Skip to main content

‘डीपफेक’ला बसणार लगाम : गुगलचा ‘डिजिटल डीएनए’ ठरणार गेमचेंजर !

Shekar Patil
21 May 2026
3 min read
3 views
‘डीपफेक’ला बसणार लगाम : गुगलचा ‘डिजिटल डीएनए’ ठरणार गेमचेंजर !

शेखर पाटील



  • सध्या एआय द्वारे तयार करण्यात आलेल्या कंटेंटमुळे खऱ्या-खोट्यातील सीमारेषा जवळपास पुसली गेली असून यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. 


  • या पार्श्वभूमीवर, गुगलच्या काल रात्री पार पडलेल्या आय/ओ २०२६ या वार्षीक परिषदेत सिंथआयडी या प्रणालीचा विस्तार करण्यात आल्याची घोषणा अतिशय लक्षणीय अशीच मागली जात आहे. 


  • यामुळे आगामी काळात डीपफेक या प्रकारातील प्रतिमा, व्हिडीओ, ऑडिओ आणि शब्दांवर ठसठशीत पध्दतीत एआय द्वारा निर्मित असा अदृश्य शिक्का मारला जाणार आहे.



आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या अशा एका वळणावर उभे आहोत जिथे डोळ्यांनी पाहिलेले अन्‌ कानांनी ऐकलेले खरे असेलच असे कुणीही म्हणू शकत नाही. जनरेटिव्ह एआय इतके सक्षम झाले आहे की, ते केवळ वास्तववादी प्रतिमाच नव्हे, तर मानवी भावभावनांनी युक्त व्हिडिओ आणि आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे ऑडिओ सहज तयार करू शकते. यामुळेच डिजिटल कंटेंटच्या विश्वासार्हतेमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, त्याचा परिणाम राजकीय निवडणूक प्रक्रियेपासून ते वैयक्तिक सायबर सुरक्षेपर्यंत सर्वच क्षेत्रांत जाणवत आहे. 


या प्रकारच्या डीपफेक कंटेंटमुळे अनेकदा दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होत असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूलाच घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, गुगलने विकसित केलेली 'SynthID' ही प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरते. याचा मूळ उद्देश एआय-जनरेटेड कंटेंटला एक अदृश्य पण कायमस्वरूपी डिजिटल ओळख प्रदान करून पारदर्शकता निर्माण करणे हा आहे.


डीपफेकला लगाम घालण्यासाठीची  'SynthID' ही प्रणाली नेमकी काय आहे?


गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या 'आय/ओ २०२६' या वार्षिक परिषदेत सिंथआयडीबाबत घोषणा करतांना एआयच्या बनावटगिरीचे एक समर्पक उदाहरण दिले. त्यांनी पडद्यावर एक फोटो दाखवला, ज्यात ते स्वतः, टेस्लाचे एलन मस्क, एनव्हीडीयाचे जेन्सन हुआंग आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमन एका पार्किंग लॉटमध्ये बसून मॅकडोनाल्ड्सचे हॅम्बर्गर खाताना दिसत होते. खरं तर हा अस्तित्वात नसणारा पण अगदी खराखुरा वाटणारा फोटो होता. सर्वसामान्य युजर्सला अशा 'अति-वास्तववादी' बनावट प्रतिमा ओळखणे आता अशक्यप्राय होत चालले आहे. बहुतांश एआय-जनीत कंटेंटवर कोपऱ्यावर वॉटरमार्क असला तरी तो इमेज, ऑडिओ वा व्हिडीओ एडिटरच्या मदतीने सहजपणे काढला जातो. याच समस्येवर उत्तर म्हणून गुगलने 'सिंथआयडी' हे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले असून याचा आता जवळपास दोन वर्षांनी विस्तार केला आहे.


User Image

गुगलची उपकंपनी असणाऱ्या डीपमाईंडने सिंथआयडी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे केवळ एक वॉटरमार्क नसून, ती माहिती सुरक्षा क्षेत्रातील एक प्रगत प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान एआय-व्युत्पन्न सामग्रीमध्ये असे 'वॉटरमार्क' जोडते जे मानवी डोळ्यांना किंवा कानांना पूर्णपणे अदृश्य असले तरी, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अचूकपणे ओळखता येतात. याच्या अंतर्गत प्रतिमांचा विचार केला असता, चित्रांच्या मूळ पिक्सेल रचनेत असे सूक्ष्म बदल केले जातात, ज्यामुळे चित्राच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही, मात्र त्याचा 'डिजिटल सिग्नेचर' कायम राहतो. 


ध्वनीमध्ये आवाजाच्या 'वेव्हफॉर्म' मध्ये हे वॉटरमार्क गुंफले जातात. यामुळे संबंधीत ऑडिओ क्लीप ही कृत्रीम बुध्दीमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. तर, व्हिडिओच्या प्रत्येक फ्रेममध्ये हे अदृश्य क्रिप्टोग्राफिक मार्कर्स जोडले जातात, ज्यामुळे व्हिडिओचा उगम पडताळणे सोपे होते. हे सिग्नल मानवी डोळ्यांना किंवा कानांना जाणवत नाहीत, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते अत्यंत सुदृढ आहेत. पारंपारिक मेटाडेटा हा सहजपणे काढून टाकता येतो, मात्र 'सिंथआयडी' हे इमेज क्रॉपिंग, कॉम्प्रेशन किंवा रोटेशन यांसारख्या बदलांनंतरही टिकून राहते.


सिंथआयडी' म्हणजे 'डिजीटल डीएनए'


अगदी समर्पक शब्दात सांगावयाचे तर 'सिंथआयडी' म्हणजे 'डिजीटल डीएनए' होय. जसा सजीवांचा डीएनए त्यांच्या प्रत्येक पेशीत असतो आणि तो बदलता येत नाही, तसेच 'सिंथआयडी' हा सामग्रीच्या 'आंतरिक ओळखीचा' भाग बनतो. पारंपारिक वॉटरमार्क हे बाह्य लेबल्स असतात जे सहज पुसले जाऊ शकतात, परंतु SynthID डोळ्यांनी दिसत नसून फाईलच्या संरचनेतच गुंफलेले असते. म्हणजेच कितीही प्रयत्न करून ते पुसता येत नसल्याचा गुगलचा दावा आहे.


वास्तविक पाहता सिंथआयडी ही प्रणाली गुगलने कधीपासूनच उपलब्ध केली असली तरी याल सर्व युजर्सपर्यंत सादर केले नव्हते. आयओ परिषदेत या प्रणालीला व्यापक प्रमाणात लागू करण्यात येत असल्याची घोषणा झाली. यात प्रामुख्याने गुगलने हे तंत्रज्ञान थेट युजर्सच्या हातामध्ये दिले आहे. गुगल सर्चमधील लेन्स, सर्कल-टू-सर्च आणि एआय मोड द्वारे कोणताही युजर कोणताही ध्वनी, प्रतिमा वा व्हिडीओ एआयने बनवले आहे का?" असे विचारून पडताळणी करू शकतात. येत्या काही आठवड्यांत हे तंत्रज्ञान 'क्रोम' ब्राउझरमध्ये जेमिनीच्या माध्यमातून समाविष्ट केले जाईल, ज्यामुळे वेबवरील सामग्रीची पडताळणी करणे अधिक सोपे होणार आहे. अर्थात, यातून फॅक्ट चेकींग ही अजून परिपूर्ण होणार आहे.


C2PA : डिजिटल फाईलच्या 'पुराव्यांची साखळी' 


दरम्यान, डिजिटल विश्वात केवळ एका तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे असते. म्हणूनच गुगलने C2PA (Coalition for Content Provenance and Authenticity) या जागतिक मानकाचा स्वीकार केला आहे. हे मेटाडेटा आधारित 'क्रिप्टोग्राफिक मार्कर्स' वापरून फाईलच्या निर्मितीचा इतिहास सांगते. हे एक जागतिक मानक असून ते डिजिटल फाईलच्या 'पुराव्यांची साखळी' तयार करते. यामध्ये फाईल कधी तयार झाली, कोणत्या उपकरणाने काढली आणि त्यात नंतर कोणते बदल केले गेले, याची संपूर्ण नोंद असते. 


याचे एक सोपे उदाहरण सांगतो. समजा, मी माझ्या कॅमेऱ्यातून जळगावच्या एका चौकाचा फोटो काढला आणि यात एआयच्या मदतीने बदल करून ते सोशल मीडियावर अपलोड केले. तर सी२पीए प्रणालीच्या मदतीने कोणत्या कंपनीच्या मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढण्यात आला ? आणि यात नंतर कोणते आणि कसे-कसे बदल करण्यात आले?  याची संपूर्ण माहिती मिळू शकते. परिणामी मी अपलोड केलेली प्रतिमा, व्हिडीओ अथवा ऑडिओ हा एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.


User Image

C2PA हे एखाद्या फाईलचा जन्मदाखला अर्थात 'बर्थ सर्टफिकेट' सारखे आहे; यातून अचूक माहिती मिळत असली तरी फाईलपासून विलग किंवा नष्ट होऊ शकतो. याउलट, सिंथआयडी हे त्या फाईलच्या डीएनए सारखे असून जे फाईलचाच एक भाग बनून राहून सहजासहजी मिटवता येत नाही. म्हणजेच-सिंथआयडी आणि सी२पीए या दोन्ही प्रणाली एकमेकांना पूरक असून त्यांच्या मदतीने गुगलने एआय जनीत कंटेंट शोधून काढणे अगदी सहजसुलभ केले आहे. ही प्रणाली केवळ गुगलच्या मॉडेल्सचेच नव्हे, तर इतर लोकप्रिय एआय मॉडेल्सद्वारे तयार केलेली सामग्री देखील शोधू शकते. 


आता तर ओपनएआय, एनव्हिडीया आणि इलेव्हन लॅब्ज सारख्या दिग्गज कंपन्यांनी सिंथआयडीचा अंगीकार केल्यामुळे याला अजून व्यापकता प्राप्त झाली आहे. तर गुगलच्याच क्रोम आणि जेमीनीसारख्या प्रॉडक्टमध्ये याचा समावेश करण्यात आल्याने ही प्रणाली जगभरातील अब्जावधी युजर्सला उपलब्ध होणार आहे. सिंथआयडी आणि सी२पीए या प्रणालींच्या मदतीने एआय द्वारे तयार करण्यात आलेल्या प्रतिमा, व्हिडीओ आणि ध्वनीफिती सहज ओळखता येणार असून यात लवकरच शब्दांचाही समावेश करण्यात येणार आहे. यातून पुर्णपणे डीपफेकची ओळख करता येणार नसले तरी गुगलने या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याची बाब लक्षणीय अशीच होय.


Share this article
सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…
ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…

लग्नाआधीचे सहमतीने प्रस्थापित केलेले संबंध हा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावरील डाग मानला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बदलत्या सामाजिक नियमांबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. खंडपीठाने म्हटले की, विवाहपूर्व संबंधांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना बदलत्या काळाची संवेदनशीलता समजून घ्यावी लागेल.

3 min read
T
Team BaiManus
ज्याच्या दुखापतीमुळे सूर्याला संधी मिळाली, आता तोच श्रेयस कर्णधार म्हणून घेतोय सूर्याची जागा
ताज्या घडामोडी

ज्याच्या दुखापतीमुळे सूर्याला संधी मिळाली, आता तोच श्रेयस कर्णधार म्हणून घेतोय सूर्याची जागा

ज्या श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे २०२१ मध्ये सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघात पदार्पणाची संधी मिळाली, आता त्याच श्रेयसने कर्णधार म्हणून सूर्याची जागा घेतली आहे. निवड समितीने श्रेयसच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने, अवघ्या ५ वर्षांत टी-२० क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला जवळपास ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमारने प्रस्थापित केलेले जागतिक विक्रम आणि त्याच्याच नेतृत्वात भारताने नुकत्याच जिंकलेल्या टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक कामगिरीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

7 min read
S
Shantanu Khuje
लोकशाहीच्या टेबलावर निम्म्या जगाची खुर्ची रिकामी…!
ताज्या घडामोडी

लोकशाहीच्या टेबलावर निम्म्या जगाची खुर्ची रिकामी…!

जगभरातील संसदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व २७.५ टक्क्यांवर पोहोचले असले तरी वाढीचा वेग गेल्या दशकातील सर्वात मंद आहे. संसदीय नेतृत्वाच्या पदांवर महिलांची उपस्थिती उलट घसरत असून २०२६ मध्ये केवळ १९.९ टक्के संसदाध्यक्ष महिला आहेत. ज्या देशांमध्ये महिला आरक्षण किंवा कोटा व्यवस्था आहे, तिथे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आयपीयूच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग ४४.४ टक्के असताना संसदेत तो केवळ १४.७२ टक्के आहे. राजकीय प्रतिनिधित्व, शिक्षण, रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना अजूनही संरचनात्मक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

7 min read
V
Vikas Meshram
फुटबॉलच्या प्रेमासाठी जिथे लाटा होत्या, तिथेच त्यांनी गोलपोस्ट उभारले अन् जन्माला आली जगाला प्रेरणा देणारी ‘पान्यी’ची कहाणी...
ताज्या घडामोडी

फुटबॉलच्या प्रेमासाठी जिथे लाटा होत्या, तिथेच त्यांनी गोलपोस्ट उभारले अन् जन्माला आली जगाला प्रेरणा देणारी ‘पान्यी’ची कहाणी...

फिफा वर्ल्ड कपचा थरार अनुभवण्यासाठी सबंध जग सज्ज झालयं. भव्य स्टेडियम्स, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेले हिरवेगार मखमली गवत, सुपर ह्युमन भासणारे वलयांकीत खेळाडू आणि हजारो प्रेक्षकांचा तो कानठळ्या बसवणारा जल्लोष… मात्र जिथे जमिनीचा एक तुकडाही नाही, फक्त अथांग निळा समुद्र आणि चुनखडीचे अक्राळविक्राळ सुळके हीच जीवनाची सीमा आहे. अशा एका ठिकाणी, कुणी फुटबॉल खेळू शकेल का ? शाच एका दुर्गम भागात सागराच्या लाटांवर, मानवी जिद्दीचे एक विलक्षण महाकाव्य लिहिले गेले आहे आणि यातूनच फुटबॉलचे वैश्वीक गारूड विलक्षण परिणामकारक पध्दतीत समोर आले आहे. ही कथा आहे थायलंडमधील पान्ये फुटबॉल क्लबच्या जन्मासह आजवरच्या वाटचालीची !

9 min read
S
shekhar patil
मोटार पंप चोरीच्या संशयावरून दलित युवकावर अमानुष अत्याचार; विहिरीत उलटे टांगून मारहाण
ताज्या घडामोडी

मोटार पंप चोरीच्या संशयावरून दलित युवकावर अमानुष अत्याचार; विहिरीत उलटे टांगून मारहाण

हरियाणातील हांसी जिल्ह्यात मोटार पंप चोरीच्या संशयावरून एका दलित युवकावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी युवकाला बेदम मारहाण करून विहिरीत उलटे टांगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हत्या प्रयत्न, धमकी आणि एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

3 min read
T
Team BaiManus
 सव्वाशे कर्मचाऱ्यांना दीड कोटींचा पगार आणि १५ लाख कोटींचा बोगस महसूल! 'राजेश एक्सपोर्ट्स'वर सेबीची बंदी
ताज्या घडामोडी

सव्वाशे कर्मचाऱ्यांना दीड कोटींचा पगार आणि १५ लाख कोटींचा बोगस महसूल! 'राजेश एक्सपोर्ट्स'वर सेबीची बंदी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) राजेश एक्सपोर्ट या कंपनीवर गेल्या पाच वर्षांत तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केल्याने कंपनी अडचणीत आली आहे. सेबीने आपला तपास पूर्ण होईपर्यंत कंपनी आणि तिचे अध्यक्ष राजेश मेहता यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा ठरू शकतो.

7 min read
S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...