अप्सरा आगा
- NEET मध्ये 530 गुण असूनही EWS धोरण अस्पष्ट असल्याने अथर्वचा MBBS प्रवेश अडकला.
- कोर्टात “मला फक्त 10 मिनिटं द्या” म्हणत स्वतः ठाम युक्तिवाद केला.
- न्यायालयाने कलम 142 वापरून 2025-26 साठी प्रोव्हिजनल MBBS प्रवेश व 7 दिवसांत कॉलेज वाटपाचे आदेश दिले.
मध्य प्रदेशातील जबलपूरचा अथर्व चतुर्वेदी हा एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थी. डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन त्याने नीट परीक्षा दिली आणि 530 गुण मिळवले. गुण चांगले असल्यामुळे त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कोट्यातून एमबीबीएस प्रवेश मिळायला हवा होता. मात्र मध्य प्रदेश सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील EWS आरक्षणाबाबत स्पष्ट धोरणच तयार केले नव्हते. परिणामी गुण असूनही त्याचा प्रवेश अडकला आणि त्याच्यासमोर वर्ष वाया जाण्याचा धोका उभा राहिला.
अनेक विद्यार्थी अशा वेळी पुढच्या वर्षाची वाट पाहतात; पण अथर्वने हार मानली नाही. वकिलीचे शिक्षण नसतानाही त्याने स्वतः कायद्याचा अभ्यास सुरू केला. संविधानातील कलमे, न्यायालयीन प्रक्रिया आणि संबंधित नियम समजून घेत त्याने स्वतःच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. जबलपूर उच्च न्यायालयात स्वतः युक्तिवाद करताना न्यायाधीशांनी त्याला “तू वकील व्हायला हवा” असेही सांगितले होते. त्याच आत्मविश्वासाने त्याने ६ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयात मोठमोठ्या वकिलांची उपस्थिती असताना अथर्वने नम्रपणे न्यायालयाला केवळ दहा मिनिटे वेळ मागितला. त्या दहा मिनिटांत त्याने स्पष्ट सांगितले की गुण असूनही केवळ सरकारी धोरणातील त्रुटीमुळे विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणे अन्यायकारक आहे. त्याचा शांत आणि ठाम युक्तिवाद न्यायालयाला पटला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने संविधानातील कलम १४२ चा वापर करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि मध्य प्रदेश सरकारला आदेश दिले की EWS प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना २०२५-२६ सत्रासाठी प्रोव्हिजनल एमबीबीएस प्रवेश द्यावा आणि सात दिवसांत कॉलेज वाटप करावे.
बारावीत त्याने गणित आणि जीवशास्त्र दोन्ही विषय घेतले होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाची संधी असूनही त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडले नाही. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि शाळेत मिळालेले संस्कार यामुळे तो न्यायालयात आत्मविश्वासाने उभा राहू शकला. संकटाच्या काळात त्याने जीवशास्त्राची पुस्तके बाजूला ठेवून संविधान वाचले आणि स्वतःची बाजू स्वतःच लढवली.
या निर्णयामुळे केवळ अथर्वलाच नाही तर त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असला तरी खासगी महाविद्यालयांच्या फीची चिंता त्याच्या कुटुंबाला आहे. मात्र एका जिद्दी विद्यार्थ्याने व्यवस्थेतील त्रुटीविरुद्ध उभे राहून न्याय मिळवला आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला.
थोडक्यात काय?
1) गुण असूनही प्रवेश अडकला - NEET मध्ये 530 गुण मिळूनही EWS आरक्षणाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने अथर्वचा MBBS प्रवेश थांबला.
2) स्वतःच कायद्याचा अभ्यास - वकिलीचे शिक्षण नसतानाही त्याने संविधान व नियम समजून स्वतःच न्यायालयीन लढा सुरू केला.
3) सुप्रीम कोर्टात थेट युक्तिवाद - “मला फक्त 10 मिनिटं द्या” म्हणत त्याने स्वतः सर्वोच्च न्यायालयात ठाम बाजू मांडली.
4) कोर्टाचा ऐतिहासिक आदेश - कलम 142 वापरून 2025-26 सत्रासाठी प्रोव्हिजनल MBBS प्रवेश व 7 दिवसांत कॉलेज वाटपाचे निर्देश दिले.
5) अनेक विद्यार्थ्यांना दिलासा - या निर्णयामुळे फक्त अथर्वच नव्हे तर अशाच परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठीही मार्ग मोकळा झाला.






