शंतनू खुजे
- महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनधिकृत पद्धतीने पुतळे का उभे केले जात आहेत..?
- मिरवणुकांमध्ये डीजे मशिदींसमोर वाजवून नेमकं काय साध्य केलं जातंय..?
- सांस्कृतिक अजेंड्याला बळकटी देण्यासाठी ऐतिहासिक आणि धार्मिक प्रतीकांचा वापर
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
कुसुमाग्रजांनी १९९७ साली लिहिलेल्या या ओळी आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतरही महापुरुषांचे प्रत्यक्ष विचार आत्मसात करण्याऐवजी, केवळ नियम मोडून त्यांचे पुतळे उभारून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या प्रवृत्तीचे तंतोतंत वर्णन करतात.
अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटात वाद सुरु झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या आणि देशातील जनतेचे प्रेरणास्थान आहे. त्यांचे पुतळे उभारणे त्यापासून प्रेरणा घेणे हे स्वाभाविक आहे, मात्र अलीकडच्या काही दिवसात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे रातोरात बसवण्यात येत आहेत. कोणतीही परवानगी न घेता, मनमानी पद्धतीने पुतळा बसवण्याचे हे काम केले जात आहे. ज्यामुळे मग दोन गटात, समाजात वाद निर्माण होतोय.

दुसऱ्या बाजूला गेल्या पाच-दहा वर्षांपासून महाराष्ट्रात एक नवीन पॅटर्न सुद्धा बघायला मिळतोय. ज्या सणांच्या मिरवणुका आजवर कधीच निघाल्या नाहीत त्यांच्या मिरवणुका निघायला सुरूवात झालीये. ही मिरवणूक मशिदीसमोर आल्यावर जोराने वाद्य किंवा डीजे वाजवणे, झेंडे नाचवणे, असे प्रकार मुद्दाम केले जातात. अनेकदा मशीदीवर झेंडे लावण्याचे प्रकारही गेल्या काही काळात घडलेले आहेत.
मात्र, ठिकठिकाणी अनधिकृत पद्धतीने पुतळे का उभे केले जात आहेत..? मिरवणुकांमध्ये डीजे मशिदींसमोर वाजवून नेमकं काय साध्य केलं जातंय..? यामागे नेमकं काय राजकारण आहे..? आणि पुरोगामी महाराष्ट्र आता “हिंदुत्वाची” नवीन प्रयोगशाळा बनतोय का…? याच सर्व प्रश्नांचा घेतलेला हा आढावा….
अनधिकृत पुतळ्यांची मालिका…
- मोहोळ आणि मोडनिंब (सोलापूर)
मोहोळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आला होता. प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता समर्थकांनी त्यास विरोध केला. महामार्गाच्या कडेला असे कायमस्वरूपी बांधकाम अपघातांना निमंत्रण देऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे होते.
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब जवळील अंजनगाव येथे एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला पुतळा बसवण्यावरून दोन गटांत मोठा तणाव निर्माण झाला. हे प्रकरण मराठा विरुद्ध धनगर अशा जातीय वादात बदलण्याचा प्रयत्न काही राजकीय घटकांकडून झाला. येथेही पुतळा रात्रीच्या वेळी बसवण्याचा प्रयत्न झाल्याने वाद चिघळला.
- चिखला काकड (बुलढाणा)
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात फेब्रुवारी २०२६ मध्ये अंगणवाडीच्या जागेवर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली.
त्यानंतर पुतळा कोणाच्या हस्ते आणि कसा बसवावा यावरून दोन नेत्यांच्या समर्थकांत वाद झाला. ज्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी या प्रकरणी २३ जणांना अटक करून गावात संचारबंदी लागू केली होती.
- बोरी (परभणी)
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून वाद झाला. प्रशासनाने विनापरवाना पुतळा हटवण्याची नोटीस दिली, ज्याचा शिवप्रेमींनी तीव्र निषेध केला. या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांनी बोरी पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला होता.
- गेवराई (बीड)
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात 'छत्रपती शिवाजी महाराज चौकात' शिवप्रेमींनी रात्रीतून अचानक महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. नंतर हा पुतळा विनापरवाना असल्याचे सांगत प्रशासनाने तो हटवण्याची तयारी केली. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींनी शहरात मोठा मोर्चा काढून पुतळा न हटवण्याची मागणी केली. प्रशासनाने या प्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल केले.

स्मशानभूमीत बसवला बाबासाहेबांचा पुतळा….
काही दिवसांपूर्वी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता स्थानिक कार्यकर्त्यांनी उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलास स्मशानभूमीच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रातोरात बसवला. महापुरुषांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाचे आणि महानगरपालिकेचे कडक नियम आहेत, ज्याचे येथे उल्लंघन झाल्याचे समोर आले.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी महापुरुषाचा पुतळा बसवणे हे अनेकांना पटणारे नव्हते. काहींच्या मते हा महापुरुषाचा अवमान होता, तर काहींनी भावनेच्या भरात हे पाऊल उचलले होते. उल्हासनगर महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे नंतर प्रशासनाने हा पुतळा अनधिकृत ठरवला.
अनधिकृत पुतळे बसवण्यामागे नेमकी काय कारणं…?
रातोरात अश्या पद्धतीने पुतळे का उभे केले जात आहे ? हा महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे. प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ एरिक हॉब्सबॉम याने त्याच्या 'The Invention of Tradition' या पुस्तकात ऐतिहासिक प्रतीकांचा कसा वापर केला जातो, यावर भाष्य केले आहे. हॉब्सबॉमच्या मते, अनेकदा सत्ताधारी किंवा राजकीय गट आपला सध्याचा प्रभाव वाढवण्यासाठी इतिहासातील प्रतीकांचा, स्मारकांचा आणि पुतळ्यांचा वापर करतात. लोकांना असे भासवले जाते की ते जुन्या महान परंपरेशी जोडले गेले आहेत.
अनधिकृत पुतळे उभारणे हे महाराजांबद्दलच्या प्रेमापेक्षा स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा, सार्वजनिक जागेवर ताबा मिळवण्याचा आणि विशिष्ट गटाला आकर्षित करण्याचा एक राजकीयदृष्ट्या केलेला प्रयत्न असतो.
हॉब्सबॉमने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हे वाक्य आहे. राजकीय स्वार्थासाठी इतिहासाचा आणि पुतळ्यांसारख्या प्रतीकांचा वापर करून नव्या परंपरा कशा निर्माण केल्या जातात आणि त्यातून समाजात वर्चस्व कसे प्रस्थापित केले जाते, याचे हे अचूक विश्लेषण या पुस्तकात आहे.
महाराष्ट्रात ‘पुतळ्यांचे राजकारण’ हा विषय नवा नाही….
महाराष्ट्रात ‘पुतळ्यांचे राजकारण’ हा विषय नवा नाही. गेल्या अनेक दशकांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक अजेंड्याला बळकटी देण्यासाठी ऐतिहासिक, धार्मिक किंवा सामाजिक प्रतीकांचा वापर करत आले आहेत, असं मतीन शेख सांगतात. ते राजकीय व सामाजिक घडामोडीचे अभ्यासक आहेत. मात्र, अलीकडच्या काळात या मुद्द्याला जाणीवपूर्वक तापवून सामाजिक ध्रुवीकरण घडवण्याचे प्रयत्न अधिक सक्रिय आणि व्यवस्थित झाल्याचंही ते अधोरेखित करतात.
बाईमाणूसशी बोलतांना ते म्हणतात की,
काही राजकीय घटक किंवा संघटना धार्मिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक प्रतीकांना राजकीय हत्यार म्हणून वापरतात. यामुळे एक प्रकारची वर्चस्वाची स्पर्धा निर्माण होते. एक समाज दुसऱ्या समाजापेक्षा आपली सांस्कृतिक श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेत इतिहासाची एकांगी व्याख्या, भावनिक उत्तेजन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरणारी अफवा यांचा वापर केला जातो. परिणामी, गावपातळीवर, शहरी वस्त्यांमध्ये आणि रोजच्या सामाजिक संबंधांमध्ये जो सलोखा आणि विश्वास अनेक पिढ्यांपासून जपला जात होता, तो हळूहळू तुटू लागतो.
अश्या प्रकारच्या घटना सतत घडल्यामुळे त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो असं मत मतीन शेख व्यक्त करतात. त्यांच्या मते,
“दोन समाजांमधील नाते एकत्रित सण-उत्सव साजरे करण्याने आणि दैनंदिन सहकार्याने बांधली गेलेली असतात, ती अशा राजकीय ध्रुवीकरणामुळे दुभंगू लागतात. छोट्या-छोट्या घटनांना मोठे रूप दिले जाते. एखाद्या पुतळ्याच्या उभारणीच्या किंवा स्थलांतराच्या मुद्द्यावरून भावनिक तणाव निर्माण केला जातो. यामुळे मने दुभंगतात, संशय वाढतो आणि परस्परांवरील विश्वासाची पातळी खालावते. एकदा सामाजिक ऐक्याची वीण उसवली की, ती पुन्हा जोडणे अत्यंत कठीण, कधीकधी अशक्यप्रायच ठरते. ध्रुवीकरणाने निर्माण झालेल्या तिरस्काराच्या भिंती पिढ्यानपिढ्या टिकतात आणि समाजाला दीर्घकाळ कमकुवत करतात.”

प्रार्थनास्थळांसमोर घोषणाबाजी केल्याच्या घटना…
अनधिकृत पुतळ्यांबरोबरच गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक प्रार्थनास्थळांसमोर विशेषतः मशिदींसमोर मिरवणुका नेऊन डीजे वाजवणे, घोषणाबाजी करणे किंवा धार्मिक स्थळांवर झेंडे फडकवणे यावरून तणाव निर्माण झाल्याच्याही अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत.
- जळगाव (पाळधी गाव)
२८ मार्च २०२३ रोजी नमाज सुरू असताना मशिदीबाहेर मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावरून दोन गटांत हाणामारी आणि दगडफेक झाली होती.धार्मिक मिरवणूक मशिदीसमोरून जात असताना मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. मशिदीजवळ गाणी थांबवली आणि ती पुढे गेल्यावर पुन्हा सुरू केली असा पोलिसांचा दावा असला तरी, याच मुद्द्यावरून वाद चिघळून दगडफेक झाली आणि पोलिसांसह काही लोक जखमी झाले.
- पुणे (दौंड/यवत परिसर)
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात काही तरुणांनी एका मशिदीवर भगवा झेंडा लावून तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ऑगस्ट २०२५ मध्ये घडली होती. सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टनंतर सुरू झालेल्या या वादामुळे दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक आणि हिंसक झटापट झाली. या जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज करावा लागला.
- मुंबई (मालाड/मालवणी)
मालाड पूर्व येथील पठाणवाडी परिसरातील 'नूरानी मशिदी'समोर दुपारच्या नमाजच्या वेळी काही तरुण भगवे झेंडे घेऊन आले आणि त्यांनी तिथे घोषणाबाजी केली. २०२५ मध्ये राम नवमीच्या पार्श्वभूमीवर मशिदीसमोर अशा प्रकारे झेंडे घेऊन जाण्यावरून आणि घोषणाबाजी करण्यावरून या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता.
ही कारस्थानं मूलभूत मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी….
धार्मिक असणं आणि धार्मिक असल्याचं स्तोम माजवणं यात फरक आहे, असं मत आनंद शिंतोळे व्यक्त करतात. ते सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत. ते म्हणतात, मी सुद्धा धार्मिक माणूस आहे पण मी कधीच देव धर्म रस्त्यावर घेऊन जात नाही.
बाईमाणूसशी बोलतांना ते म्हणतात की,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा शिक्षण, आरोग्य यांसारखे मूलभूत प्रश्न असतील या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करण्यासाठी लोकांना सतत धार्मिक अस्मितेच्या आणि वादाच्या मुद्द्यामध्ये गुंगवून ठेवलं जातं. गुंतवून ठेवण्यासाठी मिरवणुकांमधून कोणाचे तरी झेंडे नाचवले जातात, कोणाचे तरी पोस्टर किंवा चित्र काढले जातात, नंतर त्याच्यावरून तणाव निर्माण केला जातो.
लोकं शहाणे झालेले सरकारला नको आहेत, म्हणून या मूर्ख आणि बावळट गोष्टींमध्ये लोकांना जाणीवपूर्वक गुंतवून ठेवल्या जात. लोकांनी प्रश्न विचारू नयेत हाच यामागचा अजेंडा असल्याचं ते सांगतात.
मतीन शेख आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेत बाह्य घटकांची भूमिका महत्त्वाची असते.
स्थानिक मुद्द्यांना बाहेरच्या राजकीय पक्ष, संघटना किंवा सोशल मीडिया ट्रोल्सद्वारे जोड देऊन वातावरण अधिक चिघळवले जाते. काहीवेळा हे हस्तक्षेप सूक्ष्म आणि अदृश्य असतात. उदाहरणार्थ, टार्गेटेड व्हायरल पोस्ट्स, फेक न्यूज किंवा बाहेरच्या फंडिंगद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोहिमा. तर कधी हे हस्तक्षेप उघडपणे दिसतात. स्थानिक नेते, कार्यकर्ते किंवा बाहेरच्या संघटनांचे नेते स्थानिक वादात थेट उडी घेतात. यामुळे शांततेचे वातावरण बिघडते, असं शेख यांचं मत आहे.

आनंद शिंतोळे यांच्या मते ह्या सर्व घटना उत्तरेकडील संस्कृती आत्मसात केल्याचा परिणाम आहे. महाराष्ट्र “हिंदुत्वाची” नवीन प्रयोगशाळा बनतोय का..? या प्रश्नावर ते म्हणतात की, प्रयोगशाळा वगैरे नाही, महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी हा गोबरपट्टा झालाय. उत्तरेकडील संस्कृती व्यवस्थित संपूर्ण महाराष्ट्रात शिरकाव केलाय.
त्यांच्या मते, महाराष्ट्रातील कीर्तनकारांना हळूच बाजूला सारून गावखेड्यामध्ये हिंदी भाषिक कथावाचकांचं प्रस्थ निर्माण झालं असून त्यामागे येथील राजकारणी लोकांचा हात आहे. स्थानिक कीर्तनकारांना बाजूला सारून हे हिंदी कथावाचक लाखाच्या सुपाऱ्या घेऊन मंडप उभे करतात, हे मंडप उभे करायला यांना हे राजकारणी मदत करतात.
पुतळे उभारण्यापेक्षा विचार जपणे महत्वाचे…
महाराष्ट्राच्या महान परंपरेत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या महामानवांनी नेहमीच समता, बंधुभाव आणि सामाजिक न्यायावर भर दिला आहे. त्यांचे विचार जपणे म्हणजे केवळ पुतळे उभारणे नव्हे, तर त्यांच्या आदर्शांचे पालन करणे आहे. पुतळे हे केवळ दगड किंवा धातूचे असतात; खरी शक्ती समाजातील मानवी नात्यांमध्ये असते. असं मत मतीन शेख व्यक्त करतात.
आनंद शिंतोळे सुद्धा असंच काहीसं मत व्यक्त करतात. ते म्हणतात, तुम्हाला जर खरोखर महापुरुषांचे आदर्श घ्यायचे असतील लाख दीड लाख रुपये डीजे आणि पुतळ्यांमध्ये घातल्यापेक्षा त्यांच्या नावाने गावामध्ये एक अभ्यासिका उघडा, एक वाचनालय उघडा, पोरांना तिथे वाचनासाठी चांगले पुस्तकं उभे करून द्या.
खरं तर, कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे महापुरुषांचे वांझ गोडवे गाण्यापेक्षा त्यांचा मार्ग अनुसरणे हीच काळाची खरी गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभारले, ते केवळ डोक्यावर नाचवण्यासाठी नाही, तर त्यांच्या विचारांचे बीज डोक्यात रुजवण्यासाठी.
आज चौकाचौकांत अनधिकृत पुतळे उभारून, डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढून आणि धार्मिक तेढ निर्माण करून आपण महापुरुषांचा सन्मान करत नाही आहोत, तर राजकीय स्वार्थासाठी त्यांचे विडंबन करत आहोत. लाखो रुपये खर्चून बेकायदेशीर पुतळे उभे करण्यापेक्षा, त्याच पैशातून गावागावांत महापुरुषांच्या नावाने एखादे वाचनालय, अभ्यासिका उभी राहिली, तर ती खऱ्या अर्थाने रयतेच्या लेकरांना घडवेल.
महाराष्ट्राला उत्तरेकडील राजकारणाची धार्मिक प्रयोगशाळा होण्यापासून वाचवायचे असेल, तर फुले-शाहू-आंबेडकर आणि शिवरायांच्या या पुरोगामी भूमीत पुतळ्यांच्या भिंतींपेक्षा संतांनी दिलेली माणुसकीची शिकवण अधिक घट्ट करावी लागेल. महापुरुषांना दगडाच्या मूर्तीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची ज्योत तरुणांच्या मनात पेटवणे, हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना ठरेल…!






