अप्सरा आगा
- २६ जानेवारी रोजी एका ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराच्या धार्मिक ओळखीवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या छळाविरोधात उघडपणे आवाज उठवणाऱ्या दीपक कुमारवर आता गुन्हा दाखल झाला आहे.
- उत्तराखंडच्या कोटद्वारची ही घटना सिद्ध करते की, समाजात द्वेष पसरवणारे कितीही असले तरी, माणुसकीसाठी उभे राहणारे 'दीपक' अजूनही तेवत आहेत.
पोलिसांचा, सरकारचा आणि समाजाचा प्रचंड दबाव असतानाही "कोणीतरी आवाज उठवायलाच हवा…" या भूमिकेवर उत्तराखंडमधील कोटद्वार शहरातील दीपक कुमार ठाम आहे. २६ जानेवारी रोजी एका ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराच्या धार्मिक ओळखीवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या छळाविरोधात उघडपणे आवाज उठवणाऱ्या दीपकवर आता गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात निदर्शनांची तयारीही सुरू आहे, मात्र दीपक कुमार त्यानंतरही आपल्या देशाला द्वेषाची नाही, तर प्रेमाची गरज आहे, असे म्हणत ठाम उभा आहे.
कोटद्वारची ही घटना सिद्ध करते की, समाजात द्वेष पसरवणारे कितीही असले तरी, माणुसकीसाठी उभे राहणारे 'दीपक' अजूनही तेवत आहेत.

२६ जानेवारी २०२६ रोजी, उत्तराखंडमधील कोटद्वार शहरातील पटेल मार्गावरील एका वृद्ध मुस्लिम दुकानदाराच्या दुकानावर काही बजरंग दलाचे कार्यकर्ते आले. वकील अहमद नावाच्या ७० वर्षांच्या या मुस्लिम दुकानदाराच्या दुकानावर पाटी होती "बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर" या नावाची… बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुकानाच्या नावातील "बाबा" शब्दाला आक्षेप घेतला घेतला आणि दुकानदाराने नाव बदलावे अशी मागणी केली. अहमद हे पार्किन्सन आजाराने त्रस्त आहेत, मात्र अशाही अवस्थेत कुटुंबाची गुजरण व्हावी म्हणून या वयातही ते गेल्या ३० वर्षांपासून दुकान चालवत होते.
“माझं नाव मोहम्मद दीपक आहे’’
बजरंग दलाच्या सदस्यांनी त्या वकील अहमद यांच्याशी वाद घातला, घटनेचे चित्रीकरण केले आणि त्यांच्यावर दबाव आणला. जवळचे दुकानदार गप्प राहिले. मात्र त्याचवेळी बाजूलाच एक जिम चालवणाऱ्या दीपक कुमारने हा प्रकार पाहून हस्तक्षेप केला. “हिंदू दुकानदार ‘बाबा’ नाव वापरू शकतात, मग ३० वर्षांपासून चालणाऱ्या या दुकानाला नाव बदलायला का सांगताय?” असा सवाल त्याने केला. यावेळी जमावाने दीपकला त्याचं नाव विचारलं, तेव्हा त्याने संतापात उत्तर दिलं - “माझं नाव मोहम्मद दीपक आहे.” वाद वाढला आणि दीपक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बजरंग दलाच्या लोकांना दूर ढकलले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दीपक अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला, जिथे दीपकला "नायक" आणि "मोहम्मद दीपक" असे संबोधले गेले. दीपकच्या या विधानाचा अर्थ धर्मांतर नव्हता, तर "मी आधी माणूस आहे आणि मानवी हक्कांसाठी कोणत्याही धर्माच्या बाजूने उभा राहू शकतो," असा त्याचा ठाम विश्वास होता.
हाच तो दीपक कुमारचा व्हायरल व्हिडियो
या व्हिडिओनंतर दीपकविरोधात सोशल मीडियावर अनेक चिथावणीखोर पोस्ट्स व्हायरल झाल्या आणि शनिवारी ४० पेक्षा अधिक लोकांनी कोटद्वारमध्ये घोषणाबाजी करत दीपकच्या जिमला घेराव घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दीपकने सांगितले की, शनिवारचा जमाव सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर जमला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, २६ जानेवारीचा व्हिडिओ उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी दीपकला 'धडा शिकवला पाहिजे' असे म्हणत व्हायरल केला होता.

दीपकसोबत त्याचा मित्र विजय रावत हा देखील तिथे हजर होता. या दोघांनी मिळून जमावाला शांत केले आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचवली. विजय रावत यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की, "सर्वात मोठा धर्म माणुसकीचा असतो. आमचा हिंदू धर्म कोणाला मारणे किंवा शिवीगाळ करणे शिकवत नाही. चूक माणूस करतो, पूर्ण धर्म नाही. आपण माणुसकीची मिसाल दिली पाहिजे."
दीपक म्हणतो, ‘तरीही आमच्यावरच गुन्हा कसा दाखल झाला’?
या घटनेनंतर पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याऐवजी दीपक कुमारवरच गुन्हा दाखल केला. १ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले ज्यात असे म्हटले आहे की, दीपक कुमारने त्याच्या साथीदारांसह रस्त्यावर शिवीगाळ केली, जातीवाचक शब्द वापरले आणि काही व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. ३०-४० अज्ञात व्यक्तींविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सलोख्याचे वातावरण बिघडवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांशी धक्का-बुक्की करणे. दुसरा गुन्हा हा दीपक कुमारवर आणि तिसरा गुन्हा कमल पाल नावाच्या एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर पुन्हा दीपक कुमारवरच दाखल केला आहे.
पोलिसांच्या अशा वर्तनावर दीपक कुमार म्हणतो की, “पोलीस तिथे उपस्थित असतानाही, जमावाने माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल अत्यंत अपमानास्पद शिवीगाळ केली. मी माझ्या जिममध्ये होतो, आणि ते शब्द ऐकून मी त्यांना जाब विचारण्यासाठी खाली गेलो, पण पोलिसांनी मला आणि माझ्या मित्रालाच पोलीस ठाण्यात नेलं. मी पोलिसांना व्हिडिओ पुरावे दिले, शिवीगाळ करणाऱ्यांची नावे सांगितली. तरीही आमच्यावरच गुन्हा कसा दाखल झाला, हे समजत नाही.” असे तो म्हणाला.
मुस्लिम दुकानदाराने पाठीशी उभ्या असलेल्या हिंदू बांधवांचे आभार मानले
दुकानदार वकील अहमद यांनी आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या हिंदू बांधवांचे आभार मानले आहेत. "येथे आम्ही सर्व समुदाय एकत्र राहतो. कोणी हिंदू असो वा मुस्लीम, जो पीडित आहे त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सध्या या परिसरात शांतता असून दुकानदाराने आपले नाव न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

घटनेनंतर दीपक कुमारने एक व्हिडिओ संदेश जारी करून लोकांना प्रेमाचा संदेश दिला. तो म्हणाला, "मी हिंदू, मुस्लीम, शीख किंवा ख्रिश्चन असण्याआधी एक माणूस आहे. मृत्यूनंतर मला देवाकडे माणुसकीचा हिशोब द्यायचा आहे. आपल्या देशाला द्वेषाची नाही, तर प्रेमाची गरज आहे."
‘’जर त्यांनी एक आवाज दाबला, तर दुसरा आवाज उठेल.”
दीपकने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. तो म्हणतो की, “माझं नाव ‘मोहम्मद दीपक’ सांगणं हे योग्यच होतं. मी फक्त देवालाच जबाबदार आहे. धर्मामुळे एका वृद्धाला धमकावले जात होते, तेव्हा त्याच्या बाजूने उभे राहणे हीच माणुसकीची गोष्ट होती. या आंदोलनांमुळे मला काही फरक पडत नाही.”
दीपकचा मित्र विजय रावत हा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्षआहे. तो म्हणतो, “खासगी दुकानात घुसून नाव बदलायला सांगणं हा गुन्हा नाही का? एफआयआरमुळे अजून जास्त लोक आमच्यासोबत उभे राहत आहेत.”
या सगळ्या घडामोडींमुळे दीपकच्या कुटुंबावर मोठा ताण पडला आहे. त्याची पत्नी मीनाक्षी बिष्ट म्हणते, “मुलगी आजारी आहे. त्यामुळे तिला माझ्या आईकडे पाठवलंय आणि या सगळ्यामुळे तिला आणखी त्रास होईल. दीपकच्या सर्वधर्मीय मित्रांनी जरी साथ सोडलेली नसली तरी परिसरातील किंवा शेजाऱ्यांपैकी कोणीही धीर द्यायला आलं नाही", असेही त्यांनी सांगितले. दीपक लहानपणापासून विविध धर्मीय मित्रांत वाढला. तो म्हणतो, “मी जे बोललो, त्याचा मला पश्चात्ताप नाही. माझ्या आईला एफआयआर आणि जमावाची भीती वाटते, पण मी जे केलं ते अयोग्य होतं असं म्हणत ती मला ओरडलीही नाहीये. असे तो म्हणाला. “मुद्दा हा आहे की, मी एक भारतीय आहे आणि भारतात प्रत्येकाला समान अधिकार आहेत. कोणीतरी बोलायलाच हवं. जर त्यांनी एक आवाज दाबला, तर दुसरा आवाज उठेल.”
#IStandWithMuhammadDeepak हा हॅशटॅग व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेत दीपकचे कौतुक केले. "उत्तराखंडचा दीपक हा भारताचा खरा 'हिरो' आहे, जो संविधान आणि माणुसकीसाठी उभा राहिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू सिंह आहेस," अशा शब्दांत गांधींनी त्याचे मनोबल वाढवले. खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इतर अनेक नेत्यांनीही दीपकच्या धैर्याची प्रशंसा केली.






