टीम बाईमाणूस
- पी. साईनाथ म्हणतात, जागतिक तापमानवाढ हा शब्द अस्वस्थ करणारा…
- भूजल पातळी खालावण्याला पाण्याचा वारेमाप वापर कारणीभूत…
- हवामान बदल हा एक सामाजिक-आर्थिक प्रश्न
“१९८० आणि नव्व्दच्या दशकाच्या शेवटी, मोठ्या तेल आणि वाहन कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून 'जागतिक तापमानवाढ' ही संकल्पना मोडून काढली आणि अत्यंत साधा आणि कोणालाही जबाबदार न धरणारा 'हवामान बदल' हा शब्द स्वीकारला. हवामान बदलामुळे कोणावरही जबाबदारी निश्चित होत नाही. हवामान बदलत असते, ऋतू बदलतात, हवामान बदलते, तापमान बदलते ज्यामुळे मग हवामान बदलाच्या मुख्य कारणांवरून आपले लक्ष विचलित होते,” असं परखडं मत जेष्ठ पत्रकार आणि ‘पारी’चे संपादक पी. साईनाथ यांनी मांडले.
एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया, सामाजिक शास्त्रे विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठवाड्याच्या भविष्याची पुनर्कल्पना’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी रुख्मिणी सभागृहात झाले. यावेळी ‘मराठवाडा आणि हवामान बदल’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे, द हिंदू बिज्ञानेस लाइनचे उपसंपादक डॉ. राधेश्याम जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आदींची उपस्थिती होती.
जागतिक तापमानवाढ हा शब्द अस्वस्थ करणारा…
जागतिक तापमानवाढ हा शब्द आपल्याला विचार करायला कसा भाग पाडतो, हे सांगतात साईनाथ म्हणाले, “आपण सगळे हवामान बदल हा शब्द वापरतो. एक पत्रकार आणि लेखक म्हणून मी देखील माझ्या प्रकाशनांमध्ये हा शब्द वापरतो आणि आपण हा शब्द आता स्वीकारला आहे. पण खरं सांगायचं तर, हा शब्द म्हणजे एक पळवाट आहे, निसटण्याचा मार्ग आहे. मूळ शब्द खूप वेगळा होता. ८० आणि ९० च्या दशकात तो खूप वेगळा होता आणि त्याला जागतिक तापमानवाढ म्हटले जायचे, जी प्रत्यक्षात घडत असलेली प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही जागतिक तापमानवाढ हा शब्द वापरता, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात, तापमान का वाढत आहे? कोण वाढवत आहे? आणि मग ते तुम्हाला मोठ्या ऑटोमोबाईल उद्योगाकडे, मोठ्या तेल उद्योगाकडे घेऊन जाते. हे तुम्हाला अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या आणि अप्रिय प्रश्नांकडे घेऊन जाते”
पुढे ते म्हणाले, हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही. विशेषतः जर तुम्ही मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून पाहणार असाल. हवामान बदल केवळ निसर्गामुळे होत नाही. यात मानवी हस्तक्षेपाचा मोठा वाटा आहे. वाहन उद्योग, जीवाश्म इंधने यांसारख्या मानवी कृती याला जबाबदार आहेत. हवामान बदल हा एक सामाजिक-आर्थिक प्रश्न आहे. हवामान बदल हा अत्यंत महत्त्वाचा विषमतेचा प्रश्न आहे. हा न्यायाचा प्रश्न आहे. आज जगातील अनेक भागांमध्ये लोक 'क्लायमेट जस्टिस' साठी लढत आहेत, ज्याचा अर्थ समाजातील मूलभूत संसाधनांच्या मालकीची पुनर्रचना करणे असा होतो.
निसर्गाला दोष देऊ नका…
मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईवर भाष्य करतांना त्यांनी दारू कारखान्यांचे उदाहरण देत टोला देखील लगावला, ते म्हणाले “निसर्गाला दोष देऊ नका. आपण ५० वर्षे मराठवाड्यात हे संकट निर्माण करण्यासाठी खर्च केली आहेत. औरंगाबाद परिसराभोवती २४ बिअर आणि मद्यनिर्मितीचे कारखाने आहेत, ज्यांना ४० वर्षांपासून १ पैसा प्रति लिटर दराने पाणी मिळत होते. त्यानंतर मोठे आंदोलन झाले, आम्ही त्याबद्दल वर्तमानपत्रात लिहिले, लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने खूप सुनावले आणि सांगितले की तुम्ही त्यांना द्यावे लागणारे पैसे वाढवले पाहिजेत.
मग त्यांनी ते वाढवून किती केले? ५ पैसे प्रति लिटर! आता एप्रिल आणि मे महिन्यात रस्त्यावर टँकरजवळ उभे राहणारे गरीब लोक पाण्यासाठी २५ पैसे ते १ रुपया प्रति लिटर मोजतात. आणि बिअर आणि अल्कोहोल कारखाने ५ पैसे मोजतात. यात कसला न्याय आहे? असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
भूजल पातळी खालावण्याला पाण्याचा वारेमाप वापर कारणीभूत…
पाण्याच्या वारेमाप वापरामुळे भूजल पातळी वेगाने खालावत असल्याकडे लक्ष वेधत पी. साईनाथ यांनी मराठवाडा आणि तामिळनाडूतील धक्कादायक वास्तव समोर आणले. भूजल पातळीचे विदारक चित्र मांडताना ते म्हणाले, "तामिळनाडूतील ईरोड जिल्ह्यामधील तिरुचेनगोड या एकाच गावात २०,००० बोअरवेल मशिन्स आहेत. हे लोक देशभरात अगदी चेरापूंजीमध्येही बोअरवेल मारत आहेत." या मशिन्सना परवडण्यासाठी दिवसाला किमान १००० फूट ड्रिलिंग करावे लागते आणि देशभरातील हे २०,००० रिग्स मिळून दरवर्षी तब्बल २ अब्ज फूट ड्रिलिंग करत असल्याची भयानक आकडेवारी त्यांनी मांडली. याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसतो, हे सांगताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील विश्वंभर जगताप या शेतकऱ्याचे उदाहरण दिले. या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात ३६ बोअरवेल्स मारल्या आणि तो कायमचा कर्जबाजारी झाला.
पाण्याचे चुकीचे वाटप आणि विषमतेवर ताशेरे ओढताना साईनाथ यांनी विदर्भातील परिस्थितीकडे लक्ष वेधले. "नागपूरसारख्या दुष्काळी भागात 'फन अँड फूड व्हिलेज' उभे राहिले, ज्यात १८ वॉटर स्लाईड्स आहेत. तिथे एका दिवसात लाखो लिटर पाणी वापरले जाते. पण, आजूबाजूच्या गावांना मात्र पाण्याचा थेंबही मिळत नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिलांना
कर्ज वाटपातील बँकांचा दुजाभाव स्पष्ट करताना त्यांनी व्यवस्थेवर टीका केली. "२०१३ मध्ये औरंगाबादमध्ये एकाच दिवशी १५० मर्सिडीज बेंज गाड्या विकत घेतल्या गेल्या. त्यावेळी एसबीआयच्या चेअरमनने मर्सिडीज घेण्यासाठी विशेष ७ टक्के व्याजदर दिला. मात्र, उत्पादनाचे साधन असलेल्या ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्याला १६ टक्के व्याजदर द्यावा लागतो," असा विरोधाभास त्यांनी मांडला. या कर्जापायी शेतकरी महिला दिवाळखोर होते आणि तिला तिची जमीन विकावी लागते. एवढेच नाही तर, महाराष्ट्रातील ५२ टक्क्यांपेक्षा जास्त कृषी कर्ज हे मुंबई, पुणे आणि नाशिकमधून वितरित केले जाते. "तिथे कोणता शेतकरी राहतो? हे कर्ज केवळ मोठ्या कृषी-उद्योगांना दिले जाते," असा आरोप त्यांनी केला.
या सर्व पाणीटंचाईचा आणि संकटाचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पाणी आणण्याचे ८० टक्के विनामोबदला काम मुली आणि महिला करतात. मुंबईत बांधकामासाठी कोट्यवधी लिटर पाणी मिळते, पण हे पाणी ज्या भागातून मुंबंईला पुरवले जाते त्याच भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी नसते, हा विरोधाभास देखील त्यांनी अधोरेखित केला. हवामान बदलाच्या प्रश्नाकडे आपण सर्वजण सामाजिक न्याय आणि आर्थिक विषमतेच्या दृष्टिकोनातून बघू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.






