टीम बाईमाणूस
- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न राज्य अल्पसंख्याक आयोगाने फेटाळून लावले आहेत.
- आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात आतापर्यंत निष्पन्न झालेल्या आठही पीडित मुली या मुस्लिम समाजातील आहेत.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न राज्य अल्पसंख्याक आयोगाने फेटाळून लावले आहेत. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अधिकृत माहिती देत स्पष्ट केले की, या प्रकरणात आतापर्यंत निष्पन्न झालेल्या आठही पीडित मुली या मुस्लिम समाजातील आहेत. तसेच, या गंभीर प्रकरणाचा गैरफायदा घेत खोट्या अफवा पसरवून हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोक्सो आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
नेमके प्रकरण काय…?
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका १९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे गंभीर प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. यामुळे परतवाडा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद हा महागड्या गाड्यांमधून फिरून आणि रील बनवून मुलींना जाळ्यात ओढत असे. त्याने अमरावती शहरातील एका मित्राची खोली काही तासांसाठी भाड्याने घेऊन तिथे मुलींना बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ त्याने उजेर खान, मोहम्मद साद आणि तरबेज खान यांसारख्या आपल्या मित्रांना पाठवले आणि त्यांनी ते व्हॉट्सॲप तसेच टेलिग्रामवर प्रसारित करून मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
राजकीय नेत्यांकडून प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न
सुरुवातीला काही राजकीय नेत्यांनी, विशेषतः भाजप नेत्या नवनीत राणा यांनी, या प्रकरणाला लव्ह जिहाद आणि धार्मिक वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत १८० हून अधिक हिंदू मुलींचे शोषण झाल्याचा आणि ३५० हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा केला होता. मात्र, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी हे आकडे फेटाळून लावत आतापर्यंत केवळ ८ अल्पवयीन पीडित मुलींची ओळख पटली असून १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो हाती लागल्याचे स्पष्ट केले आहे.

यातच आज, १७ एप्रिल २०२६ रोजी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा खुलासा केला की, या प्रकरणातील सर्व ८ पीडित मुली या अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लीम समाजातीलच असून यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नाही. चुकीची माहिती पसरवून शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी अयानसह त्याचे व्हिडिओ व्हायरल करणारे आणि त्याला खोली उपलब्ध करून देणारे असे एकूण ८ जण अटक केले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंडिंग - राणा
नवनीत राणा यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करताना, 'तारीख नको, सुनावणी नको...थेट एन्काऊंटर करा' अशी उघड भूमिका घेतली. प्रशासनाने आरोपी अयान अहमदच्या घरावर चालवलेला बुलडोझर पुरेसा नसून, अशा गुन्हेगारांचे भारतीय नागरिकत्व रद्द करून त्यांना देशाबाहेर काढले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणाला त्यांनी पद्धतशीर कटाचे स्वरूप दिले आहे.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत झालेल्या अशाच एका प्रकाराचा संदर्भ देत, राणा यांनी असा दावा केला की या संपूर्ण रॅकेटद्वारे केवळ हिंदू मुलींना टार्गेट केले जात आहे. हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून यामागे मोठी टोळी सक्रिय आहे. या रॅकेटला चालवण्यासाठी आणि हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंडिंग मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या व्यापक नेटवर्कची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
आठही पीडित मुली मुस्लिम समाजाच्या - प्यारे खान
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीचा उल्लेख केला. "एसपी विशाल आनंद यांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणात ८ पीडित मुली आहेत. त्या सर्व मुली अल्पसंख्याक आहेत. यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नाही. अशा अफवा पसरवल्या जात होत्या की यात १८० मुलींचं शोषण झालं आहे आणि त्या सर्व हिंदू समाजाच्या आहेत वगैरे. पण असं काहीही नाही. त्या सर्व मुली मुस्लीम समाजाच्या आहेत. यासंदर्भातल्या सर्व अफवा निराधार होत्या. तिथे वातावरण बिघडावं यासाठी या अफवा पसरवल्या जात होत्या", असं प्यारे खान म्हणाले.

दरम्यान, परतवाडा प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचंही प्यारे खान म्हणाले. "अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. मग ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा कितीही प्रभावी असो. नयन सुगंधे नावाचा आरोपी अयान अहमदला खोली उपलब्ध करून द्यायचा. तिथे हे सगळे प्रकार केले जात होते. यापैकी दोन मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. इतर ६ मुलींचे फक्त फोटो व्हायरल झाले आहेत", अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व आरोपींची सखोल चौकशी व्हायला हवी..
आठही पीडित मुली मुस्लिम समाजाच्या असून यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नसल्याचं प्यारे खान यांनी म्हटलंय सोबतच त्यांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. खान यांनी पत्रकार परिषदेत केवळ अफवांचे खंडन केले नाही, तर गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काही महत्त्वाच्या मागण्या आणि निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मागणी करताना प्यारे खान म्हणाले की, जशी इतर संवेदनशील प्रकरणांमध्ये एसआयटी नेमून कारवाई होत आहे, तशीच या प्रकरणातही विशेष तपास पथक गठीत करून मुख्य आरोपी अयान अहमद आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे.या प्रकरणाची तक्रार आयोगाकडे प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) विशाल आनंद यांच्याशी थेट चर्चा केली आणि आरोपींवर कडक कारवाई करून कोणताही दुवा सुटणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
या सगळ्यांमागे मोठी संघटित टोळी सक्रिय - अनिल बोंडे 
पोलिसांनी अद्याप ८ पीडितांची पुष्टी केली असली तरी, राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी असा दावा केला आहे की मुख्य आरोपी अयान अहमद याने जवळपास १८० तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यांनी असाही आरोप केला आहे की या मुलींचे सुमारे ३५० अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्यात आले आहेत. बोंडे यांच्या मते, हे केवळ एका १९ वर्षीय मुलाचे काम नसून यामागे एक मोठी संघटित टोळी सक्रिय आहे. व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून हे जाळे पसरवले गेले आहे. यात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील मुलींना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राणांच्या हकालपट्टीसाठी अमित शहांना पत्र
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नवनीत राणा यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, "महाराष्ट्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर चालणारे राज्य आहे. जे लोक केवळ राजकीय स्वार्थासाठी खोट्या अफवा पसरवून राज्याचा विकास आणि शांतता धोक्यात आणत आहेत, त्यांची गय केली जाणार नाही. नवनीत राणा या स्वतः अमरावतीच्या असूनही त्यांना या प्रकरणातील पीडितांची खरी माहिती कशी काय मिळाली नाही, हा प्रश्न गंभीर आहे."
खान यांनी पुढे असाही खळबळजनक दावा केला की, राणा यांना शहरात दंगली घडवून सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. "या प्रकरणात पीडित मुलींची खोटी ओळख सांगून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी राणा यांच्यावर 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी माझ्याकडे आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून नवनीत राणा यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी करत आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.






