जोनाथन सेल्वाराज
- आयपीएलच्या गदारोळात भारतीय ॲथलेटिक्समध्ये एक ऐतिहासिक घटना घडली.
- रांची येथे ४४.९८ सेकंदांची वेळ नोंवत टी. के. विशालचा नवा इतिहास. एकेकाळी वाकड्या गुडघ्यांमुळे नीट चालणंसुद्धा कठीण होतं. वाळूत उभं करून करण्यात आलेली ‘थेरपी’ ठरली आयुष्याचा टर्निंग पॉइंट.
- उसेन बोल्टचं पोस्टर पाहत मोठं झालेलं मूल आज देशाचा सर्वात वेगवान ४०० मीटर धावपटू. संघर्ष, कुटुंबाचा पाठिंबा आणि जिद्दीच्या जोरावर उभी राहिलेली प्रेरणादायी कथा…
आयपीएलची बादफेरी सुरू झालीये, तमाम भारतीय क्रिकेट शौकिनांचे लक्ष आयपीएलचा चषक यावेळी कोण जिंकणार याकडे लागले आहे. मात्र याच क्रिकेटवेड्या भारतात एक अशी घटना घडली जी खेळाशी तर संबंधित होतीच, मात्र क्रिकेटशी नसल्यामुळे अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला. आयपीएलच्या चौकार-षटकारांच्या जल्लोषात संपूर्ण देश रंगून गेला असताना, भारतीय क्रीडाविश्वात शांतपणे एक वेगळीच इतिहासरेषा आखली जात होती. क्रिकेटच्या प्रचंड झगमगाटापासून दूर, रांचीच्या ट्रॅकवर एक तरुण धावपटू प्रत्येक सेकंदांशी झुंज देत भारतीय ॲथलेटिक्समध्ये नवं पर्व लिहीत होता. ४४.९८ सेकंदांचा वेग गाठत टी. के. विशालने केवळ ४०० मीटरची शर्यत जिंकली नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर उभ्या राहणाऱ्या नव्या भारताचं प्रतीक बनून दाखवलं. एकेकाळी वाकड्या गुडघ्यांमुळे ((knock Knees) नीट चालणंसुद्धा कठीण असलेला हा मुलगा आज देशाचा सर्वात वेगवान ४०० मीटर धावपटू ठरला आहे आणि ही कथा केवळ एका खेळाडूची नाही, तर दुर्लक्षित भारतातून उभ्या राहणाऱ्या असंख्य स्वप्नांची आहे.
शनिवारी रांची येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये ४०० मीटर शर्यतीत ४४.९८ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावणाऱ्या टी. के. विशालने भारतीय ॲथलेटिक्स विश्वाला पुन्हा एकदा एक गोष्ट ठामपणे दाखवून दिली की गेल्या काही वर्षे ट्रॅक अँड फील्डकडे लक्ष ठेवून असलेल्या जाणकारांना ज्या धावपटूबद्दल उत्सुकता होती, ती आता संपूर्ण देशाने मान्य केली आहे.
फेडरेशन कपपूर्वीच विशालने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. ४५ सेकंदांचा टप्पा हा ट्रॅक अँड फील्डमधील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि दुर्मिळ मानला जातो. तो अडथळा पार करत २३ वर्षीय विशालने भारतीय ४०० मीटर धावपटूंच्या परंपरेत स्वतःचं स्थान केवळ मजबूत केलं नाही, तर त्याने एका नव्या पिढीचा विलक्षण प्रतिभावान धावपटू असल्याचंही सिद्ध करून दाखवलं.
वाकड्या गुडघ्यांचा तो अशक्त मुलगा
पण विशाल नेहमीच इतक्या वेगाने धावत नव्हता, किंबहूना तो धावूच शकत नव्हता असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यातील जोलारपेट्टई या छोट्या शहरात बालपण घालवणाऱ्या विशालकडे पाहून, तो एक दिवस भारतातील अव्वल धावपटू बनेल, अशी कल्पनाही कुणाला आली नसती. बालपणी त्याच्यात अशी कोणतीही खूण दिसत नव्हती की हा मुलगा पुढे जाऊन भारतीय ॲथलेटिक्समध्ये इतिहास घडवेल.

“सहा वर्षांचा असताना विशाल खाण्याच्या बाबतीत खूप हट्टी होता. त्याचं शरीर खूप अशक्त होतं आणि चालताना त्याचे गुडघे एकमेकांकडे वाकायचे. डॉक्टरांनी त्याला ‘नॉक नीज’ असल्याचं सांगितलं होतं,”
असं विशालचे वडील थेन्नारासू सांगतात.
या समस्येवर उपचार म्हणून डॉक्टरांनी विशिष्ट आहारपद्धती सुचवली होती. पण थेन्नारासू यांच्या एका मित्राने त्यांना एका वेगळ्याच प्रकारच्या शारीरिक उपचाराची कल्पना दिली. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की हीच गोष्ट त्या मुलाच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे.
“त्या काळात मी संध्याकाळी जोलारपेट्टईच्या मिनी स्टेडियममध्ये फुटबॉल खेळायला जायचो. तिथल्या जॉन नावाच्या एका प्रशिक्षकाला मी मुलाच्या पायांच्या समस्येबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांनी फिजिकल थेरपीचा सल्ला दिला. ते विशालला लाँग जंपच्या वाळूच्या खड्ड्यात घेऊन जायचे आणि त्याला गुडघ्यांपर्यंत वाळूत गाडून ठेवायचे. जवळपास दोन तास तो तसाच राहायचा आणि त्यानंतर त्याला संपूर्ण मैदानावर धावायला लावलं जायचं,” थेन्नारासू सांगतात.
वाळूतील ‘थेरपी’ आणि धावण्याची सुरुवात
ही ‘थेरपी’ ऐकायला जितकी विचित्र वाटते, तितकीच ती परिणामकारकही ठरली.
“हळूहळू त्याचे गुडघे सुधारू लागले. ही समस्या पूर्णपणे दूर व्हायला जवळपास सहा महिने लागले. पण त्यानंतर विशाल थांबलाच नाही. तो स्वतःहून मैदानावर जाऊन धावण्याचा सराव करू लागला!”
ज्या मुलाला एकेकाळी नीट चालताही येत नव्हतं, तोच काही काळात जोलारपेट्टई मिनी स्टेडियममध्ये धावणाऱ्या सगळ्या मुलांमध्ये सर्वात वेगवान ठरू लागला. “सगळेजण त्याला ‘विशाल बोल्ट’ म्हणू लागले होते!” थेन्नारासू अभिमानाने सांगतात.
धावण्याच्या जगात विशाल जितकी मेहनत करत होता जात गेला, तितकंच ‘विशाल बोल्ट हे टोपणनाव त्याच्या मनाच्या अधिक जवळ होत गेलं. चौथीत शिकत असतानाच त्याने स्प्रिंटचा महान सम्राट ‘उसेन बोल्ट’आपल्या घराच्या भिंतीवर आणला होता.
‘विशाल बोल्ट’ नावाची जन्मलेली ओळख
“त्या वेळी बाबांचा बॅनर प्रिंटिंगचा व्यवसाय होता. मी त्यांना म्हणालो, ‘अप्पा, मला उसेन बोल्टचा पोस्टर छापून द्याल का?’ त्यांनी खूप मोठं पोस्टर छापून दिलं आणि मी ते माझ्या खोलीच्या भिंतीवर लावलं. रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी माझी नजर त्या पोस्टरवर पडायची. मी आरशासमोर बोल्टची ती प्रसिद्ध पोझ करायचो आणि मनोमन स्वप्न पाहायचो. एक दिवस माझाही फोटो अशाच एखाद्या पोस्टरवर झळकेल,”
विशाल सांगत होता.

थेन्नारासूंनी मुलाच्या या वेडाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्यामागे ठामपणे उभेही राहिले. “मला तो ॲथलिट व्हावा, किंवा कुठलाही खेळाडू व्हावा असं मनापासून वाटायचं. कारण माझ्या स्वतःच्या वडिलांनी मला कधी प्रोत्साहन दिलं नव्हतं. मी अभ्यासात चांगला होतो, पण माझं खेळाकडे असलेलं आकर्षण कुणी गांभीर्याने घेतलं नाही,” ते सांगतात.
काही वर्षांनी थेन्नारासूंना समजलं की चेन्नईतील तामिळनाडू राज्य क्रीडा वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेतली जाणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी तब्बल ७०० हून अधिक तरुण खेळाडू मैदानात उतरले होते. त्या गर्दीत विशालही होता आणि अखेर निवड झालेल्या मोजक्या मुलांमध्ये त्याचं नावही आलं.
घरापासून जवळपास २०० किलोमीटर दूर असलेल्या चेन्नईसारख्या प्रचंड मोठ्या शहरात नवं आयुष्य सुरू करण्यासाठी विशाल जेव्हा निघाला, तेव्हा वडिलांनी सांगितलेले शब्द आजही त्याच्या मनात जिवंत आहेत.
“बाबांनी मला सांगितलं होतं, ‘तू एक दिवस भारताचा झेंडा उंचावशील.’ ऑलिम्पिक म्हणजे काय, हे मला माहिती होतं. पण भारतीय खेळाडू बनण्यासाठी नेमकं काय लागतं, याची मला काहीच कल्पना नव्हती,” विशाल सांगतो.
पराभव, नैराश्य आणि कोविडकाळातील आत्मपरीक्षण
क्रीडा वसतिगृहातील सुरुवातीचे दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. घरापासून दूर, पूर्णपणे नव्या वातावरणात स्वतःला जुळवून घेणं त्याला सहज जमलं नाही.
“माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. आयुष्य एक ठरावीक दिनक्रम बनून गेलं होतं. अभ्यास, सराव, पुन्हा अभ्यास आणि पुन्हा सराव. मी खूप लहान वयात तिथे गेलो होतो. काही दिवसांतच मला समजलं की इथे आलो म्हणजे लगेच महान खेळाडू होता येत नाही,” तो सांगतो.
स्पर्धांचे निकालही नेहमी त्याच्या बाजूने लागत नव्हते.
“मी तेव्हा फक्त एक लहान मुलगा होतो. मला फक्त जिंकणं आणि हारणं एवढंच कळायचं. जर मी जिंकलो नाही, तर मला खूप वाईट वाटायचं. पण जिंकण्यापेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, स्वतःमध्ये सुधारणा करणं. हे तेव्हा मला समजत नव्हतं. त्या काळात मी काही फार वेगळा किंवा विशेष खेळाडू आहे, असंही मला वाटत नव्हतं,” विशाल सांगतो.
२०२० मध्ये आलेल्या कोविड महामारीदरम्यान तो पुन्हा घरी परतला आणि त्याच काळात त्याच्या विचारांमध्ये मोठा बदल झाला. “मी घरी बसून सतत विचार करत होतो, मी आयुष्यात नेमकं काय करतोय? माझ्यात फारशी प्रेरणा उरली नव्हती. पण माझं कुटुंब मात्र सतत माझ्या पाठीशी उभं होतं. त्यांचा तो विश्वास पाहून मला स्वतःचीच लाज वाटली. ते मला इतका आधार देत होते, पण मी त्यांना परत काय देत होतो? तेव्हाच मी स्वतःला शब्द दिला की, ही महामारी संपल्यानंतर मी स्वतःला आधीपेक्षा कितीतरी जास्त झोकून देईन. आणि त्यानंतर मी स्प्रिंटिंगकडे अत्यंत गंभीरपणे लक्ष द्यायला सुरुवात केली,” तो आठवतो.

त्याच्या मेहनतीचे परिणामही लवकरच दिसू लागले. २०२२ मध्ये ज्युनियर फेडरेशन कपमध्ये त्याने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. “त्या विजयाने मला आणखी प्रचंड प्रेरणा मिळाली,” तो सांगतो.
२०० मीटरवरून ४०० मीटरकडे घेतलेली निर्णायक झेप
विशालच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट मात्र एखाद्या शर्यतीत आला नाही. तो आला २०२४ मध्ये, जेव्हा ज्युनियर राष्ट्रीय विजेतेपदानंतर तिरुअनंतपुरम येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रवेश मिळाल्यानंतर, तिथल्या प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार त्याने ४०० मीटर शर्यतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय तर्कसंगतही होता. तब्बल १८९ सेंटीमीटर उंची, मजबूत शरीरयष्टी आणि लांब पल्ल्याचे स्ट्राईड्स यामुळे विशालची शारीरिक रचना लहान अंतराच्या स्प्रिंटपेक्षा ४०० मीटरसाठी अधिक योग्य मानली जात होती.
“सुरुवातीला मला स्वतःलाच विश्वास नव्हता की मी इतक्या चांगल्या प्रकारे धावू शकेन. पण मी प्रशिक्षकांचं ऐकायचं ठरवलं. त्या काळात मला एक गोष्ट शिकायला मिळाली, संयम आणि समर्पण हेच सर्वात महत्त्वाचं असतं,” तो सांगतो.
मात्र हा बदल सहजसोपाही नव्हता. २०२४ मध्ये ४६.७७ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंवल्यानंतर, २०२५ हंगामाची सुरुवात त्याच्यासाठी निराशाजनक ठरली. खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला अखेरच्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
“लोकांनी माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. पण त्या पराभवानंतर कदाचित त्यांनाही वाटू लागलं असेल की, त्यांनी माझ्याकडून जितक्या अपेक्षा ठेवल्या होत्या, तितका मी चांगला खेळाडू नाही. मी स्वतःही खूप खचून गेलो होतो,” विशाल सांगतो.
पण नेमकं त्याच काळात भारतीय संघासोबत काम करणारे जमैकन वंशाचे प्रशिक्षक जेसन डॉसन यांनी त्याला सावरलं.
“कोचने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली, प्रत्येक शर्यत जिंकणं शक्य नसतं. सतत फक्त जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, योग्य वेळी आणि महत्त्वाच्या क्षणी जिंकणं अधिक महत्त्वाचं असतं. त्यांनी मला सांगितलं की, जर मी स्वतःला सातत्याने झोकून दिलं, मेहनत करत राहिलो, तर जिथे खरंच महत्त्व आहे तिथे मी नक्की जिंकेन,” विशाल सांगतो.

त्यानंतर विशालच्या कारकिर्दीत काही शर्यती उत्कृष्ट ठरल्या, तर काही अपेक्षेइतक्या यशस्वी झाल्या नाहीत. पण एक गोष्ट मात्र सातत्याने घडत राहिली ती म्हणजे तो दिवसेंदिवस अधिक सक्षम होत गेला.
दर महिन्यागणिक त्याच्या ४०० मीटरच्या वेळेत सेकंदांचे छोटे छोटे तुकडे कमी होत गेले. २०२४ मध्ये नोंदवलेली ४६.७७ सेकंदांची सर्वोत्तम वेळ पुढे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ४५.५७ सेकंदांवर आली, जिथे तो चौथ्या स्थानावर राहिला. आणि त्यानंतर त्याने आणखी एक मोठी झेप घेत इंटर स्टेट स्पर्धेत ४५.१२ सेकंदांची वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला.
फिनिश लाईनवर कायम उभे असलेले वडील
तो क्षण केवळ भारतीय ॲथलेटिक्ससाठी ऐतिहासिक नव्हता, तर एका वडिलांच्या स्वप्नाचाही विजय होता. शर्यत संपल्यानंतर सर्वात आधी धावत येऊन विशालला घट्ट मिठी मारणारे व्यक्ती म्हणजे त्याचे वडील थेन्नारासू होते.
“माझ्या प्रत्येक स्पर्धेसाठी ते देशभर फिरत असतात. अशी एकही शर्यत नसेल, जिथे मी फिनिश लाईन पार केल्यानंतर ते माझी वाट पाहताना उभे नसतील,” विशाल भावुक होत सांगतो.
रांचीमध्येही थेन्नारासू पुन्हा एकदा फिनिश लाईनवर उभे होते. मुलाच्या त्या ऐतिहासिक धावण्याचा क्षण डोळ्यांत साठवत ते म्हणाले, “माझ्या मुलाला असा इतिहास घडवताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येतंय, ही माझ्यासाठी देवाचीच कृपा आहे.”

मात्र रांचीमध्ये इतिहास रचूनही विशाल केवळ ०.०२ सेकंदांनी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इडियाच्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या पात्रता निकषापासून दूर राहिला. अनेकांसाठी ही गोष्ट मोठी निराशा ठरली असती. पण विशाल आता त्या पलीकडे पाहायला शिकला आहे.
“लोकांना फक्त विजय पाहायला आवडतो. पण माझ्यासाठी खरी मजा ट्रॅकवर, सरावाच्या मैदानात असते. मी कुठे धावतोय, कोणती स्पर्धा आहे, याने फारसा फरक पडत नाही. मी फक्त धावण्यावर प्रेम करणारा माणूस आहे,”
तो शांतपणे सांगतो.
(सौजन्य - स्पोर्टस्टार)






