कोमल ठोंबरे
- समाज आजही महिला खेळाडूंना खेळापेक्षा त्यांचे सौंदर्य, आकर्षण आणि नाजुकपणाशी जोडून पाहतो.
- अनेक प्रशिक्षक, कॉमेंटेटर, सहकारी खेळाडू आणि क्रीडा पत्रकारसुद्धा अनवधानाने याच विचारसरणीची पुनरावृत्ती करतात.
- भारतातील महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत असल्या, तरी त्यांच्या कामगिरीची चर्चा अनेकदा पुरुषांशी तुलना करूनच केली जाते.
कधीकाळी महिलांचे जीवन घराच्या चार भिंतीतच मर्यादित होते. परंतु आधुनिकतेच्या प्रवासात महिलांनी दीर्घ लढा देत आपल्या स्वप्नांसाठी, हक्कांसाठी आणि ओळखींसाठी नवी वाट तयार केली. आज त्या पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून खेळ, मनोरंजन, व्यापार, अंतराळ आणि अनेक क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी करत आहेत. पण प्रश्न असा उरतो की, ज्या क्षेत्रांवर कधी पुरुषांचेच वर्चस्व होते, त्या क्षेत्रांमध्ये महिलांना आपली जागा मिळवणे सहज शक्य झाले का? महिला जेव्हा पुरुषांच्या तोडीस तोड कामगिरी करत पुढे येतात, तेव्हा समाज वारंवार त्यांना त्यांच्या ‘स्त्री’ असल्याची आठवण करून देतो. खेळाचे मैदान हे त्याचे उत्तम उदाहरण. शतकानुशतकं इथे पुरुषांचाच अधिकार राहिला. महिलांनी संघर्ष करून ही भिंत मोडली, परंतु त्यांना समान सन्मान अजूनही सहज मिळत नाही.
समाज आजही महिला खेळाडूंना सौंदर्य, आकर्षण आणि नाजुकपणाशी जोडून पाहतो. ही मानसिकता फक्त घर किंवा समाजापुरती मर्यादित नाही; अनेक प्रशिक्षक, कॉमेंटेटर, सहकारी खेळाडू आणि क्रीडा पत्रकारसुद्धा अनवधानाने याच विचारसरणीची पुनरावृत्ती करतात. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरसोबत घडलेली घटना याचे ताजे उदाहरण. दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतरही पत्रकार परिषदेत त्यांच्या तयारी, रणनीती किंवा धैर्यावर प्रश्न विचारण्याऐवजी त्यांच्या सौंदर्याबद्दल आणि वैयक्तिक नात्यांबद्दल टिप्पणी करण्यात आली.
खेळ बघायला येतात की आमचे कपडे आणि आमचे दिसणे…?
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने तर काही महिन्यांपूर्वी उघडपणे हे बोलून दाखवले होते. १८ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने नेदरलँड्समध्ये झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत वासनांध नजरांचा आणि तशाच प्रकारच्या वागणुकीचा सामना करावा लागल्याचा आरोप केला होता. प्रेक्षकांना महिला बुद्धिबळपटूंच्या खेळापेक्षा त्या कशा दिसतात? कसे कपडे घालतात? कशा वावरतात, त्यांचे केस कसे आहेत यावर लक्ष केंद्रीत करण्यात जास्त रस असतो असं दिव्याने म्हटलं आहे. ती म्हणते की,
“ बुद्धिबळ स्पर्धा सुरु असताना प्रेक्षक ती स्पर्धा किंवा आमचा खेळ गांभीर्याने घेत नाहीत. टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेसाठी मी नेदरलँडला गेले होते. ती स्पर्धा खूप चांगली होती. मी तिथे काही सामने खेळले आणि मला ती स्पर्धा आणि तिथलं आयोजनही आवडलं. मात्र स्पर्धकांनी मला सांगितलं तसंच मीही अनुभव घेतला की प्रेक्षकांना आमचा (महिला बुद्धिबळपटू) खेळ कसा सुरु आहे यापेक्षा माझे कपडे कसे आहेत?, केस कसे बांधले आहेत, तसंच इतर गोष्टी कशा आहेत? यावर लक्ष केंद्रीत करायला आवडतं. जे पुरुष खेळाडू होते त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रेक्षक करत होते. मात्र जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते?, माझे कपडे कुठले आहेत? मी कशी वावरते आहे? याकडे लक्ष देत होते. मी बुद्धिबळ कशी खेळते आहे? याच्याशी त्या प्रेक्षकांना काही घेणंदेणं नव्हतं.”
त्यानंतर दिव्या म्हणाली,
“मी आत्ता जेमतेम १८ वर्षांची आहे. महिलांची प्रगती मोठ्या प्रमाणावर होते आहे. मात्र महिला खेळाडूंना अशा प्रकारच्या दुर्व्यवहार सहन करावा लागतो. कायमच त्यांच्या खेळापेक्षा कपडे, फॅशन आणि इतर गोष्टींवर चर्चा केली जाते. महिला खेळाडूंचं मोठ्या प्रमाणावर कौतुकही होत नाही. त्यांच्याबद्दल वाईटच बोललं जातं. मी जेव्हापासून खेळ खेळू लागले आहे तेव्हापासून मी अशा वाईट नजरांचा आणि तिरस्काराचा सामना जास्त केला आहे. महिला बुद्धिबळपटू असोत किंवा अॅथलिट असोत त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे”
हे केवळ त्यांच्या यशाचे अवमूल्यन नव्हते, तर माध्यमांमध्येही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्याप पुरुषसत्ताक चौकटीतच आहे हेच याचून सिद्ध झाले. भारतातील महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत असल्या, तरी त्यांच्या कामगिरीची चर्चा अनेकदा पुरुषांशी तुलना करूनच केली जाते. अशा तुलना महिलांना समानतेच्या पातळीवर न ठेवता दुसऱ्या दर्जावर ढकलतात.
महिला खेळाडू आणि पुरुषसत्ताक कॉमेंट्री
खेळांच्या कॉमेंट्रीची भाषा हा देखील या संदर्भातील महत्वाचा मुद्दा आहे. महिलांच्या खेळाचे वर्णन अनेकदा पुरुषी शब्दांनी केली जाते, जणू ताकद, आक्रमकता किंवा रणनीती ही नैसर्गिकरित्या पुरुषांचीच वैशिष्ट्ये आहेत. महिला क्रिकेट संघाच्या विजयाला “पुरुषांसारखी आक्रमकता” असे म्हटले जाते. एक संशोधन दाखवते की खेळातील भाषेत महिलांना ‘सुंदर आणि नाजूक’ असे वर्णन केले जाते, तर पुरुषांना ‘शक्तिशाली आणि रणनीतिक’. भारतीय संदर्भात ही समस्या आणखी तीव्र आहे.
2023 महिला टी–20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शेफाली वर्माच्या आक्रमक जल्लोषावर प्रश्न उपस्थित झाले, कारण एका महिलेकडून अशी तीव्र भावनांची अपेक्षा नसल्याची समाजाची मानसिकता आहे. सानिया मिर्झाला वारंवार कुटुंब आणि मातृत्वासंबंधी प्रश्न विचारले जातात, जे पुरुष खेळाडूंना कधीही विचारले जात नाहीत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभवानंतर दीपिका कुमारीला ‘हीरोइन ते व्हॅम्प’ अशा टिप्पण्यांचा सामना करावा लागला. एका अभ्यासानुसार भारतीय वृत्तपत्रांमध्ये महिला खेळाडूंबाबतच्या 60 टक्के बातम्या त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या शारीरिक स्वरूपावर केंद्रित असतात.
मीडियामध्ये महिल खेळाडूंचे स्थान
महिला खेळाडूंना कमी मिळणाऱ्या माध्यम कव्हरेजमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. यूनेस्कोच्या अहवालानुसार, जगभरातील खेळाडूंमध्ये जवळपास 40 टक्के महिला असल्या तरी त्यांना एकूण स्पोर्ट्स मीडिया कव्हरेजपैकी फक्त 4 टक्केच जागा मिळते. या मर्यादित कव्हरेजमध्येही महिलांचे वस्तुकरण केले जाते किंवा त्यांना कमी लेखले जाते. एका अभ्यासानुसार 2017 पर्यंत देशातील एक तृतीयांश लोकांना भारताची महिला क्रिकेट टीम आहे हेही माहिती नव्हते. 90 टक्के लोकांना महिला संघाच्या कर्णधाराचे नावही ठाऊक नव्हते. महिला विश्वचषक 2017 मधील हरमनप्रीत कौरच्या विलक्षण खेळीनंतरच अचानक महिला क्रिकेटला माध्यमांमध्ये जागा मिळाली; त्याआधी तर बहुतेक सामने प्रसारितही होत नव्हते.
विनेश फोगाट यांच्या क्रीडा कौशल्यापेक्षा त्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाचीच माध्यमांमध्ये चर्चा जास्त झाली. महिलांकडे “महिला म्हणून” पाहण्याचा दृष्टिकोन इतका खोल रुजला आहे की अनेकदा त्या खेळाडू म्हणून न दिसता पहिल्यांदा “स्त्री” म्हणूनच आकलन केल्या जातात. पुरुष क्रिकेटर कोट्यवधी रुपये कमावत असताना महिलांना तुलनेने अत्यल्प मानधन मिळते. त्यांना स्वतःच विचारावे लागते की त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्याचे मूल्य त्यांच्या हाती का नाही.

ही कहाणी त्या महिला खेळाडूंची आहे ज्या मैदानावर विजयी होत असल्या, तरी भाषेच्या बाबतीत, ट्रोलिंगमध्ये आणि वागणुकीत मात्र पराभव सहन करत आहेत. 2003 च्या क्रिकेट विश्वचषकात अँकर मंदिरा बेदी यांना पुरुष सहकाऱ्यांकडून वारंवार ‘फक्त शोभेची बाहुली’ म्हणून हिणवले गेले. काही खेळाडू त्यांच्या दिसण्यावर टिप्पणी करत, तर काही त्यांच्या प्रश्नांना कमी लेखत. 2023 मध्ये हरभजन सिंह यांनी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांच्या क्रिकेटसमजावर केलेल्या टिप्पणीही लिंगभेदीच होत्या. महिला टी–20 विश्वचषकात भारताचा पराभव झाल्यावर महिला खेळाडूंना सोशल मीडियावर “स्वयंपाकघरात परत जा” अशा टिप्पण्यांचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या एका टीव्ही शोवरील लैंगिक टिप्पण्यांनंतर BCCI ला कारवाई करावी लागली, पण हे फक्त वरवरचे समाधान होते.
४९ टक्के मुली किशोरावस्थेतच खेळ सोडतात
या सर्व व्यवहारांचे परिणाम गंभीर असतात. यूनेस्कोच्या संशोधनानुसार 49 टक्के मुली किशोरावस्थेत खेळ सोडतात आणि 21 टक्के महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात लैंगिक हिंसेचा धोका असतो. 2024 च्या एका अहवालानुसार महिला क्रिकेट संघावर होणारी टीका पुरुष संघाच्या तुलनेत अधिक सेक्सिस्ट स्वरूपाची असते.
तरीही बदलाची काही चिन्हे दिसत आहेत. BCCIची कारवाई, सानिया मिर्झासारख्या खेळाडूंची निर्भीड मते, आणि मनू भाकर ते शेफाली वर्मापर्यंत अनेकांनी उचललेला आवाज हा बदलाचा पहिला टप्पा आहे. खरा बदल भाषा बदलण्यात आहे. संशोधक सांगतात की सेक्सिझम दोन प्रकारचा असतो, एक उघड आणि अपमानजनक, आणि दुसरा सौम्य स्वरूपात, कौतुकाच्या नावाखाली महिलांना पारंपरिक भूमिकांमध्ये बंदिस्त करणारा.
खेळांच्या कॉमेंट्रीमध्ये हा दुसरा प्रकार फारच दिसतो. कॉमेंट्री फक्त शब्दांचा खेळ नसतो; त्याचा थेट परिणाम प्रेक्षकांच्या धारणा, मीडिया कव्हरेज, ब्रँड मूल्य, स्पॉन्सरशिप आणि अखेरीस खेळाडूंच्या करिअरवर होतो. जेव्हा महिला खेळाडूंची प्रतिमा त्यांच्या खेळाच्या गुणवत्तेऐवजी त्यांच्या वैयक्तिक जीवनावर किंवा स्वरूपावर आधारित दाखवली जाते, तेव्हा त्यांचे श्रम, त्यांची क्षमता आणि त्यांची मेहनत मागे पडते.
बदल कसा होईल?
महिला खेळाडूंच्या वाढत्या यशाला समाजमान्यता मिळण्यासाठी वैयक्तिक प्रयत्नांबरोबरच धोरणात्मक पातळीवरही गंभीर बदल आवश्यक आहेत. माध्यमांनी महिला स्पोर्टसला केवळ उत्सवाच्या किंवा भावनिक क्षणांच्या चौकटीत न मांडता पुरुष क्रीडेसारखेच सातत्यपूर्ण, विश्लेषणात्मक आणि दर्जेदार कव्हरेज देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी समतोल प्रसारण, संवेदनशील भाषेचा वापर आणि लैंगिक पूर्वग्रह टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार व्हायला हवीत.
त्याचबरोबर महिला खेळाडूंना उपलब्ध सुविधा प्रशिक्षण, तज्ज्ञ स्टाफ, सुरक्षितता प्रणाली, पायाभूत सुविधा यांमध्ये ठोस गुंतवणूक होणे आवश्यक आहे. समान मेहनतीसाठी समान आर्थिक संधी दिल्या तर महिला खेळाडूंना फक्त “यशस्वी अपवाद” म्हणून नव्हे, तर मुख्य प्रवाहातील क्रीडायोद्धा म्हणून ओळख मिळेल. शासन, क्रीडा संघटना आणि प्रसारमाध्यमे या तिन्ही स्तंभांकडून धोरणात्मक बांधिलकी मिळाल्यास समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गतीही अधिक वेगवान होईल.

विराट कोहली, नीरज चोप्रा यांनी घालून दिले आदर्श
याच प्रक्रियेत पुरुष सहकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण क्रीडांगणावर पुरुष खेळाडूंचा आदर आणि स्वीकार हा बाहेरील समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रभाव टाकतो. अलीकडच्या काळात विराट कोहली, नीरज चोप्रा आणि अनेक वरिष्ठ खेळाडूंनी महिला खेळाडूंना दिलेले खुलेपणाने केलेले कौतुक आणि समर्थन हे फक्त औपचारिक नव्हे, तर खेळातील कौशल्याला लिंगापलीकडे जाऊन मान्यता देणारे ठरते. अनेक अकॅडमी आणि संघांमध्ये पुरुष प्रशिक्षक आणि वरिष्ठ सहकारी महिला खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन देताना त्यांना “मुलगी खेळाडू” म्हणून नव्हे, तर “समकक्ष स्पर्धक” म्हणून स्वीकारतात. या सहकार्यामुळे केवळ विश्वास वाढत नाही, तर एक सकारात्मक क्रीडा संस्कृती निर्माण होते जिथे महिला क्रीडा ‘अपवाद’ म्हणून नव्हे, तर ‘मानक’ म्हणून उभी राहते. पुरुषांचा हा बदलता दृष्टीकोन समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो. खेळाचा पाया कौशल्यात आहे, लिंगाच्या सीमारेषेत नाही.
या परिस्थितीत बदल घडवण्याची जबाबदारी फक्त खेळाडूंवर नाही. मीडिया हाउस, क्रीडा संघटना आणि प्रेक्षक या सर्वांनी भूमिका बजावणे आवश्यक आहे. माध्यमांनी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, थेट प्रसारणाच्या प्रशिक्षणात लैंगिक जागरूकता अनिवार्य करावी, आणि कॉमेंट्री टीममध्ये महिलांचा व विविध पार्श्वभूमीतील लोकांचा समावेश वाढवावा. समाजात मीडिया साक्षरता वाढवल्यास हे पूर्वग्रह मोडण्यास मदत होऊ शकते.






