अप्सरा आगा
- नीट व सीबीएसई पेपरफुटीमुळे १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात तीव्र आंदोलन.
- सरकार चर्चा करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांना बदनाम करून तरुणांचा आवाज दाबत आहे.
- हे आंदोलन गांधी आंबेडकरांच्या अहिंसक विचारांवर असून, पुण्यानंतर नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही आंदोलन केले जाईल.
देशातील सर्वोच्च आणि राष्ट्रीय स्तरावरील 'नीट', 'सीबीएसई' यांसह विविध परीक्षांमधील पेपरफुटी व कथित घोटाळ्यांमुळे देशभरातील १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले.
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला पुण्यातील विविध विद्यार्थी संघटना, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. आंदोलनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत अभिजित दिपके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असीम सरोदे यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना, हे आंदोलन केवळ पुण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात पसरणार असल्याचा इशारा दिला.
अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पुण्यातील आंदोलन (फोटो क्रेडिट: अप्सरा आगा))
अभिजित दिपके यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘देशात जेव्हा जेव्हा सामान्य जनता किंवा तरुण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा तेव्हा आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा, त्यांना फेक ठरवण्याचा किंवा आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हे विसरू नये की आपला देश आंदोलनांच्या माध्यमातूनच स्वतंत्र झालेला आहे. आपल्या देशातील लोकशाही आज जिवंत आहे, ती केवळ आणि केवळ जनआंदोलनांमुळेच सुरू आहे.’
दिपके पुढे म्हणाले, ‘आम्हाला फेक किंवा समाजकंटक म्हणण्यापेक्षा रस्त्यावर उतरून व्यक्त होत असलेल्या देशातील सुशिक्षित तरुणांचे नेमके म्हणणे काय आहे, हे सरकारने समजून घेतले पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे सरकार तरुणांच्या भविष्याशी निगडित असलेल्या एवढ्या मोठ्या संवेदनशील विषयावर चर्चा करायलाच तयार नाही. आमची भूमिका आणि आमचे विचार सोशल मीडियावरून पद्धतशीरपणे दडपण्याचा प्रयत्न आयटी सेलच्या माध्यमातून होत आहे.’
१ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना फटका
दिपके म्हणाले की, देशभरातील एक कोटीहून अधिक प्रामाणिक विद्यार्थ्यांवर या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि भ्रष्टाचारा मुळे प्रचंड अन्याय झाला आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यांना न्याय मिळवून देणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

‘आम्ही येथे कोणाशी वैयक्तिक भांडण करण्यासाठी किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी एकत्र आलेलो नाही. तर, देशातील खिळखिळी झालेली शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. आम्ही आजही सरकारशी सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु सरकारनेही चर्चेची दारं खुली ठेवली पाहिजेत,’ असे आवाहनही दिपके यांनी केले.
पुण्यातून आंदोलनाची सुरुवात
पुणे हे ऐतिहासिक काळापासून 'शिक्षणाचे माहेरघर' आणि विद्यार्थ्यांचे हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच या राष्ट्रीय पातळीवरील अन्यायाविरोधातील आंदोलनाची सुरुवात पुण्यातून म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून करण्यात येत असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.
हे आंदोलन केवळ पुण्यापुरते मर्यादित राहणार नसून, आगामी काळात देशातील इतर प्रमुख शैक्षणिक केंद्रांवरही नेले जाईल. भविष्यात नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही अशाच प्रकारची तीव्र जनआंदोलने उभी केली जातील आणि विद्यार्थ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही ः डॉ. विश्वंभर चौधरी
या आंदोलनाला आणि पत्रकार परिषदेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी उपस्थित राहून आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘हे आंदोलन पूर्णपणे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहिंसक व घटनात्मक विचारांवर आधारित आहे.

आज देशातील लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला देशातील लोकशाही आणि विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल, तर जनआंदोलनांशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. अशा आंदोलनांना जनतेचा पाठिंबा मिळून त्यांची समाजात विश्वासार्हता निर्माण होणे आज अत्यंत गरजेचे आहे.’
‘विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण’
ॲड. असीम सरोदे म्हणाले, ‘परीक्षांमधील सातत्यपूर्ण गैरव्यवस्था आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही तरुण विद्यार्थ्यांना नैराश्यातून आपले जीवन संपवावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे जीव जात असतानाही सरकार या प्रश्नावर संवेदनशीलतेने प्रतिसाद देताना दिसत नाही. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
आपल्याकडून चुका झाल्या आहेत हे मान्य करण्याची आणि देशवासीयांची, विद्यार्थ्यांची माफी मागण्याची प्रवृत्ती सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये अजिबात दिसून येत नाही. शिक्षण व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, मात्र सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे.’
विद्यापीठ परिसरात घोषणाबाजी अन् निदर्शने
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि शैक्षणिक संकुलाच्या परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’, ‘विद्यार्थ्यांशी खेळ मांडणाऱ्या सरकारचा निषेध असो’, ‘शिक्षण व्यवस्थेचे व्यापारीकरण थांबवा’, अशा घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता.
(आंदोलकांनी हातात फलक घेऊन केला निषेध (फोटो क्रेडिट: अप्सरा आगा))
आंदोलकांनी हातात फलक घेऊन परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कारभाराचाही निषेध केला. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी विद्यापीठ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे पुण्यातील विद्यार्थी वर्गात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळबळ उडाली असून, आगामी काळात हे आंदोलन काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






