळख असलेल्या सरेरी इथे पोहोचायची होती. डोके इतके तडकले होते, त्या गावात जाऊन भांडाफोड करण्याचा जणू मी मनोमन निश्चय करून टाकला होता. पाणी डोक्यावरून जाऊ लागले होते. निर्णायक लढ्याचा क्षण जवळ येऊन ठेपला होता. संघर्ष सुरू झालेला होता, फक्त घोषणा व्हायची तेवढी शिल्लक होती.'
कुठेच दाद मिळाली नाही…
प्रक्षुब्ध मन:स्थितीत मी संध्याकाळी ब्राह्मणांच्या सरेरी गावात जाऊन पोहोचलो. आदल्या दिवशी घडलेल्या लाजीरवाण्या घटनेबाबत अस्थिकलश यात्रेत सामील झालेल्यांना जाब विचारला. मात्र, त्यांनी जेवण फेकून दिल्याच्या कृतीचा साफ शब्दांत इन्कार केला. परंतु पुरुषोत्तमजींचे नाव घेऊन त्यांनीच मला या घाणेरड्या कृत्याची माहिती दिली, असे जेव्हा सांगितले, तेव्हा त्यावर, गाडी भगवानपुऱ्याच्या वळणावर असताना मागे बसलेल्या स्वयंसेवकाच्या हातून अनवधानाने जेवण रस्त्यावर पडले, असे सांगण्याचा काहींनी प्रयत्न केला. परंतु, मी त्यांचे बोलणे आणि डोळ्यांतले भाव यातला फरक स्पष्टपणे पाहू शकत होतो. माझी पक्की खात्री झाली होती, समोर उभे 'परमपूज्य भाईसाहेब' खूप सफाईदारपणे धडाधडीत खोटे सांगत होते. मी म्हणतो, जेवण कुणाच्या हातून पडायचेच होते, तर ते रस्त्याच्या मधोमध पडायला हवे होते. रस्त्याच्या कडेला जाऊन ते कसे काय पडले? दुसरी गोष्ट म्हणजे, खीर-पुरी काही मी एकत्र बांधून दिलेली नव्हती. त्यामुळे पुऱ्या समजा हातून पडल्या, तर खीर शिल्लक असायला हवी होती. आणि खीर खाली पडायची, तर भांड्याला किमान खोक पडायला हवी होती.
उघडच होते, प्रत्यक्षात तसे काहीही घडले नव्हते. या लोकांनी जाणूनबुजून मी मोठ्या आपुलकीने बांधून दिलेले अन्न रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. त्यांनी जाणीवपूर्वक एका दलित स्वयंसेवकाच्या घरी बनवलेले जेवण नाकारले होते आणि आता घडलेली चूक मान्य करण्याऐवजी भलतेसलते तर्क देण्यात आपली शक्ती खर्ची घालत होते.
त्यांचे ते खोट्याला खरे ठरवण्याचे निलाजरे प्रयत्न पाहून माझे मन खच्ची झाले. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आपला घोर अपमान झाला आहे, असे वाटू लागले. त्या दिवशी संघातल्या लोकांनी त्या एका कृतीतून केवळ माझ्या घरी बनवलेले जेवणच फेकलेले नव्हते, तर मलादेखील दूर फेकून दिले होते. यामुळे माझ्यात आणि संघामध्ये मोठे अंतर पडल्याचे मला जाणवले. संघातले लोक मला एकाएकी ढोंगी आणि खोटारडे वाटू लागले.
नंतर बरेच दिवस एखाद्या सिनेमाप्रमाणे हा प्रसंग माझ्या नजरेपुढ्यात पुनःपुन्हा येत राहिला. खरेतर मी पूर्ण ताकदीनिशी संघाचे कार्य पुढे नेण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. त्या क्षणी मला रामाच्या नावाने प्राणांची आहुती देण्यासाठी घराबाहेर पडलेला मी दिसत होतो. त्या संघर्षाच्या दिवसांमध्ये समजा, प्रत्यक्ष अयोध्येत पोहोचलो असतो, तर कदाचित शरयू नदीच्या पुलावर पोलिसांनी चालवलेल्या गोळ्यांना बळी पडलो असतो. मग, या संघातल्या लोकांनी माझ्या प्रेताला तरी हात लावला असता का? माझा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह घरी पोहोचवण्याची व्यवस्था तरी त्यांनी केली असती का? की, ज्याप्रमाणे मी दिलेले जेवण फेकून दिले तसे त्यांनी माझा मृतदेह मध्येच कुठेतरी शरयूच्या पात्रात टाकून दिला असता? मी स्वतःलाच प्रश्न केला. मी याच हिंदू राष्ट्रासाठी अहोरात्र खपततोय का? आणि मारण्या-मरण्यासाठी आतूर होतोय का? प्रत्यक्षात, या राष्ट्रात माझ्यासाठी जराही जागा नाही. शेवटी, माझी लायकी तरी काय आहे? माझी स्वतःची ओळख तरी काय आहे? मी आहे तरी कोण? एक रामभक्त हिंदू कारसेवक की एक शूद्र वा अस्पृश्य? या अस्पृश्याच्या घरचे जेवणही हिंदू राष्ट्राचा झेंडा फडकवणाऱ्यांना स्वीकारार्ह नाही. अशा प्रसंगी स्वतःला कोणत्या ओळखीशी जोडून घेऊ मी स्वतःला?
‘’ मी स्वयंसेवक जरी असलो, तरीही पूर्णपणे हिंदू नक्कीच नव्हतो, मी तर महादलित होतो’’
मी खूप विचार केला. तेव्हा लक्षात आले, हिंदू वर्णव्यवस्थेतल्या शूद्रांमधल्याही खालच्या जातीतला अस्पृश्य आहे मी. ज्याला अलीकडे महादलित वा अवर्ण असेही म्हटले जाते. अखेरीस मी स्वयंसेवक जरी असलो, तरीही पूर्णपणे हिंदू नक्कीच नव्हतो. म्हणूनच माझा पूर्णशाने स्वीकार झालेला नव्हता. म्हणूनच कदाचित मला विस्तारक होण्याचा शहाजोग सल्ला देण्यात आला होता, प्रचारक होण्यापासून रोखण्यात आले होते.
मी स्वतःलाच बजावले. झाले तितके पुरे झाले. आता मला स्वतःला ओळखले पाहिजे. मी कोण आहे, याचा शोध घेतलाच पाहिजे. माझ्या संदर्भात जी धक्कादायक घटना घडली आहे, त्या घटनेच्या मुळाशी मी गेलेच पाहिजे आणि त्या मुळांवर घाव घातलाच पाहिजे.

त्यासाठी मग मी माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरपर्यंत पत्रव्यवहार करण्याचा निश्चय केला. माझी ही समस्या घेऊन मी अस्थिकलश यात्रेत सामील पदाधिकारी-स्वयंसेवकांपासून संघाच्या विविध स्तरावरच्या प्रचारकांकडे गेलो. सगळ्या बाजूंनी, सगळ्या स्तरावर जाऊन मी प्रयत्न केले, परंतु कुठेच मला उत्तर मिळाले नाही. कुणीच मला दाद दिली नाही. तेव्हा निराश होऊन मी माननीय सरसंघचालक रज्जूभय्यांपर्यंत तक्रार घेऊन गेलो. त्यांना एक सविस्तर पत्र लिहिले. माझ्या संदर्भात जे काही घडलेय, त्याचा साद्यंत तपशील त्यात नोंदवला. संघाचे स्थानिक ठेकेदार मला हिंदू म्हणून काम करू देण्यास राजी नाहीत, असेही निरीक्षण त्यात मांडले.
पण एवढा सव्यापसव्य करूनही माझे म्हणणे कोण ऐकणार होते? तिथेही सर्वोच्च स्थानी माझे म्हणणे ऐकले गेले नाही. खरी गोष्ट तर ही होती, मला त्यांना दादच द्यायची नव्हती. माझी तक्रार ऐकूनच घ्यायची नव्हती. त्या दरम्यान, ज्या काही संघ प्रचारक आणि पदाधिकाऱ्यांना भेटलो, सगळ्यांनी ही 'बिनमहत्त्वाची गोष्ट' आहे, असे म्हणून मला उडवून लावले. काहींनी तर, असे हे नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार आत्मसात करा आणि त्यात मन गुंतवा, असे म्हणून चार शब्दही सुनावले. परंतु, माझ्याशी अस्पृश्य समजून व्यवहार होणे, ही मामूली, बिनमहत्त्वाची गोष्ट आहे, हे मला पटले नाही. किंबहुना, तेव्हाही आणि आताही यासंदर्भातला माझा विचार बदललेला नाही. भेदभाव आणि स्पृश्यास्पृश्यता ही कोणत्याही माणसाच्या आयुष्यात बिनमहत्त्वाची, छोटी गोष्ट असू शकत नाही. जन्माच्या आधारावर कुणा व्यक्तीला अस्पृश्य ठरवून त्याचे आदरातिथ्य नाकारणे, ही हिंदू राष्ट्र निर्मात्यांच्या नजरेतली समाजातली सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्ट असू शकते, परंतु माझ्या आयुष्यातली ही आता सगळ्यात महत्त्वाची बाब होती.
जनावर, दलित आणि चकवाड्याचा तलाव…
जयपूर शहराजजीक असलेल्या दुदू विधानसभा मतदारसंघातल्या चकवाडा गावात राहणारे बाबुलाल बैरवा 'विहिंप'शी जोडलेले व्यक्ती होते. बाबुलाल कारसेवेत सामील झालेले कार्यकर्तेसुद्धा होते. परंतु, एका टप्प्यानंतर संघाने जसा त्यांचा भ्रमनिरास केला, ते आंबेडकरी विचारधारेकडे खेचले गेले. त्यांच्यासंदर्भात जी घटना घडली, त्या घटनेने केवळ त्यांचेच नव्हे, त्यांच्यासारख्या इतरही दलितांचे डोळे उघडण्याचे काम केले. घडले असे, की बाबुलाल राहात असलेल्या गावात एक तलाव होता. त्या तलावात गाई, म्हशी, शेळ्या, कुत्री, मांजरी, डुक्कर आदी जनावरे डुंबत असायची, त्या तलावात आंघोळ करण्याची घोडचूक या कारसेवक बाबुलालच्या हातून घडली. त्याला वाटले, तो अभिमानी हिंदू आहे, संघाशी जोडलेला विहिंपचा कार्यकर्ता आहे, नव्हे, राममंदिर निर्माणासाठी हुतात्मा होण्यास एका पायावर तयार असलेला स्वयंसेवक आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, याच चकवाड्यातले लोक त्याला अयोध्येला घेऊन गेले होते. त्यामुळे तो सर्वांना स्वीकारार्ह आहे. पण हा बाबुलालचा मोठा भ्रम होता. ज्या दिवशी तलावात आंघोळ करण्याचा अक्षम्य अपराध त्याच्याकडून घडला, त्या दिवशी त्याचा हा भ्रम दूर झाला.
गावातल्या सार्वजनिक तलावात आंघोळ केल्याच्या गुन्ह्याखाली गावातल्या पंचांनी बाबुलालला ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अर्थातच, या अन्याय्य निर्णयाविरोधात बाबुलालने आवाज उठवला. म्हणाला, 'माझ्या हातून काहीही गुन्हा घडलेला नाही. ज्या तलावात गावातले इतर लोक आंघोळ करतात, इतकेच 'नव्हे, जिथे जनावरेसुद्धा डुंबायला येतात, त्याच तलावात माणूस म्हणून आंघोळ करण्याचा मला अधिकार का नाहीये?' बाबुलाल शक्य होईल, तिकडे दाद मागत राहिला, एकाही हिंदुत्ववादी संघटनेने-संस्थेने त्याची तक्रार ऐकली नाही. शेवटी, थकल्या-भागल्या बाबुलाल जयपूरमधल्या दलित अधिकार केंद्राच्या पी. एल. मीमरोठ यांना भेटला. त्या घटनेनंतर बाबुलाल याला त्याचा घटनात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी दलित आणि मानवाधिकार संघटना पुढे सरसावल्या. बाबुलाल याला न्याय मिळवून देण्याचा लढा तीव्र झाला. घटनेचे गांभीर्य मोठे होते. त्यामुळे चकवाड्यातल्या सार्वजनिक तलावात दलितांना आंघोळीचा हक्क मिळवून देण्यासाठी देशभरातून ५०० जण सद्भावना यात्रेद्वारे निघाले. परंतु, त्यांना माधोराजपुरा गावानजीक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या बहाण्याने पोलिसांनी अडवून धरले.

मीसुद्धा या यात्रेत सामील होतो. तुम्हा वाचकांपैकी कुणी त्या प्रसंगात हजर असते, तर हिंदू तालिबानींची दहशत काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या दिवशी आला असता. सांगितले तर आज कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु, जवळपास ३०-४० हजारांची भलामोठा जमाव 'कल्याण धणी की जय' आणि 'जय जय श्रीराम'चा जयघोष करत निशस्त्र सद्भावना यात्रेत सामील झालेल्यांवर चाल करून येत होता. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या आणि इतरही काही शस्त्रास्त्रे होती. त्यांचा उद्देश, दलितांचा धडा शिकवणे हाच दिसत होता. आता चित्र असे होते, एका बाजूला उन्मत्त हिंदुत्ववाद्यांची मोठी फौज होती, मध्ये पोलीस उभे होते आणि दुसऱ्या बाजूला मूठभर दलित आणि त्यांच्या समर्थकांचा निषेध मोर्चा होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दलितांनी आपला मोर्चा तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. बहकलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या हिंसक झुंडींनी दलितांना संरक्षण देत असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलीस आणि प्रशासन मधोमध उभे असल्याने दलितांना धडा शिकवता आला नाही, याचाच हिंदुत्ववाद्यांना मोठा राग आल्याचे दिसले. म्हणून मग रागाच्या भरात, समोर उभ्या जिल्हाधिकाऱ्यांपासून आय.जी. आणि एस.पी. पातळीवरच्या बड्या अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले गेले. हे जाणूनबुजून घडले होते. अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण, जशी अनागोंदी माजली, पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला, त्यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले. (संदर्भ : डायमंड इंडिया संपादकीय- न्यारे न्यारे राम)
या सगळ्या अफरातफरीमुळे दलितांची सद्भावना यात्रा आणि समानतेसाठी चालवली गेलेली मोहीम अर्धवट राहिली. या घटनेवर संघाच्या वतीने नेहमीप्रमाणे कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र संघाने अत्यंत चलाखीने 'हे विदेशी शक्तींनी हिंदू समाजात फूट पाडण्याचे घडवून आणलेले कारस्थान होते,' असे सांगून जनतेची मोठी दिशाभूल केली. त्या दिवशी दलितांविरोधात हिंसक बनलेल्या झुंडींचे नेतृत्व संघ परिवाराशी संबंधित संस्था-संघटनांचे गावपातळीवरचे नेते करत होते. याचा अर्थ, दलितांच्या सद्भावना यात्रेचा प्रयत्न विफल करण्यासाठी सरळ सरळ जे कारस्थान रचले गेले होते, त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा होता. त्या दिवशी मनुवाद्यांनी मानवतावाद्यांना हरवले होते. या सगळ्या प्रकारात बाबुलाल बैरवा याला हिंदू म्हणून मान्यता देणे, तर दूरच राहिले, एक साधा माणूस म्हणूनदेखील मान्यता मिळाली नाही. असे समजा, बाबुलाल याला जनावरांपेक्षाही खालच्या दर्जाचे ठरवले गेले.
'पाच दलितांपेक्षा एका गाईचा जीव खूप महत्त्वाचा आहे'
खरेतर, संघामध्ये काही काही माणसांना जनावरांपेक्षाही हलक्या दर्जाचे समजण्याची प्रथा पहिल्यापासूनची आहे. याचे ठळक उदाहरण म्हणून हरयाणामधल्या झज्जर जिल्ह्यात, पोलिसांच्या उपस्थितीत गोहत्येच्या संशयावरून पाच दलितांची जाळून हत्या करण्यात आल्याच्या घटनेकडे पाहता येते. वास्तव हे होते, हे दलित नैसर्गिक मरण आलेल्या गाईचे चामडे सोडवत होते. त्यांच्या हातून तसा कोणताही गुन्हा घडलेला नव्हता. त्याचमुळे देशातल्या मानवतावादी मंडळींनी या घटनेची तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, 'विहिंप'चे नेते गिरिराज किशोर यांनी दलितांना मारण्यात आल्याच्या या घटनेचे प्रच्छन्नपणे समर्थन करत, 'पाच दलितांपेक्षा एका गाईचा जीव खूप महत्त्वाचा आहे' अशी माणुसकीला लाज आणणारी प्रतिक्रिया दिली. (संदर्भ : लेखसंग्रह 'आज अगर खामोश रहें तो' - विविधा फीचर्स, जयपूर) याचा अर्थ स्पष्ट आहे, गाय शेवटी कितीही प्रिय असली तरीही अंतिमत: ते एक जनावर आहे, पण या मंडळींसाठी हे जनावर दलितांच्या जिवापेक्षाही मौल्यवान आहे. हे लोक गाईचे मूत्र पवित्र समजून पितात, परंतु दलितांच्या हातचे अन्न नाही, खात. विरोधाभास हा, घरातली पाळलेली कुत्री-मांजरी यांच्यासोबत खातात, एकाच पलंगावर झोपतात, यांच्या महागड्या इम्पोर्टेड एसी गाड्यांमधून एकत्र फिरतात, पण दलितांसोबत एकत्र बसणे तर दूरची गोष्ट, यांची सावलीदेखील ते अपवित्र मानतात.
हा असा कसा धर्म आहे, जिथे घाण फैलावणारे लोक मानसन्मान मिळवतात आणि त्यांनी केलेली घाण काढणारे लोक नीच, हलक्या दर्जाचे मानले जातात. जे तमाम रिकामटेकडी लोक येता-जाता पोथीपुराण घोकत राहतात, दुकानांमधून मापात पाप करत राहतात, दिवसभर खोट्यावर खोटे बोलत राहतात, त्यांना मोठे मानून उच्चवर्गीय म्हटले जाते. हे माझ्या मते, विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर उच्च, नव्हे तुच्छ पातळीवरचे वर्ग आहेत, इतरांनी केलेल्या ढोर मेहनतीवर ऐषारामात जगत आले आहेत. मी तर म्हणतो, श्रमाला सर्वोच्च सन्मान देण्याऐवजी अकार्यक्षमता दर्शवणाऱ्या रिकामटेकडेपणालाच इथे धर्म मानले गेले आहे.
वस्तुत: पूर्णपणे फसवणूक आणि खोटेपणावर टिकून असलेला गरीब, दलित, आदिवासी आणि महिलाद्वेषी असा हा धर्म आहे. या धर्मात दररोज महिला आपापल्या घरांमध्ये अपमान आणि अवहेलना सहन करत आहेत, अत्याचाराच्या बळी ठरत आल्या आहेत. आजही बहुसंख्य घरांमध्ये मुलींची त्यांच्या इच्छेविरोधात लग्ने लावून दिली जात आहेत, पुढे जाऊन या महिलांना रोजच केवळ अनिच्छेने वीर्यपातापुरत्या टिकाव धरणाऱ्या आपल्या नवऱ्यांच्या तथाकथित पुरुषपणाचा सामना करावा लागत आहे. या महिलांवर हरप्रकारे अत्याचार करणारा, त्यांचे शोषण करणारा, त्यांना परंपरेच्या बेड्यांमध्ये जखडून टाकणारा हा बेगडी धर्म 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता' असे निरर्थक श्लोक समोरच्या माणसाच्या तोंडावर फेकून आत्ममग्न राहिला आहे. मग तुम्ही सांगा, याला धर्म म्हणायचे, की अशकांचे शोषण करणारी अन्यायकारी व्यवस्था म्हणायचे? मुळात, या विषमतामूलक अक्षम्य प्रवृत्तीला धर्म म्हणणे हेच आदर्श अशा धर्म आणि अध्यात्मिकतेचा अपमान करण्यासारखे आहे.
विषमता हेच ज्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे, अशा या धर्माबाबत विचार करताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे वारंवार आठवत राहते. यात ते देशातल्या दलितांना सावधतेचा इशारा देताना म्हणतात, 'जर खरोखर या देशात हिंदू राष्ट्राची स्थापना होत असेल, तर नि:संशय हे या देशाचे सगळ्यात मोठे दुर्दैव असेल. हिंदू लोक काहीही म्हणोत, त्यांचा हा हिंदू धर्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वासाठी सगळ्यात मोठा धोका आहे. लोकशाहीसाठी या धर्माचे आचरण पूर्णपणे विसंगत आहे. याचमुळे कोणतेही मूल्य चुकावून या हिंदू राष्ट्राला आकारास येण्यापासून रोखले पाहिजे.'
डॉ. आंबेडकरांसाठी हिंदू राष्ट्र याचा अर्थ, जिथे सवर्ण हे दलित, शूद्र आणि स्त्रियांवर आपले अधिकार गाजवत राहतील, असे राष्ट्र हा होता…
(संदर्भ : थॉट्स ऑन पाकिस्तान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेख व भाषणे, खंड ८, पृष्ठ ३५८)






