कोमल ठोंबरे
- ‘एन्टी वॉर मूव्ही’ असलेल्या ‘इक्कीस’ला ट्रोल का केलं जातयं?
- कोण होता भारताचा सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा अरुण खेत्रपाल?
- आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला भेटायला त्याचे वडील पाकिस्तानात का गेले?
पाकिस्तान हा तर आपला कट्टर शत्रू आणि त्यातही पाकिस्तानी सैन्य अधिकारी म्हणजे दुश्मन नंबर १… तमाम भारतीयांच्या मनात यापेक्षा वेगळं मत असूच शकत नाही, त्यातही ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हा कट्टरतावाद आणखीनच भारतीयांमध्ये भिनलाय. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये एक सिनेमा प्रदर्शित होतो, हा सिनेमा म्हणजे एक ‘एन्टी वॉर मूव्ही’… भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धावर आधारित, पण तरीही या सिनेमातील एक पाकिस्तानी सैन्य अधिकारी हा अतिशय चांगल्या मनाचा असल्याचं दाखवण्यात येतं आणि मग सुरू होतो वाद. पाकिस्तानी लष्कर अधिकारी हा चांगला असूच कसा शकतो, हे या वादाचं मूळ असतं…
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं नाव आहे ‘इक्कीस’... अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा आ नुकतेच दिवंगत झालेले धर्मेंद्र या सिनेमात मुख्य भूमिकेत असून अंधाधून, बदलापूर, मेरी ख्रिसमस या अत्यंत गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी ‘इक्कीस’चे दिग्दर्शन केले आहे. ज्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याला घेऊन हा वाद सुरू झाला आहे त्या सैन्य अधिकाऱ्याची भूमिका केली आहे जयदीप अहलावातने.
‘इक्कीस’ वरून सोशल मीडियावर वाद सुरू झाल्यानंतर या सिनेमाच्या शेवटी एक ‘डिस्क्लेमर’ टाकण्यात आलं, ज्यात लिहिलं आहे की,
‘’पाकिस्तानी ब्रिगेडियर यांचा मानवीय व्यवहार ही एक अपवादात्मक स्वरुपाची घटना आहे, अन्यथा आपल्या शेजारचा हा देश जराही भरोसाच्या लायक नाही. पाकिस्तानी लष्कराने युद्धादरम्यान आणि शांती चर्चेच्या दरम्यान आपल्या सैनिकांशी आणि नागरिकांशी अत्यंत क्रुर आणि अमानवीय व्यवहार केला आहे, कित्येकदा जिनेव्हा कराराचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादापासून एका जागरुक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांनाच सावध आणि सर्तक राहायला हवे… जय हिंद!’’

‘इक्कीस’वरून जो वाद सुरू झालाय तो तुर्तास बाजूला ठेवू आणि सिनेमाच्या कथानकाकडे वळू… देशाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सीमेवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जवानांनी कित्येकदा आपल्या अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले आहे. अरुण खेत्रपाल हा त्यापैकीच एक. सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळवणारा शूर सैनिक. याच अरुणबद्दल आपण जाणून घेणार आहोत…१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवताना शहीद झालेल्या अगदी तरुण वयात मरणोत्तर परमवीर चक्र मिळालेल्या सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचा ‘इक्कीस’ हा आयुष्यपट…सत्य घटनेवर आधारित!
काय आहे सत्य घटना?
२००१ सालची ही गोष्ट जेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये लोकांचं येणं-जाणं सुरू होतं. व्हिसाचे नियम फारसे कठोर नव्हते. त्याच दरम्यान भारताचे ८१ वर्षांच्या निवृत्त ब्रिगेडियर एम. एल. खेत्रपाल यांच्याजवळ पाकिस्तानच्या एका ब्रिगेडियरचा ‘ख्वाजा मोहम्मद नसीर’ यांचा संदेश आला. तो पाकिस्तानी अधिकारी भारताच्या ह्या निवृत्त ब्रिगेडियरला वारंवार पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण पाठवत होता. पाकिस्तानात येऊन काही वेळ राहण्याची विनंती करत होता.
ब्रिगेडियर खेत्रपाल यांनी बराच काळ त्याच्या ह्या निमंत्रणाकडे दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनी त्यांनी ह्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटण्याचा निश्चय केला. ब्रिगेडियर खेत्रपाल यांची अशी इच्छा होती की, एकदा तरी पाकिस्तानातील सरगोधा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराला बघावे.

लाहोर येथे राहणारे ब्रिगेडियर ख्वाजा मोहम्मद नसीर यांनी खेत्रपाल यांच्या व्हिसा आणि इतर कागदपत्रांची व्यवस्था केली. नसीर, त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि नोकरचाकर या सर्वांनी ब्रिगेडियर खेत्रपाल यांचे स्वागत केले. त्यांनी खेत्रपाल ह्यांना कुठल्याही प्रकारची कमी होऊ दिली नाही. ३ दिवस खेत्रपाल तिथे राहिले. त्या तीन दिवसांमुळे खेत्रपाल आणि नसीर ह्यांच्यात एक आपुलकीचे नाते बनले. पण खेत्रपाल ह्यांना एक गोष्ट अजूनही सतावत होती, ती म्हणजे एक पाकिस्तानी अधिकारी त्यांना एवढा मानसन्मानआणि प्रेम का देत आहे?
‘’तुमच्या मुलाला गोळ्या मीच घातल्या होत्या…’’
जेव्हा खेत्रपाल यांची परतायची वेळ झाली तेव्हा ब्रिगेडियर नसीर ह्यांनी खेत्रपाल ह्यांना सांगताना म्हटले की, “सर, एक गोष्ट आहे जी खूप वर्षांपासून मला तुम्हाला सांगायची होती. पण मी कसं सांगू हे कळत नव्हतं. मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. पण ह्यामुळे आता मला हे सांगताना आणखी त्रास होतो आहे की, अरुण ह्याची हत्या माझ्याच हातून झाली होती.”
अरुण म्हणजेच सेकण्ड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, भारताचा सर्वात कमी वयाचा परमवीरचक्र विजेता सैनिक… १९७१ च्या युद्धात बासंतार लढ्यात पाकिस्तानजवळ ५ बटालियन होत्या आणि भारताजवळ केवळ ३ बटालियन. त्यावेळी तीन टँक सोबत ‘१७ पुना हॉर्स’चे सेकण्ड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल ह्यांना समोरून येणाऱ्या पाकिस्तानी १३ लान्सर्सच्या पॅटण टँक्सना रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अरुण खेत्रपालने आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत तीन टँकसह पाकिस्तानच्या 10 टँकचा सामना केला. मृत्यू डोळ्यासमोर असतानाही त्यांनी माघार न घेता शत्रूचा अखेरचा टँकही उध्वस्त केला.

“तू तुझे कर्तव्य पार पाडत होतास आणि तो त्याचे.”
ब्रिगेडियर नसीरने अरुणच्या वडिलांना म्हणजेच ब्रिगेडियर खेत्रपाल यांना सांगितले की, ते दोघेही एकमेकांवर फायरिंग करत होते. दोघांमधून कोणीही एक वाचू शकत होता. ते तर नसीरचं नशीब म्हणून ते वाचले. नसीरने सांगितले की, जवानांना ट्रेनिंग दिली जाते की कश्याप्रकारे शत्रूशी लढताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचे. पण अरुण खेत्रपाल ह्याचं साहस बघून नसीर ह्यांना त्याची हत्या केल्याचा पश्चाताप होऊ लागला.
हे सर्व ऐकल्यावर ब्रिगेडियर खेत्रपाल काही बोलू शकले नाही. त्यांच्यासमोर एक असा व्यक्ती होता ज्याने त्यांच्या मुलाची हत्या केली होती. पण सोबतच मागील ४० वर्षांपासून तो त्या गोष्टीचा पश्चाताप देखील करत होता. त्यानंतर ब्रिगेडियर खेत्रपाल ह्यांनी ब्रिगेडियर नसीरला तेच सांगितले जे एका शिपायाकडून अपेक्षित होते. ते ब्रिगेडियर नसीर ह्यांना म्हणाले की, “तू तुझे कर्तव्य पार पाडत होतास आणि तो त्याचे.”
बसंतरच्या लढाईला इतिहासात इतकं महत्वं का आहे?
पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत पूर्वेकडील सेक्टरमधून भारतीय लष्कराचा दबाव संपवायचा होता. या योजनेतंर्गत पाकिस्तानने दोन कट रचले होते. राजस्थानच्या लोंगेवाला पोस्टवरून भारतावर हल्ला करून जैसलमेर काबीज करण्याचा पहिला कट होता. त्याचवेळी सियालकोट बेसच्या मदतीने शकरगडमार्गे पंजाबमधील पठाणकोट ताब्यात घेण्याचा दुसरा कट होता. पठाणकोट ताब्यात घेऊन पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमधून उर्वरित भारताशी संपर्क तोडायचा होता. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या योजनेवर कारवाई करण्यापूर्वी भारतीय लष्कराने शकरगड भागात हल्ला करून तो आपल्या ताब्यात घेतला.
पाकिस्तानातील शकरगढ भागात झालेल्या रणगाड्यांमधली ही भीषण लढाई बसंतरची लढाई म्हणून ओळखली जाते. बसंतर नदीवर पूल बांधून शकरगढमध्ये भारतीय सैन्याचा हल्ला पठाणकोट काबीज करण्याच्या इराद्याने पाकिस्तानने बसंतर नदीच्या काठावरील शकरगड परिसरात तीन पायदळ तुकड्या, एक आर्मर्ड डिव्हिजन आणि एक आर्मर्ड ब्रिगेड तैनात केले होते. येथे, पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कराची 3 इन्फंट्री डिव्हिजन आणि 2 आर्मर्ड ब्रिगेड बसंतर नदीच्या या बाजूला पोहोचली होती. भारतीय लष्कराच्या क्षमतेबद्दल शत्रूला शंका नव्हती. भारतीय लष्कर लवकरच नदीवर पूल बांधून हल्ला करणार हे त्यांना माहीत होते.

भारतीय लष्कर आणि त्यांच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी शत्रूने बसंतर नदीच्या काठावर भूसुरुंग पेरले होते. येथे 47 इन्फंट्री बटालियन आणि 17 पूना हॉर्स यांनी 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता बसंतर नदीवर पूल बांधण्याचे काम पूर्ण केले. पूल बांधल्याबरोबर भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी शाखेने माइनफील्ड साफ करण्यास सुरुवात केली. माइनफिल्ड साफ करण्याचे काम अर्धेच पूर्ण झाले होते, तेव्हाच पाक सैनिकांच्या कारवायांची एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. या माहितीत असेही सांगण्यात आले की, शत्रूचे सैन्य आपल्या टँक ब्रिगेडसह त्यांच्या दिशेने येत आहे.
10 रणगाड्यांचा सामना करण्यासाठी तीन भारतीय रणगाडे युद्धभूमीत
शत्रूच्या 10 रणगाड्यांचा सामना करण्यासाठी तीन भारतीय रणगाडे युद्धभूमीत शत्रूच्या आगमनाची बातमी मिळाल्यावर कॅप्टन व्ही. मल्होत्रा, लेफ्टनंट अहलावत आणि द्वितीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल हे त्रिकूट भूसुरुंगाची पर्वा न करता आपल्या रणगाड्यांसह शत्रूच्या दिशेने निघाले. काही वेळातच शत्रूच्या दहा रणगाड्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीन रणगाडे समोर होते. युद्धाच्या सुरूवातीस कॅप्टन मल्होत्रा, लेफ्टनंट अहलावत आणि सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल या त्रिकुटाने शत्रूचे सात टँक नष्ट केले. शत्रूच्या सैन्याच्या तीन टँक अजूनही रणांगणावर आगीचा वर्षाव करत होत्या. कॅप्टन मल्होत्रा यांच्या रणगाड्याला शत्रूच्या रणगाड्यातून डागलेल्या गोळ्याचा फटका बसला तर लेफ्टनंट अहलावत यांच्या रणगाड्यात तांत्रिक बिघाड झाला. शत्रूचे तीन टँकचा सामना करण्याची जबाबदारी एकट्या सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आली होती. शत्रूच्या तीन टँकना आता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या रणगाड्याला कोणत्याही किंमतीत लक्ष्य करायचे होते.
‘’मी या शत्रूंना संपवूनच परत येईन…’’ अरुणचे शेवटचे शब्द
बसंतरच्या लढाईत शत्रू सैन्याचा एकच रणगाडा उरला होता. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल शत्रूच्या या रणगाड्याकडे वळले, त्याआधी शत्रूच्या रणगाड्यातून एक गोळा त्यांच्या रणगाड्यावर पडला. अरुण खेत्रपाल यांच्या टँकमध्ये ज्वाळा वाढत होत्या. ही परिस्थिती पाहून त्याच्या युनिट कमांडरने टँक सोडून परत येण्यास सांगितले. मात्र, अरुण खेत्रपाल आपल्या युनिट कमांडरचा हा आदेश मानायला तयार नव्हते.

त्यांनी आपल्या युनिट कमांडरला प्रत्युत्तर दिले, ‘सर, मी माझ्या रणगाड्याला अशा अवस्थेत सोडू शकत नाही, तो अजूनही कार्यरत आहे, मी या शत्रूंना संपवूनच परत येईन.’ तोपर्यंत शत्रू सैन्याची तिसरी टँक अरुण खेत्रपाल यांच्यापासून फक्त 100 मीटरवर पोहोचली होती. वेळ न दवडता त्यांनी शत्रूच्या रणगाड्याला लक्ष्य करायला सुरुवात केली. त्यानंतर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या मशीनगनमधून निघालेल्या गोळ्यांनी शत्रूच्या सैन्याचा महाकाय रणगाडा उद्ध्वस्त केला.
शत्रूचे 4 रणगाडे उद्ध्वस्त करणारे अरुण खेत्रपाल यांचा रणगाडा आता पूर्णपणे आगीच्या कचाट्यात सापडला होता. खेत्रपाल यांना या टँकमधून बाहेर पडणे आता अशक्य झाले होते. ‘बसंतरच्या लढाई’ दरम्यान, द्वितीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल शत्रूशी लढताना वीरगतीला प्राप्त झाले. खेत्रपाल यांच्या शौर्याबद्दल आणि पराक्रमासाठी त्यांना लष्कराचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र हा पुरस्कार देऊन मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं.
भारताचा सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा सैनिक
अरुण खेत्रपालचा जन्म 14 ऑक्टोबर 1950 रोजी पुणे शहरातील एका लष्करी कुटुंबात झाला होता. त्याचे वडील एमएल खेत्रपाल हेही त्यावेळी भारतीय सैन्यात ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. 1967 मध्ये त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये लष्करी जीवन सुरू केले. 13 जून 1971 रोजी त्यांना 17 पूना हॉर्समध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. 1971 च्या भारत-पाक युद्धात वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्याने देशासाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले.
शहीद जवान सेकण्ड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. ते भारतातील सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारे सैनिक आहेत. त्यांच्या ह्या साहसी वृत्तीला पाकिस्तानने देखील सलाम केला. त्यांची ही कहाणी पाकिस्तानी डिफेन्सच्या वेबसाईटवर देखील आहे. शत्रू राष्ट्राने आपल्या देशाच्या एखाद्या जवानाच्या कहाणीला त्यांच्या वेबसाईटवर घेणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
(संदर्भ - इन मराठी)






