एखादा निर्णय चुकीचा ठरतो आणि आयुष्य हातातून पूर्णपणे निसटू लागतं... या परिस्थितीतून काही जण सावरतात तर, काही जण उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अशाच उद्ध्वस्तांची आणि सावरलेल्यांचीही… अनूला तिचं लग्न झाल्यानंतर कळतं, तिचा नवरा शरद समलैंगिक आहे...
तिचं संपूर्ण भावविश्वच कोसळू लागतं... आणि पुढे आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यांची मुलगी सुचिता बापावरचा हा 'ठपका' घेऊन सासरी कायम जाच सहन करत राहते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या लढाईत एका वळणावर मानसिक आजाराची बळी ठरते. मात्र, शलाका तिला एक खंबीर साथ देते आणि त्यातून तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळतं... ती सावरते.
हे झालं कादंबरीचं कथासूत्र. पण या कादंबरीतून लेखिका अरुणा सबाने जो कळीचा प्रश्न उभा करतात, तो म्हणजे समलैंगिकता समाजमान्य असती तर, अनू काय किंवा शरद काय किंवा सुचिता काय...या तिघांच्याही आयुष्याची होरपळ वाचली नसती का?
समलैंगिकता आणि मानसिक आजार अशा आजच्या महत्त्वाच्या समस्यांवर आणि निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर थेट पण संयत भाषेत चर्चा करणारी कादंबरी दुभंगलेलं जीवन!
‘दुभंगलेलं जीवन’ ही अरुणा सबाने यांची नवी कादंबरी. शलाका ही या कादंबरीची नायिका. ती एका एनजीओमध्ये काम करते. ती लग्न न करता एकटी राहते. तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे. तिने एकटी राहण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे. तिच्या कुटुंबात तिला आलेले अनुभव, वाचन आणि भोवतालच्या सामाजिक घटनांकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची वृत्ती यातून तिच्यात रूढ कुटुंबव्यवस्थेविरुद्धच्या बंडखोरीची भावना निर्माण झाली आहे.
तिच्या समाजकार्यातील सहकारी आदिनाथवर तिचे प्रेम आहे. काही काळ ते ‘लिव्ह इन’मध्ये देखील राहतात. काही काळाने आदिनाथ शलाकाला लग्नाचा आग्रह धरतो. कारण घरात त्याच्या बहिणीचे लग्न असते. त्यामुळे शलाका आणि आदिनाथ यांच्या लग्नाशिवाय एकत्र राहण्याच्या चर्चेला विराम मिळावा म्हणून आदिनाथ शलाकाजवळ लग्नाचा आग्रह धरतो. शलाकाला आदिनाथचे प्रेम हवे आहे.

पण प्रेमाची परिणती लग्नात व्हावी हे तिच्या स्वातंत्र्याचा कल्पनेत बसत नाही. लग्नाशिवाय एखाद्या स्त्रीने एकटे राहणे, मैत्रीसंबंधातून ‘लिव्ह इन’मध्ये राहणे आणि जेंव्हा त्या संबंधांचा काच होतो, तेंव्हा वेगळे होणे, हेच शलाकाला नैसर्गिक वाटते. त्यासाठी लग्नाची गरज काय असा तिचा प्रश्न आहे. लग्नामुळे स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाचा संकोच होतो, ही गोष्ट तिला अनैसर्गिक वाटते.
केवळ व्यावहारिक गोष्टींचा गरजेतून लग्न करणे तिला अमान्य आहे. रूढ सामाजिक संकेतांविरूद्धच्या तिच्या या भूमिकेमुळे तिला कुटुंबात आणि भोवतालच्या समाजात संघर्ष करावा लागतो.
मातृत्व किंवा आईपण हे स्त्रीला निसर्गाने दिलेले एक वरदान आहे. ते उपभोगण्याचे तिला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्याचा लग्नसंस्थेशी काय संबंध? म्हणून ती नांदेडच्या वरदान संस्थेकडून एका छोट्या मुलीला दत्तक घेते. ज्या संस्थेतून मुलगी दत्तक घेते, तिथे आलेल्या मुलांच्या जन्मदात्या आईबद्दलच्या भावनाही समाजाच्या विषाक्त असतात.
जन्माला आलेल्या मुलाशी त्याचा काहीही संबंध नसतो. खरा संघर्ष तर तेंव्हा होतो, जेंव्हा शलाका आपल्या दत्तक मुलीला उर्वीला शाळेत प्रवेशासाठी शाळांचे उंबरठे झिजवते. कायद्याने मुलाला बापाचे नाव असण्याची गरज नाही. शलाका उर्वीला बापाच्या जागी स्वतःचे नाव व आडनाव लावते.
पण तरीही फुले-आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या संस्थांमध्ये देखील उर्वीला प्रवेश मिळत नाही. थोडक्यात ‘लग्न’ आणि ‘कुटुंब’ यांच्या चौकटीतील संकल्पनांच्या गजाआड अडकलेल्या समाजाच्या बाहेर स्वतंत्रपणे जागू पाहणाऱ्या शलाकाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.
‘दुभंगलेलं जीवन’ या कादंबरीचे मुख्य संभाषित हेच आहे. स्त्रीपुरुष संबंधातील नैतिक दुभंग हा आजच्या वर्तमान जीवनाचा नरक झाला आहे. स्त्रीपुरुषसंबंधांतील नव्या घटितांनी आणि शक्यतांनी विवाहसंस्थेच्या औचित्याला आणि कुटुंबसंस्थेतील जडत्वाला आव्हान दिले आहे. स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांनी भारीत स्त्री-पुरुषांच्या जगण्यात निर्माण झालेला हा नैतिक पेच हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. यातून दुभंगलेले मानसिक आणि सामाजिक जीवन हा लेखिकेच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
कादंबरी हा अनेक कथनप्रकार आणि गंभीर चर्चात्मक गद्याला पोटात घेणारा प्रकार आहे. ह्याचा उत्तम वापर लेखिकेने या कादंबरीत केला आहे. ‘लिव्ह इन’मध्ये राहणे, स्त्रीने एकटे राहणे आणि एकल माता म्हणून तिला मिळणारे कायदेशीर अधिकार या विषयी चर्चा या कादंबरीत येते. शलाकाचे स्वतःचे जीवन याच प्रश्नांनी बाधित झाले आहे.
तिचे बालपण, तरुणपणातील तिचा चळवळींशी येणारा संबंध, तिचे वाचन आणि पुढे तिचे त्या प्रश्नांच्या संदर्भात काम करणाऱ्या एनजीओमध्ये काम करणे या कथात्मक भागाशी हे प्रश्न एकजीव झाले असले तरी या प्रश्नांचे किती पैलू आहेत, किती बाजू आहेत ह्याची चर्चा पात्रांच्या संवादातून या कादंबरीत येते.
सुचिता हे एक मुख्य पात्र या कादंबरीत येते. ती शलाकाची भाची आहे. तिची मोठी बहीण अनुराधाचे घाईघाईत शरदशी लग्न लावून दिले जाते. नावलौकीक असलेल्या श्रीमंत कुटुंबातील शरदचे रमेश या मित्राशी समलिंगी संबंध असतात. त्यामुळे अनुला कौटुंबिक सुख मिळत नाही. ती खंगून मरते.
पुढे शरदाचाही मृत्यू होतो. सुचिताचे लग्न तिची आत्या राजनशी लावून देते. पण तिच्या वाट्याला नरकवास येतो. तिच्या छळाला तिचा बाप समलिंगी असणे हे समाजाच्या दृष्टीने किळसवाणे वास्तव कारणीभूत ठरते. ती उद्ध्वस्त होते. अखेर ती वेडी होते. शलाका तिला त्यातून सोडविण्याचा प्रयत्न करते.
शरद आणि रमेश यांच्यातील समलैंगिक संबंधामागील शरीरशास्त्रीय, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिमाणांची विस्तृत चर्चा या कादंबरीतील पात्रांच्या चर्चेत येते. समलैंगिकता ही विकृती नाही. मानवी लैंगिकतेचा एक नैसर्गिक पैलू आहे. ज्यांच्या वाट्याला अशी लैंगिकता आलेली आहे, त्यात त्यांची कोणतीही चूक नसते. निसर्गातील सर्वच गोष्टी समाजाने ठरवलेल्या मापदंडात बसवता येत नाही म्हणून शरद आणि रमेश यांच्यातील संबंधांकडे तुच्छतेने पाहणे गैर आहे.

पण सामाजिक वास्तव मात्र या उलट आहे. त्याचा किती गंभीर परिणाम त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या जगण्यावर होतो, हा या कादंबरीतील एक अनुभवविषय आहे.
लिव्ह इन, एकल माता आणि समलैंगिक जगण्याचे प्रश्न आणि त्यांची चर्चा या कादंबरीत सुटी सुटी येत नाही. कादंबरीतील पात्र आणि त्यांच्या आयुष्यातील घटनांच्या अनुषंगाने या प्रश्नांचे अनुभवाच्या पातळीवर प्रत्ययकारी कथात्मक चित्रण करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी, व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने झालेले कायदे आणि शुद्ध नैतिक भूमिका एकीकडे आणि पारंपारिक मूल्यांच्या जोखडात बंदिस्त अशा समजात जगण्याची शिक्षा या कादंबरीतील पात्रे भोगत आहेत. शलाका, सुचिता, मल्हार आणि आदिनाथ या पात्रांच्या वाट्याला भीषण असे वास्तव येते. तरीही या कादंबरीचे स्वरूप शोकात्म नाही, हे वैशिष्ट्य आहे.
यातून लेखिकेचा जीवनाकडे पाहण्याचा आशादायी दृष्टिकोन जाणवतो. सुचिता ही तिच्या कुटुंबाकडून नागवली जाते. अखेर अनाथ होते आणि स्किझोफ्रेनिक होते. पण अशाही अवस्थेत शलाका तिला आधार देते. त्यासाठी खस्ता किती खाते, ह्याचे फार विदारक चित्रण कादंबरीत येते.
हे या कादंबरीचे सामर्थ्यस्थळ आहे. शलाकाची ग्रामीण पार्श्वभूमी, गावगाड्यातील पाटीलकीचे संस्कार, तिच्या कुटुंबातील भाऊबंदुकीचे चित्रणही फार परिणामकारक आहे.
कुटुंबव्यवस्थेत व्यक्ती म्हणून स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची होणारी गळचेपी आणि पारंपरिक विवाहसंस्थेत स्त्रीपुरुषांच्या लैंगिक संबंधांची होणारी कुचंबणा अशा अनुभवावर यापूर्वीही अनेक कादंबऱ्या आलेल्या आहेत. पण तरीही अरुणा सबाने यांची या जुन्याच प्रश्नांना भिडण्याची तटस्थ नैतिक भूमिका आणि निरामय सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेता, ही कादंबरी महत्त्वाची ठरते.
कादंबरी - ‘दुभंगलेलं जीवन’
लेखिका - अरुणा सबाने
रोहन प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन






