अप्सरा आगा
- पाषाण तलावात सांडपाणी मिसळल्याने आणि जलपर्णी वाढल्याने ऑक्सिजनची पातळी खालावली, ज्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आणि परिसरात दुर्गंधी पसरली.
- या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेने उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता दर्जाच्या ४ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
- पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही.
पुणे शहरातल्या पाषाण तलावात मागच्या काही दिवसांपूर्वी जे काही झालं, त्यानं नुसती खळबळ उडाली नव्हती, तर निसर्गप्रेमींच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. तलावातील हजारो मेलेले मासे अचानक तरंगायला लागले. ज्या तलावाच्या काठावर लोक फिरायला जायचे, तिथं मेलेल्या माशांचा असा काही घाण वास सुटला की तिथं उभं राहणं मुश्किल झालं होतं. आता या प्रकरणात पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली असून, कामात हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत चार अधिकाऱ्यांना निलंबित केलंय.
पाषाण तलावात अचानक मासे मरून पडायला सुरुवात झाली. बघता बघता मेलेल्या माशांचा खच साचला. लोक म्हणायला लागले की, तलावाच्या पाण्यात काहीतरी विषारी द्रव्य गेलंय किंवा पालिकेचं लक्ष नसल्यामुळं हे झालंय. खरं तर, या तलावाची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेच्या काही विशिष्ट विभागांकडं होती. पण तिथं जलपर्णीचा विळखा इतका वाढला होता की माशांना श्वास घ्यायला ऑक्सिजनच उरला नव्हता, असं प्राथमिक तपासात समोर आलं. पाणी खराब झालं, त्यात घाण मिसळली अन बिचारे मासे तडफडून मेले. जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा लोक संतापले. "आम्ही टॅक्स भरतो ते काय हे असं बघायला का?" असा सवाल पुणेकर विचारू लागले. सामाजिक कार्यकर्त्यांनी तर पालिकेला धारेवर धरलं. विषय मोठा झाला, मग पालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश दिले.
चौकशी झाली अन् समोर आलं की, जे अधिकारी या कामासाठी नेमले होते, त्यांनी आपलं काम केलं नाही. तलावाची स्वच्छता करणं, तिथलं पाणी तपासणं आणि जलपर्णी काढणं ही त्यांची जबाबदारी होती. पण साहेबांनी त्याकडं साफ दुर्लक्ष केलं होतं. शेवटी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी या प्रकरणात चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली. यात उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आलबेल' कारभाराची पोलखोल
एकूणच काय, तर पाषाण तलावातल्या माशांच्या मृत्यूने पालिकेच्या 'आलबेल' कारभाराची पोलखोल केली आहे. या चार अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई म्हणजे हिमनगाचं फक्त एक टोक आहे. जर पुण्यातील इतर नद्या आणि तलावांकडं वेळेवर लक्ष दिलं नाही, तर पाषाणसारखी वेळ मुठा नदीवर किंवा इतर तलावांवर यायला वेळ लागणार नाही. आता या कारवाईनंतर तरी पालिकेला जाग येईल आणि ते तलाव खऱ्या अर्थाने स्वच्छ करतील, अशी अपेक्षा आहे.
"काम करा नाहीतर घरी जा"
या कारवाईमुळं पालिकेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. "काम करा नाहीतर घरी जा" असाच इशारा प्रशासनाने यातून दिलाय. पण लोकांचं म्हणणं वेगळं आहे. लोक म्हणतात की, फक्त खालच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून काय होणार? मोठ्या साहेबांवर कारवाई कोण करणार? आणि मुख्य म्हणजे, जे मासे मेले आणि तलावाचं जे नुकसान झालं, ते कसं भरून येणार?
पाषाण तलावाची दुरवस्था कशामुळं?
पाषाण तलाव हा पुण्याचा एक महत्त्वाचा वारसा आहे. तिथं अनेक विदेशी पक्षी येतात. पण गेल्या काही वर्षात या तलावाला ग्रहण लागलंय. आजूबाजूच्या सोसायट्यांचं मैलापाणी थेट तलावात सोडलं जातंय, अशी तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. जेव्हा हे सांडपाणी प्रक्रिया न करता पाण्यात जातं, तेव्हा पाण्यातला ऑक्सिजन कमी होतो. त्यात जलपर्णी वाढली की मग तर माशांसाठी तो तलाव म्हणजे मरणाचं द्वारच ठरतो.
या प्रकरणावरून आता राजकारणही तापलंय. विरोधकांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढलेत. "स्मार्ट सिटीच्या गप्पा मारता अन एक तलाव नीट ठेवता येत नाही का?" असा सवाल विचारला जातोय. अधिकारी मात्र आता बचावात्मक पवित्रा घेत आहेत. निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची बाजू काय आहे, हे अजून स्पष्ट झालं नसलं, तरी पालिकेने ही कारवाई करून लोकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केलाय हे मात्र नक्की.
"माशांच्या मृत्यूमुळे परिसरात पसरलेल्या उग्र दर्पामुळे पाषाण, बाणेर आणि सुस परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला आहे. हवेतून पसरणाऱ्या या प्रदूषणामुळे परिसरातील सोसायट्यांमधील राहणे मुश्किल झाले असून, लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोगराई पसरण्याची भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत."
पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही
पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या संवर्धनासाठी एकूण २१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. यापैकी कात्रज तलावातील गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे, मात्र पाषाण तलावासाठी आलेला निधी अजूनही पडून आहे.
पाषाण तलावातील हजारो माशांच्या मृत्यूनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या. तलावातील १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) योग्यरीत्या कार्यरत नसल्याचे आढळून आले. यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते, ज्याचा जलचरांवर गंभीर परिणाम होऊन मोठ्या संख्येने मासे व इतर जलचरांचा मृत्यू झाला.
प्रशासनाकडून पाषाण तलावातील गाळ काढता येत नसल्याचे कारण दिले जाते, कारण तलाव कधीच रिकामा होत नाही. मात्र, या तलावात दररोज १५ एमएलडी सांडपाणी येत असल्याने तो नेहमीच पाण्याने भरलेला राहणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गाळ काढण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक होते, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह संपूर्ण प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. वेळीच संवर्धन झाले असते तर तलावातील मासे आणि इतर जलचर वाचले असते, अशी खंत व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेधले असून महापालिका प्रशासनाच्याही ही घटना निदर्शनास आणून दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
"पुण्यातील पाषाण तलावातील मासे मरण पावले असून त्यांचा खच तलावात पडला आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, विषारी रसायने या तलावात सोडली जात आहेत. त्यामुळे या तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याखेरीज माशांचा खच गेली चार पाच दिवसांपासून पडलेला असल्याने त्यावर आता कीटक घोंघावत असून नागरिकांच्या आरोग्याला त्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे".
भविष्यातील उपाययोजना
"आता गरज आहे ती केवळ कारवाईची नाही, तर कृतीची. तलावात एरेटर बसवणे, सांडपाणी रोखण्यासाठी कडक भिंत किंवा वळण मार्ग तयार करणे आणि तलावाच्या स्वच्छतेसाठी एक स्वतंत्र 'लेक मॅनेजमेंट कमिटी' स्थापन करणे आवश्यक आहे. या समितीमध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असावा, जेणेकरून साहेबांच्या एसी केबिनमधून होणाऱ्या नियोजनापेक्षा जमिनीवरची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल."
पुणेकरांना आता फक्त निलंबन नकोय, तर पाषाण तलावाचा कायमस्वरूपी कायापालट हवाय. तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी जे एसटीपी प्लॅन्ट लावलेत, ते नीट चालतात की नाही, हे कोण पाहणार? तलावातली जलपर्णी फक्त फोटो काढण्यापुरती काढायची की पूर्ण साफ करायची? असे प्रश्न लोक विचारत आहेत.

ब्रिटिशकालीन पाषाण तलावाचा इतिहास आणि सध्याची दुर्दशा
एकेकाळी पुण्याचे वैभव असलेला पाषाण तलाव आज अत्यंत वाईट अवस्थेत आहे. पुण्याच्या मध्यभागी असलेला पाषाण तलाव हा मानव निर्मित तलाव असून, गर्व्हनर बंगल्यास (आत्ताचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर) आणि पाषाण सुतारवाडी भागास पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने ब्रिटिश काळात हा तलाव बांधण्यात आला होता. स्थलांतरित पक्षांचे वस्तीस्थान म्हणून या तलावाची ख्याती होती. अलीकडच्या काळात ढिसाळ व्यवस्थापन, अनियोजित विकास, प्रदूषण इत्यादींमुळे या तलावाची दुर्दशा झाली आहे. या तलावाचे पुनरुज्जीवन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी अभ्यासपूर्ण कृती आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने पाषाण तलावास मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यात येणार आहे.
पाषाण तलाव परिसर पाणथळ परिसंस्थेने घेरलेला आहे. बशीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या आणि उथळ काठ असलेला हा तलाव नैसर्गिक विविधतेने संपन्न आहे. समृद्ध वैविध्यपूर्ण अधिवास स्थलांतरीत पक्षी आणि जलचरांकरीत उपलब्ध होत होता. परंतू 2008 ते 2013 या काळत तलावाच्या सौंदर्याकरणाच्या नावाथाली इथला वैशिष्ट्यपूर्ण अधिवास नष्ट केला गेला. निलगिरी आणि बांबू यासारखी झाडे लावून इथला
नैसर्गिक आधीवास काढूनटाकण्यात आला. पाश्चात्य देशांसह भारतातील दुर्गम भागातून दुर्मिळ प्रजाती आणि पक्षी येथे सातत्याने निसर्गचक्राप्रमाणे नियमितपणे स्थलांतर करून येत होते. 2013 नंतर मात्र, हे चित्र बदलले.
तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी नैसर्गिक इको सिस्टीम उभे करणे गरजेचे आहे. खाटपेवाडी, भुकूम, भूगांव, डिआरडीओ अशी टप्प्या टप्प्याने स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. पाषाण तलावाच्या सभोवतालचे मृदा आणि जल परीक्षण सासत्याने करणे आवश्यक आहे. तलावात कारंजे उभे करून पाण्यातील प्राणवायू 8 पीपीएम पर्यंत आणावा लागेल.






