मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला कारणही तसंच होतं. थिएटरचे मालक अबुशेठ यांनी तमाशा रसिकांसाठी एक आगळावेगळा प्रयोग केला होता. थिएटरच्या आवारात एका छान सजवलेल्या राहुटीत पठ्ठे बापूराव आणि पवळाला नटूनथटून बसवले आणि त्यांना बघण्यासाठी तिकीट ठेवले. मुंबईतल्या प्रेक्षकांना या जोडीबद्दल मोठी उत्सुकता होती त्यामुळे लोकांनी रांगा लावून तिकिटे काढली, राहुटीत प्रवेश केला की या दोघांना डोळेभरून बघायचं, दोन्ही हात जोडून नमस्कार म्हणायचं. बापूराव आणि पवळाने हलकेसे स्मित जरी केले तरी बघणाऱ्याला धन्य झाल्यासारखे वाटायचं. कलाक्षेत्राच्या इतिहासात केवळ कलाकाराला बघण्यासाठी तिकीट लावण्याचा आजवर प्रयोग फक्त एकदाच झाला, आधुनिक तमाशासृष्टीचे जनक बापूराव आणि तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार संगमनेर तालुक्यातल्या हिवरगावपावसा इथली पवळाबाई यांना हे भाग्य लाभलं…
संगमनेरपासून तीन चार मैलावर हिवरगाव पावसा हे गाव आहे. इथल्या तबाजी (तानाजी) आणि रेऊबाई भालेराव यांची पवळा ही मुलगी. 12 ऑगस्ट 1870 रोजी पवळाचा जन्म झाला. खंडोबाला केलेल्या नवसामुळे मुलगी झाली म्हणून तिला त्यांनी यथावकाश मुरळी म्हणून देवाला अर्पण केलं. पवळा दिसायला सुंदर तर होतीच पण तिचा आवाजही गोड होता. पवळा बारा-तेरा वर्षांची झाली तेव्हा तबाजीने तिला हरिबाबा घोलप यांच्याकडे गाणे शिकायला पाठवलं. हरिबाबा हे त्या काळातील उत्तम कवी, शाहीर होते. त्यांचा छोटासा तमाशाही होता. तोवर तमाशात केवळ तरुण मुलंच स्त्रियांचा वेष करून नाचगाणे करायचे. पवळाच्या रूपाने खरोखर सुंदर दिसणारी, सुंदर नाचणारी तरुण मुलगी तमाशात आल्याने हरिबाबा घोलपांच्या तमाशाची कीर्ती सगळीकडे पसरली.

पण एकदा हरिबाबा घोलप यांना या सगळ्याचा कंटाळा आला त्यांनी विरक्ती पत्करली आणि कीर्तने करू लागले. यानंतर पवळाने कोल्हारच्या कडू सुभान्या लोखंडे व इतर एक दोन तमाशात काम केले. नंतर नामा धुलवडकर यांच्या तमाशात काम करीत असताना हा तमाशा मुंबईत आला. मुंबईत पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडूबा साळी, शिवा संभा कवलापुरकर, शंकरराव अवसरीकर आदी तमाशे गाजत होते, पण या सगळ्या तमाशात तरुण मुलेच स्त्री वेशात नाचायची. जेव्हा मुंबईत बातमी पसरली की नामा धुलवडकर यांच्या तमाशात खरीखुरी स्त्री नाचते तेव्हा या तमाशाला मोठी गर्दी होऊ लागली. गर्दी इतकी वाढली की नामा धुलवडकरांसारख्या तमासगीराला गुंड प्रवृत्तीच्या प्रेक्षकांपासून पवळाला सांभाळणे कठीण जाऊ लागले. अखेरीस धुलवडकरांनी तमाशा बंद केला आणि पवळा पठ्ठे बापुरावांच्या तमाशात गेली.
बापूरावांचा जन्म सध्याच्या सांगली जिल्ह्यातल्या रेठरे हरणाक्ष गावचा. लहानपणापासून तमाशाची मोठी आवड असणाऱ्या बापुरावांनी चोरून तमाशे बघायला सुरुवात केली. आईवडिलांच्या निधनानंतर बापूराव गावातल्या हरिजन वस्तीतल्या तमाशा कलाकारांना कवने रचून द्यायला सुरुवात केली. मग हळूहळू तमासगीर मंडळीत रहायला सुरुवात केली. परंपरेने चालत आलेले गावचे कुलकर्णीपद सांभाळताना बापुरावांकडून चुका होऊ लागल्या. वरिष्ठांच्याकडून विचारणा झाल्यावर बापुरावांनी सरकारी काम सोडले आणि आपले ब्राह्मण्यही सोडले. कलाकार गोळा करून तमाशे करू लागले. तोवर ओबडधोबड असलेल्या तमाशात लोकांना चांगली कवने ऐकायला मिळू लागली आणि बापुरावांचा तमाशा गाजू लागला.

या तमाशात पवळाचा प्रवेश झाला आणि तमाशा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचला, इतका की असे म्हणतात की बापूराव आज गायलेलं कवन दुसऱ्या दिवशी गात नव्हते. पवळामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर आला होता. अमाप पैसा मिळत होता.बापुरावांचा त्याकाळातील रोजचा खर्च 20 - 25 रुपये होऊ लागला. त्याकाळी सरकारी नोकराला महिन्याला एवढा पगार मिळत नव्हता. बापूराव आणि पवळा ही जोडी तमाशा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली होती.
त्याकाळी पवळाचा थाट इतका असायचा की ती मुंबईहून पावसाळ्यात संगमनेरला आली की तिच्यासाठी खास तयार केलेल्या आणि सजवलेल्या छकड्यातून हिवरगावला जायची. तिच्या अंगावर नेहमीच उत्तम शालू असायचा. नखशिखांत सोन्याने मढलेली पवळा गाडीला चहूबाजूने लावलेले पडदे लावून हिवरगावला आपल्या मळ्यात जायची.
पण बापुरावांच्या वाढत्या खर्चिक स्वभावामुळे तिचे त्यांच्याशी वाद होऊ लागले. अखेरीस तिने बापुरावांच्या साथ सोडली. मसुरच्या मारुतराव पाटील यांनी तिला नवा फड उभारून दिला. इकडे बापूराव सैरभैर झाले होते. काही काळ पवळाचा तमाशा फड जोरात चालला पण मारुती पाटील आणि पवळाचे वाद सुरू झाले, हे वाद शेवटी कोर्टात गेले आणि फड बंद पडला.
पवळा पुन्हा हिवरगावला आली. ही बातमी बापुरावांना कळली ते संगमनेरला आले आणि बैलगाडी करून पवळाला जाऊन भेटले. गावातल्या थोरामोठ्यांच्या मध्यस्तीने पवळा आणि बापूराव यांच्यातला वाद मिटवला गेला. पवळा आणि बापुरावांच्या नावाने पुन्हा तमाशा उभा राहिला या तमाशाचा पहिला खेळ वाघापूर गावात मोफत करायचे ठरले. संगमनेर आणि पंचक्रोशीतील लोकांनी तमाशाला मोठी गर्दी केली. दोघांनी पुन्हा महाराष्ट्र गाजवायला सुरुवात केली.
बापूराव तमाशात रमले पण त्यांच्या गावात ते धर्मांतर करणार असल्याची अफवा पसरली. लोक त्यांना समजून सांगण्यासाठी येऊ लागले. बापुरावांना समजुतीच्या चार गोष्टी सांगताना पवळाला दोष देऊ लागले. यामुळे पुन्हा पवळा आणि बापूराव यांच्यात खटके उडू लागले. गावकऱ्यांनी बापुरावांना रेठऱ्याला नेले, 300 रुपये वर्गणी काढून ती रक्कम बापुरावांना दिली आणि काशीला जाऊन शुद्धीकरण करून या असे सांगितले. बापूराव हे तीनशे रुपये घेऊन मुंबईला आले, सर्व पैसे पवळाला दिले.
प्रतिभावान तमाशा कलावंत रघुवीर खेडकर याबद्दल अतिशय रंजक अशी माहिती सांगतात, पवळा आणि बापूराव यांचा संगम हा बापूरावांच्या प्रतिभेच्या परमोत्कर्षास कारणीभूत झाला. आणि त्याच वेळी बापूराव बाटले, त्यांना हद्दपार का करू नये, अशी लोकांत चर्चा सुरू झाली. प्रखर जातीय व्यवस्था आणि शिवाशिव पाळणाऱ्या समाजात तर गहजब होणे साहजिकच होते. समाजात अशांतता पसरत होती. आणि शेवटी पठ्ठे बापूराव आणि पवळा यांना कोर्टाचे बोलावणे आले. न्यायाधीशाने बापूरावांना ‘तुम्ही बाटलात का’ असे विचारले. त्याच्या उत्तरासाठी बापूरावांनी कोर्टातल्या न्यायाधीशांना आपल्या तमाशाचे आमंत्रण दिले. न्यायाधीश तमाशाला आले आणि बापूरावांनी कवन सुरू केले :-
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी, सोवळे ठेवले घालुन घडी
मशाल धरली हाती तमाशाची, लाज लाविली देशोधडी
कलियुगाचा ऐका दाखला, पठ्ठे बापूराव भुलला पवळिला
महारिणीसाठी महार झाला
पुन्हा जात मिळेल का हो त्याला
ब्राह्मणाला हो जी जी।।
जातीपातीच्या पलीकडे जाऊन पठ्ठे बापूराव आणि पवळा कला जगण्यासाठी आणि जागविण्यासाठी विचार करत होते, हे न्यायालयाच्या लक्षात आले आणि कोर्टाने बापूराव आणि पवळाला निर्दोष सोडले. पुढे पुन्हा त्यांचा तमाशाचा फड सुरू झाला.
पण पवळा मनातून दुःखी झालेली होती, लोकांचे टोमणे तिला सहन होत नव्हते. तिने तमाशा सोडला आणि गावी परत आली. वय वाढले, आजारपण वाढू लागले. शेवटी उपचार करणे गरजेचे होते म्हणून कफल्लक झालेली पवळा मुंबईतल्या नागपाडा भागात रहात असलेल्या तिच्या लक्ष्मण तबाजी भालेराव या भावाकडे गेली. पण आजारपणाने तिची पाठ सोडली नाही. कधीकाळी खूप ऐश्वर्य भोगलेली पवळाबाई 6 डिसेंबर 1939 रोजी हे जग सोडून गेली. जिला बघण्यासाठी मुंबईकर तिकीट काढून यायचे त्या पवळाबाईला अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वरळीच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले.

पठ्ठे बापूराव आणि पवळा यांच्या जीवनावर आधारित दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेले आहेत. 1950 साली 'पठ्ठे बापूराव ' या नावाने तर 1993 साली ' लावण्यवती 'या नावाने एक सिनेमा आला होता. योगायोग असा की 1993 साली आलेल्या लावण्यवती सिनेमात पवळाची भूमिका संगमनेरची कन्या वर्षा संगमनेरकर यांनी केली. वर्षा या गुलाबबाई संगमनेरकर यांच्या धाकट्या कन्या आहेत. ज्या संगमनेरकरांवर सिनेमे आले अशा अनंत फंदी, डॉ. आनंदीबाई जोशी ( संगमनेरच्या स्नुषा) यांच्यानंतर तिसऱ्या संगमनेरकर म्हणजे पवळा हिवरगावकर.image widget






