प्रा. आशालता कांबळे
- समतेच्या चळवळीतील बाबासाहेबांची साथीदार रमाबाई भीमराव आंबेडकर यांची आज जयंती.
- समाजामध्ये रमाईंची प्रतिमा रडणारी, शोषिक, त्यागमूर्ती म्हणून प्रचलित आहे.
- मात्र रमाई ही रडणारी नव्हती तर लढणारी होती, त्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते.
भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रीची ओळख ही कुणाची तरी कन्या, बहीण, पत्नी, आई, आजी अशाच रूपात करून दिली जाते. तिची स्वतःची काही स्वतंत्र मतं असू शकतात. स्वतःचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असू शकतं, ही गाेष्ट जमेतच धरली जात नाही. भल्याभल्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या बाबतीत हे हाेतं. तर रमाईंसारख्या गृहिणी म्हणून आयुष्य वेचणाऱ्या स्त्रीच्या बाबतीतही हे सहजपणाने हाेऊ शकतं.
रमाईंची जनमानसात स्थिर झालेली ओळख म्हणजे, कराेडाे लेकरांची माता! बाबासाहेबांप्रती निष्ठा असणाऱ्या सर्वांनीच रमाईंना ‘आईसाहेब’ म्हणून मान्यता दिली. दुसरीकडे बाबासाहेबांना खंबीर साथ देणारी, त्यांचा शब्दनशब्द झेलणारी, त्यांच्या सुख-दुःखात स्वतःला झाेकून देणारी, त्यांच्या शिवाय स्वतःचा अजिबात विचार न करणारी, ‘बाबांची सावली’ अशी ओळख रूढ केली गेली. बऱ्याचशा एकपात्री प्रयाेगातून तर रमाई सतत रडतानाच दाखवल्या जातात.
स्टेजवरची रमाई रडते आहे आणि समाेरील प्रेक्षकही रडताहेत. रडणारी रमाई जनमानसात ‘त्यागमूर्ती रमाई’ म्हणून उभी राहते. बाबासाहेबांसाठी, लेकरांसाठी, बाबासाहेबांनी आपलं मानलेल्या जनतेसाठी खस्ता खाणारी! प्रचंड दुःख साेसणारी ‘शाेषिक रमाई’ ही प्रतिमा तर अगदी सर्वच स्तरावरील समाजातील लाेकप्रिय प्रतिमा!
करुणेने ओथंबलेल्या डाेळ्यांची ‘करुणामयी रमाई’ ही रमाईंची ओळख मात्र अशी आहे की, ज्यामध्ये त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट्य अधाेरेखित हाेतं. रमाईंच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं तर हे सार आहे, जे तथागत बुद्धांच्या करुणेशी थेट नातं सांगतं,पण करुणेचा उजेड अवतीभवती पसरविणाऱ्या या जित्या जागत्या हाडामांसाच्या असामान्य बाईचं असतेपण अदृश्य करून तिला फक्त ‘युगपुरुषाची सावली’ एवढ्यापुरतंच मर्यादित केलं, तिच्यावर असीम प्रेम करणाऱ्यानीही कळत-नकळत!
बाबासाहेबांची सावली इतकीच फक्त ओळख नाही तर…?
रमाई युगपुरुषाची सावली हाेत्या. या अर्थाने की, त्यांनी बाबासाहेबांना अगदी सावलीसारखी साथ दिली. त्यांच्या सुखात-दुःखात-संघर्षात. पण रमाईंचं इतकंच अस्तित्व हाेतं का? अर्थातच नाही.त्यांचं जन्मापासूनचं आयुष्य पाहिलं तर लक्षात येतं की, एक हाडामांसाची, रागा-लाेभाने युक्त अशी अल्लड मुलगी - जी शेजारणीला मदत केल्यामुळे; तिने दिलेले पैसे आनंदाने हाती घेते आणि आईला दाखवते. आईने कान उघाडणी करतानाच, स्वाभिमानाच्या तसेच करुणेच्या मूल्यांची तिला ओळख करून दिली आणि पुढे मरेपर्यंत रमाईंनी या मूल्यांची जपणूक केली. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना ठायी-ठायी ही मूल्ये दिसतात.
यातील स्वाभिमानाच्या मूल्याचे दर्शन घडविणारे दाेन ठळक प्रसंग म्हणजे, बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना रमाईंच्या वाट्याला काही दिवस असे आले की, कुटुंब चालवणं त्यांना कठीण हाेऊ लागलं. गाेवऱ्या थापून विकण्याचं काम करूनही कुटुंबाला पाेटभर जेवू घालण्याइतके पैसे हाती येईनात. अशावेळी कार्यकर्त्यांनी वर्गणी गाेळा करून रमाईंना काही पैसे देऊ केले पण स्वाभिमानी रमाईंनी आपलं कुटुंब चालवण्यासाठी ते पैसे घेतले नाहीत. काेणी आपली दया करावी, आपल्याला सहानुभूती दाखवावी असं रमाईंना कधीच वाटलं नाही.
पडत्या काळात जेवढे जमतील तेवढे स्वतः कष्ट केले, अगदी रस्त्यावर खडी टाकण्याचंही काम केलं आणि कुटुंब चालवलं. दुसऱ्या प्रसंगात,1923 मध्ये लंडनहून कुटुंबात परत आलेल्या बाबासाहेबांचं औक्षण करण्यासाठी तयार हाेणाऱ्या रमाईंकडे नवीन लुगडं नेसायला नाही, म्हणून नणंद मंजुळाने देऊ केलेलं लुगडं घेणं त्यांनी नाकारलं. शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार करताना दिलेल्या जरीच्या फेट्याचा लुगडं म्हणून वापर केला. कुटुंबाबाहेर आणि कुटुंबातही कुणाकडून दया म्हणून काही घेणं हे रमाईंनी कटाक्षाने नाकारलेलं आहे.
रमाई स्वभावाने शांत हाेत्या, साेशिक हाेत्या. याचा अर्थ त्यांना स्वतःची मतं नाहीत असा नव्हता. राधाबाई बळवंत वराळे यांनी लिहिलेल्या आठवणीतून रमाईंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वावर बराचसा प्रकाश पडताे. धारवाडला वराळे यांच्याकडे रमाई एकूण तीन वेळा गेल्या हाेत्या. पहिल्या गाेलमेज परिषदेत बाबासाहेब लंडनला गेले तेव्हा त्या पहिल्यांदा धारवाडला आल्या आणि राधाबाईंनी त्यांना पहिल्यांदा जवळून पाहिलं. या पहिल्याच भेटीत राधाबाईंना रमाई कशा वाटल्या? त्या लिहितात -
‘आईसाहेब एकदम पिवळ्या धमक, सडपातळ आणि गाेल चेहऱ्याच्या हाेत्या. त्यांचा चेहरा शांत पण करारी दिसला.’
राधाबाईंनी या करारीपणाबराेबरच रमाईंच्या प्रेमळपणाचाही उल्लेख केलेला आहे. सहजपणाने लिहिलेल्या या आठवणीत एके ठिकाणी राधाबाई लिहून जातात की,
‘साहेब जेव्हा मुंबईस कामानिमित्त जात असत तेव्हा आईसाहेबांना धारवाडला घेऊन जाऊ का? असे विचारीत असत. बाबासाहेब म्हणायचे, ‘‘बघ, तिची तयारी असेल तर घेऊन जा.’’
म्हणजे रमाई स्वतंत्र मताच्या हाेत्या तर! फक्त बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून त्या प्रत्येक गाेष्ट करीत नसत. स्वतःच्या मनाला वाटलं तरच करीत असत, ही गाेष्ट इथे प्रकर्षाने लक्षात येते.
बाबासाहेब रमाईंना शिकण्याचा आग्रह करीत हाेते, तेव्हाच्या प्रसंगातूनसुद्धा ही गाेष्ट लक्षात येते. म्हणजे जेव्हा रमाईंच्या इच्छेविरुद्ध बाबासाहेब त्यांना पाटी-पेन्सिल घेऊन समाेर बसायला सांगतात, तेव्हा त्या ऐकतच नाहीत अक्षरे गिरवायला. अगदी बाबासाहेबांनी त्रागा केला, आदळआपट केली तरीही त्यांनी पाटी-पेन्सिल हाती घेतली नाही म्हणजे नाही! बाबासाहेब लंडनला गेल्यानंतर मात्र त्यांना, त्यांची पत्रे वाचण्यासाठी आपल्याला अक्षरओळख करून घ्यायला पाहिजे ही गाेष्ट मनाेमन पटल्यानंतर घरी शिकवायला येणाऱ्या शिक्षकाकडून त्यांनी पत्र वाचण्या-लिहिण्यापुरतं शिकून घेतलं आणि बाबासाहेबांना पत्रातून ही गाेष्ट कळवली देखील.
‘केसात गजरा घालून फिरायला चल’ या बाबासाहेबांच्या आग्रहाला देखील त्यांनी मनावर घेतलं नाही. विधवा लक्ष्मीबाईंचा विचार न करता आपण सजून-धजून पतीबराेबर फिरायला जाणं बरं नाही असं त्यांना वाटल्यामुळे कदाचित त्या अशा प्रकारे बाहेर पडत नसाव्यात. सोमवारच्या उपवासाच्या याबाबतीतही त्या बाबासाहेबांनी सांगितलेलं मनावर घ्यायच्या नाहीत.काही ठिकाणी रमाईंचे विचार बाबासाहेबांच्या अगदी विराेधी आहेत असं दिसतं. पण बाबासाहेबांचे विचार आणि रमाईंचे विचार यात तफावत असेलच ना? रमाईचं बाबासाहेबांइतकं वाचन थाेडंच हाेतं? जगाचा अनुभव थाेडाच हाेता?
बाबासाहेबांच्या सुरक्षेला घेऊन खूपच संवेदनशील…
रमाईंचं विश्व बाबासाहेबांच्या तुलनेत तसं छाेटंसं! काेकणातील वणंद गाव, त्यानंतर भायखळ्याची चाळ, लग्न झाल्यावर डबक चाळ, परेलची बी.आय.टी. चाळ आणि दादरचं राजगृह. फिरण्यासाठी म्हणून फक्त साेलापूर-बावी आणि धारवाड इथेच जाणं. त्यांचे ज्ञान म्हणजे इतरांकडून पुराणातील ऐकलेल्या सीता-पार्वती यांच्या कथा आणि सासऱ्यांकडून ऐकलेले कबीराचे दाेहे. या ज्ञानातून त्यांना जे कळत हाेतं, ते त्या आचरणात आणत हाेत्या. उपवासावरचा विश्वास हा त्यातलाच एक भाग हाेता.
बाबासाहेबांच्या जीवाला धाेका आहे या भीतीमुळे कदाचित त्यांनी हा विश्वास जाेपासला असावा. अर्थात जरी त्यांचा उपवासावर-देवावर विश्वास हाेता तरी देवाच्या मूर्तीची कधी त्यांनी पूजा केली नाही, की काेणत्या देवतेला कधी नवस केला नाही. काेणत्या देवतांची व्रतेही केली नाहीत. त्या देवाच्या अंधभक्त नव्हत्या. राधाबाई याबद्दल लिहितात -
‘‘आईसाहेब भावूक श्रद्धाळू हाेत्या. त्यांचा देवावर विश्वास हाेता. परंतु मूर्तिपूजा त्या कधीच करत नसत. रात्रंदिवस बाबासाहेबांचा त्यांना ध्यास असायचा. लांब गेले आहेत सुखरूप येऊ देत. अशी त्यांची प्रार्थना असायची. कबीराचे दाेहे त्यांना पाठ हाेते. पाैर्णिमेच्या दिवशी त्या दाेहे म्हणत असतात. त्या दखनी म्हणायच्या. आईसाहेब सांगत असतात, बाबासाहेबांच्या घराण्याचे दहिवलकर बुवा हे कबीरपंथीय गुरू हाेते. प्रत्येक पाैर्णिमेला संध्याकाळी बाबासाहेबांचे वडील, मुले, सुना सर्वजण मिळून कबीराचे दाेहे म्हणत असत.’’
म्हणजे रमाई नवससंस्कृतीतून पूर्णपणे मुक्त हाेत्या. बाबासाहेबांच्या सुरक्षेला घेऊन त्या खूपच संवेदनशील हाेत्या आणि या संवेदनशीलतेमुळे त्या उपवासाला शेवटपर्यंत चिकटून हाेत्या एवढंच. त्यांच्या प्रार्थनेत कधी काेणत्या देवाची आरती आली नाही की काेणती मूर्ती आली नाही. पुढे पंढरपूरच्या विठाेबाचे दर्शन घेण्याच्या हट्टापासून त्या परावृत्त झाल्या, त्याही या मूर्तिपूजेतील मुक्ततेमुळेच!
रमाईंवर या समाज व्यवस्थेतील काही रीती-रिवाजांचा, समजुतींचा जरूर पगडा हाेता. त्यातून त्या लवकर मुक्त हाेणं शक्यचं नव्हतं. पण बाबासाहेबांच्या सहवासामुळे काही गाेष्टीतील निरर्थकता त्यांच्या लक्षात आलेल्या हाेत्या. स्वतःच्या बुद्धीने काही गाेष्टींचा अर्थ लावून काेणती स्वीकारायची आणि काेणती नाकारायची याचं शहाणपण त्यांच्या ठायी हाेतंच. धारवाडच्या एका प्रसंगातून हे लक्षात येतं. धारवाडच्या दुसऱ्या भेटीत स्वयंपाकीण गंगव्वा हिच्याशी झालेल्या गप्पांतून रमाईना बेळगाव जिल्ह्यातील साैंदत्ती येथील यल्लमा देवीच्या (रेणुका देवी) मंदिराविषयी आणि तिथे भरणाऱ्या यात्रेविषयी समजलं. या मंदिराविषयी त्यांच्या मनात कुतूहल जागं झालं.
रेणुका देवीचं दर्शन घ्यायची इच्छा त्यांनी बाेलून दाखवली आणि वराळे यांनी लगेचच एक स्वतंत्र कारगाडी करून रमाईंना मंदिराच्या भेटीसाठी नेलं देखील. तिथे देवीची पूजा करण्याचा प्रकार रमाईंसाठी नवीन हाेता. गळ्यात मण्यांची-कवड्यांची माळ घातलेले तसेच हातात परडी व भंडाऱ्याची पिशवी घेतलेले अनेक भक्त रमाईंनी पाहिले. लिंब नेसणे म्हणजे लिंबाच्या डहाळ्या गुूंन वस्त्राप्रमाणे अंग झाकायचं. ताेंडात लिंबाची डहाळी धरायची, जाेगत्यांना बाेलावून परडी भरायची, नवस फेडायचा हे सर्व कुतूहलाने त्यांनी बघून घेतलं.
स्वतः मात्र देवीच्या ओटीचे साहित्य पुजाऱ्याच्या स्वाधीन करून देवीचं फक्त दर्शन घेतलं आणि परतीच्या वाटेला लागल्या. वाटेत हुबळी शहरातील सिद्धेश्वर मठात अंधांसाठी शाळा चालवली जात हाेती. त्या शाळेला त्यांनी भेट दिली. अंध विद्यार्थ्यांनी गाऊन दाखवलेले भजन, त्यांनी पक्ष्यांचे काढून दाखवलेले आवाज ऐकले. त्या अंध विद्यार्थ्यांविषयी रमाईंच्या मनात खूप दया दाटून आली. तिथे ठेवलेल्या देणगीच्या पेटीत त्यांनी स्वखुशीने देणगी म्हणून पैसे टाकले. जी देणगी त्यांनी मंदिरात दिली नाही, ती इथे अंध विद्यार्थ्यांसाठी आनंदाने दिली.
विद्यार्थी उपाशी आहे हे कळताच दागिने गहाण टाकले
काेणत्याही देव-देवीमध्ये किती गुंतायचं, त्यांच्या किती जवळ जायचं, याचं भान रमाईंना नक्कीच हाेतं. त्यांच्या मनात देवांसाठी खूपच कमी जागा आणि जित्या-जागत्या माणसांसाठी कितीतरी माेठी जागा हाेती. देवाच्या भक्तीपेक्षा माणसांसाठीच्या करुणेने त्यांचं मन ओतप्राेत भरलेलं हाेतं. वराळे रेक्टर असलेल्या धारवाडच्या वसतिगृहातील विद्यार्थी दाेन दिवस उपाशी आहेत हे कळताच त्यांनी आपला दागिना सावकाराकडे गहाण टाकून किंवा विकून विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी वराळे यांच्या हाती दिला, ताे याच करुणेमुळे!रमाईंच्या करुणेने भारलेल्या मनाचा माेठेपणा, त्यागी-वृत्ती या गाेष्टी पिढ्यान् पिढ्यांसाठी आदर्शवत ठरल्या... ठरत राहतील...!
याच भेटीत रमाई जातिभेदाच्या गुंत्यातून मुक्त झाल्या. धारवाड हुबळी गावात ढाेर-चांभार समाजातील कार्यकर्ते बाबासाहेबांच्या साेबत काम करत हाेते. त्यामुळे ते जातिभेदातून मुक्त झालेले हाेते. पण त्यांच्या घरातील स्त्रिया मात्र त्याच समजुतीत गुंतून पडल्या हाेत्या. त्यांना यातून मुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून हाेंगल, घाेडके आदींनी यल्लप्पा हाेंगल यांच्या घरी एकत्रित चहापानाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं रमाईंनी मान्य केलं. पुन्हा त्यांनी इथे नुसतीच उपस्थिती दाखवली नाही तर हाेंगल या चर्मकार समाजातील कार्यकर्त्यांच्या घरी बनवला गेलेला चहा सर्वांबराेबर त्यांनी देखील आनंदाने घेतला.
जातीच्या उतरंडीतील भेदाभेदांतून मुक्त हाेण्याचं हे रमाईंनी उचललेलं पहिलं पाऊल हाेतं. पुढे राजगृहात राहायला आल्यानंतर बाबासाहेबांनी राजगृहाच्या स्वच्छतेसाठी कामावर ठेवलेल्या वाल्मिकी समाजातील बहादूर आणि बादामीबाई यांनी स्वतःच्या हाताने तयार करून दिलेला पानाचा विडा त्या आनंदाने खात असत.जातीभेद- वर्णभेद यातून मुक्त हाेणे आजही भल्याभल्या उच्चशिक्षित व्यक्तींना कठीण जातं. अगदीच अल्पशिक्षण घेतलेल्या रमाई मात्र, या भेदांचा समाजात आत्यंतिक पगडा असलेल्या काळात, यातून सहजपणे मुक्त झालेल्या दिसतात.
रमाईंच्या जीवनातील अनेक प्रसंगातून त्यांच्या निर्मळ मनाची साक्ष पटते.याच निर्मळतेमुळे त्या राजगृहात राहायला आल्या तरी बी.आय.टी. चाळीतील आपल्या गरीब मैत्रिणींना विसरल्या नव्हत्या. चालता-बाेलता यायच्या स्थितीत हाेत्या, तेव्हा कधीमधी दुपारच्या वेळी राजगृहातून त्या बी.आय.टी. चाळीत जायच्या. कधी मैत्रिणींना दादरच्या हिंदू काॅलनीतील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या राजगृहावर बाेलवायच्या. मायेने-बराेबरीच्या नात्याने त्यांच्याशी बाेलायच्या. त्यांच्याशी सुखदुःखाची देवाण-घेवाण करायच्या. 
आयुष्याचा बराच काळ गरिबीत गेलेल्या रमाईंना, या गरिबीनेच काही गाेष्टी शिकवल्या हाेत्या, ज्या त्यांनी स्वतःच्या जगण्याचं तत्त्वज्ञान बनवून टाकल्या हाेत्या. ‘अन्न कधी टाकू नये’ हे त्यांचं अन्नाच्या बाबतीतलं, त्यांनी बनवलेलं माेठं तत्त्वज्ञान हाेतं. धारवाडला राधाबाई वराळेंनी बनवलेल्या काेंबडीच्या मटणाच्या आणि मसाले भाताच्या जेवणातील मसालेभात जरा जास्तीचाच उरला. या भाताचं आता काय करायचं या चिंतेत राधाबाई असल्याचं लक्षात येताच रमाई त्यांना म्हणाल्या -
‘‘एखाद्या वेळी एखादा पदार्थ शिल्लक उरताे. यात काही बिघडत नाही. त्या पदार्थाचा नवीन पदार्थ तयार करता येताे. काेंड्याचा मांडा बनवू शकेल अशी चतुर गृहिणी पाहिजे. आता जाे भात उरला आहे ना ताेच कढीपत्ता, माेहरी, कांदा घालून फोडणी देऊन गरम करा आणि ताे उद्या सकाळी द्या न्याहारीला. एक नवाच पदार्थ तयार हाेईल ताे. बघा कसे आवडीने सर्व खातील. उरलेलं अन्न टाकून देणे गुन्हा आहे. अन्न मिळवण्यासाठी माणसाला काय काय करावं लागतं. गरिबाला त्याची किंमत कळते. आता माझेच मी सांगते, साधं अन्नही मी गरम करून खात असे. टाकून कधी दिले नाही. अन्न आहे म्हणून माणूस आहे.’’
पालेभाज्या देठासहित बनवायच्या असतात, याबद्दलही त्यांचं ठाम मत हाेतं. भाजी निवडताना देठ काढून नुसतीच पानं निवडून घेणाऱ्या राधाबाईंना सांगताना रमाई म्हणतात, ‘पानांमध्ये काय सत्त्व असते? देठामध्ये सत्त्व असते. देठच काढून टाकल्यावर त्या भाजीची कशी चव लागेल? आपण मटण करताे ना त्यात हाडेही असतात. नुसत्या मांसाचे मटण रुचकर नसते. डाॅक्टर लाेक नेहमी पालेभाज्या खायला सांगतात. देठासहित केलेल्या पालेभाजीतच खरे सत्त्व असते.'
रिकाम्या वेळेत त्या राधाबाईंना गृहिणी म्हणून काय करायचं याबाबतीत छाेट्या-माेठ्या सूचना द्यायच्या, ज्या आजही स्त्री आणि पुरुष दाेघांनीही लक्षात घ्यायला हव्यात. जसे की -
- ‘घरात आणलेल्या वस्तूची नासाडी करू नये.’
- ‘जेवढे लागते तेवढेच ताटात वाढावे.’
- ‘स्वयंपाक करताना केस माेकळे साेडू नयेत.’
- ‘घरातील सामान माेजके असले तरी ते नीटनेटके ठेवावे.’
- ‘इकडे तिकडे पसारा पडलेला नसावा. इत्यादी.
बाबासाहेबांसारख्या पूर्णपणे विज्ञानवादी का नाही बनू शकल्या?
बायकांच्या जीवनात गराेदरपण ही अवस्था तिच्या मनात जशी आनंद निर्माण करणारी असते, तशीच तिचं मन अत्यंत हळवं करणारीही असते. तिला आयुष्यभर कधीही मनात निर्माण न झालेल्या इच्छा या काळात हाेऊ शकतात. अशा वेळी तिला प्रेमाची, मायेची, सुरक्षिततेची, जपणुकीची खूप गरज असते. रमाईंचा काळ म्हणजे, समाजात याविषयी इतकी जागरूकता नसलेला काळ! पण रमाई मात्र कदाचित स्वतःच्या अनुभवावरून हे जाणत असाव्यात.
त्यांच्या स्वतःच्या गराेदरपणात जरी त्यांना या गाेष्टींची कमतरता जाणवली असेल, तरी ती इतरांना जाणवू नये असं त्यांना मनाेमन वाटत असावं. त्यामुळे बळवंतरावांना त्यांनी पत्नीची खूप काळजी घेण्याविषयीच्या सूचना दिल्या. स्वतः जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असतानाही! रमाईंनी इतरांच्या भावनांची खूप जपणूक केली. सर्वांना भरभरून प्रेम दिलं.
रमाईंकडे एक 'हाडामांसाची व्यक्ती' म्हणून जर पहिलं तर मात्र एक प्रश्न नक्की मनात येतो की, त्या बाबासाहेबांसारख्या पूर्णपणे विज्ञानवादी का नाही बनू शकल्या? जर तशा बनल्या असत्या तर उपास-तापास या समजुतीतून मुक्त झाल्या असत्या. कदाचित पुढे जाे त्यांना क्षयासारखा आजार जडला ताे झाला नसता.
बाबासाहेब 1923 ला लंडनहून आल्यानंतर खूप चांगले दिवस रमाईंच्या वाट्याला आले हाेते. बाबासाहेब जरी सामाजिक कामांसाठी बाहेर असायचे तरी रमाईंची काळजी घेण्यासाठी नाेकर-चाकर हाेते. पैशांची कमतरता नव्हती. हा पैसा कसा वापरावा याचे निर्णय रमाई घेऊ शकत हाेत्या. बाबासाहेबांचं त्यावर बंधन नव्हतं. बाबासाहेब त्यांच्या पद्धतीने रमाईंची खूप काळजी घेत हाेते. म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायला सांगणे, मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नेमणे, वगैरे. पण इतकं सारं असूनही रमाईंना स्वतःची काळजी घेता आली नाही. शिक्षण नसल्याने कदाचित त्यांना या सगळ्याची जाणीवही नसावी.
रीती-रिवाज, पारंपरिकता यातून त्या लवकर मुक्त झाल्या नाहीत त्यामुळे. पण तरीही बाबासाहेबांच्या सहवासात राहून त्यांची पारंपारिकता खूप सैल झालेली हाेती. मूर्तिपूजा तर त्यांनी कधी केलीच नाही. निसर्गामध्येच अनामिक देव पाहिला आणि त्याच्याकडेच आपल्या साहेबांसाठी प्रार्थना करीत राहिल्या. ‘साहेब लांब गेलेत ते सुखरूप येऊ देत’, ही त्यांची प्रार्थना हाेती. ‘पारंपारिकतेतील अपारंपारिकता’ त्यांच्या ठायी अशी दिसून येते.
रमाईंच्या व्यक्तिमत्त्वातील या छाेट्याशा मर्यादांना, त्यांच्या ठायी कितीतरी पटीने अधिक असलेल्या सामर्थ्याने खरंतर नगण्य करून टाकलं आहे. अनेकदा भावनिकतेने आपण या साऱ्याकडे पाहताे, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही सशक्त पैलू सहज दुर्लक्षित हाेतात. जसे की, त्या शाेषिक-शांत-प्रेमळ, त्यागी या गुणांना हायलाईट करताना त्यांच्यातील करारीपणा, जिद्दीपणा, धैर्य-चिकाटी या गुणांना आपण नकळत लुप्त करून टाकताे. हे हाेता कामा नये.
विपूल व्यवहार ज्ञान
रमाईंच्या जीवनातील काही प्रसंगातून त्यांच्या ठायी असलेला करारीपणा खूप उठून दिसताे. विशेषतः मुलांचा सांभाळ करताना मुलगा यशवंताला आई म्हणून त्या कशा वाटतात, हे आपण कधी लक्षातच घेत नाही. एका मुलाखतीत यशवंतराव (भैय्यासाहेब आंबेडकर) म्हणतात की, ‘आमची आई खूप करारी हाेती, शिस्तीची हाेती. आम्ही चुकीचं वर्तन केलेलं तिला अजिबात खपत नसे.’ राधाबाई वराळे यांनीसुद्धा रमाईंना जेव्हा धारवाडला प्रथम पाहिलं तेव्हा त्याही वर्णन करतात की, ‘त्यांचा चेहरा शांत पण करारी दिसला.’
बळवंतराव वराळे यांना देखील त्यांनी करारीपणाने काही सूचना दिलेल्या दिसतात. राधाबाईंर्पाशी झालेल्या संवादातून अनेक ठिकाणी त्यांची विनाेदबुद्धीही दिसून येते. त्यांना पुस्तकी ज्ञान मिळालेलं नव्हतं, पण व्यवहार ज्ञान त्यांच्याकडे विपुल हाेतं. सहज बाेलताना त्या बाेली भाषेतील म्हणी वापरायच्या. जीवनाची मूल्यं सांगणारी वाक्ये बाेलून जायच्या. जसे की -
' अन्न आहे म्हणून माणूस आहे' - अन्न टाकू नये, दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ बनवावा. हे सांगताना त्या हे वाक्य बाेलतात.
- 'काेंड्याचा मांडा बनवू शकेल अशी चतुर गृहिणी पाहिजे' - काेणताही उरलेला पदार्थ टाकून न देता त्यावर प्रक्रिया करून ताे रुचकर कसा बनवावा हे सांगताना ही म्हण वापरतात.
- 'माेती पाेवळं विकली आणि पपई आणली' - राजगृहाचं बांधकाम सततच्या रचना बदलामुळे खूप खर्चिक हाेत चाललं हाेतं, अशावेळी पैसे कमी पडले म्हणून रमाईंचे दागिने विकावे लागले. पण तरीही त्या पैशात घर काही बांधून पूर्ण झालं नाही. याबद्दलची खंत व्यक्त करताना त्या ही म्हण वापरतात.
- 'जसे दिवस येतील तसे जमवून घेणे माणसाला जमले पाहिजे' - अन्न उरलं तर ते गरम करून खाता आलं पाहिजे. आपण आपल्या मुलांनाही तशी सवय लावली आहे, हे सांगताना त्या हे मूल्य सांगून जातात.
- 'आपली दुःखे उगाळत बसण्यात काय अर्थ?' - राधाबाई वराळे यांच्या सहवासात कधीतरी आपल्या मुलांच्या जाण्याचं दुःख उाळून वर यायचं आणि त्या ते राधाबाईंना सांगायच्या. पण त्याच वेळी वरील वाक्य बाेलून त्या दुःखी अवस्थेतून निघायचा प्रयत्न करताना जीवनाचे मूल्यच सांगायच्या.
रमाईंच्या या भाषिक काैशल्याबराेबरच त्यांच्या ठायी असलेल्या विशेष गुणांचे दर्शन घडवणारी अशी वराळे दांपत्याकडून आणि रमाईंकडून बाेलली गेलेली काही वाक्ये -
- आईसाहेबांचे नैतिकतेचे वजन इतके हाेते की, आता मला प्रांजळपणाने सर्व काही सांगणे आवश्यक हाेते - राधाबाईंच्या या वाक्यातून रमाईंच्या ठायी असलेली नैतिकता अधाेरेखित हाेते.
- अधिक बरे वाटले की मी पुन्हा धारवाडला येईन - रमाईंच्या या वाक्यातून त्यांच्या ठायी असलेला आशावाद इथे व्यक्त हाेताे.
- आईसाहेब अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना जास्त बाेलवत नाही. तरीही त्यांचे मन स्थिर आहे - बळवंतराव वराळे रमाईंविषयी राधाबाईंना हे जे सांगतात, त्यातून स्थिरचित्त रमाईंचं दर्शन घडतं.

अनेक कसोटीचे प्रसंग हाताळले
रमाईंचं व्यक्तिमत्त्व उजळून टाकणारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे सारे सामर्थ्यशाली पैलू आपण बघितले, तरी त्यांना सर्वात उंचीवर नेणारा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या ठायी असलेलं असामान्य धैर्य ! काेणत्याही व्यक्तीला कधी निराशेने-संकटाने ग्रासलं तर रमाईंच्या व्यक्तिमत्त्वातील 'धैर्य' या गुणाकडे पाहावं. ती व्यक्ती आपाेआप निराशेतून बाहेर येईल.
बाबासाहेब अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेले असताना, ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी हाेती ते माेठे दीर आनंदराव मृत्यू पावले आणि रमाईंवर कुटुंब चालवण्याची जबाबदारी आली. हाती पैसा नाही... पदरात एक लहान मूल... एक मूल पाेटात... पतीच्या मृत्यूने खचलेल्या विधवा जाऊ लक्ष्मीबाईंना सावरणे... तिच्या मुलाला पाेरकेपणा जाणवू न देणे. चारही बाजूंनी उभ्या असलेल्या आव्हानांना रमाई त्या काळात ज्या धैर्याने सामाेऱ्या गेल्या, त्याला ताेड नाही. वसंत मून याविषयी लिहितात -
‘‘खूप कमी वयात त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी अजिबात कुरबूर न करता अतिशय धैर्याने घरातील अडचणींना ताेंड दिले. त्या सातत्याने काैशल्यपूर्ण काम करीत राहिल्या.’’
खरेच, त्या काळात जर रमाईंनी ही परिस्थिती काैशल्याने हाताळली नसती, तर बाबासाहेबांना शिक्षण अर्धवट टाकून भारतात परत यावं लागलं असतं. पण रमाईंना त्या लहान वयात खूप माेठी समज हाेती. पतीच्या शिक्षण प्रेमाला जपायचं आहे, एवढं त्यांना कळत हाेतं. पुढे तर अनेक प्रसंग आले कसाेटीचे त्यांच्या जीवनात. पुणे कराराच्या वेळच्या कसाेटीच्या प्रसंगाबद्दल वसंत मून लिहितात की -
‘‘पुणे कराराच्या वेळेस रमाबाई यांनी खूप धैर्य दाखविले. या काळात अनेक माणसांनी, राजकारणी नेत्यांनी त्यांना खूप त्रास दिला. रमाबाई यांच्यावर प्राणांतिक हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, तरीही त्यांनी त्यांचे कर्तव्य करण्याचे साेडले नाही. त्या आंबेडकरांना शेवटपर्यंत साथ देत राहिल्या.’’
या अशा प्रसंगांसाेबतच काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही रमाईंच्या समाेर कसाेटीचे प्रसंग आले, जे त्यांनी धैर्याने निभावले. चार मुलांचा अकाली मृत्यू. बाबासाहेब सभा-परिषदांमध्ये गुंतलेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत माेठे दीर बाळाराम, नणंद तुळसा यांच्यासारख्या प्रिय माणसांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी...
हे सारे प्रसंग एका बाईला खरे तर न पेलणारे पण रमाईंनी जणू बाईपणाच्या पलीकडे जाऊन हे प्रसंग निभावले. आयुष्याच्या उत्तरार्धात तर त्या समुदायाच्याच हाेऊन गेल्या. किती साऱ्या सामाजिक कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या! घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांना-निराधार मुलांना, आईच्या मायेने जेऊ-खाऊ घातलं. यशवंत-मुकुंदाचं आईपण निभावतानाच, जणू कराेडाे लेकराचं आईपणही निभावलं. रमाईंनी अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे चळवळीत सहभाग दिला. खरे तर त्या बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या समतेच्या-मानवतेच्या चळवळीचा पाया बनल्या.
बुद्धकाळातील थेरींनी कन्या, पत्नी, माता या निसर्गाने दिलेल्या भूमिका बजावल्यानंतर, स्त्रीत्वाच्या भूमिकेतून मुक्त हाेऊन समुदायासाठी जगण्याचा मार्ग निवडला. त्यासाठी घर-संसार साेडून त्या भिक्खुणी बनल्या. हृदयात करुणा जागवून स्थिरचित्ताने आयुष्याच्या अखेरच्या क्षणांना स्वीकारत राहिल्या. रमाईंचं उभं आयुष्य पाहिलं तर त्यात, या भिक्खुणींच्या आयुष्यापेक्षा अजून वेगळं काय दिसतं? रमाईंनी फक्त घर-संसार प्रत्यक्ष साेडला नाही पण घर-संसारात राहूनही त्या वैयक्तिक जीवनातून मुक्त झाल्या. शेवटी-शेवटी तर सगळ्या विकारांना दूर सारून फक्त ‘करुणामयी’ म्हणून उरल्या. संसारात राहूनही भिक्खुणीसारखं जीवन जगणारी ही आधुनिक थेरीच नव्हती का? ही सदा-सर्वकाळ आसवे गाळणारी कशी असू शकेल? ही तर आहे भारताच्या इतिहासात अनंत काळासाठी काेरली गेलीय अशी एक कणखर व्यक्ती! समतेच्या चळवळीतील बाबासाहेबांची साथीदार… रमाबाई भीमराव आंबेडकर!
(‘रमाई : एक स्वतंत्र व्यक्तिमत्व’ या प्रा. आशालता कांबळे लिखित पुस्तकातून)






