रितेश शिसोदे
- सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग असून या कर्करोगामुळे दरवर्षी 3,00,000 पेक्षा जास्त मृत्यू होतात.
- एचपीव्ही लस गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी प्रभावी मानली जाते. त्यामुळे या लसीकरणाची देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाली आहे.
- मात्र या लसीकरण मोहिमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लसीच्या विश्वासार्हतेबाबत अनेक लोक शंका उपस्थित करीत आहेत.
घटना २००९ सालची आहे… भारतात बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्याशी संलग्न असलेली 'पाथ' (PATH) ही संस्था आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या सहाय्याने गुजरात आणि आंध्र प्रदेश येथील एकूण २४ हजार मुलींना एक लस देण्यात आली होती. त्यानंतर सात मुलींचा मृत्यू झाला होता. ज्यांपैकी बहुतांश मुली आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील होत्या. या लसीचे नाव होते HPV म्हणजेच 'ह्युमन पॅपिलोमाव्हायरस'... भारताच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये HPV लसींचा समावेश कसा करता येईल याचे मूल्यांकन करणे हा या चाचणीमागचा उद्देश होता. मात्र, चाचणीच्या काळात सहभागी झालेल्या सात मुलींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यावर हा प्रकल्प तीव्र चौकशीच्या भोवऱ्यात सापडला.
महिला आरोग्य गट आणि मानवाधिकार संघटनांनी त्यावेळी निदर्शने केली. एप्रिल २०१० पर्यंत, भारत सरकारने हा कार्यक्रम स्थगित केला आणि चौकशीचे आदेश दिले. या मुलींचा मृत्यू त्या लशींशी संबंधित नसून, मलेरिया, साप चावणे, पाण्यात बुडून आणि आत्महत्या इ. कारणांमुळे झाला होता, असे स्पष्टीकरण आयसीएमआरने दिले होते. मात्र, तज्ज्ञांनी आणि न्यायालयाने देखील, 'भारतीय जनता ही विदेशी लोकांसाठी प्रयोगाचे गिनिपीग साधन आहे,' असे म्हणत त्याबाबत आक्षेप घेतले होते. त्यामुळे केंद्र सरकारने हे लस परीक्षण तातडीने थांबवले होते. सखोल शवविच्छेदन तपासाचा अभाव आणि नियामक त्रुटींच्या धारणेमुळे लोकांच्या विश्वासावर त्यावेळी कायमस्वरूपी परिणाम झाला.

या घटनेला आज, एका दशकाहून अधिक काळ लोटलाय आणि आता पुन्हा HPV लसीकरण नव्या जोमाने सुरू करण्याचा विडा भारत सरकारने उचलला आहे. मात्र हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे की आता, भारतात सुरू होत असलेल्या लसीकरणातील लस, ही देखील बिल गेट्स यांच्याशीच संबंधित 'गॅवी' (GAVI) संस्थेकडून सादर झालेली आहे. सन २००९मध्ये जी 'गाडांसील-४' लस दिली गेली होती, तीच आत्ताचीही आहे, असे सांगितले जाते. स्पेन, जपान या देशांनी देखील अशा लसीकरण परीक्षणात झालेल्या काही मृत्यूंमुळे हे लसीकरण थांबवले होते. हे मृत्यू लसीकरणाशी निगडित नसले तरीही जपानने अद्याप या लसीकरणास अधिकृत मान्यता दिलेली नाही.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तीन लाखपेक्षा अधिक महिलांचा मृत्यू
सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग असून या कर्करोगामुळे दरवर्षी 3,00,000 पेक्षा जास्त मृत्यू होतात. एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. एचपीव्ही संसर्गाच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा बहुतेक एचपीव्ही-16 आणि 18 मुळे होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी भारतात प्रथमच क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लस उपलब्ध होणार आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे संरक्षण व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २८ फेब्रुवारीपासून एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. राजस्थानच्या अजमेर येथे पंतप्रधानांनी या लसीकरणाचे उद्घाटन केले. ही लस आपल्या मुलींना वयाच्या १४-१५व्या वर्षात देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी देशातील पालकांना केले आहे. ही मोहीम इतर राज्यांत या वर्षीच्या महिला दिनापासून म्हणजेच ८ मार्चपासून राबवायला सुरूवात झालीये. तूर्तास, हे लसीकरण ऐच्छिक आहे. आपल्या मुलीला लस द्यावी की नाही, हा सर्वस्वी पालकांचा निर्णय असेल, कारण त्यासाठी त्यांची संमती आवश्यक आहे. ही लस ९ ते ४५ वर्षांपर्यंतची मुले, पुरुष यांनाही दिली जाते. महाराष्ट्र राज्यात ‘पिक ओपीडी’ नावाने या मोहिमेला सुरूवात झाली असून ९ ते १४ वयोगटातील ९ लाख ८४ हजार मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.
HPV लस वरदान ठरू शकेल का?
HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमाव्हायरस. एचपीव्ही हा एक विषाणू नसून जवळपास २०० प्रकारच्या विषाणूंचा एक समूह आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यामागे एचपीव्ही विषाणू सर्वाधिक कारणीभूत असतो. धूम्रपान, असुरक्षित शारीरिक संबंध हे देखील त्यास कारणीभूत ठरतात. गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यासाठी या २०० विषाणूंपैकी फक्त १०-१२ प्रकारचे एचपीव्ही विषाणू कारणीभूत असतात. यातील, १६, १८, ३१, ३३, ४५, ५२, ५८ या प्रकारच्या एचपीव्हीने गर्भाशय मुखाचा कर्करोग किंवा शरीरावर छोटे चामखीळ निर्माण होतात. एचपीव्ही विषाणूमुळे होणारा कर्करोग पुरुषांमध्येदेखील आढळतो. असुरक्षित शरीरसंबंधांतून हा विषाणू फैलावतो. गुदद्वार, शिश्न, तोंड, घसा यांचाही कर्करोग त्यामुळे उद्भवू शकतो. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येनंतर, दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात.

हा कर्करोग न होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे, एचपीव्ही लस. या लशीने कर्करोगाविरुद्ध ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते, असे सांगितले जाते. दुसरे म्हणजे, गर्भाशय मुखाचे नियमित स्क्रीनिंग, तपासणी गरजेची आहे. या तपासणीत या कर्करोगाचे निदान लवकर होऊन तो टाळता येणे शक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. किमान दर तीन ते पाच वर्षांनी ही तपासणी न चुकता करून घेतली पाहिजे. परंतु, आपल्या भारतात, गर्भाशय मुखाची नियमित तपासणी करण्याचे प्रमाण जवळपास १.९ टक्के इतके अत्यल्प आहे.
सध्या जगभरात आणि भारतात, एचपीव्ही लस म्हणून गार्डासील-४, गार्डासील९ आणि सविहरिंक्स या लशींचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. गार्डासील ४ आणि सव्हिरॅक्स या लशी चार प्रकारच्या एचपीव्हीपासून संरक्षण करतात, तर, गार्डासील९ही लस एचपीव्हीपैकी ६, ११, १६, १८, ३१, ३३, ४५, ५२, ५८ या एचपीव्हीपासून संरक्षण करते, असे सांगितले जाते.
एचपीव्ही लस कोणाला देता येते?
ही लस मुलामुलींना देता येते. मात्र एचपीव्हीच्या संपर्कात येण्याआधी ही लस घेतली पाहिजे. कारण ही लस केवळ संसर्ग टाळू शकते. एकदा का या विषाणूची लागण झाली तर या लशीचा फारसा उपयोग होत नाही. हा विषाणू इतक्या वेगाने पसरतो की मुलांनी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधीच त्यांना लसीकरण करणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सामान्य व्यक्तीला या लशीचे एक किंवा दोन डोस पुरेसे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना मात्र दोन किंवा तीन डोस द्यावेत असं संघटना सांगते.
भारत सरकारने या लसीकरणासाठी गाडांसीलच्या एकाच डोसचा पर्याय निवडला आहे, यापूर्वी एकापेक्षा अधिक डोसचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. हा बदल २०२२च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आला आहे. ही लस दंडाच्या ०.५ मिली स्नायूमध्ये इंजेक्शन म्हणून दिली जाते आणि डाव्या हाताच्या करंगळीवरील नखाच्या खुणेद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाते. लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि डिजिटल लसीकरण प्रमाणपत्रे देण्यासाठी डिझाइन केलेले केंद्र सरकारचे पोर्टल, यू-विन प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल ट्रॅकिंगचा आधार या संपूर्ण प्रणालीला दिला गेला आहे. दरवर्षी सुमारे १.१५ कोटी मुलींचे लसीकरण करण्याच्या सरकारच्या योजनेसह, हा उपक्रम जगातील कोठेही राबवल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या HPV लसीकरण मोहिमांपैकी एक आहे.
जगभरात एचपीव्हीची लस किती व्यापक आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळजवळ 90% मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. अशा देशांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे लवकर लक्षात येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, 2030 पर्यंत एचपीव्हीचे 90 टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. जवळपास 140 देशांनी आता एचपीव्हीचे लसीकरण सुरू केले आहे. महिलांमध्ये या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण सब-सहारा आफ्रिकेत (24%) आढळते. त्यानंतर लॅटिन अमेरिका, कॅरिबिया (16%), पूर्व युरोप (14%) आणि दक्षिण पूर्व आशिया (14%) चा क्रमांक लागतो. लसीकरण मोहीम सुरू करणारा रवांडा हा आफ्रिकेतील पहिला देश होता. 2011 मध्ये मुलींना लवकरात लवकर लसीकरण करून महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाची तपासणी सुरू करण्यासाठी त्यांनी एक योजना सुरू केली.

HPV च्या विश्वासार्हतेबाबत या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत…
या लसीकरण मोहिमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लसीच्या विश्वासार्हतेबाबत अनेक लोक शंका उपस्थित करीत आहेत. माजी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अंजली मुळके यांनी HPV लसीकरणासंबंधी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ. मुळके म्हणतात की,
‘’या लशीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून डिसेंबर २०१४मध्ये मान्यता देण्यात आली असून, याचे प्रात्यक्षिक हे २००६ पासून केले गेले होते. या लशींवरील संशोधनाचे निष्कर्ष हाती येण्यासाठी किमान ३० वर्षांचा परिणामात्मक कालावधी असायला हवा. परंतु, त्याआधीच लशीला मान्यता कुठल्या अभ्यासावरून दिली गेली, हे स्पष्ट होत नाही.’’
या लशीचे कार्य, दुष्परिणाम आणि दूरगामी परिणाम यांबाबत चक्कर येणे, इंजेक्शनच्या जागी सूज इ. लक्षणे सोडून अधिक स्पष्टता दिली गेली नाही. या लशीचे एक ते दोन डोस द्यावेत, असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. प्रतिकारशक्ती कमी असणारे, एचआयव्हीबाधित व्यक्ती आणि अधिक वयाच्या व्यक्तींना त्या अनुषंगाने तीन वा अधिक डोस द्यावेत, असेही संघटना म्हणते. सरकारकडून सध्या मोफत दिल्या जात असलेल्या या लशीची किंमत ३९२७ रुपये आहे. तिचा पुढचा डोस कोणाला, कधी द्यायचा, तसेच पुढचा डोसही सरकार मोफत देणार आहे का, याही बाबतीत सरकारकडून स्पष्टता नाही, असाही मुद्दा डॉ. मुळके यांनी उपस्थित केला आहे.
त्याचवेळी, अमेरिकेचे आरोग्यमंत्री रॉबर्ट एफ. केनेडी यांनी एचव्हीपी लसीकरणाला विरोध करत गाडांसील-४ लस घेतल्यानंतरचा मृत्यूदर कर्करोगापेक्षा ३७ टक्क्यांनी अधिक आहे, असा आक्षेप नोंदवला आहे. हा मुद्दा, एपस्टीन फाइल्समध्ये बिल गेट्स यांचे आलेले नाव, करोना संबंधीच्या लशींबाबतचे भारतीय नागरिकांचे आक्षेप आणि इतर अनेक बाबींमुळे लसीकरण सुरू होण्यापूर्वीच भारतात त्याबाबत साशंकता निर्माण होते आहे, असेही डॉ. मुळके यांनी स्पष्ट केले आहे.
HPV लस घेतलेल्या इतर देशांना आलेले अनुभव
HPV लसीसंबंधीचे वाद फक्त भारतापुरते मर्यादित नाहीत.अनेक देशांनी अशा संकटांचा अनुभव घेतला आहे ज्यामुळे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांवरील लोकांच्या विश्वासाला मोठा तडा गेला.
- २०१३ मध्ये जपानमधील राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकात HPV लसीचा समावेश करण्यात आला, परंतु लस घेतलेल्या काही मुलींमध्ये तीव्र वेदना, Motor Dysfunction आणि थकवा आल्याच्या बातम्यांनंतर ही लस वादाच्या भोवऱ्यात सापडली. लोकांची वाढती चिंता लक्षात घेऊन, सरकारने लसीसाठीची आपली सक्रिय शिफारस स्थगित केली, जरी ती लस स्वेच्छेने उपलब्ध असली तरीही.

- कोलंबियामध्ये २०१४ साली कारमेन डी बोलिवार शहरात आरोग्यासंबंधी एक भीतीचे वातावरण निर्माण झाले, जिथे शेकडो शाळकरी मुलींनी चक्कर येणे, डोकेदुखी आणि मज्जासंस्थेवर परिणामांची लक्षणे नोंदवली. अधिकाऱ्यांनी या घटनेला सामूहिक मानसिक आजार असल्याचे म्हटल्यानंतर यामुळे देशभरात घबराट पसरली आणि लसीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले.
- युरोप,डेन्मार्क आणि आयर्लंडमध्ये माध्यमांचे वृत्तांकन आणि पोश्चरल ऑर्थोस्टॅटिक टॅकीकार्डिया सिंड्रोम व तीव्र थकवा यांसारख्या आजारांशी लसीचा संबंध जोडणाऱ्या मोहिमांमुळे लसीकरणाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. जरी नियामक आणि जागतिक आरोग्य संघटना व युरोपियन मेडिसिन्स एजन्सी यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी लस सुरक्षित असल्याचे ठामपणे सांगितले असले तरी, या घटनांनी हे दाखवून दिले की जेव्हा समुदायांना वाटते की त्यांच्या चिंतांकडे दुर्लक्ष केले जात आहे, तेव्हा लोकांचा दृष्टिकोन किती वेगाने बदलू शकतो.
एचपीव्ही लस न घेता सर्वाइकल कॅन्सर कोणत्या चाचण्यांनी टाळता येतो?
गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत, विशेषतः ग्रामीण भागात अजूनही जागरुकतेचा अभाव दिसून येतो. शहरी भागात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे वेळीच निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. 20-25% महिला याबाबत जागरुक असल्याचे दिसून येते. जे प्रमाण पूर्वी केवळ 5% इतके होते.
मुळात एचपीव्हीचे ९० टक्के संक्रमण हे आपले शरीर प्रतिकारशक्तीद्वारे परतून लावते. त्यातील काही एचपीव्ही संक्रमणाचाच धोका कर्करोगाशी संबंधित असतो. सुरक्षित शरीरसंबंध, अनेक व्यक्तींशी शरीर संबंध टाळणे, नियमित तपासणी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. नियमित तपासणी केल्यास कर्करोगाचा धोका अत्यंत कमी होतो. या तपासणीसाठी सध्या सरासरी १५०० ते तीन हजार रुपये लागतात.
पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचण्यांसारख्या नियमित चाचण्यांद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा टाळता येण्याजोगा आणि उपचार करण्यायोग्य असला तरी, ही जागतिक आरोग्य समस्या ठरली आहे. स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी एचपीव्ही विरुद्ध नियमित तपासणी आणि लसीकरणास प्राधान्य देणे आवश्यक आहे.
तरुण महिलांनी नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे शक्य होते. स्त्रियांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या वाढत्या असुरक्षिततेमुळे धूम्रपान, लठ्ठपणा आणि चुकीच्या आहाराची निवड यासारखे जीवनशैलीशी निगडीत घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.






