सोनमची नाळ मातीशी घट्ट जुळलेली - अनिल कपूर
सोनमचा विशेष वाखाणण्याजोगा गुण म्हणजे, ती आईवडील म्हणून आमचा जेवढा आदर करते, तेवढाच प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा करते. शिवाय त्यांचा सल्ला ऐकते व त्याप्रमाणे वागण्याचा मनापासून प्रयत्न करते. मला पिता म्हणून सोनमचा अभिमान वाटतो, की ती करिअर ओरिएंटेड असूनही मातीशी तिची घट्ट नाळ जुळलेली आहे. आज मुली सर्व क्षेत्रांत प्रगती करताहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
सोनमही आपल्या कर्तृत्वाने यश, पैसा उत्तम मिळवत आहे; पण मला विशेष भावतो तो तिचा विनम्रपणा. प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या सेलिब्रेटी मुलींना आपल्या आईवडलांशी, कुटुंबीयांशी फुरसतीने चार शब्द बोलायलाही वेळ नसतो; पण सोनम प्रयत्नपूर्वक आम्हाला वेळ देते. माझ्या मते, कलाकार आणि सर्वसामान्य माणसे दोघेही समुद्राच्या काठावर उभे असलेले प्रवासी आहेत.
पलीकडे जायचे तर हातपाय हलवायलाच हवेत, मेहनतीला पर्याय नाही. आपण जीवन आणि अभिनयरूपी या सागरात जितके जास्त हातपाय मरू, तेवढा त्याच्या खोलीचा अंदाज येत जाईल. अनुभवांचे गाठोडे समृद्ध होईल. सोनमला हे पक्के ठाऊक आहे, की शिक्षण कधी वाया जात नाही. त्यामुळे ती सतत काहीतरी शिकत पुढे पुढे जात असते. मला तो दिवस चांगला आठवतोय, “ब्लॅक’च्या सेटवर मी गेलो होतो.
सोनम या सिनेमात संजय लीला भन्सालींना असिस्ट करत हाेती. त्या वेळी अमितजी (अमिताभ बच्चन), राणी मुखर्जी आणि स्वत: भन्सालींनी सोनमचे भरभरून कौतुक केले, तेव्हा मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटला. ती माझी मुलगी आहे, म्हणून ते तिची स्तुती करत नव्हते, तर सोनमने आपल्या मेहनतीने आणि नम्रपणाने त्यांचे मन जिंकले होते. सोनम सेटवर आपण अनिल कपूरची मुलगी आहोत, हे विसरून कोणताही अहंगंड वा न्यूनगंड न बाळगता सगळी बारीक-सारीक कामे करत होती, जी एखाद्या नवख्या असिस्टंटने करणे अपेक्षित असते.
तिची काम समजून घेण्याची जिज्ञासा तिच्या वावरण्यातून जाणवत होती. तिची मेहनत, तिच्यामधील अभिनय गुण हेरून संजय भन्सालींनीच तिला अभिनेत्री म्हणून आपल्या सिनेमात संधी दिली. तेव्हाच माझी पक्की खात्री झाली, की सोनमचे भविष्य उज्ज्वल आहे…
आलिया यशोशिखर गाठेल - महेश भट
आलिया माझ्या खूप पुढे आहे. माझ्या आधाराशिवाय तिने लहान वयात स्वत:चे जे स्थान निर्माण केले आहे, ते पाहून मला एक पिता म्हणून खूप समाधान वाटते. सर्वसाधारणपणे असा समज आहे, की जर तुम्ही एखाद्या मोठ्या घराण्याशी संबंधित असाल तर तुमचा मार्ग सुकर असतो. पण मला वाटते, हा प्रवास दसपटीने जास्त खडतर असतो. कारण नकळत तुमची तुलना आई-वडलांशी केली जाते.
खरे तर पहिल्याच प्रयत्नात मिळालेले यश हे एक प्रकारचा शाप ठरते; जसे सचिन तेंडुलकरच्या बाबतीत झाले. तुमचे चाहते सदैव तुमच्याकडून यशाचीच अपेक्षा करतात, ते तुमचे अपयश पचवू शकत नाहीत. शेवटी राजा असो वा विद्वान, कोणीही आपली लोकप्रियता कायम ठेवू शकत नाही. आलिया अजून लहान आहे, पण तिला माहीत आहे, की चाहते आणि निर्माते तिच्याकडून कायम यशाची अपेक्षा ठेवताहेत.
आलियाची क्षमता ती लहान असतानाच मी हेरली होती. ती माझी प्रत्येक गोष्ट गंभीरपणे ऐकत असे, शिवाय त्याचा अधिक सखोलपणे विचार करत असे. मला वाटतं, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन हळूहळू सकारात्मक होत आहे. तुम्हाला आठवत असेलच, आलियाच्या सामान्य ज्ञानाबद्दल जेव्हा प्रत्येक जण तिची खिल्ली उडवत होते, तेव्हा आलियाने उत्तर म्हणून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्याला त्यावेळी 65 लाख हिट्स मिळाले होते.
शेवटी निखळ विनोद तोच, जेव्हा माणूस स्वत:वरच हसतो! माझे गुरू यू. जी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी मी लिहिलेल्या “ए टेस्ट ऑफ लाइफ’ या पुस्तकाचा अर्थ आलियाने जेव्हा तिच्या शैलीत मला सांगितला, तेव्हा तिची समज मला प्रकर्षाने जाणवली. खरं तर आलियाकडून प्रगल्भ विचारांची मी यापूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती. तिच्या अभिनयाविषयी बोलायचे तर मी जेव्हा “हायवे’ पाहिला तेव्हा मला खात्री पटली, की ही मुलगी तर अमर्याद समुद्रासारखी आहे...!
मी आश्चर्यचकित झालो, की हे सर्व ही कुठून शिकली? कारण या चित्रपटात ती खूप ठामपणाने, आत्मविश्वासाने वावरताना दिसली. आईवडलांसाठी आपले मूल कधीच मोठे होत नाही. तरीही आलियाच्या अभिनयाने मला हा विश्वास मिळाला आहे, की एक ना एक दिवस ती निश्चितच यशाचं शिखर गाठेल.
ग्लॅमरआडच्या वास्तवाची श्रद्धाला पूर्ण जाणीव - शक्ती कपूर
श्रद्धा मुलगी आणि बहीण या नात्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, असे मला वाटते. मला माहीत आहे, ती थोडी हट्टी, सणकी आणि मुडी आहे. पण ती कठोर नाहीए. तिचे नखरे हवेहवेसे वाटतात. तिला खूश करणे फारसे कठीण नाही. तिचा स्वभाव असा आहे, की ती कोणतीही चुकीची गोष्ट सहन करू शकत नाही. ती अतिशय खंबीर व ठाम असते. खरं म्हणजे, मी श्रद्धाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू इच्छित नाही.
पण तिला कधी माझ्या सल्ल्याची गरज भासली तर एक पिता म्हणून मी जरूर तिच्याशी माझे अनुभव शेअर करीन. तिने मला तिची कोणती समस्या सांगितली तर मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. पण कदाचित अशी वेळ येणारच नाही, कारण स्वत:च्या पातळीवर सक्षमपणे परिस्थिती हाताळण्याचे श्रद्धाचे प्रयत्न असतील. श्रद्धा खूप बुद्धिमान मुलगी आहे. ती बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकली आहे. तिला हिंदू धर्माविषयी प्रचंड आस्था आहे.
मला खूप अभिमान आहे, की ती माझी मुलगी आहे. श्रद्धाच्या अभिनयाविषयी सांगायचे तर माझ्या मते, श्रद्धा तिच्या सहजसुंदर अभिनयाने आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आिण मधुबालाची आठवण करून देते. आज ती बॉलीवूडमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावली असली तरी ती मेहनतीला कधीही मागे नसते. शिवाय तिची विनोदाची जाण व टायमिंग जबरदस्त आहे.
तिच्यातील विनोदी अभिनेत्रीला अजून चित्रपटात वाव मिळालेला नाही, पण मला खात्री आहे, की तशी संधी मिळाली तर ती श्रीदेवी व जुही चावला यांच्यासारखीच अभिनयाची ती उंची गाठू शकेल. श्रद्धाने गायन आणि नृत्याचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. मी तिच्या अभिनयातील यशाने अर्थातच समाधानी आहे; पण एक पिता म्हणून मला तिच्या लग्नाची काळजीही आहे. श्रद्धाला ही ग्लॅमरची दुनिया नवीन नाही. इथली चमक-दमक चार दिवसांची आहे, हे तिला चांगलेच माहीत आहे. म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो, की तिची सगळी स्वप्नं पूर्ण होऊ दे.
प्रामाणिकपणा हाच एकताचा गुण आणि दोषही - जितेंद्र
माझ्या काळातल्या इतर अभिनेत्यांची मुलं जेव्हा पडद्यावर चमकण्यासाठी धडपडत होती, तेव्हा माझ्या मुलीने-एकताने वेगळाच मार्ग निवडला. ती चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनवर काही नवीन करण्यासाठी उत्सुक होती. शेवटी तिने टेलिव्हिजनसाठी मालिका निर्मितीमध्ये भविष्य घडवण्याचे पक्के केले. सासू-सुनेची संकल्पना श्रद्धाने मालिकांमधून अशी काही साकारली, की जणू त्या संकल्पनेचा कॉपीराइटच तिला मिळाला.
खरं सांगायचं तर एकताने ही जोखीम उचलली, तेव्हा मी जरा साशंक होतो; पण माझा विश्वास डगमगला नाही. आज तर मला तिचा खूप खूप अभिमान आहे. एकता माझे पहिले अपत्य आहे, त्यामुळे तिच्यावर माझे जास्त प्रेम आहे. तसंही मुली आईपेक्षा वडलांच्या जास्त जवळ असतात. एकता थोडी तापट आहे, पण एक पिता म्हणून मला त्याची कारणे चांगलीच ठाऊक आहेत.

वास्तविक एकता कोणालाही मदत करण्यात मागेपुढे पाहात नाही, पण त्याच्या बदल्यात तिला 100 टक्के रिझल्ट हवा असतो. आपण पाहिले आहे की, एकताने कितीतरी अनोळखी चेहऱ्यांना सेलिब्रिटी बनवले आहे. मग अशा वेळी एखादा कलाकार आपल्या कामामध्ये इमानदारी दाखवत नाहीए, असे एकताच्या लक्षात आले तर ती त्याच्यावर राग काढायला कधीही संकोच बाळगत नाही. खरं तर एकता अत्यंत प्रामाणिक आणि फटकळ मुलगी आहे.
पण असा अप्रोच तिला अडचणीत आणणारा ठरत आला आहे. “टीव्ही क्वीन’ ते “श्रेष्ठ फिल्म निर्माता’ पर्यंतचे सगळे सन्मान एकताने निश्चितच आपल्या नावे केले आहेत. टीव्ही असो वा फिल्म, ती कधीही “लकीर की फकीर’ झाली नाही, हे आपणसुद्धा मान्य कराल. आता तिने तिच्या क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे, यश मिळवले आहे. आता तिने लग्न लवकरात लवकर व्हावे, एवढीच इच्छा आहे. ती लग्नासाठी “हो’ म्हणण्याची मी वाट बघतोय…
सोनाक्षी समाजाचा गौरव ठरो - शत्रुघ्न सिन्हा
सोनाक्षीने मान-मर्यादांचे भान राखून ज्या तऱ्हेने स्वत:ला डेव्हलप केलं आहे, तेही आपल्या अटींवर-मी तर तिला खूप मानतो. आपल्या आई-वडलांप्रमाणेच तिने स्वाभिमान जपला आहे. ती ज्या स्वाभिमानाने आिण “आन-बान-शान’ राखत अभिनय करतेय, त्यामुळे ती नव्या मुलींसाठी रोल मॉडेल बनली आहेच; शिवाय आपला स्वभाव आणि यश याच्या जोरावर तिने जे स्थान पटकावले आहे, ते आमच्यासाठीही अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे.
आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या बळावर ती कोणत्याही प्रस्थापित कलाकाराचा सामना करायला सक्षम आहे. मी तिच्या बाबतीत कायम निश्चिंत असतो. ज्या दिवशी शूटिंग नसेल, त्या दिवशी ती क्लब वगैरे ठिकाणी न जाता घरीच थांबणे पसंत करते. क्लबमध्ये जाणाऱ्या मुलींना नावं ठेवण्याचा माझा हेतू नाही, पण सोनाक्षीला तशी सवयच नाही. तिला आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे जास्त आवडते.
इथे एका घटनेचा मी आवर्जून उल्लेख करीन. जेव्हा मी राजेश खन्नाच्या विरोधात दिल्लीहून निवडणूक लढवत होतो, तेव्हा माझे कुटुंबीयही माझ्यासोबत तिथे होते. सोनाक्षीही माझ्यासोबत होती. आपल्याला हे माहीत आहेच, की माझ्या या चुकीसाठी मी नंतर काकांची क्षमासुद्धा मागितली होती. पण त्या वेळी अडवाणींच्या आदेशाला मी “नाही’ म्हणून शकलो नाही. निवडणुकीच्या निकालानंतर मी जेव्हा मुंबईत परतलो, तेव्हा सोनाक्षीने माझ्या जवळ येऊन निरागसपणे प्रश्न केला, “काय झालं पापा... तुम्ही जिंकलात की हरलात?’... आणि ती माझ्या गळ्यात पडली. हा क्षण मला खूप भावूक करून गेला. शेवटी इतकंच सांगेन, की ती आपल्या समाजाचा गौरव ठरो!






