Skip to main content

‘’मोहोर तर भरपूर आला, पण हापूस आंब्याची चव काही चाखता आली नाही…’’

Sanjana Khandare
15 May 2026
49 views
‘’मोहोर तर भरपूर आला, पण हापूस आंब्याची चव काही चाखता आली नाही…’’

संजना खंडारे


  • अवकाळी पाऊस, वाढते तापमान, गारपीट आणि बदलत चाललेले ऋतूचक्र यामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.


  • सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोहोर काळा पडून गळाला, तर उत्पादन घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.


  • कोकणातील हापूस आणि काजू उत्पादनावर हवामान बदलाचा नेमका किती परिणाम होतोय? उत्पादन घटल्याने स्थानिक अर्थव्यवस्था, मजूर, निर्यात आणि कोकणच्या पारंपरिक आंबा संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत? या प्रश्नांचा वेध घेणारा ‘बाईमाणूस’चा हा ग्राउंड रिपोर्ट.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मिठबाव गावात सकाळच्या वेळी आंब्याच्या बागेतून चालताना जमिनीवर काळपट पडलेला मोहोर दिसतो. काही झाडांवर तुरळक आंबे लटकताना दिसतो, तर अनेक फांद्या रिकाम्याच दिसतात. “यंदा मार्चमध्ये झाडांना मोहोर इतका आला होता की बाग भरून गेल्यासारखी वाटत होती,” सिंधुदुर्गमधील पूजा कदम सांगते. “पण अचानक वातावरण बदललं. ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट… आणि काही दिवसांत सगळा मोहोर काळा पडला. जसं काही करपून गेल्यासारखं.” तिच्या आवाजातली निराशा लपून राहत नाही. पूजाच्या मिठबाव मध्ये आंब्याच्या बागा आहेत. 


कोकणातला हापूस आंबा हे केवळ फळ नाही. तो इथल्या घरांचा आधार आहे. वर्षभराची कमाई, मुलांचं शिक्षण, घरखर्च सगळं काही या हंगामावर अवलंबून असतं. मात्र बदलत्या हवामानामुळे आता आंबा बागायतदारांमध्ये अनिश्चितता वाढू लागली आहे. पूर्वीसारखी थंडी राहत नाही, ऋतूचक्र बदलतंय आणि त्यातच वाढते विकास प्रकल्प, जंगलतोड आणि बांधकामांमुळे स्थानिक वातावरणावर परिणाम होत असल्याची भावना अनेक स्थानिक व्यक्त करतायेत. त्यामुळे यावर्षी  आंबा आणि काजू उत्पादन घटल्याने कोकणातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.


User Image


नुकसानभरपाईच्या मागणीसाठी वर्षा निवासस्थानावर मोर्च्याचा प्रयत्न


अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादनाला मोठा फटका बसल्यानंतर आता बागायतदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नुकसानभरपाई, पीक विमा आणि बागायती पिकांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज (१५ मे) हजारो आंबा आणि काजू उत्पादकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. कोकणातील विविध भागांतून शेतकरी या मोर्च्यात सहभागी होणार होते. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष या राजकीय पक्षांनीही मोर्च्याला आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्च्याला परवानगी नाकारली आणि हजारो आंबा उत्पादक, विरोधी पक्षाच्या नेत्यांची मंबईत धडपकड केली.


यंदा हिवाळ्यातील बदलते तापमान, मोहराच्या  काळात पडलेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक भागांत मोहोर काळा पडून गळाला, तर काही ठिकाणी उत्पादन कमी झाले. उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून बाजारपेठ, निर्यात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. 


‘कोकणातील शेतकऱ्यांनी गेल्या पन्नास वर्षात सरकारपुढे हात पसरले नाहीत’


दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आंबा व काजू बागायतदार व्यापारी महासंघाचे मुख्य प्रवक्ते गणेश गावकर यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षापासून आंबा उत्पादक कर्जात अडकत आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी गेल्या पन्नास वर्षात कधीच सरकारपुढे हात पसरले नव्हते. गेल्या वर्षी थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला. थ्रिप्स हा कीटक आहे जो मिरचीवर जास्त प्रमाणात असतो आणि त्याचा आता आंब्यावरही हल्ला वाढायला लागले आहे. थ्रिप्स गेल्या वर्षी महागडी फवारणी करूनही नियंत्रणात आला नाही. त्याच्यामुळे ३० ते ३५ टक्के नुकसान झाले. पिवळ्या रंगाची फळमाशी असते. ती आंब्याला दंश करते आणि आंबा सडवून टाकते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याच्यावर कृषी विभागाने ट्रॅप बागेत लावण्याची सूचना दिली.परंतु त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा नाही. यावर्षी अतिप्रमाणात थंडी असल्यामुळे धुक्याचे प्रमाण वाढल्याने दवाचे प्रमाण वाढले. परिणामी मोहराला बुरशी झाली. औषधाचा उपाय झाला नाही आणि मोहोर करपून गेला आणि फळ आले नाही.


यावर्षीच्या हंगामात हवामानबदलामुळे कोकणातील आंबा – काजू या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या शेतकऱ्यांचे ९० टक्के तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. आंब्याशिवाय काजू,सुपारी अशा सर्व उत्पादनाला फटका बसला आहे, अशी खंत गणेश गावकर यांनी व्यक्त केली आहे.


“मोहर आला, पण सगळं करपून गेलं” 


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू उत्पादनाला मोठा फटका बसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. शुभांगी गोलवे ह्या रत्नागिरी मधील RSCD च्या कार्यकर्ता आहेत. ‘बाईमाणूस’शी बोलतांना त्यांनी सांगितले,


"गेल्या वर्षीपेक्षा यंदा आंबा आणि काजूला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे उत्पादन वाढेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र फुलोऱ्यानंतर अचानक ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि दोनदा पडलेल्या गारपिटीमुळे हा मोहोर काळा पडून करपल्यासारखा झाला. परिणामी उत्पादन कमी झालं. खत, फवारणी आणि मजुरीवर खर्च करूनही अनेक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले नाही. उत्पादन घटल्याने बाजारात आंबा आणि काजूचे दर वाढले असले तरी स्थानिक बागायतदारांकडे विक्रीसाठी पुरेसा माल नसल्याचे चित्र आहे. काही भागांत देवगड हापूसच्या नावाने बाहेरील आंबे विकले जात आहेत. दरम्यान, नुकसानभरपाईसाठी तहसील स्तरावर पंचनामे आणि कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्यक्ष मदत काही झाली नसल्याने बागायतदारांमध्ये नाराजी आहे." 


User Image


उत्पादन घटलं, दर वाढले

यंदा कोकणात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हापूसच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात ज्या बागायतदारांकडे मागील वर्षी ५०० ते ६०० पेट्यांचं उत्पादन होत होतं, तिथे यंदा अनेक ठिकाणी केवळ ५० ते १०० पेट्यांपर्यंतच उत्पादन झाल्याचं चित्र आहे. परिणामी बाजारात आंब्याची आवक कमी झाली आणि मागील काही वर्षांत ८०० ते १२०० रुपयांना मिळणारी हापूसची पेटी यंदा २००० ते ३५०० रुपयांपर्यंत पोहोचली, तर काही ठिकाणी दर्जेदार निर्यातक्षम हापूसला ४००० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. उत्पादन घटल्यामुळे मुंबई, पुणे आणि वाशी APMC बाजारातील आवक कमी झाली असून निर्यातीवरही त्याचा परिणाम झाला आहे. 

कोकणात सुमारे १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड केली जाते, जे भारताच्या एकूण आंबा लागवड क्षेत्राच्या सुमारे ७.२८ टक्के आहे. मात्र येथे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर सुमारे २२०० किलो इतकंच राहते. हा भाग ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात जवळपास २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड होते आणि सरासरी उत्पादकता सुमारे ७२०० किलो प्रति हेक्टर इतकी आहे. भारतातील एकूण आंबा उत्पादनापैकी जवळपास एक चतुर्थांश उत्पादन उत्तर प्रदेशातून येतं. अशा परिस्थितीत कोकणातील घटलेलं उत्पादन केवळ स्थानिक बाजारपेठेलाच नाही, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीला देखील मोठा फटका देत आहे.


या आहेत आंबा उत्पादकांच्या मागण्या…


  • आंबा उत्पादनाला १ हेक्टरी ५ लाख रुपये तर काजू उत्पादनाला हेक्टरी ३ लाख रुपये भरपाई मिळावी. 
  • आंब्याच्या एका कलमाला कमीत कमी ५ हजार आणि आणि काजूच्या एका कलमाला ३ हजार रुपये शासनाने दिले पाहिजे. कारण एका कलमाच्या मशागतीला जवळपास ५ हजार खर्च येतो. 
  • सरकारने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील चौदा जिल्ह्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोकणातील जिल्ह्यांनाही कर्जमाफी दिली पाहिजे. 
  • नियमानुसार ३१ जून नंतर कर्ज थकीत होते.त्यानंतर शासनाची कर्जमाफी लागू होणार आहे. कोकणातील शेतकऱ्याचे कर्ज जास्त प्रमाणात थकित नसते. त्यामुळे आमचे चालू वर्षाचे कर्ज तरी माफ करावे. 
  • उत्पादनाला योग्य हमीभाव मिळावा अशी आमची मागणी आहे. गोवा सरकार काजूला २०० रुपयांचा हमीभाव देते आहे तसाच निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा.


अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उद्ध्वस्त होत चाललेली बागायती 


हवामान बदलाचा परिणाम आता कोकणातील आंबा आणि काजू उत्पादनावर थेट दिसू लागला आहे. पूर्वी ठराविक ऋतूचक्रानुसार चालणारे वातावरण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. डिसेंबर-जानेवारीत पडणारी थंडी कमी झाली आहे, तर अचानक वाढणारे तापमान, अवकाळी पाऊस आणि वाढती आर्द्रता यामुळे आंबा व काजू पिकांचे नैसर्गिक चक्र विस्कळीत होत आहे.


हापूस आंब्यासाठी थंड वातावरण आणि कोरडी हवा महत्त्वाची मानली जाते. मात्र यंदा हिवाळा अपेक्षेइतका थंड न राहिल्याने अनेक भागांत मोहर उशिरा आला. काही ठिकाणी मोहर आल्यानंतर अवकाळी पावसाने त्याचे मोठे नुकसान केले. पावसामुळे फुलांवर बुरशी आणि कीड वाढली, तर अनेक झाडांवरील मोहर गळून पडला. परिणामी फळधारणा कमी झाली. ज्या झाडांवर आंबे टिकले, त्यांच्यावरही काळे डाग, आकारातील असमानता आणि अकाली गळती यांसारख्या समस्या दिसल्या. त्यामुळे उत्पादन घटलेच, शिवाय निर्यातीसाठी लागणारा दर्जाही कमी झाला.


User Image


काजू उत्पादनालाही याच बदलांचा फटका बसत आहे. काजूला फुलोऱ्याच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. मात्र वातावरणातील आर्द्रता वाढल्याने फुलांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. अचानक पडणाऱ्या पावसामुळे काजूचा मोहोर खराब झाला आणि उत्पादनात घट झाली. अनेक बागायतदारांना अतिरिक्त फवारण्या कराव्या लागल्या, त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.


कोकणातील अनेक बागायतदार सांगतात की, पूर्वी ऋतूंचा अंदाज बांधता येत होता; आता हवामान पूर्णपणे अनिश्चित झाले आहे. “फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पाऊस आणि एप्रिलमध्ये ढगाळ वातावरण” अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. हवामानातील ही अनिश्चितता केवळ एका हंगामाचे नुकसान करत नाही, तर पुढील वर्षांच्या उत्पादनक्षमतेवरही परिणाम करत आहे. त्यामुळे हवामान बदल हा आता केवळ पर्यावरणाचा मुद्दा राहिलेला नसून कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनत चालला आहे.  


‘पीकविमा योजनेचा आंबा उत्पादकाला काहीच फायदा होत नाही’


आंबा शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत का या प्रश्नाला उत्तर देताना गणेश गावकर म्हणतात की, शासनाने १३ एप्रिलला पंचनामे करण्यासाठी परिपत्रक काढले होते. महिनाभरात आजपर्यंत त्यांनी केवळ २५ टक्के पंचनामे पूर्ण केले आहेत. उर्वरित ६५ टक्के पंचनामे बाकी आहेत. अधिकाऱ्यांनी येत्या १० दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र एवढ्या कमी वेळात ते कसे पूर्ण होणार याबाबत आम्हाला प्रश्न आहे. त्यामुळे त्यासाठी शासनाने वेळ वाढवून द्यावी अशी आमची मागणी आहे.


पीकविमा योजनेचा आंबा उत्पादकाला काहीच फायदा होत नाही. कारण त्या निकषांमध्ये कोकणातील आंबा – काजू उत्पादन बसत नाही. कोकणात उंच सखल भाग असल्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. मात्र शेतकऱ्याचे नुकसान सगळीकडेच होते. त्यामुळे अनेक वेळा केवळ ५ हजार रुपयांचा पिकविमा मिळाल्याचे उदाहरण आहे.


जगभर पोहोचलेला कोकणचा हापूस


कोकणातील हापूस आंबा हा केवळ महाराष्ट्राची ओळख नाही, तर जागतिक बाजारपेठेतही एक प्रतिष्ठित ब्रँड मानला जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याला त्याच्या खास चवी, सुगंध आणि गुणवत्तेमुळे भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे. दरवर्षी कोकणातून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची निर्यात दुबई, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील विविध देशांमध्ये केली जाते. विशेषतः मध्यपूर्व देशांमध्ये कोकणच्या हापूसला मोठी मागणी असते.


कोकणात हापूस हा केवळ शेतीमाल नाही; तो स्थानिक संस्कृती, अर्थकारण आणि ओळखीचा भाग आहे. आंबा हंगाम सुरू झाला की गावागावांत बाजारपेठा गजबजतात, बागांमध्ये कामांची लगबग वाढते आणि हजारो कुटुंबांच्या उत्पन्नाचे चक्र सुरू होते. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या आंबा बागायतीशी जोडलेली आहेत. त्यामुळे हवामान बदलामुळे उत्पादन घटत असल्याची चिंता केवळ आर्थिक नाही, तर कोकणच्या पारंपरिक आंबा संस्कृतीसमोर उभे राहिलेले मोठे आव्हान मानले जात आहे.


“वाढत्या विकास प्रकल्पांमुळे स्थानिक हवामान बदलतंय” - पूजा कदम 


सिंधुदुर्गमधील पूजा कदम हिने कोकणात वाढणाऱ्या विकास प्रकल्पांमुळे स्थानिक हवामान बदलत असल्याची चिंता व्यक्त केली. बाईमाणूसशी बोलतांना तिने सांगितले, “रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहेत. इथली जमीन, हवामान आणि थंडी यामुळे आंब्याला विशेष चव मिळते. मात्र गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प, रस्ते, बांधकामं आणि जंगलतोड वाढत असल्याने वातावरणात बदल जाणवू लागलेत. आता तापमान वाढत असून ऋतूचक्रही बदलले आहे. डिसेंबर-नेवारीत जशी थंडी असायची तशी आता राहत नाही. अचानक ढगाळ वातावरण होतं, अवकाळी पाऊस पडतो, कधी गारपीट होते. याचा सर्वात मोठा परिणाम आंबा आणि काजू बागायतीवर होतो,” असे पूजा कदम सांगते.


User Image


ती पुढे म्हणाली, “यंदा आंबा आणि काजूला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा होती. पण मध्येच आलेल्या पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे मोहोर काळा पडला, गळून गेला. अनेक झाडांवर फळ टिकलेच नाही. हवामानातील हे बदल आता अपवाद राहिलेले नाहीत, तर दरवर्षीची समस्या बनत चाललीये. विकास होणं गरजेचं आहे, पण त्याचा पर्यावरणावर होणारा परिणामही पाहायला हवा. कारण कोकणातल्या हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह आंबा आणि काजू बागायतीवर अवलंबून आहे. हवामान असंच बदलत राहिलं तर भविष्यात कोकणची आंबा संस्कृतीच धोक्यात येईल,” अशी भीतीही तिने व्यक्त केली. 


बागांपासून निर्यातीपर्यंत : उत्पादन घटल्याने संपूर्ण साखळी संकटात 


यंदा आंबा आणि काजू उत्पादन घटल्याचा सर्वात मोठा परिणाम गावातील मजुरांवर झाला आहे याबद्दल सिंधुदुर्गातील विजय सपकाळे या बागायतदाराशी बाईमाणुसने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, "साधारणपणे फेब्रुवारीपासूनच बागांमध्ये कामांची लगबग सुरू होते. मोहोर आल्यानंतर फवारणी, झाडांची निगा, गवत काढणे, नंतर आंबा उतरवणे, वर्गीकरण, पेट्या भरणे अशा अनेक कामांसाठी स्थानिक मजूर आणि महिलांना रोजगार मिळतो. पण यंदा उत्पादनच कमी झाल्यामुळे अनेक बागांमध्ये कामाचे दिवस कमी झाले. काही ठिकाणी आंबा उतरवण्यासाठी मजूर बोलवायची वेळच आली नाही. आंबा हंगामावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम झालाय. पूर्वी हंगामात गावात चैतन्य असायचं.  बागांमध्ये काम करणारी माणसं दिवसभर असायची. मात्र आता तसं काही असल्यामुळे माणसांविना बागा ओसाड पसल्यासारख्या दिसतात." 


रत्नागिरीतील पवन देशमुख या आंबा निर्यातदार बागायतदाराने सांगितले की, "हवामान बदलामुळे निर्यात व्यवसायही मोठ्या संकटात सापडला आहे. परदेशात जाणाऱ्या हापूस आंब्याला विशिष्ट गुणवत्ता लागते. आकार, रंग, टिकाऊपणा आणि चव यावर निर्यात अवलंबून असते. पण यंदा अवकाळी पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि गारपिटीमुळे अनेक आंब्यांवर काळे डाग आले, काही आंबे आतून खराब झाले आणि त्यांची टिकण्याची क्षमता कमी झाली. उत्पादन घटल्याने केवळ शेतकरीच नाही, तर संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम झालाय. आंबा हंगामात पॅकिंग उद्योग, वाहतूक, थंड साठवणूक, पेटी बनवणारे कारागीर, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि बाजारपेठ यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालतात. पण उत्पादन कमी झालं की या सगळ्यांवर परिणाम होतो. यंदा अनेक व्यापाऱ्यांना ठरलेल्या ऑर्डर पूर्ण करता आल्या नाहीत,” असे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले, “कोकणात हवामान बदल हा आता भविष्यातला धोका राहिलेला नाही; तो प्रत्यक्षात दिसू लागला आहे. पूर्वी ऋतू ठरलेले असायचे. आता डिसेंबरमध्ये उष्णता असते, मार्चमध्ये पाऊस पडतो आणि एप्रिलमध्ये ढगाळ वातावरण तयार होतं. या बदलांचा थेट परिणाम आंबा आणि काजूच्या उत्पादनावर होत आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुढच्या काही वर्षांत कोकणातील पारंपरिक बागायती मोठ्या संकटात येऊ शकतात."  


User Image


कोकणातील आंब्याच्या बागा आजही तितक्याच हिरव्यागार दिसतात. झाडांवर मोहोरही येतो, पण तो फळात रुपांतरित होईल याची खात्री मात्र आता उरलेली नाही. हवामान बदल, अवकाळी पाऊस, वाढती उष्णता आणि बदलत चाललेलं स्थानिक पर्यावरण यामुळे कोकणातील पारंपरिक बागायती अनिश्चिततेच्या छायेत उभ्या आहेत. एकीकडे जगभर पोहोचलेला कोकणचा हापूस जागतिक बाजारपेठेत आपली ओळख टिकवून ठेवण्यासाठी झगडतोय, तर दुसरीकडे स्थानिक बागायतदार आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसतायेत. 


आंबा हा केवळ फळ नाही. तो कोकणातील संस्कृती, अर्थव्यवस्था आणि हजारो कुटुंबांच्या जगण्याचा आधार आहे. मात्र हवामानातील बदलांचा वेग आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ही संपूर्ण साखळी धोक्यात येऊ लागलीये. त्यामुळेच आता बागायतदारांचा वर्षा निवासस्थानावर निघणारा मोर्चा हा केवळ नुकसानभरपाईसाठीचा आवाज नसून, कोकणच्या बदलत्या हवामानाविरोधात आणि उद्ध्वस्त होत चाललेल्या आंबा संस्कृतीला वाचवण्यासाठीचा इशारा आहे. 


(This story is produced under Project Dharitri, a joint undertaking by Asar and Baimanus on Climate Change & Gender reporting.)


Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...