Skip to main content

43 डिग्रीत कचऱ्याच्या गाड्या ढकलणाऱ्या महिलांची होरपळ… ना कुठे झाडाची सावली, ना प्यायला पाणी, ना बाथरूमची सोय…!

Apsara Aga
18 May 2026
8 min read
86 views
43 डिग्रीत कचऱ्याच्या गाड्या ढकलणाऱ्या महिलांची होरपळ… ना कुठे झाडाची सावली, ना प्यायला पाणी, ना बाथरूमची सोय…!
  • अप्सरा आगा


  • ४०-४३ अंश तापमानात पुण्याच्या कचरा वेचक महिलांना तासनतास उन्हात काम करावं लागतं; कचरा गाड्या वेळेवर येत नसल्यामुळं त्यांना उन्हात ताटकळत बसावं लागतं.


  • शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचक महिला मात्र आजही पिण्याचं पाणी आणि हक्काच्या बाथरूमसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.


  • वाढत्या तापमानामुळं कचरा वेचकांच्या कामाच्या वेळेत बदल करणं, फिडर पॉइंटवर पिण्याचं पाणी आणि सावलीची सोय करणं आवश्यक आहे. 


  • ४० लाख पुणेकरांचा कचरा साफ करणाऱ्या ४ हजार कचरा वेचक महिलांवर रणरणत्या उन्हाचा काय परिणाम होतो…? ‘बाईमाणूस’चा स्पेशल रिपोर्ट. 


'काय सांगावं, पुणं आता नुसतं तापलंय बघा. दुपारी रस्त्यानं चालताना पायाखालचं डांबर पायाला चटकं देतंय, अन् अंगाची लाहीलाही होती. पण आमी जर घरात बसलो, तर या पुणेकरांच्या कचऱ्याचं काय व्हणार? आमी घाण उपसली तरच लोकांचं आरोग्य चांगलं राहणार ना? पण आमचा विचार करायला कोणाला येळ हाय?' पुण्याच्या लोहियानगर भागात भरदुपारी डोक्यावर कचऱ्याचं ओझं वाहणाऱ्या सुषमाबाईं सांगत होत्या.

 

पुणे शहर आज 'आयटी हब' म्हणून मिरवतंय. शहरात मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेत, रस्ते चकचकीत झालेत. पण या झगमगाटामागे एक वेगळंच वास्तव आहे. पुण्याची निम्मी लोकसंख्या आजही वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहते.


तिथे दोन माणसांना नीट वावरता येईल एवढीही जागा नाही. हीच कष्टकरी माणसं शहराचा कणा आहेत. ती दिवसभर राबतात, घाम गाळतात आणि शहर चालवतात. पण दुर्दैवानं प्रशासनाचं त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष होतं. प्रगतीच्या या शर्यतीत हा कष्टकरी माणूस आजही मागेच राहिला आहे. त्यातीलच एक म्हणजे पुण्यातील कचरा वेचक महिला. या कष्टकरी महिलांवर वाढत्या उष्णतेच्या लाटेचा काय परिणाम होतो यासंबंधीचा हा विशेष 'ग्राउंड रिपोर्ट'.

 

सकाळचे ठिक सात वाजलेत. पुणे शहर आळस झटकून नुकतंच जागं होत असताना, शहराच्या विविध भागांतील 'फिडर पॉईंट'वर मात्र कमालीची लगबग सुरू झाली. पुण्यातील अरणेश्वर भागातील एका फिडर पॉईंटवर कचरा वेचक महिलांची हजेरी सुरू होती.


प्रत्येकीच्या चेहऱ्यावर घाई होती आणि मनात एकच विचार होता, ऊन डोक्यावर यायच्या आत ठरवून दिलेला भाग गाठायचा. एकापाठोपाठ एक आपली हजेरी लावून, या महिला आपापल्या कचरा गाड्या ढकलत कामाला निघाल्या.


जातानाच त्यांनी कडक उन्हाची तयारी केली होती; कोणाचं डोकं रुमालानं घट्ट बांधलेलं होतं, तर कोणी सोबत नेलेल्या पाण्याच्या बाटलीला ओला कापड गुंडाळला होता, जेणेकरून रणरणत्या उन्हात घोटभर पाणी तरी गार मिळावं.

 

रणरणत्या पुण्यात चार हजारांहून अधिक कचरावेचक घाम गाळत आहेत

 

या महिलांचा दिवस दररोज सकाळी सहा-सात वाजताच सुरू होतो. पुण्यासारख्या ४० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराला स्वच्छ राखण्याची संपूर्ण जबाबदारी या चार हजारांहून अधिक कचरा वेचकांच्या खांद्यावर आहे, ज्यामध्ये ७० टक्के महिला आहेत.


ओला आणि सुका कचरा वेगळा करताना प्लास्टिक, कागद आणि काच वेचणं हे त्यांचं रोजचं काम. पण हे काम वाटतं तितकं सोपं नाही. अनेकदा त्यांच्या हातात हातमोजे नसतात किंवा पायात साधी चप्पलही नसते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हात घालताना कधी फुटलेली काच टोचते, तर कधी वापरलेली सुई किंवा सिरिंज हाताला लागते. अशा वेळी रक्त आलं किंवा जखम झाली, तरी ती पदरानं पुसून पुन्हा कामाला लागावं लागतं.


User Image


कारण आजारपण आलं म्हणून काम थांबवलं, तर घरची चूल पेटणार नाही, हे भीषण वास्तव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांना या कामातून महिन्याला एका घराचे ७० ते १०० रुपये मिळतात. उन्हाळा जास्त असल्यामुळं  घरं कमी होतात. त्यामुळं त्यांचं महिन्याचं आर्थिक नियोजन कोलमडतं.

 

फीडर पॉइंट नेमके काय?

 

पुण्यातील 'कचरा वेचक फीडर पॉइंट' म्हणजे कचरा व्यवस्थापनातील एक अशी साखळी आहे जिथे घरोघरी जाऊन गोळा केलेला कचरा मोठ्या गाड्यांमध्ये भरण्यासाठी एकत्रित केला जातो. पुणे महानगरपालिका आणि 'स्वच्छ' संस्थेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही एक प्रभावी यंत्रणा आहे.


या प्रक्रियेत, कचरा वेचक आपल्या हाताने ओढायच्या गाड्यांमधून किंवा छोट्या वाहनांतून परिसरातील कचरा गोळा करून एका ठराविक मोकळ्या जागेवर म्हणजेच 'फीडर पॉइंट'वर येतात. या ठिकाणी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे पुन्हा एकदा सूक्ष्म वर्गीकरण केले जाते. त्यानंतर, महानगरपालिकेच्या मोठ्या घंटागाड्या किंवा कॉम्पॅक्टर या पॉइंटवर येऊन तो कचरा उचलतात आणि पुढील प्रक्रियेसाठी मोठ्या डेपोमध्ये नेतात.


या फीडर पॉइंट्समुळे कचरा वेचकांना कचरा वर्गीकरण करण्यासाठी हक्काची जागा मिळते आणि कचरा रस्त्यावर न टाकता थेट मोठ्या वाहनांत भरला जातो. यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा कुंडीची गरज उरत नाही, ज्यामुळे शहर अधिक स्वच्छ राहण्यास मदत होते.

 

आजच्या घडीला या महिला कचरा वेचक केवळ शहर स्वच्छ करत नाहीत, तर त्या महापालिकेची मोठी आर्थिक बचतही करत आहेत. त्यांच्यामुळे दररोज सुमारे २२० टन कचरा पुनर्वापरासाठी वळवला जातो आणि २३ टन ओला कचरा हा मूळ ठिकाणीच जिरवला जातो.


User Image


या प्रभावी व्यवस्थापनामुळं पुणे महापालिकेचा वर्षाला सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च वाचतो. इतकी मोठी सेवा देऊनही, जेव्हा उन्हाळ्याचा पारा ३९-४३ अंशांच्या पार जातो, तेव्हा मात्र या महिलांना कोणाचीही सावली मिळत नाही. हवामान खात्याने यंदा पुण्याचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याचा अंदाज वर्तवला, अशा स्थितीत त्यांच्यासाठी किमान मानवी सोयी-सुविधा असणारी व्यवस्था उभारणं, ही आता काळाची गरज बनलीय.

 

४० डिग्रीमध्ये दररोज सहा ते सात किलोमीटरचा प्रवास

 

काही कचरा वेचक महिला तळजाई वस्तीतून अरणेश्वर भागात कचरा गोळा करायला येतात. सहा ते सात किलोमीटर दररोजचा त्यांचा प्रवास. सकाळी घरातलं आवरून त्या चालत येतात. कधी वेळ झाला तर त्यांना रिक्षानं यावं लागतं. आणि सकाळपासूनच त्या कामाला लागतात.


दुपार चढू लागली की, या महिला मात्र घामानं थबथबलेल्या अवस्थेतही आपलं काम नेटानं करत असतात. भर उन्हात कचरा गोळा करून शहर चकाचक करतात. या कडक उन्हातही काम करताना त्यांना नेमका काय त्रास होतो, हे या महिलांनी खूप जवळून अनुभवलंय. 

 

तळजाई परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षाच्या सुवर्णा खंडाळे सांगतात,


'काय सांगायचं ओ ताई, पुणं आता नुसतं तापलंय. ५२ वर्ष वय झालंय माझं, पाच-सहा वर्षांपासून हे कचऱ्याचं काम करते. तळजाईच्या त्या पत्र्याच्या घरात तर दुपारी साधं उभं पण राहवत नाही, जणू तवाच तापलाय म्हणा. सकाळी आठला वाळवेकर भागात आले की गाडी ढकलत फिरावं लागतं. अंगातून घामाच्या धारा वाहत्यात, पण थांबायला कुठं झाड नाही की साधी सावली नाही. घसा पारक कोरडा पडतो, पण पाणी प्यावं म्हणलं तरी नशिबी तेच चटके. घरून बाटली भरून आणली तरी तासाभरात उन्हाच्या झळानं त्याचं पाणी चहासारखं कडक गरम होतंय. वाटतं एखादा गार पाण्याचा घोट घ्यावा, पण कुठं जाणार? तेच चहासारखं गरम पाणी प्यावं लागतं. कोरडा घसा ओला केल्याशिवाय पुढची गल्ली गाठता येत नाही आणि काम केल्याशिवाय तर आमची चूल पण पेटत नाही.'

 

कचरागाड्या लवकर नाही आल्या तर ताटकळत उभं राहावं लागतं

 

कचरा वेचक विद्या नायकनवरे सांगतात,


'सकाळी सातला हजेरी लावून आम्ही कामाला लागतो, अकरा-साडेअकरापर्यंत साऱ्या गल्ल्या चकाचक करून आमचं काम उरकतं. वाटतं की आता उन्हाच्या झळा वाढायच्या आत घराकडं जावं, पण नशिबात काय दुसरंच लिहिलंय. काम झालं तरी आमची सुटका नाय, कारण त्या कचरागाड्यांची वाट बघत अडीच-तीन वाजेपर्यंत फिडर पॉईंटला ताटकळत बसावं लागतं. गाड्या येत्यात तरी कशा? कधी ओल्या कचऱ्याची आली तर सुक्या कचऱ्याची गाडी गायब असती. गाड्यांची ही चालढकल बघून जीव नुसता नको नको होतय. एक तर तापतं ऊन, कोणाला सावली मिळती तर कोणाला उन्हाच्या झळातच बसावं लागतं. तिथं ना प्यायला पाणी, ना बाथरूमची सोय. कडक उन्हामुळं महिलांना उन्हाळे लागून राहिल्यात, शरीराची नुसती लाहीलाही होत्या. आमचं काम तर वेळेत उरकतंय, मग या गाड्या वेळेवर का येत नाहीत? भर उन्हात, त्या दुर्गंधीत गाड्यांची वाट बघत बसायला आम्हाला कोणी भाग पाडलंय? या साऱ्या त्रासाला जबाबदार कोण?'

 

५२ वर्षाच्या वंदना लोंढे सांगतात,


'काय सांगायचं, कामामुळं शरीराला त्रास होतोय. उन्हाच्या झळानं जीव नुसता व्याकूळ होतोय. घसा कोरडा पडतोय, पण पाणी प्यावं म्हणलं तरी भीती वाटती. का? तर बाथरूमला जायची सोय नाय. कामाच्या ठिकाणी आम्ही जायचं कुठं? या उन्हामुळं तहान तर लय लागती, पण बाथरूमची अडचण बघून पाणी पण जपून प्यावं लागतंय. आजारी पडलो, अंगात ताप भरला तरी सुट्टी घ्यायची सोय नाय बघा. एक दिवस घरी बसलो तर दुसऱ्या दिवशी कचऱ्याचा डोंगर उभा राहणार, मग तो उन्हात कोण ओढणार? त्यापेक्षा आजारी अंगानंच गाडी ओढलेली बरी, असं वाटतं. दुपारी घरी गेलं तरी तिथं पण चैन नाय, पत्र्याचं घर जणू भट्टीवानी तापलेलं असतंय. उन्हाच्या तावानं जेवण जात नाय, नुसतं पाणी पाणी होतंय. इकडं आड आणि तिकडं विहीर, अशी आमची अवस्था झालीय.'

 User Image

३० वर्षाच्या मोनिका देशमाने सागंतात,


'मी सकाळी साडेसहा वाजता उठते, मला एक अडीच वर्षाचं बाळ आहे. बाळाचं आवरून घेते. सात वाजता आमची हजेरी असते, त्यामुळे त्याच्या अगोदर घरातलं सगळं आवरून घेते. सातला कचरा गोळा करायला सुरुवात  अकराला काम होतं. पण गाड्याचं येत नाहीत. सगळ्याची मोठी समस्या तिच. मासिक पाळीचा काळ आमच्यासाठी खूप त्रासदायक आहे. मासिक पाळीच्या काळात खूप त्रास होतो. पॅड बदलायला जागा नाही. त्यात कचऱ्याची गाडी ढकलावी लागते. कचऱ्याच्या भरलेल्या बकेट उतराव्याच्या, वर ठेवायच्या त्यामुळे जास्त त्रास होतो. त्या काळात दोन-तीन दिवस खूप त्रास सहन करावा लागतो. आईला तर अक्षरशः चकर आली. मग रिक्षा करून घरी सोडलं. या गोष्टी महापालिकेला समजतात का? आमचं काम बारापर्यंत होतं. त्यावेळी गाड्या आल्या की कचरा गाडीत टाकला की आम्ही उन्हाच्या आधी घरी जाऊ शकतो. पण महापालिकेला समजत नाही.'

 

कचरा गाड्या लवकर, वेळेवर पाठवण्यासाठी सूचना दिल्या

 

स्वच्छ सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लुबना अनंतकृष्णन सांगतात,


'कचरा वेचकांचं काम अकरापर्यंत संपतं, अशी वास्तविक परिस्थिती नाही. पुण्यात एवढा कचरा निघतो की, त्याची प्रक्रिया करण्याची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे कचरा गाडी ११ वाजता येणं अपेक्षित असतं, पण ती वेळेवर येत नाही. यामुळं महिलांना गाड्यांची वाट बघत थांबावं लागतं आणि त्यांना होणारा त्रास सहन करावा लागतो. जर कचरा तसाच फीडर पॉइंटवर राहिला तर लोक आणि प्रशासन दोघेही राग कचरा वेचक महिलांवर काढतात. कामाच्या वेळेत बदल करण्यासाठी आम्ही काही सूचना दिल्या आहेत. महापालिकेनं कचरा गाड्या लवकर आणि वेळेवर पाठवाव्यात, अशी सूचना दिली आहे. तसेच, आरोग्य कोठीवर पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.’

 

कचरा वेचक महिलांसाठी तज्ज्ञ काय सांगतात?

 

पुण्यातील डॉ. कपिल जगताप कचरा वेचक महिलांच्या आरोग्याबाबत सांगतात, या कडक उन्हात (४०-४५ अंशात) कचरा वेचणाऱ्या महिलांना त्वचेचे आजार, जळजळ आणि उष्माघाताचा मोठा धोका असतो. कचरा वेचताना घाम येतो आणि त्यातूनच बुरशीजन्य आजार वाढतात.


या कडक उन्हात त्वचेचे आजार आणि उष्माघाताचा मोठा धोका असतो, त्यामुळे महिलांनी डोकं झाकून घ्यावं, दिवसातून ४-५ लिटर पाणी प्यावं. कचऱ्यात काम केल्यावर हातापायाला खाज सुटते किंवा लाल चट्टे पडतात. यासाठी कामावरून घरी गेल्यावर न चुकता अंघोळ करा आणि घामोळ्यांची पावडर वापरा.


User Image


जर चक्कर आली, मळमळलं किंवा जीव कासावीस झाला, तर अंगावर दुखणं न काढता तातडीनं दवाखाना गाठा. उन्हात काम करताना अंगभर कपडे आणि ते पण सुती असावेत. डोक्याला बांधलेला ओला रुमाल तुमच्या मेंदूला तापण्यापासून वाचवेल.


शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत जर गाड्यांची वाट बघत बसावं लागलं, तर उन्हात न थांबता सावलीचा आसरा घ्या. घसा कोरडा पडू देऊ नका. बाटलीतलं पाणी गरम झालं तरी ते पीत राहा. दिवसाला किमान ४-५ लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. घरी गेल्यावर नुसतं जेवण करू नका, तर लिंबू सरबत किंवा ओआरएसचं पाणी घ्या, ज्यानं अंगातली ताकद टिकून राहील.'

 

महापालिकेने काय उपाययोजना केल्या?

 

पुणे महापालिका दरवर्षी उष्णतेची लाट कृती योजना राबवते. यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, आरोग्य केंद्रे सज्ज ठेवणे आणि जनजागृती करणे यांचा समावेश आहे. नागरिकांसाठी सावलीची ठिकाणे, ओआरएस  स्टॉल्स आणि दुपारी कामाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या जातात.


महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणि आरोग्य केंद्रांत उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड आणि औषधांचा साठा उपलब्ध केला जातो. पाणी, ओआरएस स्टॉल्स सार्वजनिक ठिकाणी लावले जातात. वृक्षारोपण आणि सावलीचे नियोजन करतात.


नागरिकांसाठी विशेष सूचना दिल्या जातात. दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळा. पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरा. पुरेसे पाणी, लिंबू सरबत, ताक प्या. थेट सूर्यप्रकाशात काम करणाऱ्यांनी (उदा. मजूर, डिलिव्हरी बॉय, असंघटीत कामगार) डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा.


उन्हाळ्याच्या काळात आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन कक्षाद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाते. अशा महापालिकेच्या उपाययोजना कागदावर दिसत असल्या तरी, असंघटीत कामगार म्हणजेच कचरा वेचक महिलांना याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही.

 

दशकातील सर्वात उष्ण उन्हाळा

 

पुणे हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत पुण्याचे तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार करत आहे. २०१६, २०१९ आणि २०२४ मध्ये भीषण उष्णतेच्या लाटा आल्या. विशेषतः मे २०२६ मध्ये पारा ४२.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून गेल्या १० वर्षांतील उच्चांक मोडला गेला, ज्यामुळे पुण्यातील उन्हाळा पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आणि असह्य झाला.


२०२५ मध्ये पुण्याचा उन्हाळा मे महिन्यात सर्वाधिक तापला होता. त्यावर्षी मे महिन्याच्या मध्यात सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एप्रिलमध्ये तापमान ३८ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते, तर मे महिन्यात ते ४० अंशांच्या पुढे होते. जूननंतर पुन्हा घट झाली. २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये सरासरी तापमानात १.५ ते २ अंशांची वाढ झाली.


User Image


अरबी समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन उत्तर भारताकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे ही वाढ झाल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात. सध्या पुण्यात दिवसभर कडक ऊन आणि रात्रीदेखील उष्ण हवा जाणवत आहे. मे अखेरपर्यंत तापमान ४१ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात खऱ्या अर्थानं उन्हाळ्याला सुरुवात होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडू लागतात. कोरड्या हवेमुळं त्वचा कोरडी पडणे आणि डिहायड्रेशनचे प्रमाण वाढते. मे महिना हा पुण्यासाठी वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरतो.


मे महिन्यात सूर्याची किरणं थेट जमिनीवर पडतात. याच काळात अनेकदा 'अवकाळी' किंवा 'मेघगर्जनेसह' पावसाच्या सरीही येतात, ज्यामुळे काही काळ गारवा मिळतो पण नंतर आर्द्रता वाढून उकाडा अधिकच असह्य होतो. यंदा पुण्यात उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त कडक राहण्याची शक्यताही आहे.

 

वाढत्या उष्णतेचा असंघटित कामगारांना फटका, ‘प्रयास’चा अभ्यास

 

वाढत्या उष्णतेच्या संकटाकडे पाहताना केवळ तापमानाचे आकडे किंवा हवामान अंदाज पाहून चालणार नाही, कारण याचा खरा आणि सर्वाधिक फटका शहरातील असंघटित कामगारांना बसतो. याच वास्तवाकडे लक्ष वेधण्याचे महत्त्वाचे काम ‘प्रयास’ या संस्थेने केले आहे.


प्रयासचा हा अभ्यास केवळ उष्णतेच्या आकडेवारीवर न थांबता, प्रत्यक्ष रस्त्यावर उन्हात उभे राहून काम करणारे लोक या संकटाचा सामना कसा करतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

 

अनेकदा वैज्ञानिक चर्चा आणि हीट अॅक्शन प्लॅनमध्ये तळागाळातील कामगारांचा आवाज हरवतो; मात्र ‘प्रयास’ने पथविक्रेते, मजूर आणि बांधकाम कामगार यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणले आहे.


User Image


२०२५ च्या उन्हाळ्यात पुण्यातील ३५८ असंघटित कामगारांशी केलेल्या संवादातून असे समोर आले की, त्यांच्यासाठी उष्णता ही केवळ हवामानाची समस्या नसून रोजीरोटी, आरोग्य आणि जगण्याशी जोडलेला गंभीर प्रश्न आहे. सावलीची कमतरता, पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा आणि सततच्या उन्हामुळे होणारा थकवा, चक्कर किंवा डोकेदुखी अशा समस्या सोसूनही, केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी काम थांबवण्याचा पर्याय या कामगारांकडे उपलब्ध नसतो.

.

उष्णतेचे अनेक परिणाम ‘अदृश्य’ स्वरूपाचे असतात. थकवा, चिडचिड, झोपेच्या समस्या, मानसिक ताण, उत्पादकतेत घट किंवा दीर्घकालीन हृदयविकार हे परिणाम तात्काळ दिसत नाहीत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेने केवळ उष्माघाताच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित न करता, उष्णतेमुळे वाढणाऱ्या इतर आजारांचेही सूक्ष्म पातळीवर निरीक्षण करणे गरजेचे आहे.

 

‘प्रयास’ हेल्थच्या विजया जोरी सांगतात,


‘उष्णतेची लाट ही आता केवळ हवामानाची समस्या राहिलेली नाही, तर ती सार्वजनिक आरोग्य आणि उपजीविकेचा एक गंभीर प्रश्न बनला आहे. पथविक्रेते, कचरा वेचक आणि बांधकाम मजूर यांसारख्या असंघटित कामगारांसाठी ही परिस्थिती धोकादायक आहे, कारण रोजंदारीवर अवलंबून असल्यामुळे त्यांना तब्येत बिघडली तरी काम थांबवणं परवडत नाही. यामुळे तीव्र उष्णतेत जास्त वेळ काम केल्यानं त्यांच्यात उष्माघात, निर्जलीकरण, हृदयविकार आणि रक्तदाबाचा धोका वाढतो. उष्णतेचे अनेक परिणाम हे थकवा, चिडचिड, मानसिक ताण आणि उत्पादकतेत घट अशा अदृश्य स्वरूपात असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेनं केवळ उष्माघाताच्या रुग्णांपुरतं मर्यादित न राहता, उष्णतेमुळं वाढणाऱ्या इतर आजारांचेही सूक्ष्म पातळीवर निरीक्षण करणं गरजेचं आहे.’

 

आपण शहराच्या विकासाच्या गप्पा मारतो, पण ज्यांच्या कष्टावर हा विकास उभा आहे, त्या कचरा वेचक महिलांना साधं पिण्याचं पाणी आणि हक्काचं बाथरूम मिळू नये, ही मोठी शोकांतिका आहे. उन्हाच्या या झळा फक्त त्यांच्या अंगाला नाही, तर त्यांच्या अस्तित्वाच्या जाणिवेलाही पोळत आहेत.


'स्मार्ट सिटी' होताना या कष्टकऱ्यांच्या जगण्याला थोडी सुसह्यता देणं, ही प्रशासन आणि आपलीही जबाबदारी आहे. अन्यथा, शहराचा झगमगाट वाढत राहील, पण त्यामागचं हे अंधारलेलं आणि होरपळलेलं वास्तव कधीच बदलणार नाही. आपण फक्त 'पाणी वाचवा' किंवा 'झाडे लावा' म्हणतो, पण या उन्हात ताटकळणाऱ्या माऊलींच्या डोळ्यांतली तहान ओळखावी, हीच खरी माणुसकी ठरेल.


(Apsara Aga is a mentee at the Climate Change Media Hub of the Asian College of Journalism. The program is supported by Interlink Academy, Germany.)


(This story is produced under Project Dharitri, a joint undertaking by Asar and Baimanus on Climate Change & Gender reporting.)

Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...