- सुरज पटके
- नक्षल कमांडर हिडमाचे उदात्तीकरण असलेल्या गाण्यावर नृत्य केल्यामुळे अलीकडेच पुण्यात काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
- इतिहास सांगतो की सत्तेला बंदुकीपेक्षा गाण्यांची जास्त भीती अनेकदा वाटलेली आहे.
- काय आहे भारतातील चळवळीच्या गाण्यांचा इतिहास? चळवळीच्या गाण्यांचे स्वरूप आतापर्यंत कसेकसे बदलत गेले?
- प्रत्येक वेळी मुख्य दरवाजे बंद झाले की कलाकारांनी खिडकीतून, गल्लीबोळातून, यूट्यूबवरून, स्टेजवरून आणि लोकांच्या फोनमधून नवा मार्ग कसा शोधला आहे?
एका शाळेच्या मंचावर काही विद्यार्थी नाचतात. स्पीकरवर एक गाणं वाजत असतं. कार्यक्रम संपतो, टाळ्या पडतात, मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड होतात आणि काही तासांतच तो प्रसंग सोशल मीडियावर पोहोचतो. अचानक आनंदाचा क्षण वादात बदलतो. कारण त्या गाण्याचा संदर्भ एका वादग्रस्त नावाशी जोडलेला असतो. चौकशीची मागणी होते, राष्ट्रवादाचे दाखले दिले जातात, नक्षलवादाचा उल्लेख होतो, शाळांची जबाबदारी विचारली जाते, विद्यार्थ्यांच्या जाणिवांवर प्रश्न उपस्थित होतात. एका गाण्याभोवती प्रचंड गदारोळ उभा राहतो…
घटना पुण्याची आहे. 11 ते 13 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि इतर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्यातील शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी विविध रिमिक्स गाण्यांवर नृत्य करून आपली आदिवासी संस्कृती सादर करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान पुण्यातील शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी येथे राहून शिक्षण घेणारे किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या दोन आदिवासी विद्यार्थ्यांनी नक्षल कमांडर हिडमाच्या उदात्तीकरणाचे गाणे वाजवले आणि 'मेरे जंगल कि सेना' या गाण्यावर नृत्य सादर केले.
हे गाणं जहाल नक्षलवादी हिडमा याच्याशी संबंधित असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. अलीकडेच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च कमांडर माडवी हिडमा ठार झाला होता.
एका गाण्याभोवती इतका मोठा गदारोळ का उभा राहतो…? हा प्रश्न वरकरणी छोटा वाटू शकतो; पण त्यामागे फार मोठा इतिहास दडलेला आहे. तो इतिहास सांगतो की सत्तेला बंदुकीपेक्षा गाण्यांची जास्त भीती अनेकदा वाटलेली आहे.
(नक्षल कमांडर हिडमाचे उदात्तीकरण असलेल्या गाण्यावर नृत्य केल्यामुळे अलीकडेच पुण्यात काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले)
गाणं हे केवळ करमणुकीचं माध्यम नाही. ते लोकांच्या स्मरणात राहतं, त्यांच्या भावनांना हात घालतं, त्यांना एकत्र आणतं, त्यांना धैर्य देतं, प्रश्न विचारायला शिकवतं. भाषणं विसरली जातात, निवेदनं फाइलांत हरवतात, आदेशांची कागदपत्रं धूळ खात पडतात; पण एखादी ओळ लोकांच्या तोंडात गेली की ती पिढ्यान्पिढ्या फिरत राहते. म्हणूनच सत्ताधाऱ्यांना गाणं नेहमीच संशयास्पद वाटत आलं आहे. कारण गाणं मन जिंकतं, आणि मन जिंकणाऱ्याची ताकद सत्तेला कधीच सहज मान्य नसते.
1947 ते 2026 : चळवळीच्या गाण्यांनी स्वतःला कसं नव्यानं घडवलं?
इतिहासात पाहिलं तर भारतातही याची अनेक उदाहरणं दिसतात. आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांनी सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या गाण्यांचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील प्रसारण रोखल्याच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात.
अलीकडच्या काळात मोर्चे, सभा, धरणे आणि प्रतिकाराच्या रस्त्यांवर चळवळीच्या गाण्यांना पुन्हा हळूहळू जागा मिळत असली, तरी बहुतेक कलाकारांना आजही अतिशय नाजूक सीमारेषेवर चालावं लागतं. त्यांची कला प्रभावीही राहावी आणि त्यावर प्रतिहल्लाही होऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागते.
3 जानेवारी 2025 रोजी पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात एका बांधकामस्थळी सेप्टिक टँकमध्ये आढळून आला. त्यांनी राज्याच्या बस्तर विभागातील रस्ते प्रकल्पातील घोटाळ्यावर वृत्तांकन केल्यानंतर सरकारने चौकशी सुरू केली होती. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात त्यांची हत्या झाल्याची घटना देशाला हादरवून गेली.

“धर्म, जात, वर्ग किंवा लिंग यांच्या आधारावर कोणत्याही समुदायासाठी सहअस्तित्वच शत्रुत्वपूर्ण बनत असेल, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, त्यापासून पळ काढू शकत नाही. कारण ट्रेनने प्रवास करणं किंवा आपलं काम करणं यांसारखी अगदी सामान्य गोष्टही तुम्हाला जीवघेणी ठरू शकते,” असं ‘ब्लूज’ गायक आमिर अज़ीज सांगतात.
2017 मध्ये झारखंडमध्ये रेल्वेच्या डब्यात एका किशोरवयीन मुलाच्या झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर आमिर अज़ीजने ‘अच्छे दिन ब्लूज’ (2019) हे गाणं लिहिलं. 2020 मध्ये या गायकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली, जेव्हा Pink Floyd या प्रसिद्ध बँडचे रॉजर वॉटर्स यांनी Julian Assange यांच्या सुटकेच्या मागणीसाठी लंडनमध्ये झालेल्या आंदोलनात अज़ीज यांच्या ‘सब याद रखा जायेगा’ या कवितेतील ओळी उद्धृत केल्या.
कला की सक्रिय राजकारण?
भारतातील चळवळीच्या गाण्यांकडे पाहताना एक मूलभूत प्रश्न समोर येतो तो म्हणजे ही गाणी केवळ कला आहेत, की ती प्रत्यक्ष सामाजिक-राजकीय हस्तक्षेप आहेत? आमिर अज़ीज यांच्या मते, आंदोलनात गाण्यांचा वापर होणं स्वाभाविक आहे, कारण कला ही स्वतःतच बंडाची कृती असते. “लोकांच्या भावनांशी जोडण्यासाठी रूपकांची गरज असते,” असं ते सांगतात.
मुंबईतील रॅपर सानिया कैयूमुद्दीन मिस्त्री, उर्फ Saniya MQ, आपल्या अद्याप प्रदर्शित न झालेल्या गाण्यात म्हणते, “मेरा गाँव, मेरा गाँव, इसको बचाओ, मत खाओ...” या ओळीतील ‘गाव’ म्हणजे प्रत्यक्षात तिचा देश आहे. “या ओळीतून मी हेही सांगते की मी एक अल्पसंख्याक स्त्री, या देशाचाच भाग आहे,” असं ती स्पष्ट करते.
रूपकांचा वापर करून आपला मुद्दा मांडण्याची शैली तिने इतर गाण्यांतही कायम ठेवली आहे. तिच्या सच (2022) या पहिल्या गाण्यात ती शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करते. जनता गुमराह (2022) मध्ये बेरोजगारीचा मुद्दा हाताळते. तर उडान (2023) मध्ये मुलींना पडद्याऐवजी शिक्षण द्या, अशी ठाम मागणी करते.
(मुंबई रॅपर Saniya MQ)
दिल्लीतील संगीतकार अविक रॉय हे त्यांच्या Purple Penchant या बँडमध्ये उपरोधाचा प्रभावी वापर करतात. त्यांच्या पहिल्या Gotta Say The News (2019) या गाण्यात टीव्ही वाहिन्यांच्या बेजबाबदार वृत्तांकनावर त्यांनी थेट प्रहार केला होता.
प्रसिद्ध बँड ‘इंडियन ओशन’चे सदस्य आणि ‘ऐसी तैसी डेमोक्रसी’ या सर्जनशील समूहाशी जोडलेले संगीतकार राहुल राम यांच्या मते, प्रत्येक गोष्ट रूपकांतून सांगता येते. दडपशाहीच्या काळात उघडपणे बोलण्यापेक्षा रूपकांतून बोलण्याची कला शिकावी लागते.
कारण अविवेकी लोकांशी विवेकाने लढता येत नाही. म्हणूनच त्यांच्या गाण्यांत थेट कुणाचं नाव घेतलं जात नाही. ते म्हणतात,“मी तुम्हाला अशा एका देशाची गोष्ट सांगतो, जिथे एका रात्रीत सगळे पैसे अवैध ठरवले गेले...” एकच ओळ, पण संदर्भ सर्वांना समजतो. हीच आंदोलन गीतांची ताकद आहे. नाव न घेता सत्य सांगण्याची, आणि गाणं म्हणत समाजाला आरसा दाखवण्याची.
याच बँडचं ‘माँ रेवा’ (2000) हे गाणं नर्मदा नदीवर आधारित होतं. त्या गाण्यात नदीच्या सौंदर्याचं सुरेल चित्रण तर होतंच, पण त्याचवेळी नदीवर उभारल्या जाणाऱ्या धरणांमुळे स्थानिक लोकांना सहन कराव्या लागलेल्या विस्थापनाच्या वेदनाही त्यात दडल्या होत्या.
“कोणतंही गाणं जेव्हा एखाद्या विशिष्ट संदर्भात ऐकलं जातं, तेव्हा त्याला एक ठोस आणि वेगळा अर्थ प्राप्त होतो,” असं राहुल राम सांगतात. त्यांच्या मते, म्हणूनच या गाण्याचं रूपांतर पुढे आंदोलनाच्या गीतात झालं. नर्मदेच्या पाण्यातील सौंदर्य, किनाऱ्यावरच्या जगण्याची तगमग आणि विकासाच्या नावाखाली घरदार उध्वस्त झालेल्या लोकांचा आक्रोश या सगळ्यांना ‘माँ रेवा’ ने एकाच वेळी स्वर दिला होता. त्यामुळे ते केवळ नदीचं गाणं राहिलं नाही, तर संघर्ष आणि स्मृतीचं गीत बनलं.
भारतातील चळवळीच्या गाण्यांचा इतिहास : स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत
भारतातील चळवळीच्या गाण्यांची परंपरा समृद्ध, बहुपदरी आणि दीर्घ आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या आधीपासूनच गाणं हे केवळ करमणुकीचं माध्यम नव्हतं; ते लोकजागृतीचं, संघटनाचं आणि प्रतिकाराचं प्रभावी साधन होतं. राहुल राम सांगतात, “Indian People’s Theatre Association (इप्टा) ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातच उभी राहिली होती. सलील चौधरी आणि सुमंगला दामोदरन यांसारखे कलाकार हिंदी आणि बंगाली भाषेत गात होते.” इप्टाने नाटक, संगीत, कविता आणि लोककलांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न लोकांसमोर आणले. त्या काळात कला ही चळवळीचा अविभाज्य भाग होती.
1980 नंतर चळवळींची गाणी अधिक स्थानिक होत गेली. आदिवासी भाषांमध्ये आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही गाणी निर्माण होऊ लागली. राहुल राम ‘गाव छुडाव नहीं’ या गाण्याचा उल्लेख करतात, ज्याला त्यांनी नव्याने सादरही केलं आहे.
याचा अर्थ असा की आंदोलन गीतांनी राष्ट्रीय पातळीवरून स्थानिक संघर्षांकडे वळत आपली भाषा आणि स्वर बदलले. गाव, जंगल, जमीन, विस्थापन, रोजगार, ओळख, जातीय अन्याय, स्त्रियांचे प्रश्न या सगळ्या मुद्द्यांनी गाण्यांच्या आशयाला अधिक व्यापक आणि लोकाभिमुख बनवलं.
गायिका-गीतकार अभिलाषा सिन्हा म्हणतात, “भारत हा आंदोलनं करणारा देश आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राण दिले, त्यांच्या बलिदानाशिवाय हा देश अस्तित्वातच आला नसता.” त्या सांगतात की लहानपणी त्या आपल्या आईसोबत ‘कदम कदम बढाये जा’ हे गाणं गात असत.
या गाण्यावर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्तेने बंदी घातली होती. मात्र ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ती बंदी उठवण्यात आली आणि या गीताला देशभक्तीचं प्रतीकात्मक स्थान मिळालं. यावर अभिलाषा सिन्हा म्हणतात, “याला पूर्वी ‘व्यवस्थाविरोधी’ म्हणून पाहिलं जात नव्हतं, ती कल्पना ब्रिटिशांनी आणली.”
(आमिर अज़ीज (अच्छे दिन ब्लूज))
त्यांच्या या विधानात एक मोठं सत्य दडलं आहे. सत्तेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक आवाजाला ‘अव्यवस्था’, ‘देशविरोध’, ‘अराजक’ अशी लेबले लावण्याची परंपरा नवी नाही. 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) देशभर आंदोलनं सुरू असताना अभिलाषा सिन्हा यांनी संगीतकार सुखनिध कौर यांच्यासह ‘हम देखेंगे’ या प्रसिद्ध कवितेचं सादरीकरण केलं होतं. फैज अहमद फैज यांच्या या रचनेने त्या काळात नव्या पिढीसाठी प्रतिकाराचं गीत म्हणून पुनर्जन्म घेतला.
यातून भारतातील चळवळीच्या गाण्यांचा एक सातत्यपूर्ण प्रवास दिसतो. स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्तीपर गीतांपासून ते विस्थापनाविरोधातील लोकगीतांपर्यंत, संविधान रक्षणाच्या आंदोलनांपासून ते आजच्या डिजिटल पिढीच्या रॅपपर्यंत…
गाण्यांनी प्रत्येक काळात आपला आवाज बदलला, पण प्रश्न विचारण्याची सवय सोडली नाही. भारतातील आंदोलन गीतांचा इतिहास म्हणजे प्रतिकाराच्या भाषेचा इतिहास आहे. स्वर बदलले, ताल बदलले, माध्यमं बदलली; पण अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज मात्र कायम राहिला.
आमिर अज़ीज यांना 1960 च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील प्रतिकाराची परंपरा आठवते. ते ‘हकीकत’ सारख्या चित्रपटांचा उल्लेख करतात, ज्यात युद्धविरोधी भावनेची गाणी होती. त्याचबरोबर शैलेन्द्र, साहिर लुधियानवी यांसारख्या कवी-गीतकारांच्या लेखणीनेही सामाजिक भान असलेली गाणी निर्माण केली.
अनेक कव्वाली गीतांमधूनही अन्याय, अध्यात्म, प्रेम आणि मानवी समानतेचा आवाज पुढे आला. यातून हे स्पष्ट होतं की आंदोलन गीतांची भाषा नेहमी घोषणाबाजीचीच नसते. ती कधी चित्रपट गीतांतून येते, कधी कव्वालीतून, कधी काव्यातून, कधी लोकसंगीतातून, तर कधी रंगमंचावरून.
चळवळीच्या गाण्यांची जागा आता ‘रॅप’ने घेतली
आजच्या काळात मात्र आंदोलनाची भाषा मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक रॅपमधून व्यक्त होताना दिसते. स्थानिक प्रश्न, बेरोजगारी, जात, धर्म, पोलिसी दडपशाही, ओळख, स्त्रियांचे प्रश्न, भाषिक अस्मिता हे सारे विषय रॅपच्या वेगवान, थेट आणि निर्भीड शैलीत समोर येत आहेत.
राहुल राम म्हणतात, “हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा जॅझसारखं रॅप लिहिण्यासाठी दहा वर्षांचं प्रशिक्षण लागत नाही. आपला संदेश जगासमोर पटकन पोहोचवण्याचा तो अधिक जलद मार्ग आहे.”
ही टिप्पणी आजच्या सांस्कृतिक बदलाचं अचूक वर्णन करते. चळवळीची गाणी पूर्वी मैफलीत जन्म घ्यायची, आता ती मोबाईलवर जन्म घेतात. पूर्वी ती सभा-मोर्च्यांत पसरायची, आता ती रील्स, यूट्यूब आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून लोकांपर्यंत पोहोचतात. पण माध्यम बदललं तरी हेतू तोच आहे, अन्यायाला नाव देणं, अनुभवाला आवाज देणं आणि लोकांना जोडणं.
“रॅप तुम्हाला स्वतःसारखं राहण्याची ताकद देतो. तो स्पष्ट बोलण्याची, थेट बोलण्याची जागा देतो. पण आज अनेक संगीतकार चुकीच्या कारणांसाठी स्पष्ट बोलत आहेत. जगाचं कुरूप वास्तव, विषमता, भांडवलशाही आणि प्रत्येक सत्तेला चालना देणाऱ्या व्यवस्थेवर बोलण्याऐवजी ते वेगळ्याच गोष्टींमध्ये गुंतले आहेत.
रॅपर म्हणून तुमचं काम अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आहे. पण भारतात त्यासाठी आवश्यक वातावरणच नाही,” असं काश्मिरी रॅपर अहमर जावेद दार म्हणतात. 2025 पर्यंत भारत आंदोलन गीतांच्या बाबतीत मागे का पडला आहे, याकडे ते लक्ष वेधतात.
अहमर दार यांच्या या निरीक्षणात आजच्या संगीतविश्वातील एक मोठी विसंगती दडलेली आहे. रॅप हा मूळतः उपेक्षितांचा, रस्त्यांचा, प्रश्न विचारणाऱ्यांचा आणि व्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांचा प्रकार मानला जातो. पण अनेकदा तो बाजाराच्या चमकदार चौकटीत अडकतो.
(संगीतकार राहुल राम)
विद्रोहाची भाषा शैलीत राहते, आशयात नाही. कलाकार आजकाल लोकप्रिय होण्याच्या उद्देशाने संगीत तयार करत आहेत, लोक काय ऐकतील, काय व्हायरल होईल, काय ट्रेंड बनेल यानुसार गाणी घडवली जात आहेत. “पण अशा प्रकारे तुम्ही स्वतःची कला मारत आहात,” असं आमिर अज़ीज म्हणतात. त्यांच्या मते, जेव्हा कलाकार प्रामाणिकतेपेक्षा पसंतीचा पाठलाग करतो, तेव्हा कला तिचं नैतिक बळ गमावते.
ते पुढे म्हणतात, “याशिवाय कोणतीही मोठी म्युझिक कंपनी तुम्हाला साइन करणार नाही. त्यामुळे 2025 मध्येही आंदोलन गीतं तुम्हाला स्वतंत्रपणे, स्वतःच्या जोरावर, यूट्यूबवरच प्रदर्शित करावी लागतात. याची तुलना बॉब डिलनशी करा. 1960 च्या दशकात जगातील मोठ्या कोलंबिया रेकॉर्ड्स या कंपनीने बॉब डिलनला साइन केलं होतं आणि त्याच काळात तो Blowin’ in the Wind सारखी आंदोलन गीतं लिहित होता!”
या तुलनेतून भारतीय संगीतविश्वातील बाजाररचनेचा प्रश्न उभा राहतो. इथे प्रतिकार विक्री योग्य मानला जात नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या कलाकारासाठी मुख्य प्रवाहात फारशी जागा नाही. त्याला स्वतःचं व्यासपीठ स्वतःच उभं करावं लागतं.
म्हणूनच भारतात आंदोलन गीतांचा प्रवास आजही कठीण आहे. एकीकडे कलाकारांवर लोकप्रियतेचा दबाव आहे, दुसरीकडे उद्योगसृष्टीची भीती आणि तिसरीकडे राजकीय प्रतिक्रियांचं सावट. तरीही स्वतंत्र कलाकार, रॅपर, लोकगायक आणि डिजिटल पिढीतील नव्या आवाजांमधून प्रतिकाराचं संगीत जिवंत आहे. कारण जेव्हा मुख्य प्रवाह दार बंद करतो, तेव्हा गाणं नेहमीच नवा रस्ता शोधतं.
भारतात चळवळीच्या गाण्यांसमोरची आव्हानं
भारतात चळवळींची गाणी तयार करणं ही केवळ कलात्मक प्रक्रिया नाही; ती अनेकदा धोक्याची, अनिश्चिततेची आणि मर्यादांची वाट असते. कारण इथे फार थेट बोलणं अनेकदा महागात पडू शकतं. काश्मिरी रॅपर अहमर जावेद दार मान्य करतात की त्यांनी काही काळानंतर अशा विषयांवर थेट बोलणं कमी केलं, ज्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
हा केवळ एका कलाकाराचा वैयक्तिक निर्णय नाही; तो भीतीच्या वातावरणाचा सामाजिक दस्तऐवज आहे. कलाकाराला काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये, याचा विचार करावा लागतो, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
अविक रॉय म्हणतात, “अशा प्रकारचं स्वातंत्र्य भारतात नाही, ही गोष्ट वेदनादायक आहे. जगभरातील स्टँड-अप कॉमेडियन मोठ्या नेत्यांवर विनोद करतात. इथे मुनव्वर फारुकी यांचे कार्यक्रम रद्द केले जातात. गोल्डन ग्लोब्ज असो किंवा ऑस्कर, लोक आपल्या भाषणांत सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर बोलतात, कारण ते बोलणं महत्त्वाचं असतं.”
त्यांच्या या विधानातून भारतातील सांस्कृतिक क्षेत्रातील अस्वस्थता समोर येते. कलाकाराला समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का, की त्याने केवळ मनोरंजनच करावं, हा दबाव सतत जाणवतो. अनेक संगीतकारांना धमक्या, कुटुंबियांवर दबाव, करार मोडणाऱ्या संगीत कंपन्या, आणि ‘हलकी-फुलकी’ किंवा ‘आनंदी’ गाणी पसंत करणाऱ्या महोत्सवांतून बाहेर ठेवणं, अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. प्रश्न फक्त गाण्याच्या आशयाचा नसतो; कलाकाराच्या उपजीविकेचाही असतो.
अशा वेळी स्वतंत्रपणे संगीत निर्माण करणं अनेकांसाठी पर्याय ठरतं. पुण्याचा रॅपर श्रेयस सागवेकरचा मराठी रॅप ‘तांबडी चामडी’ (2024) हे सावळ्या किंवा काळ्या त्वचेच्या लोकांसाठी आत्मसन्मानाचं गीत ठरलं आहे.
रंगभेद आणि सौंदर्याच्या बनावट निकषांना आव्हान देणारं हे गाणं अनेकांसाठी ओळखीचा आवाज बनलं. श्रेयस सागवेकरसारखे कलाकार स्वतःचं संगीत स्वतःच प्रसिद्ध करतात. त्यामुळे गाण्याचे शब्द बदलण्यासाठी, आशय मवाळ करण्यासाठी किंवा प्रतिमा जपण्यासाठी कोणाकडे उत्तरदायी राहावं लागत नाही.

सागवेकर म्हणतो, “लेबलसोबत असताना माझं गाणं त्या ब्रँडवर कसं प्रतिबिंबित होतं, याचाही प्रश्न असतो. इथे मीच ब्रँड आहे. मात्र डिजिटल स्वातंत्र्यालाही मर्यादा आहेत. तरीही तुमचं कंटेंट ‘भावना दुखावतो’ असं ठरवलं गेलं, तर ते हटवलं जाऊ शकतं.”
म्हणजेच आजच्या काळात व्यासपीठ बदललं आहे, पण सेन्सॉरशिपचे स्वरूप बदलून पुन्हा समोर उभं आहे. पूर्वी बंदी आदेशांद्वारे होत असेल, तर आज ती अल्गोरिदम, तक्रारी, रिपोर्ट्स, ब्रँड इमेज आणि डिजिटल नियमांद्वारेही होऊ शकते.
भारतातील स्वतंत्र आंदोलन संगीत म्हणूनच दोन आघाड्यांवर लढतं. एक अन्यायाविरुद्ध आणि दुसरं स्वतःचा आवाज टिकवण्यासाठी. तरीही हे संगीत जिवंत आहे, कारण प्रत्येक वेळी मुख्य दरवाजे बंद झाले की कलाकारांनी खिडकीतून, गल्लीबोळातून, यूट्यूबवरून, स्टेजवरून आणि लोकांच्या फोनमधून नवा मार्ग शोधला आहे.
सुखनिध कौर यांच्यासोबत ‘हम देखेंगे’ सादर केल्यानंतर अभिलाषा सिन्हा यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मृत्यूच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या. त्यांना ‘देशविरोधी’ अशी लेबलेही लावण्यात आली.
त्या म्हणतात, “मी अमेरिकेत राहते, जन्माने उच्चवर्णीय हिंदू आहे आणि माझं कुटुंब सध्याच्या सत्तेला पाठिंबा देणारं आहे. त्यामुळे माझ्यासाठी परिणाम तुलनेने कमी आहेत. माझ्याकडे एक व्यासपीठ आहे आणि मी मला हवं ते बोलू शकते. ही अशी गोष्ट आहे, जी अनेक मुख्य प्रवाहातील कलाकार सार्वजनिकपणे वापरत नाहीत.”
या विधानातून भारतीय सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचं वास्तव समोर येतं ते म्हणजे प्रत्येक कलाकार समान धोक्यातून बोलत नाही. काहींना सामाजिक स्थान, आर्थिक सुरक्षितता किंवा भौगोलिक अंतरामुळे अधिक मोकळेपणाने बोलता येतं, तर अनेक कलाकारांना करिअर, कुटुंब, सुरक्षितता आणि प्रतिमेच्या भीतीत गप्प राहावं लागतं.
अविक रॉय यांच्या मते, कोणताही उपाय शोधायचा असेल, तर आधी समस्या मान्य करावी लागते. “कलेची भूमिका म्हणजे ही समस्या दाखवून देणं आणि निरोगी लोकशाही जिवंत ठेवणं. आंदोलनं रस्त्यावर नसली, तरी लोकांनी आणि कलाकारांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत राहिलं पाहिजे. कधी सूचकपणे, कधी थेट.”
हे वाक्य आजच्या काळासाठी फार महत्त्वाचं आहे. लोकशाही केवळ निवडणुकांनी चालत नाही; ती सततच्या प्रश्नांनी, टीकेने, स्मरणशक्तीने आणि सांस्कृतिक जागरूकतेने टिकते. कलाकारांची भूमिका इथे मनोरंजनापलीकडे जाते.
आमिर अज़ीज यांच्या मते, समाजातील अन्यायाला प्रश्न विचारणाऱ्या गाण्यांचं सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. “समाज आणि मानवतेबद्दलची गाणी नसतील, तर प्रेमगीतांनाही अर्थ उरत नाही. दुसऱ्या मनुष्यावर प्रेम करणं हीसुद्धा स्वतःच्या आतल्या भीतीविरुद्धची एक प्रकारची बंडखोरी आहे,” असं ते म्हणतात.
म्हणून प्रश्न पुन्हा तिथेच येतो, गाण्यांची भीती सरकारांना का वाटते? कारण गाण्यांना तुरुंग नसतो. स्पीकर बंद करता येतो, पण ओठ नाहीत. मंच हटवता येतो, पण आठवण नाही. आदेश काढता येतो, पण धून जप्त करता येत नाही. जे शब्द भाषणात मरतात, तेच शब्द अनेकदा सुरांत अमर होतात. आणि म्हणूनच प्रत्येक काळात, प्रत्येक व्यवस्थेत, प्रत्येक सत्तेला गाण्यांची थोडीफार भीती वाटत आली आहे.
(संदर्भ - How India’s protest music has reinvented itself- Karishma Kuenzang - .theestablished.com/)






