विठ्ठल साबळे
- महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ भक्तीची नव्हे, तर समाजप्रबोधन आणि समतेची चळवळ राहिली आहे;
- कीर्तनाच्या मंचावरून उमटणारी वादग्रस्त वक्तव्ये, त्यातून निर्माण होणारा तणाव आणि काही धक्कादायक घटना यामुळे या पवित्र परंपरेचं रूप बदलतंय का,
- भक्तीचा संदेश देणारं हे व्यासपीठ आज विचारसरणी, प्रभाव आणि वादाचं साधन बनत चाललं आहे का? याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न….
महाराष्ट्राची संतपरंपरा ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या विचारातून उभी राहिलेली वारकरी परंपरा समतेचा, नैतिकतेचा आणि भक्तीचा संदेश देणारी होती. या परंपरेत कीर्तन हे लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम ठरलं. गावोगावी फिरून कीर्तनकारांनी समाजाला दिशा दिली, अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठवला आणि नैतिकतेची जाणीव करून दिली. त्यामुळे कीर्तनकार हा केवळ कलाकार नव्हता, तर समाजाचा मार्गदर्शक म्हणून पाहिला गेला.
ही परंपरा विश्वासावर उभी होती. कीर्तनकार बोलला की ते अंतिम मानलं जायचं. समाजाने त्यांना आदर्श मानलं. पण बदलत्या काळात या परंपरेच्या स्वरूपात सूक्ष्म पण गंभीर बदल होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं आहे. आज कीर्तनाचा मंच हा केवळ भक्तीचा राहिलेला नसून, काही ठिकाणी तो वाद, विचारसरणी आणि प्रभाव टाकण्याचं साधन बनत चालल्याची टीका होत आहे. यामुळेच हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.. की कीर्तन परंपरेला खरंच ग्रहण लागलं आहे का?
कीर्तनातील बदलते सूर आणि वादग्रस्त वक्तव्यांची एंट्री
गेल्या काही काळात कीर्तनाच्या मंचावरून उमटणारे सूर बदलत चालल्याचं चित्र दिसू लागलं आहे. भक्ती आणि समाजप्रबोधनाच्या चौकटीत राहणाऱ्या या परंपरेत आता आक्रमक भाषा, राजकीय संदर्भ आणि वादग्रस्त वक्तव्यांची भर पडताना दिसते. अलीकडील काही घटनांनी हा बदल अधिक ठळकपणे समोर आणला आहे.
अलीकडेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनांमधून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला. कीर्तनाच्या मंचावरून बोलताना त्यांनी ‘पुढील काळात नथुराम गोडसेसारखं व्हावं लागेल, असं झालंच पाहिजे’ असे विधान केल्याचा आरोप आहे.... या विधानानंतर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आणि हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. याशिवाय “हम दो हमारे दो बंद करा, चार-पाच मुलं होऊ द्या, त्यातील एक तरी क्रांतिकारी बनेल” असं म्हणत त्यांनी लोकसंख्येबाबतही वादग्रस्त भूमिका मांडली.
कीर्तनाच्या व्यासपीठावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अलीकडेच संग्राम बापू भंडारे चर्चेत
तसेच “छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की शत्रू मोजण्याआधी आपल्या घरातील गद्दार शोधा” असे वक्तव्य करत त्यांनी थेट राजकीय संदर्भ जोडत काँग्रेसवर निशाणा साधल्याचंही दिसून आलं. इतकंच नव्हे, तर औरंगजेबाची कबर उखडण्याबाबत आणि काही राजकीय नेत्यांना अप्रत्यक्ष इशारे देणारी वक्तव्येही त्यांच्या कीर्तनातून पुढे आली. या सर्व विधानांमुळे कीर्तनाचा मंच हा केवळ धार्मिक किंवा समाजप्रबोधनाचा राहिलेला नसून तो राजकीय, वैचारिक आणि आक्रमक भूमिकांचा प्रचार करण्यासाठी वापरला जात असल्याची टीका होत आहे. या प्रकरणाने कीर्तनातील भाषेची मर्यादा, जबाबदारी आणि त्याचे सामाजिक परिणाम यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
वक्तव्यांपासून हिंसेपर्यंत
या प्रकारांमुळे कीर्तनाच्या मंचावर उच्चारले जाणारे शब्द आता समाजात थेट प्रतिक्रिया निर्माण करू लागले आहेत, आणि काही ठिकाणी त्या प्रतिक्रियांनी हिंसक वळण घेतल्याचंही दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गांधेली गावातील कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर हे कीर्तनादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी आले. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी काही विशिष्ट गोष्टी टाळाव्यात या पारंपरिक समजुतींचा संदर्भ देत त्यांनी एका महिलेच्या कृतीवर टीका करणारे वक्तव्य केलं..आणि या वक्तव्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि संतप्त जमावाने थेट त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या वेळी घरात कुटुंबीय उपस्थित असताना हा प्रकार घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
निवृत्ती महाराज वाडेकर यांच्यावर संतप्त जमावाकडून घरात घुसून मारहाण...
विशेष म्हणजे, वाद वाढल्यानंतर वाडेकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी व्यक्त केली होती, तरीही जमावाचा रोष कमी झाला नाही. या संपूर्ण घटनेतून एक गंभीर बाब समोर येते की, कीर्तनाच्या मंचावरून केलेल्या वक्तव्यांचा परिणाम आता थेट सामाजिक तणाव आणि हिंसेपर्यंत पोहोचत आहे...कीर्तनाच्या मंचावरील शब्दांचा परिणाम आता अधिक तीव्र स्वरूपात समोर येताना दिसत आहे.
नैतिकतेला धक्का कीर्तनकाराचं गैर कृत्य
कीर्तनातील वाद आणि त्यातून निर्माण होणारे तणाव हे एक बाजू असली, तरी काही घटनांनी या परंपरेच्या नैतिक आधारालाच हादरा दिल्याचं चित्र दिसतं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे घडलेलं कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांचं प्रकरण हे किर्तन परंपरेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारे ठरलं. पोलिसात दाखल तक्रारीनुसार या कीर्तनकाराने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षापासून ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं. पीडित मुलगी लहान असतानाच आरोपीने तिला धमकावत आणि भीती दाखवत गप्प ठेवण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याचे धमक्या दिल्यामुळे ते दीर्घकाळ कोणालाही सांगू शकली नाही...
कीर्तनकार यशवंत थोरात उर्फ गुंजाळ यांच्यावर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे आरोप....
मात्र १० मार्च २०२६ रोजी या अत्याचाराने अत्यंत गंभीर स्वरूप घेतलं, जेव्हा आरोपीने तिला जबरदस्तीने बोलावून घेतलं आणि अमानुष पद्धतीने छळ करत गरम केलेल्या लोखंडी सळईने तिच्या शरीरावर चटके दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. एवढंच नव्हे, तर तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याचाही समोर आलं आहे. या क्रूर अत्याचारामुळे पीडितेची प्रकृती बिघडली आणि अखेर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. मात्र समाजाला नैतिकतेचे आणि संस्कारांचे धडे देणाऱ्या कीर्तनकाराकडूनच अशा प्रकारचे कृत्य झाल्याने ही बाब अत्यंत धक्कादायक ठरत असून, यामुळे केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण कीर्तन परंपरेवरच कलंक लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘बाई माणूस’शी बोलताना वारकरी संप्रदायातील ह.भ.प. शिवचरित्रकार व समाजप्रबोधनपर कीर्तनकार सुसेन महाराज नाईकवाडे सांगतात की,
कीर्तन परंपरेचं स्वरूप बदलत चाललं आहे, हे आता सर्वांनाच दिसत आहे. त्यांच्या मते, या क्षेत्रात अनुभव नसलेल्या आणि योग्य पात्रता नसलेल्या लोकांची वाढती एंट्री हा एक मोठा प्रश्न आहे. ज्यांना कीर्तनाचा अधिकार नाही, अनुभव नाही, असे लोक या क्षेत्रात येऊ लागले आहेत, त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असं त्यांनी नमूद केलं. कीर्तनाचा वापर राजकीय प्रभावासाठी होत असल्याच्या टीकेवर ते म्हणाले, कीर्तनाचा वापर राजकारणासाठी होऊच नये. कुठल्याही नेत्याची स्तुती करण्यासाठी कीर्तन नसतं; कीर्तन हे भगवंताची स्तुती आणि समाजप्रबोधनासाठी असतं. याचबरोबर त्यांनी कीर्तनकारांबद्दल असलेल्या पारंपरिक विश्वासालाही तडा जात असल्याचं मान्य केलं. अलीकडच्या घटनांमुळे लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, हे वास्तव आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी कडक नियमांची गरज व्यक्त केली. या क्षेत्रातील वरिष्ठ आणि अनुभवी मंडळींनी एकत्र येऊन नियम घालणं गरजेचं आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते, असंही त्यांनी सांगितलं..
वाढते वाद आणि बदलतं चित्र
2024 ते 2026 या कालावधीत राज्यभरात कीर्तनाशी संबंधित किमान 4 ते 6 वादग्रस्त घटना चर्चेत आल्या आहेत. त्यामध्ये किमान दोन हल्ल्याचे प्रकार, एक हत्या प्रकरण आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. जरी सुमारे 65 ते 70 टक्के कीर्तन अजूनही पारंपरिक स्वरूपात होत असले, तरी उर्वरित 30 ते 35 टक्के कार्यक्रमांमध्ये बदल स्पष्ट दिसतो. ही आकडेवारी दाखवते की बदल अजून पूर्ण झालेला नाही, पण त्याची दिशा स्पष्ट आहे.
‘बाईमाणूस’शी बोलताना कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील सांगतात की,
काही व्यक्तींच्या कृत्यांमुळे संपूर्ण कीर्तन परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही. फक्त वेष परिधान करून आणि कीर्तन केलं म्हणून व्यक्तीची वृत्ती बदलत नाही, कीर्तन क्षेत्रात कोणतीही अधिकृत पात्रता किंवा ठोस नियम नसल्यामुळे कोणतीही व्यक्ती सहज प्रवेश करू शकते, हीदेखील एक गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, कीर्तनाचा मंच हा आदराचा आणि जबाबदारीचा व्यासपीठ असून, प्रत्येक कीर्तनकाराने विचारपूर्वक आणि संयमाने बोलणं आवश्यक आहे.
याचबरोबर, कीर्तनाचा राजकीय वापर होत असल्याच्या टीकेवर त्यांनी भिन्न भूमिका मांडली. काही वेळा सामाजिक किंवा धार्मिक भावना तीव्र झाल्यावर वक्त्यांकडून आवेशात वक्तव्ये होतात, मात्र त्याचा थेट राजकीय अजेंड्याशी संबंध जोडणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कीर्तन परंपरा कालही चांगली होती, आजही आहे आणि भविष्यातही तशीच राहील, काही व्यक्तींच्या चुकीमुळे संपूर्ण परंपरेचं अवमूल्यन करता कामा नये, तसेच, समाजालाही जागरूक राहण्याचं आवाहन करत संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या विचारांवर विश्वास ठेवावा आणि भोंदूगिरीपासून दूर राहावं, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यांच्या मते, कीर्तन ही एक कला असून ती संतत्वाचं प्रतीक नाही; त्यामुळे व्यक्ती आणि परंपरा यामधला फरक ओळखणं अत्यंत गरजेचं आहे....

या बदलामागे प्रोपगंडा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरतो. प्रोपगंडा म्हणजे एकतर्फी माहिती देऊन लोकांच्या विचारांवर प्रभाव टाकणं. काही कीर्तनांमध्ये विशिष्ट विचारसरणीचा प्रचार केला जातो. कीर्तन हे लोकांपर्यंत थेट पोहोचणारं प्रभावी माध्यम असल्याने, त्याचा वापर विचार पसरवण्यासाठी केला जात असल्याचं दिसतं. यामुळे कीर्तनाचा मूळ उद्देश समाजप्रबोधन यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.
विचारप्रचाराचा प्रभाव आणि कीर्तन मंचाचा बदलता वापर
ध्रुवीकरण हा या प्रक्रियेचा आणखी एक परिणाम आहे. काही कीर्तनांमधील वक्तव्यांमुळे समाजात “आपण विरुद्ध ते” अशी विभागणी निर्माण होत असल्याचं दिसतं. लोक दोन गटांमध्ये विभागले जात आहेत आणि संवादाऐवजी संघर्ष वाढत आहे. कीर्तन हे समाजाला एकत्र आणण्याचं माध्यम असताना त्याच माध्यमातून विभागणी होत असेल, तर ती गंभीर बाब आहे.
कीर्तनाचं बदलतं अर्थकारण
या बदलामागे अर्थकारणाचाही मोठा वाटा आहे. आजच्या काळात कीर्तन हे मोठं व्यासपीठ बनलं आहे. सोशल मीडियामुळे कीर्तनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. अंदाजे 50 ते 60 टक्के कीर्तनाचे क्लिप्स विविध प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसतात. प्रसिद्धी मिळाल्यास अधिक कार्यक्रम मिळतात, आणि त्यामुळे मानधनही वाढतं. या सगळ्यामुळे काही ठिकाणी भडक आणि वादग्रस्त विषयांना प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसतं.
लोकांच्या धारणा देखील बदलताना दिसत आहेत. सुमारे 50 ते 55 टक्के लोक अजूनही कीर्तनकारांवर विश्वास ठेवतात, परंतु 25 ते 30 टक्के लोक संभ्रमित अवस्थेत आहेत आणि 10 ते 15 टक्के लोकांचा विश्वास कमी होत असल्याचं चित्र आहे.. पण ही आकडेवारी दाखवते की विश्वास अजून पूर्णपणे ढासळलेला नाही, पण त्याला तडा जाऊ लागला आहे.
विचारसरणीचा संघर्ष
या सगळ्या पार्श्वभूमीवर "वारकरीमध्ये धारकरी घुसू लागले” हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो. पारंपरिक वारकरी परंपरा ही समतेवर आधारित आहे, परंतु काही ठिकाणी आक्रमक आणि कट्टर विचारांची एंट्री होत असल्याचं दिसत आहे. हा बदल केवळ स्वरूपाचा नसून विचारसरणीचा आहे, आणि त्यामुळे तो अधिक गंभीर होत आहे.

सध्याची कीर्तन परंपरा ही एका संक्रमणाच्या टप्प्यावर उभी आहे. एका बाजूला पारंपरिक मूल्यं आहेत, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक प्रभाव, राजकारण आणि प्रपोगेंडा आहे. या दोन प्रवाहांमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष भविष्यात कोणत्या दिशेने जाईल, यावर कीर्तन परंपरेचं भविष्य अवलंबून आहे.
कीर्तन ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. परंतु सध्याच्या घटनांवरून असे दिसते की ही परंपरा एका महत्त्वाच्या वळणावर आहे. या परंपरेचं मूळ स्वरूप जपण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. अन्यथा, भक्तीचा हा मंच वाद आणि संघर्षाचं केंद्र बनण्याची भीती नाकारता येणार नाही. जिथे अभंगातून समतेचा संदेश घुमत होता, तिथे आता वाद, विचारसरणी आणि संघर्षाचे सूर ऐकू येत आहेत. “आणि म्हणूनच हा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतो की कीर्तन परंपरेला खरंच ग्रहण लागलं आहे का?”






