शंतनू खुजे
- एखादा शायर जातो, तेव्हा काही गझला अनाथ होतात. एखादा कवी निघून जातो, तेव्हा काही कविता पोरक्या होतात. पण काही माणसं अशी असतात की त्यांच्या जाण्याने एखादं शहरच थोडं अधिक एकाकी होतं. बशर नवाज हे असेच एक शायर होते. आज त्यांना जाऊन बरोबर अकरा वर्ष झाली…
- त्यांच्या गझलांनी प्रेम, विरह आणि काळाच्या वेदनेला शब्द दिले; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने औरंगाबादला त्याची तहजीब, उर्दूला तिची मोकळी हवा आणि साहित्याला संवादाची एक सुंदर परंपरा दिली.
- 'करोगे याद तो हर बात याद आएगी...' ही ओळ आजही असंख्य रसिकांच्या ओठांवर आहे; मात्र बशरसाबांची आठवण केवळ त्या एका गझलेपुरती मर्यादित नाही. ती एका अशा सांस्कृतिक वारशाची आठवण आहे, ज्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपण अजूनही पुरेशी ओळखलेली नाही.
वो कोई मेरा दोस्त था
जो दो घड़ी के वास्ते ही क्यूँ न हो
नज़र को रंग दिल को निकहतों से भर गया
पता नहीं किधर गया
मैं इस को ढूँढता हुआ
तमाम काएनात में
उधर उधर बिखर गया
(बशर नवाज यांच्या 'पता नही वो कौन था' या नझ्ममधील ओळी)
आज बशरसाब नाहीत. बरोबर अकरा वर्षे झाली त्यांना जाऊन. वली औरंगाबादी, सिराज औरंगाबादी यांनी लावलेल्या दख्खनी शायरीचं रोपटं आपल्या सुधारणावादी व बराचशा खुलेपणानं वाढवणाऱ्या बशर नवाजांची नेहमी आठवण येते.
बशर नवाज कोण होते? ते शायर होते, उर्दूचे अभ्यासक होते, समीक्षक होते, मराठीचेही चांगले डोळस वाचक होते शिवाय त्यांचं बलस्थान होतं ते म्हणजे औरंगाबादची तहजीब सांभाळत होते. गझल, उर्दू, माणसं, औरंगाबाद, या शहराची तहजीब आणि जगण्याची फिलॉसॉफी यावर ते भरभरून बोलत, समजावून सांगत..
छ. संभाजी नगर येथील पत्रकार महेश देशमुख यांचा बशर नवाज यांच्याशी अतिशय घनिष्ठ स्नेह होता. त्यांच्यासोबतच्या आठवणी उलगडून सांगताना देशमुख म्हणतात, ‘’
बशर नवाज यांचा उल्लेख झाल्या झाल्या डोळ्यांसमाेर उभं राहतं ते त्यांचे चिरपरिचित रूप. पांढराशुभ्र पठाणी ड्रेस, मानेवर रुळणारे पण समोरून राजीनामा देत निघालेले पांढरेशुभ्र केस, तेवढीच पांढरीधोप दाढी. डोळयात कायम काहीतरी सांगायचे आहे असे भाव आणि तलम आवाज. या ना त्या कामाने किंवा नुसते गप्पा मारायला त्यांच्याकडे जाणे व्हायचे. ज्युबिली पार्कला साने डाॅक्टरांच्या गल्लीतले जुने घर असो की नंतरचा फ्लॅट, कधीही जा, त्यांच्याभोवती माणसे असत किंवा दिवाणावर पुस्तकांच्या गराड्यात मांडी ठोकून बसलेले बशरसाब दिसत.’’

बशरसाब म्हणायचे, ‘उर्दूला देवनागरी करा. ती तुमची-आमची हिंदीच आहे.’
आदाब-सलाम झाला की समोरच्याच्या वयाचा विचार न करता थेट मैत्रीपूर्ण संवादाने गाडी सुरू व्हायची. त्यांची शायरी, इतरांची शायरी, वलीची शायरी, गाजलेल्या गझलांचे किस्से सांगतानाच मग कधी उर्दूच्या भविष्याचा विषय निघे. उर्दू केवळ लिपीमुळे मागे पडत चालली असे त्यांचे मत होते. इतरांसारखी खंत व्यक्त न करता त्यांनी त्यावर उपायही सांगितला होता. ते नेहमी म्हणत की, उर्दूला देवनागरी करा. ती तुमची-आमची हिंदीच आहे. लिपीच्या जोखडातून उर्दू निघाली की ती जगावर राज्य करेल यावर ते ठाम होते.
बशर म्हणजे माणूस आणि नवाज म्हणजे नावाजलेला किंवा गौरविलेला. आपल्या प्रतिभेने बशर यांनी शायरीला ‘नवाज’ केले. डॉ. राम पंडीत हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध गझलकार, कवी आणि संगीतकार आहेत. त्यांनी बशर यांच्या काही उर्दू कवितांचा मराठी अनुवाद केला होता.
ते सांगतात,’’१९७५-७६ या कालावधीत औरंगाबादेत सिकंदर अली वज्द वास्तव्यास होते. ते हाजी अलीला माझे शेजारी होते. त्यामुळे औरंगाबादला सिकंदर अली यांच्याकडे मी नेहमी जात असे. तेथेच माझी बशर नवाज यांच्याशी ओळख झाली. अनंत भालेराव यांनी ‘मराठवाडा’मध्ये त्या कविता प्रसिद्ध केल्या होत्या. ‘रोमँटिसिझम’ म्हणजेच प्रेमभावना व्यक्त केल्या जाणाऱ्या उर्दू शायरीचा बशर यांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्न मांडण्यासाठी चपखलपणे वापर केला. बशर यांच्या शेरामध्ये या प्रश्नांचे प्रतीकात्मकरीत्या प्रतििबब उमटले आहे. ज्येष्ठ उर्दू कवी काझी सलीम, बशर नवाज आणि मी अशा आमच्या संपादक मंडळाने मराठीतील साहित्य उर्दूमध्ये आणि उर्दूतील साहित्य मराठीमध्ये असे चार खंड महाराष्ट्र शासनासाठी संपादित केले होते.
तरक्कीपसंद शायरीतून उर्दू कवितेला जहीद शायरीकडे वळवणारा शायर
साठोत्तरी कालखंडातील उर्दू कवितेतील एक महत्त्वाचे कवी म्हणून बशर नवाज यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित केली. तरक्कीपसंद शायरीतून उर्दू कवितेला जहीद शायरीकडे- म्हणजेच आधुनिक शायरीकडे वळवण्याचे श्रेय ज्या मोजक्या कवींकडे जाते त्यातील बशर नवाज हे अग्रणी नाव आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. निदा फाजली, शहरयार यांच्या समकालीन असलेल्या बशर नवाज यांचे नज्म- म्हणजेच कविता आणि गजल या दोन्हींवरही तेवढेच प्रभुत्व होते. उर्दू, हिंदूी, इंग्रजी भाषेतील अभिजात साहित्यप्रवाहांचा अभ्यास, अभ्यासातून आलेली समीक्षेची जाण आणि त्याला पुरोगामी चळवळीची जोड यामुळे बशर यांची नज्म रसिकांच्या थेट काळजाला जाऊन भिडते. सामान्यांच्या व्यथा-वेदनेला आपल्या काव्यातून थेट मांडणारे बशर नवाज यांचा उल्लेख ‘सामाजिक वेदनेचा भाष्यकार’ असेच करणे सयुक्तिक ठरेल.

तरुणपणात उर्दू साहित्यात असलेल्या प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंटचे जवळपास सदस्यच होते. अली सरदार जाफरी व इतरांनी ती चळवळ चालवली, पण त्यातील बहुतेक जण कम्युनिस्ट विचारधारांचे होते. बशर नवाजांनी कधी राजकीय विचारधारेचा शिक्का बसू दिला नाही. यामागे त्यांच्या रक्तात असलेली दख्खनी अदबच होती. सुफी विचारधारा त्यांना जवळची वाटे, तशी त्यांना मराठी संतपरंपराही जवळची वाटे. संत एकनाथ महाराजांनी केलेले समाजप्रबोधन हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. संत ज्ञाानेश्वर, जनार्दन स्वामी यांच्या विचारधारांवरही ते जाणकारपणे भाष्य करीत. फक्त उर्दू एके उर्दू न करता ते इतर भाषांतील साहित्यावरही अधिकारवाणीने बोलत.
डॉ. राम पंडीत यांनी बशर नवाज यांच्यासंदर्बात एक आठवण सांगितली. छंदशास्त्रावर हुकमत आणि अभिजात उर्दू शायरीचा व्यासंग हे बशर नवाज यांचे अनोखे वैशिष्टय़. औपचारिकदृष्टय़ा त्यांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी सामाजिक अनुभवाच्या शाळेत त्यांनी ज्ञानसाधना केली. एकदा औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उर्दू कवी फैजल जाफरी यांच्याशी त्यांचे वैचारिक वाद झाले. तेव्हा त्यांनी रात्री अकरा ते पहाटे चारदरम्यान रंगवलेल्या मैफलीमध्ये त्यांनी मुखोद्गत असलेले गालिब, मीर, अनिस, सौदा, अजगर गोंडवी, यगाना चंगेजी यांचे हजारो शेर ऐकवले. या मैफलीचा मी साक्षीदार होतो.
‘करोगे याद तो हर बात याद आएगी’सारखी अजरामर गझल…
दिल्ली आणि लखनौ या शहरांबरोबरच महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाडा हे उर्दूचे प्रमुख केंद्र राहिले आहे. त्यात बशर नवाज यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हे त्यांचे श्रेय कुणालाही नाकारता येणार नाही. साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांच्यासारखे शायर उपजीविकेसाठी मुंबईला आले व चित्रपटसृष्टीमध्ये रमले. चित्रपटगीतांमुळे हे शायर सामान्य रसिकांपर्यंत पोहोचले. त्या धर्तीवर ‘बाजार’ चित्रपटातील ‘करोगे याद तो हर बात याद आती है’ या एकाच गीतामुळे बशर नवाज अजरामर झाले. पण चित्रपटांपेक्षाही ते आपल्या मनपसंत असलेल्या शायरीच्या प्रांतामध्येच रमले.
मात्र ‘करोगे याद तो हर बात याद आएगी’सारखी अजरामर गझल लिहिणारा शायर गेला एवढंच काही त्यांच्या जाण्याचं महत्त्व नाही. शायर हा एकच पैलू त्यांची बाहेरच्या जगासाठी ओळख असली तरी त्यांच्या जाण्यानं उर्दूचे मोठे नुकसान झाले आहे. वली औरंगाबादीने जगासमाेर आणलेली दख्खनी, जी नंतर आजची उर्दू बनली, त्या दख्खनी परंपरेचा हा शेवटचा खांब होता. वली औरंगाबादी, सिराज औरंगाबादी, नंतर दोनशे वर्षांनी जन्माला आलेले सिकंदर अली वज्द यांनी दख्खनी तिच्या वैशिष्ट्यांसह टिकवली आणि वाढवली. त्या परंपरेतील बशर नवाज हे शेवटचे पाईक.

१९८२ च्या सागर सरहदींच्या बाजार चित्रपटातील ‘करोगे याद तो हर बात याद आएगी’ने त्यांची ओळख सर्वांना करून दिली. नसीर व स्मितावरची भूपेंद्रने गायलेली ही गझल ही बशर नवाजांची ओळख बनली. या चित्रपटासाठी सरहदींनी वेगवेगळ्या कालखंडांतील शायरांच्या रचना वापरल्या. मीर तकी मीर, मिर्झा शौक यांच्या जोडीने बशर नवाजांची ही गझल घेतली गेली. या गझलबद्दल ते कायम उत्साहाने बोलत. त्यातला ‘गली के मोड पे सुनासा कोई दरवाजा' हा शेर खुलताबादच्या एका सुनसान गल्लीत दुपारच्या वेळी कसा सुचला ते सांगत. हा शेर आल्यावरच मला ती गझल पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले असे ते म्हणत.
मेहदी हसन या गझलच्या सम्राटाच्या एका अल्बममध्ये आपली गझल कशी आली याचा किस्सा तर ते जास्तच उत्साहाने सांगत. ते म्हणायचे,‘मी मुंबईत गेलो होतो. सरदार जाफरींना वगैरे भेटलो. तेव्हा मेहदी हसन रेकाॅर्डिंगसाठी मुंबईत आले होते. हाॅटेलवर त्यांना भेटायला मी आणि जाफरी गेलो होतो. भेटून निघालो. तिकडे जाफरी आणि मेहदी हसन यांच्यात अल्बमसाठी कोणत्या १२ गझल निवडायच्या यावर चर्चा सुरू होती. ११ निवडल्या, पण हाती उरलेल्यांतून १२ वी काही मेहदी हसन यांना पसंत पडत नव्हती. जाफरींनी मग त्यांना नवीन शायराची बघा एखादी, असे सांगत माझ्या गझला बघून घ्या, असे सांगितले. त्यांना मी ‘जुल्फें खुली तो मस्त घटा घिर के आ गयी, आँचल उडा तो जैसे कयामत सी छा गयी' ही गझल एेकवली. त्यांना ती पसंत पडली आणि त्यांनी ती गायलीसुद्धा. मेहदी हसन यांच्या त्या गझलेने त्यांना सातासमुद्रापार ओळख निर्माण करून दिली.
गझल, समीक्षा आणि नज्मही
‘अजनबी समंदर’, ‘रायगाँ’ हे दोन गझलसंग्रह त्यांनी लिहिले. ‘नया अदब’ हा साहित्य समीक्षणावरचा ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेचा परिचय देतो. याशिवाय अनेक अप्रकाशित गझला व नज्म यांचे भांडार बाकी आहे. गझलसोबतच नज्म हा प्रकारही त्यांनी तेवढ्याच ताकदीने लिहिला, पण ते रमले ते गझलमध्येच. त्यांच्यात रोमँटिक शायर काय ताकदीचा होता हे सांगणारी ही गझल....
यही चेहरा, यही आँखें, यही रंगत निकले
जब कोई ख्वाब तराशूँ तेरी मूरत निकले।
इक खूशबू के ताकूब में सफर है फिरसे
फिर कोई दश्त ना इस राह की किस्मत निकले।
जिंदगी थी किसी बाजार का मंजर जैसे
हम भी माथे पे सजाए हुए किमत निकले।
ज्या ताकदीने बशर नवाजांनी गझल हाताळली, त्याच ताकदीने त्यांनी नज्मचा प्रकारही हाताळला. वाचकाला विचार करायला लावणाऱ्या प्रसंगी आश्चर्यचकित करायला लावणाऱ्या प्रतिमांचा वापर त्यांनी नज्ममध्ये मुक्त हस्ते केला. आईना ही शायरांच्या आवडत्या प्रतिमांपैकी एक आहे. बशरनवाजांनी त्यांच्या एका नज्ममध्ये ती मोठया सुरेख प्रकारे वापरली आहे. ते म्हणतात…
वो एक लम्हे का आईना
कितनी सदियों कितने हजार मिलों की शक्लमें
दरमियाँ खडा था
न फिर वो मै था न फिर वो तुम थे....
बशरसाहेबांच्या नावानं काही करावं अशी कुणाची इच्छाच नाही
महेश देशमुख सांगतात की, वली औरंगाबादी, सिराज औरंगाबादी यांच्यानंतरचा अत्यंत अफाट ताकदीचा शायर ही बशर साहेबांची ओळख. औरंगाबादेत काला दरवाजाच्या मागं पंचकुँवा कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानात औरंगाबादनं उर्दूला दिलेले दोन शायर चिरविश्रांती घेत आहेत. त्यात एक मकबरा आहे सिराज औरंगाबादीचा आणि सिराजच्या शेजारी म्हणजे उजव्या हाताला काळाच्या गझलेत शरीक झालेले बशर नवाज विसावले आहेत. सिराज आणि बशर नवाज यांच्या सानिध्यात उर्दू शायरीच्या वठलेल्या झाडाला कदाचित नवीन पालवीही फुटेल. काही शतकांचा पूल ओलांडून एकमेकांशेजारी पहुडलेले हे दोन महान शायर म्हणजे त्यांच्या काळाचं बंधन झुगारून उभी असलेली आणि आजही भरभरून देणारी शायरी याचं प्रतीक वाटत आलंय मला.

गझलनवाज भीमराव पांचाळे कायम बशर साहेबांचा आदराने उल्लेख करतात. त्यांचं काम किती मोलाचं होतं हे सांगत ते पुढं नेलं पाहिजे असे म्हणतात. बशरनवाजांना जाऊन ११ वर्षं झाली... शहर सांभाळणाऱ्या पुढाऱ्यांना विकासाची कामं म्हणून फक्त पैशांचीच कामं दिसतात. शहराची सांस्कृतिक ओळख टिकवणं ही आपली जबाबदारी आहे हेच जणू त्यांना ठाऊक नाही. त्यातल्या कुणीही शहराची तहजीब जोपासणाऱ्या आणि उर्दूची ध्वजा घेऊन जगभर जाणाऱ्या बशरसाहेबांच्या नावानं काही करावं अशी साधी इच्छाही व्यक्त केली नाही. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करताना ही खंत बोचणारीच आहे.
बशर नवाज यांचे काही निवडक शेर
काफिलेवाले चल दिए छोडके
चंद नक्श ए पा (पदचिन्हे)
देखा न मुडके फिर कभी
जैसे कि रह गुजर के हम
(सोबती असलेले केवळ पदचिन्हे ठेवून मला सोडून गेले. त्यांनी वळूनही पाहिले नाही. जणू मी सडक म्हणजे रस्ता होतो.)
पत्थर भी अपनी सिम्त न आए
कहाँ के फूल
हम भी बहुत दरींचों
के नीचे खडे रहें
(दगडंच जिथे माझ्या वाटय़ाला आले नाहीत तिथे फूलं कोठून येणार. इथे योग्य माणसाची किंमतच कुणाला कळत नाही)
झुलसी दिलके आंगन में
हुवी ख्याबोंकी फिर बारीश
कहीं कोंपल लहक उठी
कही पत्ता निकल आया
(पोळलेल्या हृदयाच्या अंगणात पुन्हा स्वप्नांचा पाऊस पडला. आशादायक वातावरणात कुठे तरी अंकुर फुटला. कुठे खात्रीचे पान फुटले.)
बहुत खौंफ जिसका फिर
वही किस्सा निकल आया
मेरे दुख से किसी आवाज का
रिश्ता निकल आया
(दु:खाचे स्मरण जागविणारा शेर)






