विठ्ठल साबळे
- येवती (अमरावती) येथे पार पडलेल्या महिलांच्या शंकरपट्टी स्पर्धेत लक्ष्मी सोनबावणे सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली.
- 12.43 सेकंदांचा वेळ नोंदवत तिने विदर्भाच्या क्रीडा इतिहासात आपलं नाव ठळकपणे नोंदवलं.
शंकरपट हा मर्दानी मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो. भल्याभल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडते. शंकरपटात बैलांची शर्यत पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. तर डोळ्यासमोर उभे राहतात बैल आणि रिंगी हाकणारा रांगडा धुरकरी. मात्र या पुरुषप्रधान खेळाला अमरावतीच्या लक्ष्मी सोनबावणे यांनी आव्हान दिले आहे.
येवती (ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) येथील महिलांच्या शंकरपटाने यंदा विदर्भाच्या क्रीडा इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला. बारावी पास झालेल्या लक्ष्मी सोनबावणे हिने महिलांच्या शंकरपटात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली असून, १२.४३ सेकंदांचा वेळ नोंदवत तिने स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. सलग 2 वर्षे अजिंक्य राहिल्यानंतर तिसऱ्यांदा हा मान पटकावत लक्ष्मीने केवळ वैयक्तिक यश मिळवले नसून, ग्रामीण भागातील महिला क्रीडाशक्तीची ठळक ओळख राज्यपातळीवर अधोरेखित केली आहे.
जिल्ह्यातील विदर्भ केसरी मैदानावर पार पडलेल्या या महिलांच्या शंकरपटाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या ऐतिहासिक स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. महिलांच्या नावावर पारंपरिक क्रीडाप्रकारांमध्ये अजूनही मर्यादा असल्याचे चित्र असताना, या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला खेळाडूंची संख्या आणि त्यांचा आत्मविश्वास लक्षवेधी ठरला. प्रेक्षकांमध्येही महिलांच्या शंकरपट्टीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
महिलांच्या शंकरपटात लक्ष्मीचा निर्धार
‘बाई माणूस’शी बोलताना लक्ष्मी सोनबावणे म्हणाल्या की, महिलांच्या शंकरपटीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणं हा क्षण आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. एक महिला म्हणून हे यश अधिक महत्त्वाचं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापुढे म्हणाल्या, सुरुवातीच्या काळात नातेवाईक, शेजारी आणि आईकडूनही विरोध सहन करावा लागला. हा आपला खेळ नाही, यात उतरू नकोस, असं वारंवार ऐकायला मिळालं; मात्र वडिलांचा ठाम आधार आणि विश्वास हेच आपलं खऱ्या अर्थानं बळ ठरल्याचं त्या म्हणाल्या. त्याच आधारावर आपण जिंकून दाखवलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्या अशाही म्हणाल्या की ग्रामीण भागातील मुलींनी कोणाच्याही दबावाखाली न जाता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा, स्वतःवर विश्वास ठेवावा, असा स्पष्ट संदेश देत लक्ष्मी सोनबावणे यांनी आपलं यश हे केवळ वैयक्तिक नसून इतर मुलींसाठी प्रेरणा ठरावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अंतिम फेरीत लक्ष्मी सोनावणेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. तिच्या धावण्यातील सातत्य, योग्य टायमिंग आणि शरीरसामर्थ्याचा अचूक वापर स्पष्टपणे जाणवत होता. १२.४३ सेकंदांत अंतर पार करत तिने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. या शर्यतीत मल्हार-मोगली, साई-तेजा आणि सैतान-राणा या बैलजोड्यांनीही चांगली झुंज दिली. मात्र लक्ष्मीचा वेग आणि आत्मविश्वास निर्णायक ठरला. तिच्या विजयानंतर मैदानावर उत्स्फूर्त जल्लोष पाहायला मिळाला.
शंकरपटात महिलांचा वाढता सहभाग
या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे केवळ विजेतेपद नव्हे, तर महिलांचा वाढता सहभाग. बारावी उत्तीर्ण झालेल्या तसेच पुढील शिक्षण घेत असलेल्या अनेक तरुणी या शंकरपट्टीत सहभागी झाल्या होत्या. अनेक महिलांनी पहिल्यांदाच या प्रकारात उतरत भीती पत्करत मैदान गाठले. विशेष म्हणजे अनेक स्पर्धकांच्या कुटुंबात पूर्वी शंकरपट्टीची परंपरा नसतानाही त्यांनी सहभाग नोंदवला, ही बाब सामाजिक बदलाचे सूचक मानली जात आहे.
शंकरपटाकडे पारंपरिकदृष्ट्या पुरुषप्रधान खेळ म्हणून पाहिले जाते. मात्र येवती येथील या स्पर्धेने ही धारणा बदलण्यास सुरुवात केली आहे. घरगुती जबाबदाऱ्या, सामाजिक मर्यादा आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर मात करत महिलांनी या क्रीडाप्रकारात पाऊल टाकले आहे. मात्र, अलिकडच्या काळात महिलांचा वाढता सहभाग ही धारणा बदलताना दिसत आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींना खेळाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळत असल्याचे मत क्रीडातज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
या स्पर्धेच्या आयोजनात स्थानिक ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि स्वयंसेवकांचा मोठा वाटा होता. स्पर्धेचे संचालन सुरळीत पार पडावे यासाठी नियोजनपूर्वक तयारी करण्यात आली होती. नोंदणीपासून ते अंतिम फेरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शिस्त आणि पारदर्शकता पाळण्यात आली. पंच, संयोजक आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने काम केल्याने स्पर्धेची विश्वासार्हता अधिक बळकट झाली.
कसे मिळवले यश?
लक्ष्मी सोनबावणे यांच्या यशामागे सातत्यपूर्ण सराव, कुटुंबाचा पाठिंबा आणि आत्मविश्वास हे महत्त्वाचे घटक ठरले. ग्रामीण भागात मर्यादित साधनसुविधा असूनही तिने मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे येवतीसह परिसरातील अनेक तरुणींना प्रेरणा मिळाली असून, पुढील काळात महिलांच्या शंकरपट्टीसाठी अधिक खेळाडू पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महिलांच्या क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अशी स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे. केवळ बक्षिसांपुरते मर्यादित न राहता, प्रशिक्षण, सुरक्षितता आणि दीर्घकालीन क्रीडा विकासावर भर देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेली शारीरिक क्षमता आणि जिद्द योग्य मार्गदर्शनाने मोठ्या व्यासपीठावर पोहोचू शकते, हे या स्पर्धेने स्पष्ट केले आहे.
एकूणच, येवती येथील महिलांच्या शंकरपट्टीने केवळ एक क्रीडा स्पर्धा म्हणून नव्हे, तर सामाजिक बदलाचा संदेश देणाऱ्या उपक्रम म्हणून ओळख निर्माण केली आहे. लक्ष्मी सोनबावणे यांच्या हॅट्रिक विजयाने या चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यात विदर्भातील महिलांचा सहभाग आणखी वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






