अप्सरा आगा
- इराण-इस्रायल संघर्षामुळे मुंबई बंदरात सांगलीची हजारो टन हळद अडकली….
- दर्जेदार हळद, चमकदार पिवळा रंग, घट्ट पोत, जीआय टॅगमुळे जागतिक बाजारात ओळख.
- माल बाहेर काढावा, भाव स्थिर ठेवावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी.
सांगली…हळदीचं माहेरघर. सांगलीतील हळदीचा बाजार हा फक्त महाराष्ट्रापुरताच नाही, तर संपूर्ण भारत आणि जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जातो. हळद ही फक्त मसाला नाही, तर शेतकरी, मजूर, व्यापारी आणि निर्यातदारांसाठी आर्थिक आधार आहे. परंतु, सध्या जागतिक राजकारणाने सांगलीच्या हळदीला मोठा फटका दिला आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे मुंबईच्या बंदरात हजारो टन हळद अडकली आहे, ज्याचा थेट परिणाम सांगलीतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर दिसत आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हळद ही प्रमुख शेती पिकांपैकी एक आहे. सांगलीतील हवामान, सुपीक माती आणि पावसाचं प्रमाण हळदीसाठी योग्य असल्यामुळे उत्पादन दर्जेदार आणि निर्यातयोग्य ठरतं. सांगली हळदीचा रंग, घट्ट पोत आणि सुगंध जागतिक बाजारात प्रसिद्ध आहे.
सांगलीतील हळद मुख्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड केली जाते. आणि जानेवारी-मार्च दरम्यान ती बाजारात येते. शेतकरी हळदीचा दर्जा आणि भाव यावर आपला नफा ठरवतात. यंदा हळद चांगली झाली होती, भावही सुरुवातीला १४,५०० ते २४,००० रुपये प्रति क्विंटल चालला होता.
मुंबईत अडकले कंटेनर
इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मुंबईच्या जेएनपीटी बंदरात हजारो टन हळद अडकली आहे. ही हळद सांगली, कोल्हापूर, सातारा आणि इतर जिल्ह्यांमधून निर्यात करण्यासाठी पाठवलेली होती. व्यापारी म्हणतात, “जो माल अडकला आहे, त्याची गुणवत्ता टिकवणे मोठा प्रश्न आहे. जर युद्ध लांबले, तर हळदीच्या भावात अजून घट होऊ शकते.” अडकलेल्या मालामुळे निर्यातही थांबली आहे, ज्याचा आर्थिक दबाव व्यापाऱ्यांवर आहे.

सांगलीतील शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही यामुळे मोठा आर्थिक ताण बसला आहे. शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली, खत आणि मजुरी खर्च केली, पाणी दिलं, पण आता माल विकण्यासाठी मार्ग बंद आहे. भाव कोसळला आहे आणि शेतकऱ्यांचा नफा बऱ्यापैकी घटला आहे.
व्यापारी देखील चिंतेत आहेत. निर्यात अडकली असल्याने त्यांना माल परत आणावा लागतो, कंटेनर भाड्याचा खर्च, स्टोरेज खर्च आणि भाव कोसळल्यामुळे जोखीम वाढली आहे. काही व्यापारी म्हणतात की सध्या बाजारात हळदी विकणे म्हणजे मोठा धाडस आहे, कारण भाव अजून कोसळण्याची भीती आहे.
बाजारपेठ अन् निर्यात
सांगलीतील हळदीचा बाजार स्थानिक, राज्यस्तरीय आणि जागतिक स्तरावर आहे. स्थानिक बाजारात व्यापारी, टोकदार, निर्यातदार यांची मोठी हलचाल असते. युरोप, आफ्रिका, मध्यपूर्व आणि अमेरिकेत सांगली हळद निर्यात होते. हळदीची निर्यात होण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या बंदरांवर मोठ्या प्रमाणात माल पाठवला जातो. पण आता युद्धामुळे जहाज वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे निर्यात प्रभावित झाली आहे. यामुळे स्थानिक बाजारातही भाव घटला आहे, कारण जे माल निर्यात होत नाही, त्यावर अतिरिक्त दबाव येतो.
भाव कोसळणे अन् आर्थिक ताण
अडकलेल्या हळदीमुळे भाव कोसळले आहेत. सध्या हळदीचे भाव प्रति क्विंटल अंदाजे १००० ते १५०० रुपयांनी कमी झाले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक ताणामुळे स्थानिक बाजारात दबाव वाढला आहे. शेतकरी म्हणतात, “हळद विकणे आता कठीण झाले आहे. खर्च केलेला पैसा परत मिळेल की नाही, हे माहित नाही. निर्यात अडकली असल्यामुळे भावही कोसळतो आहे.” व्यापारी म्हणतात की, जर युद्ध जास्त काळ चालले, तर हळदीच्या भावात आणखी घट होईल. कंटेनरमध्ये दिवसांपासून अडकलेल्या मालामुळे गुणवत्ता कमी होण्याची भीती आहे.
हळदीचा इतिहास
सांगलीतील हळदीचा इतिहास शंभर वर्षांहून अधिक जुना आहे. पूर्वी सांगली मार्केट यार्ड देशभरातील हळदीच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. त्या काळात हळदीचा दर सांगलीतून ठरायचा. हळदीच्या व्यापारामुळे सांगलीतील व्यापारी, शेतकरी आणि मजूर यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. हळदीचा व्यापार इतका व्यापक होता की सांगलीला भारतातील ‘हळदीची राजधानी’ म्हणून ओळख मिळाली..सांगली हळदीला जीआय (Geographical Indication) टॅग मिळाल्यामुळे तिचा दर्जा जागतिक स्तरावर नोंदवला गेला. या टॅगमुळे सांगली हळदीची बाजारपेठ वाढली आणि ती औषध, मसाला, सौंदर्यप्रसाधन आणि अन्न उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
हळदीचा जागतिक व्यापार
सांगली हळदी फक्त देशांत नाही, तर जागतिक बाजारातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हळदी निर्यात करण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या बंदरांवरुन जहाजाने माल पाठवला जातो. सांगली हळदीसाठी जीआय टॅग मिळाल्यामुळे तिची ओळख जागतिक स्तरावर कायम राहते. सांगलीतील हळद औषध, मसाला, अन्न आणि सौंदर्य उद्योगात वापरली जाते. त्यामुळे सांगली हळदीला फक्त एक पिक म्हणून नाही तर आर्थिक आधार म्हणून पाहतात.

सांगली मार्केट यार्डमध्ये दरवर्षी १७–१८ लाख क्विंटल हळदीची आवक होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल केली जाते, सुमारे हजार कोटींचा व्यापार या उद्योगात होतो. हे मार्केट यार्ड शेतकरी, व्यापारी, टोकदार आणि निर्यातदारांसाठी आर्थिक केंद्र मानलं जातं.
हळद कुठे पिकते?
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये हळद मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. विशेषतः सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये हळद हे प्रमुख पीक मानले जाते. येथील सुपीक माती, योग्य पाणी व्यवस्थापन आणि अनुकूल हवामान यामुळे हळदीचे उत्पादन दर्जेदार मिळते. सांगली हळदीची खासियत म्हणजे तिचा चमकदार पिवळा रंग, घट्ट पोत आणि सुगंध. त्यामुळे या हळदीला देशांतर्गत बाजारासोबतच परदेशातही मोठी मागणी आहे.
हळद बनते कशी?
सांगलीतील हळद बनण्याची प्रक्रिया पिकापासून बाजारात येईपर्यंत संपूर्ण नियोजित आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हळकुंड्याची लागवड करतात. जमिनीत सुपीक माती, पाणी व्यवस्थापन आणि योग्य अंतरावर रोपे लावणे गरजेचे असते. पिक वाढताना नियमित पाणी, खत आणि रोग प्रतिबंधक उपाय केले जातात.
सुमारे ८–९ महिन्यांनी हळकुंड तयार होतात, त्यानंतर जमिनीतून काढले जातात. आणि माती साफ करून सूर्यप्रकाशात वाळवला जातात. वाळवल्यानंतर हळकुंड पॉलिशिंग कारखान्यात नेला जातो आणि त्याला गरम करून चमकदार पिवळा रंग व आकर्षक स्वरूप दिले जाते. तयार हळद पॅकेज करून स्थानिक बाजारात आणि देश-विदेशात निर्यातीसाठी पाठवली जाते. राजापुरी वाण विशेषतः दर्जेदार मानले जाते.
सरकारकडे उपाययोजना करण्याची अपेक्षा
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य आणि केंद्र सरकारकडे उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे. व्यापारी संघटनांनी सरकारकडे बंदरात अडकलेला माल बाहेर काढणे, हळदीचे भाव स्थिर ठेवणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे यासाठी मागणी केली आहे. या उपाययोजनांमुळे हळदीच्या भावात स्थिरता येईल, शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल आणि निर्यातदारांना माल वेळेत पाठवता येईल. जलद निर्णय झाल्यास सांगलीतील हळदी उद्योग आणि शेतकरी‑व्यापारी यांना मोठा दिलासा मिळेल.

शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आणि सरकार सर्वांची अपेक्षा आहे की युद्धामुळे अडकलेली परिस्थिती लवकर सुटावी, हळदीची निर्यात सुरळीत होईल आणि भाव पुन्हा स्थिर होतील. सांगली हळदीला जागतिक बाजारपेठेत जशी ओळख आहे, तशी टिकवण्यासाठी आणि शेतकरी-व्यापाऱ्यांचा आर्थिक आधार सुरक्षित राहण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.






