संदीप द्विवेदी/ निहाल कोशी
- आयपीएलचा ज्वर चांगलाच वाढलाय. एकामागोमाग एक विक्रम रचले जात आहेत. फलंदाजांची बॅट चांगलीच तळपतेय.
- मात्र फलंदाजांच्या या बॅट्स बनतात कुठे? प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची कहाणी काय आहे? बॅटचे वजन आणि फलंदाची यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो?
- मेरठला क्रिकेटच्या बॅट्सचं माहेरघर का म्हणतात? ‘एसजी’ आणि ‘एसएस’ या बॅट तयार करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनींची काय कहाणी आहे…?
पारस आनंद यांना बॅट पाहून कळतं की नक्की फरक काय आहे. हातोड्याने ठोकून पाहण्याची त्यांना आवश्यकता नाही. हातात बॅट आणि त्याकडे डोळे केंद्रित. गेले तीन दशकं पारस हेच काम करत आहेत. चेंडू बॅटवर आल्यानंतर किती वेगाने भिरकावून गेला. थोड्याच अंतरावर जतीन सरिन सांगतात, मी पाहून सांगू शकतो. रात्री असो किंवा दिवसा-हेच माझं काम आहे. कुठल्या बॅटने खणखणीत फटका बसेल किंवा नाही.
दोन माणसं आणि दोन कंपन्या, ‘एसजी’ आणि ‘एसएस’... पण शहर मात्र एकच. T20 क्रिकेटचं आगमन होण्याआधीपासून मेरठ हे क्रिकेट बॅट्सचं माहेरघर आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली या दिग्गजांनी मेरठ इथे तयार झालेल्या बॅटनेच अद्भुत असे विक्रम रचले. वीरेंद्र सेहवागने ज्या बॅटने त्रिशतक झळकावलं ती इथल्याच कारखान्यात तयार झाली. व्हीव्हीएस लक्ष्मणची २८१ धावांची खेळी असो किंवा युवराज सिंगचे सहा चेंडूत सहा षटकार. विक्रमवीर बॅट्स मेरठच्याच. T20 वर्ल्डकप जिंकला तेव्हा रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ज्या बॅट्स नेल्या होत्या त्याही इथल्याच. बॅट्समनला नक्की काय हवं आहे हे चपखल ओळखणाऱ्या हातांनीच या बॅट्सची निर्मिती केली आहे.

संजू सॅमसनचा तातडीने कॉल
T20 वर्ल्डकपच्या महिनाभर आधी संजू सॅमसनने घाईघाईत आणि काळजीने पारस यांना कॉल केला. जो प्रश्न संजूला भेडसावत होता त्याचं उत्तर पारस यांच्याकडे होतं. त्यामुळे संजूने पारस यांनाच कॉल केला. सराव करताना संजूच्या तीन बॅट मोडल्या. बॅटचा बॅलन्स व्यवस्थित होता, वजन पुरेसं होतं. बॅटचा फीलही उत्तम होता. पण तरी बॅट मोडण्याचं थांबेना. महिनाभरानंतर स्पर्धेत अफलातून कामगिरीसाठी संजूला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण महिनाभरापूर्वी कुठल्या बॅटने खेळावं असा प्रश्न त्याच्यासमोर होत्या कारण बॅट मोडत चालल्या होत्या.
संजूचा कॉल आला तेव्हा तो म्हणाला बॅट मोडत आहेत. सगळं नीट आहे तरीही असं होतंय. रिबाऊंड साठी मी हलक्या पद्धतीचं लाकूड असलेली बॅट तुला देतो. तुला त्याची गरज आहे. बॅट मोडू नयेत यासाठी वरच्या बाजूला टेप गुंडाळणं आवश्यक आहे असंही सांगितलं. फेस टेप वापरण्याची क्लृप्ती जुन्या काळातले क्लब क्रिकेटपटू वापरत असत. यामुळे बॅट मजबूत होत असे आणि ठिसूळता येत नाही. T20 प्रकारात जगातल्या अव्वल फलंदाजांमध्ये गणना होणारा संजू ही गोष्ट विसरला होता.
‘’बॅटची निर्मिती करणारा माणूस आणि बॅट्समन यांचा ऋणानुबंध खास असतो. बॅट्समनची चूक आहे असं त्याला वाटू न देता बॅट तयार करणाऱ्याला प्रश्न सोडवायचा असतो.बॅटचं वजन, संतुलन, मजबूतपणा या कशाशीही तडजोड न करता बॅट्समनचा प्रश्न सोडवायचा असतो. त्यांना न दुखावता त्यांना नेमकं काय हवंय हे आम्ही बघतो.’’
पारस यांच्या सॅन्सस्पारेल्स ग्रीनलँड्स कंपनीत सहा माणसं आहेत. क्रिकेटविश्वात ही कंपनी एसजी या नावाने प्रसिद्ध आहे. या सहाजणांचं कामच हे आहे की मोठ्या फलंदाजांना त्यांच्या बॅटसंदर्भात काय हवं नको ते पाहणं. बॅट्समनकडून चिंतातूर स्थितीत येणाऱ्या कॉलना त्याने डिस्ट्रेस कॉल असं नाव दिलं आहे. सुनील गावस्करांनी पारस यांच्या काकांना असा कॉल केला होता. मोहम्मद अझरुद्दीन यांनीही. राहुल द्रविडने पारस यांना कॉल केला होता. भविष्यात आयुष म्हात्रेही त्यांना कॉल करेल. अलीकडे पारस यांचा मुलगा नव्या क्रिकेटपटूंचे बॅटचे प्रश्न सोडवतो. तुफान फटकेबाजी करणाऱ्यांची परंपरा सुरू राहते. क्रीझवर कोण एवढंच फक्त बदलतं.
इशान किशनची बॅटरुपी तलवार
अझरुद्दीन यांच्या माध्यमातून द्रविड एसजी कंपनीच्या संपर्कात आला. द्रविड ११७०-११८० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बॅटने खेळला नव्हता. अझरुद्दीन एसजी कंपनीची ११२० ग्रॅमची बॅट वापरायचा. ती अतिशय हलकी आणि वेगवान चालायची. द्रविडने अझर यांना एसजी कंपनीशी बोलण्याची विनंती केली. त्यानंतर द्रविडही हलकी बॅट वापरू लागला. प्रचंड ताकदीपेक्षाही टायमिंग ही द्रविडची जमेची बाजू होती. गोलंदाज कितीही वेगाने गोलंदाजी करत असला तरी द्रविड चेंडूपर्यंत पोहोचत असे. T20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारा इशान किशन हलकी बॅट वापरतो. त्याच्या बॅटचं वजन ११२५ ग्रॅम एवढं असतं. पण हलकी बॅट वापरण्याचं त्याचं कारण वेगळं आहे. तो बॅट तलवारीसारखी वापरतो असं पारस सांगतात. कट, पूल, इनसाईड आऊट हे सगळे फटके तो हलक्या बॅटने लगावतो. परिणाम आपण सगळे जाणतोच.

हार्दिक पंड्याची मागणी वेगळी असते. बॅटच्या टोकाला घाटदार असावी. हार्दिक वापरतो त्या ८० टक्के बॅट्सना टोकाच्या बाजूला मोठा बाक आहे. बॅट तयार करणाऱ्या मंडळींना हा बाक खूप आहे असं वाटतं.सचिन तेंडुलकरला एक गोष्ट कळली होती ती म्हणजे सतत फटकेबाजी झाल्यानंतर बॅटचं लाकूड आक्रसतं आणि स्वीट स्पॉट तयार होतो. बॅटची निर्मिती करणाऱ्यांना त्याने वेगळा विचार करण्यास सुचवलं. हार्दिकने बॅटचं ऐकलं. एसजी कंपनीने प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत २०० टक्के बाक असलेली बॅट तयार केली. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार, बाक जास्त असलेल्या बॅटने अधिकाअधिक पल्लेदार फटके लगावता येतात. हार्दिकला बॅटच्या प्रत्येक भागाचा वापर करत षटकार मारायचा आहे. ४५ डिग्रीच्या कोनात मारायचा आहे. नेहमीच्या आकाराच्या बॅटने हे शक्य नाही असं पारस सांगतात.
ऋषभ पंतच्या बॅटला हार्दिकएवढा बाक नाही. पंतच्या बॅटला खालच्या बाजूला बाक आहे. के.एल.राहुल अशीच बॅट वापरतो. माझ्यासाठी बॅटचं संतुलन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बॅटचा पंच. ऋषभने एका व्हीडिओत हे सांगितलं.
कोणाची बॅट किती वजनाची?
T20 वर्ल्डकपपूर्वी शिवम दुबे एसएसच्या फॅक्टरीत आला होता. मी त्याला विनंती केली की त्याने ३० ग्रॅम जड बॅट वापरावी असं सरीन सांगतात. शिवम लोअर मिडल ऑर्डरमध्ये खेळत आहे. हाणामारीच्या षटकात त्याला बॅटिंग करावी लागते. त्याने अधिकाअधिक षटकार मारावेत अशी संघाची अपेक्षा असते. त्याने माझं ऐकलं. त्याची कामगिरी पुरेशी बोलकी आहे.
सरीन यांनी धोनीलाही असाच सल्ला दिला होता. धोनी १२२० ग्रॅम वजनाची बॅट वापरतो. हाणामारीच्या षटकांमध्ये तो ३० ग्रॅम जड बॅट वापरतो. या षटकांमध्ये गोलंदाज अधिक वेगाने चेंडू टाकतात. त्याचवेळी धोनी अधिक वजनाच्या बॅटने षटकारांची लयलूट करतो.
मोठे षटकार लगावणारा कोणताही फलंदाज जास्त वजनाच्या बॅट वापरणार हे नक्की. हलक्या बॅटने पल्लेदार षटकार लगावता येत नाहीत असं सरीन सांगतात. कायरेन पोलार्ड, आंद्रे रसेल १२५० ग्रॅम वजनाची बॅट वापरतात. तेंडुलकर १३०० ग्रॅम वजनाची बॅट वापरायचा. सूर्यकुमारच्या बॅटचं वजन ११७० ग्रॅम आहे. रोहितच्या बॅटचं वजन १० ग्रॅम जास्त आहे. अभिषेक शर्माही ताकदवान बॅट वापरतो. विराटच्या बॅटचं वजन ११७४ ग्रॅम एवढं आहे तर तिलक वर्मा ११४० ग्रॅम वजनाची बॅट वापरतो.
एखाद्या टेलरला आपल्या ग्राहकाच्या कपड्यांची मापं लक्षात असतात तसं सरिन यांना बॅटबाबतचे आकडे पाठ असतात. डेटा म्हणून नाही पण कोणत्या बॅट्समनची बॅट किती ताकदीची हे मित्र म्हणून त्यांना माहिती असतं. सरिन बॅट आणि बॅट्समनबद्दल भरभरून बोलतात.

बॅट संदर्भात सौरव गांगुली कमाल आहेत असं सरिन सांगतात. ते बॅटसाठी दोन किटबॅग बरोबर बाळगत असत. कोहली जीनिअस आहे. त्याला बॅटबद्दलचे सगळे बारकावे अचूक ठाऊक असतात. धोनी अतिशय स्मार्ट आहे. बॅट नक्की कशी हवी आहे याचं ज्ञान धोनीला आहे. सरीन यांना मॅच पाहायला वेळ कमी मिळतो कारण ते सतत कामात असतात. मॅच पाहायला वेळ मिळाला तर ते बॅट पाहतात. कोणता खेळाडू कोणती बॅट वापरतो आहे, कसे फटके लगावतो आहे, कुठल्या बॅटला बाक आहे या गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. एखाद्या बॅट्समनला विशिष्ट फटका लगावल्यानंतर तो कोणत्या बॅटने लगावला हे सरिन सांगतात. खेळाडूचा खेळ पाहून माझा खेळाडू जुनी बॅट वापरतोय का नवी हे सांगू शकतो.
सूर्यकुमार यादवला बॅटचं वजन आणि बाक यांनी फार फरक पडत नाही. त्याला ग्रेन आवडतं. बॅटच्या रंगात लाल रंग असावा असं त्याला वाटतं. मोठी ग्रेन आणि लाल रंग हे त्याला हवं असतं. ग्रेनची फार मोठी भूमिका नसते पण फटके मारताना त्याचा फायदा होतो. सूर्याच्या बॅटचं संतुलन अतिशय सुरेख असतं. बॅटचा लूक खूप महत्त्वाचा ठरतो. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. फलंदाज मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या हातातल्या बॅटवरून आत्मविश्वास कळतो.
ह्यूमिडीफायर रुम
एसजीच्या फॅक्टरीत ह्यूमिडिफायर रुम आहे. पूर्ण तयार न झालेल्या बॅट्स रांगेत मांडून ठेवलेल्या असतात. आर्द्रता हा खूप महत्त्वाचा ठरतो. खूप कोरड्या सरफेसने कामगिरीवर परिणाम होतो. बॅटमध्ये ओलसरपणा राहिला तर वजन वाढतं. लाकडाचा पोत, घनता आणि रिबाऊंड यांच्या परस्पर संबंधावर संशोधन करत आहेत. बॅटचा जो भाग फटकेबाजीत निर्णायक ठरतो त्या सगळ्याबाबत विचारविमर्श सुरू आहे. लाकडाचा तो भाग ज्याने फटका जोरकस होतो, रिबाऊंडसाठी अचूक दाब किती असावा, बॅट हँडलचं कर्व्ह आणि ब्लेड यांच्यातील संबंध या सगळ्यावर काम सुरू आहे. आम्हाला लवकरच फॉर्म्युला सापडेल असं पारस सांगतात. या चाचणीला डिजिटल माध्यमाचा पर्याय नाही. कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल मशीनद्वारे बॅट हँडल्स अचूकतेने तयार करतात. हातोडा पक्का करतो.
बॅटला आकार देणारा माणूस नव्हे तर बॅट निर्मितीतला प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे असं पारस सांगतात. हॅडलची निवड करणारा माणूस, क्लेफ्ट निवडणारा माणूस, हँडल बसवणारा माणूस, लाकूड ठरवणारा, बॅटला वाळूची देणारा माणूस. सँडिग करताना व्हेरिबिलिटीचा धोका असतो. बॅट्समनला ४१ मिलीमीटरची एज हवी असू शकते त्यामुळे सँडिग मॅन्युअली करावं लागतं. एका बॅटसाठी शेकडो हात खपतात. भूमिका छोटी असो वा मोठी- काम महत्त्वाचं असतं. बॅट्समन बॅटने फटके लगावतात- त्यासाठी ही सगळी मंडळी अहोरात्र खपतात. त्यावेळी मेरठमधले दोनजण पाहत असतात. किंवा पाहतही नसतात. कॉमेंटेटर्स बॅट चांगली आहे की नाही सांगण्याआधीच या दोघांना माहिती असतं.

युवराजच्या ६ षटकारांनी कसं बदललं चित्र
सरीन यांनी १९९६ मध्ये फॅमिली बिझनेसमध्ये कामाला सुरुवात केली. त्याआधी ते इंग्लंडमध्ये बॅट तयार करण्याची प्रक्रिया समजून घेतली. त्याआधी त्यांनी वडिलांकडून बॅटबाबतच्या खाचाखोचा समजून घेतल्या. जतीन यांचे वडील विद्यापीठ स्तरावरचं क्रिकेट खेळले होते. त्यावेळी क्रिकेट बॅटचं स्वरुप क्रिकेटप्रमाणे होतं.टेनिस रॅकेटपेक्षा जड आणि चेंडू मारण्यासाठी तयार. बॅटच्या स्पेसिफिकेशन्स कमी होत्या. बॅटबद्दल फार चर्चा व्हायची नाही.
२००७ वर्ष उजाडलं. दक्षिण आफ्रिकेत पहिलावहिला वर्ल्डकप झाला. सरिन यांनी याकरता इंग्लंडहून खास बॅट मागवल्या. युवराज सिंगसाठी त्यांनी सात ते आठ बॅट मागवल्या. नेहमीच्या बॅटपेक्षा अर्धा इंच लांबी जास्त होती. मधला भागही मोठा होता. युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूत ६ षटकार लगावले आणि सगळं चित्रच बदललं. बॅट मोठ्या होत गेल्या. मजबूत होत गेल्या. त्यांनी लागणारे फटके खणखणीत होऊ लागले.
सरिन यांच्या ऑफिसात त्या बॅट अजूनही डिस्प्लेमध्ये आहेत. खास बॅट मात्र युवराजकडे आहे. पण त्या बॅटची प्रोटोटाईप सरिन यांच्याकडे आहे. युवराज सिंग हा मार्केटिंगच्या विभागासाठी आदर्श माणूस होता. युवराज सिंगने देशात षटकार लगावण्याचं फंडा शोधून काढला. बॅट सेलिंगचं विश्व त्याने बदलून टाकलं. आता जो तो षटकार मारू लागतो.
त्या ६ षटकारांच्या षटकाने मेरठचं चित्र पालटलं. डिस्ट्रेस कॉल्सची संख्या वाढली. बॅटच्या प्रत्येक ग्रॅमची चर्चा होऊ लागली. त्या सगळ्याचा संदर्भ डरबानमधल्या त्या खेळीशी होता. बॅटबद्दल बॅट्समन आणि तयार करणारे यांच्यात तासनतास चर्चा होऊ लागली. बॅटचे बारकावे अधिक घोटीव झाले. दोन माणसं बॅटच्या दोन टोकांना थांबून प्रश्न सोडवत आहेत हे चित्र बदलून बॅट वापरणारा आणि तयार करणारा मित्र झाले आणि बोलू लागले.

परफेक्ट १०
पारस यांना परफेक्ट १०ची प्रतीक्षा आहे. खेळाडूला जशी बॅट हवी आहे तशीच्या तशी तयार करणं. बॅट तयार करताना आवाज होत नाही. पण बॅटने चेंडू फटकावला जातो तो आवाज सुखावणारा असतो. स्टेडियम भारून टाकणारा असा तो आवाज असतो. कृत्रिम प्रकाशात हजारो चाहत्यांच्या साक्षीने बॅटने लगावलेला तो षटकार सामन्याचं चित्रच पालटवून टाकतो.
(साभार - द इंडियन एक्स्प्रेस / दै. लोकसत्ता)






