रितेश शिसोदे
- भारत-पाकिस्तान तणावामुळे गुजरातच्या किनारी भागातील मासेमारी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे.पोरबंदर, ओखा, जखाऊ आणि वेरावळसारख्या भागांमध्ये अनेक बोटी बंदरातच उभ्या आहेत.
- सीमेजवळ वाढलेली सुरक्षा, अटक होण्याची भीती आणि वाढते खर्च यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान बदल, खोल समुद्रात जावं लागणं आणि सीमावाद यामुळे मच्छीमारांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे.
- किनारी गावांमध्ये भीती, बेरोजगारी, कर्ज आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
अरबी समुद्र गुजरातच्या हजारो मच्छीमार कुटुंबांसाठी फक्त समुद्र नाही, तर त्यांच्या जगण्याचा आधार आहे. पण गेल्या दोन उन्हाळ्यांपासून भारत-पाकिस्तान तणावामुळे हा समुद्र त्यांच्या आयुष्यात भीती आणि अनिश्चितता घेऊन आलाय. किनाऱ्यावर बोटी थांबल्या आहेत, मासेमारी कमी झालीये आणि अनेक कुटुंबांचे उत्पन्न जवळपास बंद झाले आहे.
पोरबंदर, ओखा, जखाऊ आणि वेरावळसारख्या गुजरातच्या किनारी भागांमध्ये मच्छीमार आता समुद्रात जाण्यापूर्वी मासे मिळतील का यापेक्षा सुरक्षित परत येऊ का, याची जास्त चिंता करतायेत. सीमेजवळ वाढलेली सुरक्षा, अटक होण्याची भीती आणि वाढते खर्च यामुळे संपूर्ण मच्छीमार समुदाय आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. बाहेरून पाहताना हा केवळ भू-राजकीय संघर्ष वाटू शकतो, पण किनारी राहणाऱ्या लोकांसाठी तो मानवी संकटात बदलला आहे.
भीतीच्या सावटाखाली मासेमारी
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळील अरबी समुद्र हा नेहमीच संवेदनशील भाग मानला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांत वाढलेल्या लष्करी तणावामुळे आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मच्छीमारांसाठी परिस्थिती अधिक कठीण झालीये. मच्छीमारांच्या मते, समुद्रात आता नौदलाची गस्त वाढली आहे. अनेक ठिकाणी सतत तपासणी आणि इशारे दिले जात असल्याने खोल समुद्रात जाण्याची भीती वाढली आहे. पूर्वी ज्या भागांमध्ये सहज मासेमारी केली जात होती, त्या भागांमध्ये आता जाणं धोकादायक वाटत आहे.

गुजरातमधल्या पोरबंदर फिशिंग बोट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनीष लोधरी सांगतात,
‘’विशेषतः लहान मच्छीमारांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. अनेक बोटी अजूनही जुन्या जीपीएस प्रणालींवर किंवा पारंपरिक दिशांवर अवलंबून आहेत. खराब हवामान किंवा समुद्रातील बदलत्या परिस्थितीत सीमारेषा ओळखणं कठीण होतं. त्यामुळे चुकून सीमा ओलांडली जाण्याची भीती सतत असते. मासे मिळवण्यासाठी खोल समुद्रात जाणं आवश्यक असतं. मात्र सीमेजवळील वाढत्या निर्बंधांमुळे त्यांची मासेमारीची क्षेत्रे कमी झाली आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतोय. समुद्रात कोणतीही रेषा दिसत नाही. पण चुकून सीमा ओलांडली तर अटक होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी समुद्रात जाताना भीती वाटते. लहान मच्छीमारांसाठी समुद्रातील एक छोटी चूकही मोठं संकट ठरू शकते.’’
मच्छीमारांमध्ये गोंधळ आणि भीती
ओखा परिसरातील अनेक मच्छीमार सांगतात की, सध्याची परिस्थिती केवळ अटक होण्याच्या भीतीपुरती मर्यादित नाही. समुद्रात नेमकं कुठपर्यंत सुरक्षितपणे जाऊ शकतो, याबाबतही मोठा गोंधळ निर्माण झालाय. पूर्वी मच्छीमार अनुभवाच्या आधारावर समुद्रातील मार्ग, मासेमारीची ठिकाणं आणि सीमेजवळील भाग ओळखत होते. मात्र आता वाढलेली सुरक्षा, नौदलाची गस्त आणि सततचे इशारे यामुळे परिस्थिती बदललीये. त्यामुळे अनेक मच्छीमार खोल समुद्रात जाणं टाळतायेत.
ओखामधील सिद्दीक या मच्छीमाराने सांगितले, “आधी अनुभवातून आम्हाला समुद्रातील मार्ग समजत होते. पण आता कुठपर्यंत जावं आणि कुठे थांबावं हेच कळत नाही. गस्त आणि इशारे वाढल्याने चुकून सीमा ओलांडली जाईल, अशी भीती सतत वाटते.”
लहान बोटी आणि पारंपरिक साधनांवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण आहे. समुद्रात सीमारेषा दिसत नसल्याने खराब हवामान किंवा दिशाभूल झाल्यास नकळत सीमेजवळ पोहोचण्याचा धोका वाढतो. मच्छीमारांच्या मते, समुद्रातील एक छोटी चूकही मोठ्या संकटात बदलू शकते. अटक, बोट जप्त होणे किंवा अनेक वर्षे तुरुंगवास भोगण्याची भीती त्यांच्या मनात कायम आहे.
अटकेनंतर उद्ध्वस्त होणारी कुटुंबे
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ मासेमारी करताना भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेतले जाण्याच्या घटना नवीन नाहीत. दरवर्षी अनेक मच्छीमार चुकून सीमारेषा ओलांडल्याच्या आरोपाखाली अटक होतात. मात्र अलीकडील तणावामुळे किनारी गावांमध्ये भीतीचे वातावरण अधिक वाढले आहे. अटक झाल्यानंतर अनेक मच्छीमारांना महिनोन्महिने किंवा काही वेळा वर्षानुवर्षे तुरुंगात राहावे लागते. या काळात त्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक आणि मानसिक ताण येतो. कमावणारा व्यक्ती अचानक गायब झाल्याने घर चालवणे कठीण होते.

गुजरातच्या किनारी गावांमध्ये अशा अनेक घटना लोकांच्या आठवणीत अजूनही जिवंत आहेत. वेरावळमधील एका महिलेचा नवरा जवळपास तीन वर्षे पाकिस्तानी तुरुंगात होता. ती सांगते, “लोक देशांमधल्या युद्धाबद्दल बोलतात. पण आमच्यासाठी युद्ध म्हणजे घरातील माणूस अचानक समुद्रात हरवणं आणि तो परत कधी येईल हे न समजणं.” अनेक कुटुंबांना आजही त्यांच्या नातेवाईकांच्या अटकेचा मानसिक धक्का विसरता आलेला नाही. काही मुलं वडिलांशिवाय मोठी झाली, तर अनेक महिलांना एकट्याने घराची जबाबदारी सांभाळावी लागली. किनारी गावांमध्ये आता अशा कथा सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे समुद्रात जाण्यापूर्वी प्रत्येक मच्छीमाराच्या मनात अटकेची भीती कायम असते.
मासेमारी थांबल्याने वाढले आर्थिक संकट
भारत-पाकिस्तान तणावाचा सर्वात मोठा परिणाम गुजरातच्या मच्छीमारांच्या अर्थकारणावर होत आहे. मासेमारी कमी झाल्याने संपूर्ण किनारी भागातील स्थानिक अर्थव्यवस्था अडचणीत आलीये. गुजरातमध्ये मासेमारी हा फक्त समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांचा व्यवसाय नाही. त्यावर हजारो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बर्फ कारखान्यातील कामगार, मासे वर्गीकरण करणारे मजूर, वाहतूकदार, मासळी बाजारातील विक्रेते, जाळी दुरुस्ती करणारे कामगार आणि छोट्या दुकानांचे मालक या सगळ्यांचे उत्पन्न मासेमारीवरच चालते.
मात्र सध्या अनेक बोटी समुद्रात कमी वेळा जातायेत किंवा बंदरातच उभ्या राहतायेत. त्यामुळे अनेकांचे रोजचे उत्पन्न जवळपास बंद झाले आहे. जखाऊ बंदरातील काही मच्छीमार सांगतात की, "आता समुद्रात जाऊनही खर्च निघेल याची खात्री राहिलेली नाही. डिझेलच्या वाढत्या किंमतींनी परिस्थिती आणखी कठीण केली आहे. एका मासेमारीच्या फेरीसाठी हजारो लिटर इंधन लागते. पण समुद्रात जाऊन पुरेसे मासे मिळाले नाहीत तर संपूर्ण फेरी तोट्यात जाते.
मनीष लोधरी यांनी सांगितले, “समुद्रात गेलो तर डिझेलचा खर्च परत मिळेल याची खात्री नाही. आणि सीमेजवळ गेलो तर अटक होण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही दोन्हीकडून अडकलो आहोत.” या परिस्थितीमुळे अनेक मच्छीमार कुटुंबांवर कर्जाचा भार वाढतोय. बोटींची दुरुस्ती, जाळी बदलणे, मजुरांचे पैसे आणि घरखर्च भागवण्यासाठी लोक सावकारांकडून पैसे घेत आहेत. मासेमारी कमी झाल्याने उत्पन्न घटले आणि त्यामुळे कर्जफेड करणे कठीण होत चालले आहे. अनेक कुटुंबे आता रोजच्या गरजा भागवण्यासाठीही संघर्ष करत आहेत."
मच्छीमारांच्या आयुष्यातील अदृश्य लढाई
भारत-पाकिस्तान तणावावरील चर्चा अनेकदा राजकारण, सुरक्षा आणि लष्करी हालचालींपर्यंत मर्यादित राहते. मात्र गुजरातच्या किनारी भागांमध्ये या संघर्षाचा थेट परिणाम सामान्य मच्छीमार कुटुंबांच्या आयुष्यावर होतोय. मासेमारी कमी झाल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. उत्पन्न घटल्यामुळे काही पालकांना मुलांच्या शाळेची फी भरता येत नाही. त्यामुळे अनेक मुलांना खासगी शाळा सोडाव्या लागल्या. घरखर्च भागवण्यासाठी महिलांना अतिरिक्त मजुरी किंवा लहानसहान कामे करावी लागतायेत. काही ठिकाणी तरुण रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतायेत. गावांमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक तणाव वाढल्याने मानसिक ताणही वाढत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

मच्छीमार समुदायांसोबत काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले, “मच्छीमारांना अटक झाली कीच त्यांच्याकडे लोकांचे लक्ष जाते. पण त्यांच्या कुटुंबांवर काय परिणाम होतो, मुलांचं शिक्षण कसं थांबतं किंवा संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था कशी कोलमडते याबद्दल फार कमी चर्चा होते.” मच्छीमारांसाठी मासेमारी हा फक्त रोजगाराचा विषय नाही, तर त्यांच्या परंपरेचा आणि ओळखीचा भाग आहे. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या समुद्रावर अवलंबून आहेत. लहानपणापासूनच मुलांना समुद्रातील दिशा, जाळी दुरुस्ती आणि मासेमारीची कामे शिकवली जातात. मात्र सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे अनेक मच्छीमारांना भीती वाटत आहे की, पुढची पिढी हा व्यवसाय सोडून दुसऱ्या कामांकडे वळू शकते.
हवामान बदलामुळे वाढली अडचण
भारत-पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या संकटासोबतच गुजरातमधील मच्छीमार समुदाय हवामान बदलाच्या परिणामांनाही सामोरे जात आहेत. गेल्या काही वर्षांत समुद्राच्या परिस्थितीत मोठे बदल झाल्याचे मच्छीमार सांगतात. समुद्राच्या तापमानातील वाढ, माशांच्या स्थलांतरातील बदल, वारंवार येणारी चक्रीवादळे आणि किनारपट्टीची धूप यामुळे मासेमारीवर परिणाम झालाय. पूर्वी किनाऱ्याजवळ सहज मिळणारे मासे आता कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमारांना अधिक खोल समुद्रात जावे लागते. मात्र खोल समुद्रात जाताना आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पोहोचण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हवामान बदलामुळे निर्माण झालेलं संकट आता सीमावादाशीही जोडले जात आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल आणि वाढता सीमातणाव या दोन्ही गोष्टी मच्छीमारांसाठी मोठं आव्हान ठरत आहेत. गुजरातच्या किनारी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या एका सागरी संशोधकाने सांगितले, “हवामान बदल आणि सीमावाद या दोन्ही गोष्टी आता एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. मच्छीमारांना निसर्ग आणि राजकीय परिस्थिती दोन्हीकडून दबाव सहन करावा लागतोय.”
मदतीच्या प्रतीक्षेत मच्छीमार
भारत-पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या संकटात गुजरातमधील मच्छीमार समुदायाने सरकारकडे अधिक मजबूत मदतीची मागणी केली आहे. स्थानिक संघटना आणि मच्छीमारांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत केवळ आश्वासनांपेक्षा ठोस उपाययोजनांची गरज आहे.
मच्छीमार समुदायाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
१) लहान मच्छीमारांसाठी आधुनिक नेव्हिगेशन आणि जीपीएस तंत्रज्ञान
२) अटक झालेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी जलद राजनैतिक प्रक्रिया
३ )संघर्षामुळे बंद पडलेल्या मासेमारीसाठी आर्थिक मदत आणि भरपाई
४) विमा आणि सामाजिक सुरक्षा योजना
५) मासेमारी बंदी किंवा संकटाच्या काळात पर्यायी रोजगाराच्या संधी
मात्र अनेक मच्छीमारांच्या मते, सध्याच्या मदत योजना अपुऱ्या ठरतायेत. विशेषतः छोट्या मच्छीमारांना आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना सरकारी योजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. काही मच्छीमारांच्या मते, अनेक भरपाई योजना नोंदणीकृत बोट मालकांपुरत्याच मर्यादित राहतात. त्यामुळे बोटीवर काम करणारे मजूर, मासे वर्गीकरण करणारे कामगार आणि इतर छोट्या कामांवर अवलंबून असलेले लोक आर्थिक संकटात सापडतायेत.
वेरावळमधील मासे कंटेनर लोड करणाऱ्या एका मजुराने सांगितले, “बोटी बंद झाल्या की आमचं काम लगेच थांबतं. आमच्याकडे बचत नाही. आम्ही रोज कमावतो आणि त्यावरच घर चालतं.” तज्ज्ञांच्या मते, सीमाविषयक धोरणे आणि सागरी सुरक्षेबाबत निर्णय घेताना मच्छीमार समुदायाचा सहभाग अत्यंत कमी असतो. मात्र या निर्णयांचा सर्वाधिक परिणाम याच समुदायावर होतोय.
दोन देशांच्या सीमेत अडकलेले मच्छीमार
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ राहणाऱ्या मच्छीमारांसाठी समुद्र हा उपजीविकेचा मुख्य आधार आहे. पण त्याच समुद्रामुळे आता त्यांच्या आयुष्यात भीती आणि असुरक्षितता वाढलीये. समुद्रातील आंतरराष्ट्रीय सीमारेषा प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही. जमिनीवरील सीमांसारखे कुंपण, फलक किंवा तपासणी नाके समुद्रात नसतात. त्यामुळे मास्यांच्या शोधात खोल समुद्रात गेलेला एखादा मच्छीमार नकळत वादग्रस्त भागात पोहोचू शकतो.

मच्छीमारांच्या मते, त्यामुळे आता प्रत्येक मासेमारीची फेरी धोकादायक बनली आहे. सक्रिय लष्करी संघर्ष नसतानाही अनेकजण भीतीच्या वातावरणात समुद्रात जात आहेत. पोरबंदरमधील एका वृद्ध मच्छीमाराने सांगितले, “समुद्र आम्हाला जगवतो, पण आता प्रत्येक वेळी समुद्रात जाताना भीती वाटते."
बातम्यांमध्ये दुर्लक्षित राहिलेलं किनारी संकट
गुजरातच्या मच्छीमार समुदायावर ओढवलेले हे संकट राष्ट्रीय पातळीवर फार कमी चर्चेत येतंय. अचानक घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तींसारखं हे संकट काही दिवस बातम्यांमध्ये राहत नाही. मात्र किनारी गावांमध्ये त्याचा परिणाम दीर्घकाळ जाणवत राहतो. प्रत्येक वेळी भारत-पाकिस्तान तणाव वाढला की मच्छीमारांमध्ये भीती वाढते, मासेमारी कमी होते आणि आर्थिक संकट अधिक गंभीर बनते. त्यामुळे अनेक कुटुंबांचे दैनंदिन आयुष्य अस्थिर झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, गुजरातची मच्छीमार गावे आज भू-राजकारण, हवामान बदल आणि आर्थिक असुरक्षिततेच्या तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायांना बसत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सुरू असताना हजारो मच्छीमार कुटुंबे अजूनही सुरक्षित समुद्र, स्थिर उत्पन्न आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाण्याची वाट पाहत आहेत. गुजरातच्या मच्छीमारांची ही गोष्ट केवळ सीमावादाची नाही, तर समुद्रावर अवलंबून असलेल्या त्या लोकांच्या संघर्षाची आहे, ज्यांच्यासाठी समुद्र आता पूर्वीसारखा मुक्त आणि सुरक्षित राहिलेला नाही.






