नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘Adolescence’ नावाची एक वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. अगदी आठवडाभरातच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाची कथा या वेबसीरिजमधून दाखवण्यात आली आहे. ज्याला अल्पवयीन मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली जाते. अनेकांनी या वेबसीरिजचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
Adolescence सिरीजमधून अत्यंत सूक्ष्मपणे वेगवेगळे गंभीर मुद्दे मांडले आहेत. मर्डर, तपास आणि शेवट अशी काही ती थ्रिलर सिरीज नाही. खून कोण करतं हे सुरुवातीपासून स्पष्ट आहे त्यामुळे त्यात सस्पेन्स काही नाही, की नाट्यमय शेवट नाही. जेमी मिलर ह्या १३ वर्षाच्या मुलाला खुनासाठी अटक झाली आहे. त्याला ताब्यात घेणं, चौकशी, तपास, त्याची पार्श्वभूमी ह्यामध्ये पहिला एपिसोड संपतो.
‘Adolescence’ मध्ये नेमकं काय दाखवलयं…?
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या भागात तीन महत्त्वाच्या गोष्टी बारकाईने घेतल्या आहेत. दुसऱ्या भागात एकूण टीनेजर्सचं विश्व, शाळा, शिक्षकांविषयी विशेष आदर नाही, घुसमट, आणि प्रचंड चिडचिड.. इन्स्टाग्रामचं विश्व, त्याचा शब्दकोश आणि एकसारखी, प्रचंड समवयस्कांचा प्रभाव (peer pressure) असलेली मुलं आणि एकमेकांवर होत असलेले परिणाम.
तिसऱ्या भागात ज्या 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलंय त्याचं भावविश्व… इतरांच्या कृत्यांचा त्याच्यावर होणारा परिणाम. तो काय विचार करतो, त्याला वडिलांविषयी काय वाटतं, वडिलांना त्याच्याविषयी जे वाटतं त्याच्याविषयी त्याला काय वाटतं, त्याला मुलींविषयी, प्रेमाच्या भावनेविषयी काय वाटतं, ‘डेट’ला गेल्यावर काय करावसं वाटतं, त्याच्याविषयी इतरांना काय वाटतं आणि त्यामुळे त्याचा स्वतःचा स्वतःविषयी काय ग्रह आहे. आणि त्या झालेल्या ग्रहावर तो काय आणि कसं काम करतों कसा प्रतिसाद देतो. हे एका मानसोपचारतज्ज्ञाच्या आणि त्याच्या प्रश्नोत्तरांद्वारे आपल्याला समजतं.
चौथ्या भागात आई वडिलांची भूमिका, त्यांचं त्यांनी घालवलेलं बालपण, त्यांची जडणघडण आणि त्यामुळे त्यांची वागणूक ह्याचा मुलांवर काय परिणाम होतो – होत नाही, पालक म्हणून त्यांनी अजून कसं वागायला हवं होतं, हवं आहे, ते चूक की बरोबर ही सगळी चर्चा आई वडिलांच्या सामान्य वक्तव्यातून आपल्यासमोर येते. ह्या चर्चेतूनही प्रचंड घेण्यासारखं आहे. घेण्यासारखं म्हणजे संदेश नाही प्रत्यक्ष; पण विचारप्रवृत्त करायला लावणारी चर्चा…
कोवळी पानगळं…
हे तीनही मुद्दे काही उपाय, उत्तरं देतात असं नाही. पण ते विचार करायला भाग पडतात.आज ‘इन्स्टा’ हे मुलांचं विश्व झालं आहे. ऑनलाईन वावर खऱ्या जगाहून महत्त्वाचा झाला आहे. आपण लहान असताना कोणी आपल्याला किंवा आपण कोणाला चिडवलं तरी ते माफक असायचं. एका मर्यादित ग्रुपमध्ये असायचं. माफक चेष्टा कधीतरी चांगलं वागायला, व्यक्तिमत्व सुधार करायला प्रवृत्त करायची. कधीकधी ते तात्पुरतंही असायचं. पण आज सोशल मीडियामुळे सर्व सार्वत्रिक झालंय. आणि त्याने कायमचा ठप्पा बसतोय. चर्चा गावभर होतेय. आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व ‘कुल’ दाखवण्यासाठी सर्व काही चालू आहे. मात्र ते उत्तम, प्रगल्भ करण्यासाठी काहीच चालू नाहीय.
आपल्या लहानपणी आपल्याला accepted, loved वाटण्यासाठी मित्र मैत्रिणी तर होत गेलेच पण हक्काचे असे नातेवाईक असायचे. सणसमारंभ, वाढदिवस अशा प्रसंगी ते लाडकोड करायचे, आपल्या हक्काच्या आत्ते मामे मावस बहिण भावंडांत कधी एकटं वाटायला संधीच नव्हती. पुन्हा सर्व आपल्यासारख्याच सामाजिक आर्थिक परिस्थितीतील, त्यामुळे फार भेदही नसायचे. ह्याउपर मित्र मैत्रिणी म्हणजे बोनस असायचा. माणसांच्या दृष्टीने आपलं आयुष्य समृद्ध होतं. आज एकीकडे एकेकट्या मुलांमुळे अशा नात्यांची कमी आणि दुसरीकडे चेष्टामस्करी, गुंडगिरी( bully) करणारी, टार्गेट करणारी शाळा कॉलेजमधील मुलं आणि त्यांच्या ठरलेल्या व्याख्यांमध्ये राहण्यासाठीची धडपड. आणि नाही जमलं तर त्यांनीच मारलेले ‘इन्सेल’ सारखे ठप्पे.
अजाणत्या वयातील मुलांच्या पुरुषत्वाच्या कल्पना…
तिसऱ्या भागात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आधीच लहानाची मोठी होत असताना अतिशय टेंडर, अतिशय कोवळी मनं असलेली मुलं. अक्षरशः पालकांचं एकेक बोचरं वाक्य आयुष्यभर लक्षात राहील असं ते वय. त्या वयात मुलांना अनुकरणीय कोण तर आई आणि वडील. अशा वेळेस त्यांचं आदर्श कोण, आणि ते कोणाचं अनुकरण करतात, अशा वेळेस ती आई वडिलांच्या नजरेतून स्वतःकडे बघतात आणि स्वतःविषयीची कल्पना तयार करतात.
त्याचवेळेस शारीरिक मानसिक बदल घडत असताना आपण आकर्षक आहोत की नाही, आणि कोणी म्हटलं, वारंवार म्हटलं की नाही, तर तीच मजबूत होत जाणारी कल्पना. अशा वेळेस व्यक्तिमत्वाला आधार देणारं, विकसित करायला लावणारं काहीच नाही, कोणीच नाही. आता काहीच होऊ शकत नाही कारण शिक्का तर बसला आहे. आजकाल खरंच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कोणीतरी जवळचं हवं आहे, शेअर करायला हवं आहे म्हणून हवे असतात, की दाखवायला हवे असतात, पिअर प्रेशरखाली हवे असतात हा विचार करायचा मुद्दा.
पण पिअर्सची एकेक कमेंट मनावर आघात करू शकते, कायमचा व्रण उमटवू शकते आणि विचित्र प्रतिसाद द्यायला उद्युक्त करू शकते. जेमीला इंसेल म्हटलंय. अर्थात इच्छा असतानाही ज्याला स्त्री लाभू शकत नाही असं सक्तीचे एकटेपण. आणि सगळ्यांचा नजरेतून जेमीला स्वतः अत्यंत कुरुप (ugly) आहोत असं वाटतंय. त्याची validation ची तहान दिसते जेव्हा अखेरीस तो मानसोपचारतज्ज्ञाला आकांताने विचारतो मी तुला कसा वाटतो, मी तुला आवडतो का... पुरुषत्वाच्या कल्पनेचा अजाणत्या वयात मुलांना विचार करावा लागतोय, ग्रह बनवले जात आहेत, आणि मानसिक जखमा होत आहेत.
आई-वडिलांचं अनुकरण
चौथ्या भागात आई वडील. अतिशय सुंदर घेतलेला एपिसोड. आई वडील कधीच आदर्श असतात असं नाही. तेही त्यांच्यापरीने प्रयत्न करत असतात, ते त्यांच्या आई वडिलांपेक्षा बेटर असतात. सिरीज ह्या तीनही मुद्द्यांवर थोडा थोडा भार टाकून देते. उपाय नाही सुचवत. मुलं dominant parent च्या दृष्टीने स्वतःविषयी कल्पना निर्माण करतात. हे हा भाग सुचवतो. आणि मुलं अनुकरण करतात असेही अप्रत्यक्ष आई वडिलांच्या संभाषणातून येते.
आई वडील आदर्श वागण्याचा प्रयत्न करतच असतात पण रात्री उशिरापर्यंत सोशल मिडिया, त्यावर पोर्न बघणं, तेच विश्व हे इतकं कॉमन झालं आहे की अगदी आपण जसा विचार करतो तसेच सिरीज मधलेही म्हणतात की ‘आजकाल हे सर्वच मुलं करतात नाही का! आपण त्यांच्यावर चोवीस तास नजर नाही ठेऊ शकत!’ अशा वेळेस आपण आपल्या मुलांना वेगळं काय आणि कसं सांगणार हापण सर्वसामान्य आई वडिलांचा प्रश्नच. शेजारी जेव्हा nonce म्हणून कुटुंबाकडे बघतात, तेव्हा वडील प्रचंड चिडतात, त्यांना राग आवरता येत नाही. घरी येऊन पत्नी म्हणते की तू (कायमच) रागावर नियंत्रण ठेवायला हवं होतंस तेव्हा अनुकरण ह्या मुद्द्यावर आपण येतो. दोघेही तरीसुद्धा आपण चांगले पालक होतो म्हणतातही आणि तरीही आपण त्याला घडवलं ही जबाबदारीही घेतात.
त्यांची दुसरी मुलगी जेव्हा खूप जबाबदारीने वागत असते तेव्हा हिलाही आपणच घडवलं म्हणतात तेव्हा आणखी एक मुद्दा समोर येतो तो म्हणजे समाज, पालक आणि परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येक व्यक्तीचं असं एक शारीरिक-मानसिक व्यक्तिमत्व असतं जे कसं react होईल हे सांगूच शकत नाही. ते त्याचं अगदी विशेष असतं आणि म्हणूनच एकाच पालकांची एकाच वातावरणात वाढलेली मुलं वेगवेगळ आयुष्य जगत असतात वेगवेगळे प्रतिसाद देतात. सिरीजमध्येही हे बघतो, आणि आपल्या आजूबाजूलाही आपण हे बघतच असतो.
स्टीफन ग्रॅहम ह्याने जॅक थोर्न सह लिहिलेले हे भाग कमाल ताकदीचे आहेत. त्यात ड्रामा नाही, थ्रील नाही, ते समजून घेण्याचे, धक्कादायक वास्तव समोर आणण्याचे आहेत. स्टीफनने वडिलांच्या भूमिकेतही कमाल केली आहे. ‘मी अजून बेटर व्हायला हवं होतं.’ असं तो अखेरीस म्हणतो ते अत्यंत relatabel आहे. हे प्रत्येक आई वडिलांना कायमच वाटून जातं. एका सिंगल शॉटमध्ये घेतलेले हे ह्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आपण अत्यंत गुंतून राहतो. एकेका संवादातून पुढे आलेला विचारप्रवण मुद्दा हा लेखकाच्या ताकदीचा पुरावाच आहे.
जेव्हा सर्वत्र हीच परिस्थिती आहे तेव्हा आपण खरंच काय करू शकतो?
• चांगले नातेसंबंध वाढवणं.
• मुलांवर unconditional प्रेम करणं आणि काहीही म्हणजे काहीही झालं तरी आम्ही आहोत ही खात्री त्यांना देणं.
• online वावर कमी करा म्हणण्यापेक्षा त्यांना अधिक उत्तम गोष्टींत गुंतवून ठेवणं.
• खूप मोठा purpose/उद्देश ह्याकडे लक्ष वेधणं
• अनुकरणीय व्यक्तींचा परिचय करून घेणं. 
• प्रेम विषयावर त्यांच्याशी बोलणं आणि चुकीचे ग्रह दूर करत राहणं.
• प्रेमभावना वाटणं ही नैसर्गिक आणि अतिशय सुंदर गोष्ट आहे ह्याकडे लक्ष वेधणं आणि ती मिरवण्यासाठी नाही हे बोलत राहणं.
• आपले अनुकरण केले जाते त्यामुळे आपणही अधिक बेटर, अधिक बरे व्हायचा प्रयत्न करणं
• चांगलं वाईट बघणं, वाचणं आणि चर्चा करणं
(साभार - विभावरी बिडवे यांच्या फेसबुक वॉलवरून)






