विठ्ठल साबळे
- नोव्हेंबर २०२५ मध्ये फुलंब्री तालुक्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने पालकांसमोर गंभीर प्रकार उघड केला.
- शाळेच्या परिसरात वर्गमित्रांकडून अयोग्य वर्तन झाल्याचा आरोप त्याने केला.
- या प्रकरणात चार अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस आणि शिक्षण विभाग चौकशी करत आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये फुलंब्री तालुक्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांसमोर भीतीच्या अवस्थेत एक गंभीर प्रकार उघड केला. शाळेच्या परिसरात काही वर्गमित्रांनी त्याच्यासोबत अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला. सुरुवातीला भीतीमुळे त्याने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र त्याच्या वागण्यात झालेला बदल आणि मानसिक अस्वस्थता पाहून पालकांनी विचारणा केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधत चौकशीची मागणी केली.
घटना समोर आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या वागण्यात झालेला बदल हा पालकांसाठी सर्वात मोठा धक्का होता. शाळेत जाण्याबाबत त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती. तो एकटं बाहेर जाणं टाळू लागला आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसू लागला. पालकांनी त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याने शाळेच्या परिसरात काही वर्गमित्रांकडून त्याच्यासोबत अयोग्य वर्तन झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर २५ आणि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पालकांनी शाळेच्या अकॅडमिक विभागाशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली आणि योग्य चौकशी करण्याची मागणी केली. शाळेकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
टीम बाईमाणूसशी बोलताना पीडित मुलाचे वडील सांगतात की,
“घटना घडल्यानंतर जवळपास महिनाभर आमच्या मुलाने काहीच सांगितले नाही. पण नोव्हेंबरमध्ये एक दिवस तो शाळेतून घरी आला तेव्हा तो खूप घाबरलेला होता. तो रडत होता आणि बोलायलाही तयार नव्हता. आम्ही समजावून सांगितल्यावर त्याने सांगितले की काही मुलांनी त्याला पकडले आणि त्याच्यासोबत अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याला धमकी देण्यात आली की ही बाब कुणाला सांगितल्यास उलट त्यालाच अडचणीत आणले जाईल. त्या दिवसापासून त्याच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला. तो रात्री झोपेतून घाबरून उठतो, एकटं बाहेर जाणं टाळतो आणि शाळेचा विषय निघाला तरी अस्वस्थ होतो.”
शाळा प्रशासनाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह,
पालकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर शाळा प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केल्याचे सांगितले. मात्र पालकांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीमध्ये त्यांचा किंवा त्यांच्या मुलाचा जबाब योग्य पद्धतीने नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे पालकांनी थेट मुख्याध्यापकांना भेटण्याचा निर्णय घेतला. ४ डिसेंबर २०२५ रोजी ते शाळेत गेले. मात्र त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली आणि भेटीपूर्वी काही अटी घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पीडित मुलाचे वडील सांगतात की,
“४ डिसेंबरला आम्ही शाळेत मुख्याध्यापकांना भेटायला गेलो. आम्हाला जवळपास दोन ते अडीच तास बाहेर बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर आत जाण्यापूर्वी माझा मोबाईल जमा करून घेण्यात आला. मी केबिनमध्ये गेलो तेव्हा तिथे आधीच शाळेचा कायदेशीर सल्लागार उपस्थित होता. मी एक पालक म्हणून माझ्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो. मला अपेक्षा होती की शाळा प्रशासन आमची बाजू समजून घेईल आणि योग्य कारवाई करेल. मात्र त्या वेळी आम्हाला अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला अधिकृत पातळीवर पुढे जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.”
चार अल्पवयीन वर्गमित्रांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
शाळा प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानंतर ५ डिसेंबर २०२५ रोजी पालकांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने पालकांनी लेखी अर्ज सादर केला. त्यानंतर ६ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्यात आला. फुलंब्री पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी विद्यार्थी हे पीडित मुलाचे वर्गमित्र असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवत कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे, या प्रकरणाची माहिती शाळेला दिल्यानंतरही संबंधित विद्यार्थ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला. उलट या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहता पालकांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे.तसेच तपासादरम्यान पीडित विद्यार्थ्याचा जबाब नोंदवण्यात आला असून संबंधित ठिकाणाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार बाल न्याय प्रणालीअंतर्गत पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत नामांकित इंग्रजी शाळेची भूमिका जाणून घेण्यासाठी टीम बाईमाणूस ने संबंधित शाळेशी संपर्क साधला असता सुरुवातीला शाळेच्या प्रतिनिधींनी या विषयावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “या प्रकरणावर आमचे ॲडव्हायझर बोलतील, तुम्ही काही वेळाने संपर्क साधा,” असे सांगण्यात आले. त्यानुसार काही वेळानंतर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यानंतर संबंधित क्रमांकावर संपर्क होऊ शकला नाही. पुढील प्रयत्नांनंतर टीम बाईमाणूस चा संपर्क क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणावर शाळेची अधिकृत भूमिका समोर येऊ शकली नाही. या प्रकारामुळे शाळा प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शिक्षण विभागाची चौकशी सुरू
दरम्यान, या प्रकरणाची माहिती शिक्षण विभागापर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. डिसेंबर २०२५ च्या अखेरीस प्राथमिक चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीने शाळेला भेट देऊन संबंधित माहिती संकलित केली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती राज्य शिक्षण विभागापर्यंत पोहोचली. फेब्रुवारी २०२६ मध्ये या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेचा पीडित विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. घटनेनंतर विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची भीती वाटू लागली. आरोपी विद्यार्थ्यांना रोज पाहावे लागते, या भीतीमुळे त्याच्यावर मानसिक ताण वाढला. या परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलाच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याला शाळेतून तात्पुरते दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याला मानसिक आधार आणि कुटुंबाचा आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पीडित मुलाचे वडील सांगतात की,
“या घटनेनंतर आमच्या संपूर्ण कुटुंबावर मानसिक परिणाम झाला आहे. आमचा मुलगा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो सतत भीतीमध्ये असतो. आम्ही सामान्य कुटुंब आहोत, पण आमच्या मुलाला न्याय मिळावा ही आमची एकच अपेक्षा आहे. आम्हाला कोणाशी वैयक्तिक वाद नाही, पण जे घडलं त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, हीच आमची भूमिका आहे. आज आमच्या मुलासोबत जे घडलं, ते उद्या दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत घडू नये, हीच आमची लढाई आहे.”
डिजिटल युगातील वाढते धोके
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टीम बाईमाणूसशी बोलताना मानसोपचार तज्ञ अमित टाक सांगतात कि,
“सध्याच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. अल्पवयातच मुलांना नियंत्रणाशिवाय विविध प्रकारची दृश्य सामग्री सहज उपलब्ध होते. विशेषतः पॉर्नोग्राफिक व्हिडिओ आणि हिंसक स्वरूपाची दृश्ये पाहिल्याने मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. या वयात योग्य आणि अयोग्य यातील सीमारेषा पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.” पालक आणि शाळांनी मुलांच्या डिजिटल वापरावर लक्ष ठेवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अलीकडेच उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडलेल्या एका घटनेत अल्पवयीन मुलींवर डिजिटल आणि सामाजिक दबावाचा परिणाम झाल्याचे समोर आले होते. या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तज्ज्ञांच्या मते, शाळा ही केवळ शिक्षण देण्याची जागा नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नसून शिक्षण व्यवस्थेसमोरील एक गंभीर आव्हान आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये घडलेली ही घटना डिसेंबरमध्ये अधिकृतपणे समोर आल्यानंतर प्रशासनाने तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस आणि शिक्षण विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या तपासातून सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा स्पष्ट केला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.






