आजार! आपल्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत कितीतरी आजार आपले साथसोबत करत असतात. काही आजार तर सहज सांगण्यासारखे तर काही अडचणीचे, काही लोकांची सहानुभूती मिळवून देणारे तर काही लोकांपासून लपवावेसे वाटणारे, काही आजार मनात भीती निर्माण करणारे तर काही लाज! काही आजारांशी आपली साथ सुदैवाने चटकन सुटते, तर काही बराच वेळ आपल्या सोबत राहतात.
दीर्घकाळ वास्तव्यास असलेले शरीराचे हे आजार, त्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या वेदना, त्याने मनात उद्भवलेली मरणाची भीती मग आपल्या संपूर्ण शरीरावरही ताबा मिळवितात. आणि आपल्या दुःखाचे, चिंतेचे एक प्रमुख कारण बनून राहतात. बरेच आजार, त्याच्या वेदना, आपल्या व्यक्तिमत्त्वालाही चांगला वाईट आकार देत असतात.
आजारपणामुळे सहन कराव्या लाणागऱ्या वेदना या कालांतराने लुप्त तरी पावतात किंवा त्या व्यक्तीला मृत्युदारी पोहोचवूनच गुडूप होतात. आजारामुळे उद्भवणाऱ्या वा विविध वेदनांचे अदृश्य असणं आजाराला अधिक गूढ बनवितं.
2018 ची एक घटना. काही दिवसांच्या अंतराने परिचयातल्या दोन तरुण व्यक्ती कॅन्सरच्या विळख्यात अडकल्याच्या बातम्या कानावर आल्या आणि मन सुन्न झाले. दोन्ही व्यक्ती अगदी जवळच्या, धडधाकट, निर्व्यसनी आणि शिस्तबद्ध आयुष्य जगत असलेल्या.

त्यामुळे त्यांच्या आजारांविषयी कानावर आलेल्या बातम्यांनी जरा जास्तच मोठा धक्का बसला. 'मानवाने इतर क्षेत्रात एवढी प्रगती केलेली असताना कॅन्सरच्या बाबतीत आपण अजून का चाचपडतोय?' असा त्यानिमित्ताने एक प्रश्न सहज मनात उभा राहिला, कॅन्सर या आजाराविषयीची साग्रसंगीत माहिती मिळवून वाचाविशी वाटू लागली.
'एम्परर ऑफ ऑल मालडीज्' नावाचे डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांचे एक पुस्तक हाती लागले. प्राचीन ग्रीकांपासून ते अत्याधुनिक 'जिन्स एडिटिंग' पर्यंत 'कॅन्सर' या आजाराचा आढावा घेतलेले हे सहाशे पानी पुस्तक मी अधाशासारखे वाचून काढले.
त्यातील कित्येक वैज्ञानिक, संशोधक डॉक्टर्स, रुग्ण, कार्यकर्ते यांच्या कथा वाचून शहारलो थरारलो. या पुस्तकातील अगणित व्यक्तिचित्रांतून एक व्यक्तिरेखा मात्र मनात रुतून बसली! 'मेरी लास्कर' हे तिचं नाव. या तरुणीलाही 'कॅन्सरच्या बाबतीत आपण अजून का चाचपडतोय?' असा तुम्हा आम्हासारखा प्रश्न ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी पडला होता. परंतु तो प्रश्न तसाच हवेत विरून जाऊन न देता तिने त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले होते.
कॅन्सर आणि इतर दुर्धर आजारांच्या विरोधात एका बाजूला शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत लढत असताना ही स्त्री त्याच ध्येयाप्रती विधिमंडळाच्या दालनात लढा देऊ पाहत होती. वजनदार राजकारण्यांना एकत्र आणणे हे प्रयोगशाळेत एकचित्त संशोधन करण्याएवढेच महाकठीण काम! पण समस्त मानवजातीसाठी तिने ही अनवट वाट चोखाळली.
विज्ञानाचं कुठलंही अधिकृत शिक्षण नसूनही पुरुषप्रधान वैज्ञानिक आणि राजकीय क्षेत्रात फक्त कॅन्सरच नाही तर इतर विविध दुर्धर आजारांसाठी तिने आत्मविश्वासपूर्वक केलेलं कार्य पाहून थक्क झालो.
त्या पुस्तकात जेमतेम सहा-सात पानात वर्णिलेल्या मेरी नामक व्यक्तीचा अधिक शोध घ्यावासा वाटू लागला, अमेरिकेतील वैद्यक क्षेत्रात इतके मोठे कार्य करून गेलेल्या या व्यक्तीविषयी दोन तीन इंग्रजी पुस्तके सहज वाचावयास मिळतील अशी अपेक्षा होती, पण मेरीवर चक्क एकही पुस्तक उपलब्ध नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटले वैद्यक क्षेत्र आणि राजकारण याची गळाभेट घडवून आणणारी, भाडवलशाही अमेरिकेत 'सरकारी खर्चाने वैद्यक संशोधन' हा कम्युनिस्ट विचार रुजवू पाहणाऱ्या मेरीवर अजून कोणीच पुस्तक लिहिलं नाही असं कस?
ऑफिसमध्ये लॅपटॉपवर सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहिताना मला सतत प्रश्न पडे. 'तू लिही की मग', असे हसत म्हणत मेरीबाई जणू त्या लॅपटॉप स्क्रीनवर अवतरत. 'लिहील कोणी तरी' असे स्वतःला समजावत मीही इतर कामांमुळे त्याकडे दुर्लक्ष करत होतो. असेच काही महिने गेले आणि मग कोविड दारात येऊन ठेपला.
वैद्यक शोधन संशोधक याच्याविषयी कधी नव्हे एवढी उत्सुकता सामान्य लोकांत दिसू लागली. 'विज्ञान अशा साथींवर 'चटकन' औषध का शोधत नाही' हा प्रश्न तर सगळ्यांच्याच ओठावर आला आणि परत मेरीबाई स्वप्नात येऊ लागल्या! कोविड लॉकडाउनमुळे थोडा वेळही हाताशी होता.
या विषयावर लिखाणाचा गंभीर विचार सुरू केला आणि मग दूर अमेरिकेत चाळीसच्या दशकात कार्य केलेल्या कोणा मेरीची माहिती मुंबईलगतच्या वसई गावात बसून मिळविणे तसे कठीणच होते. 'जे जे शक्य' त्याने तरी सुरुवात करूया असे म्हणत प्रथम थेट लास्कर फाउंडेशनला ई-मेल केला. पण सुरुवातीला त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही.
इंटरनेटवरून वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाइम्स, कॅन्सर लेटर अशा विविध वृत्तपत्रे, मासिकांतून जुने लेख, टिपणं मिळविली. काही महिन्यांनंतर अशाच काही लेखाच्या माध्यमातून कोलंबिया विद्यापीठाच्या संग्रहण कक्षातून एक दुर्मिळ घबाड हाती लागले.
साठच्या दशकात घेतल्या गेलेल्या मेरीच्या मुलाखतींची ती एक भली मोठी फाइल होती. पण बडबड्या आणि कोणताच विषय वर्ज्य नसणाऱ्या मेरीच्या त्या मुलाखतींची एकूण पाने होती तब्बल एक हजार! परत यातील विविध संदर्भ, स्थळ आणि काळ दोहोंच्या बाबतीत सर्वस्वी अपरिचित आणि अनोळखी प्रदेश. हळूहळू या सर्व जंजाळातून आवश्यक तेवढे वेचून मेरी लास्कर या व्यक्तिचित्राचे बिंदू जोडण्यास सुरुवात केली.
स्वतःचे कुतूहल शमविण्यासाठी सुरू केलेला हा प्रवास व्यक्ती परिचय, कार्य ओळख अशी वळणे घेत घेत 'चरित्र' या क्लिष्ट रूपबंधाकडे कसा वळला हे माझे मलाच कळले नाही.
चैतन्यशील, कला प्रेमी, यशस्वी उद्योजिका, पुरुषप्रधान वैद्यक आणि राजकारण क्षेत्रात मुशाफिरी करणारी मुलगी, प्रेमिका, पत्नी मेरीची किती किती रूपे दिसावीत? निपुत्रिका, घटस्फोटिता, 'अबला नारी'चे बिरुद दूर भिरकावून आर्थिक स्वावलंबनाच्या जारोवर टेचात राहणारी, पुरुषांना शिकवणारी, पुनर्विवाहिता, एका आयुष्यान व्यक्तीने किती किती पूर्वग्रहांचा सामना करावा?
इतकी मोठी ही नायिका, हिला मी योग्य न्याय देऊ शकेन का या भीतीने छाती दडपून जायची. लेखन, पुनर्लेखन, फेरमांडणी असे विविध टप्पे पार करत या पुस्तकाचे मागील तीन वर्षात कितीतरी खर्डे केले. आयटी क्षेत्रातील व्यग्र दिनक्रम, त्यात पालकत्वाची जबाबदारी या साध्या व्यापात माझी खरंच दमणूक व्हायची.
पण आजूबाजूला दिसणारी विविध आजारी माणसे, त्याने दुःखी कुटुंबीय, याच्याकडे पाहून 'मेरीची कथा इथं सांगितलीच पाहिजे' अशी एक विलक्षण प्रेरणाही मला वारंवार मिळत गेली. हळूहळू लिखाणातून झिरपलेला चेहरा ओळखीचा वाटू लागला... आणि पुस्तक निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली. हा संपूर्ण प्रवास निश्चितच आणि या कसोटी पाहणारा आणि म्हणूनच समृद्ध व आनंदी करणाराही झाला!
असं म्हणतात, की It takes a village to raise a child पुस्तकालाही ते लागू होतं. पुस्तक निर्मितीमागे कित्येक विभूतीचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हातभार लागलेले असतात. त्यांचे उल्लेख करणे त्यामुळे महत्त्वाचे, ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर, डॉ. सिसिलिया कार्व्हलो, स्टॅन्ली गोन्साल्विस, लुईजा डिसोझा, अर्लिना मस्करणीस या माझ्या वसईतील पहिल्या वाचकांकडून मिळालेला अभिप्राय मोलाचा आणि हुरूप वाढविणारा होता.
त्याचबरोबर साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. शंतनू अभ्यंकर, डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी दिलेल्या मौलिक सूचनांचाही पुस्तकातील आशय मांडणीसाठी बराच फायदा झाला. हस्तलिखिताचे बाड पाहून प्रकाशनास तयार झालेले 'मनोविकास'चे अरविंद पाटकर आणि आशिश पाटकर, तसेच संपादक विलास पाटील यांचे खास आभार.
मनोविकासतर्फे डॉ. अरुण गद्रे यांनी केलेल्या अमूल्य सूचनांमुळे काही दुर्लक्षित भागाचाही धांडोळा घेता आला. कल्पक आणि वेधक मुखपृष्ठ साकारणारे चंद्रमोहन कुलकर्णी, मनोविकास परिवारातील सर्व सदस्य आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा मी मनापासून ऋणी आहे.

लास्कर फाऊंडेशनच्या न्यू यॉर्कस्थित विद्यमान अध्यक्ष डॉ. क्लेअर पॉमरॉय यानी मी इंग्रजीत संक्षिप्त रूपात पाठविलेलं प्रत्येक प्रकरण काळजीपूर्वक बाचून निर्वाळा दिला, तो सुखावणारा होता. तसेच मेरीचे काही फोटो या पुस्तकात वापरण्यास त्यांनी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
'वैद्यक संशोधन' हे पुस्तकाचे मुख्य सूत्र लक्षात घेता, या विषयात अधिकारवाणीने बोलू शकतील अशी जी काही नावे मनात येतात, त्यात पहिले प्रमुख नाव म्हणजे डॉ. अभय बंग. 'सर्च' या संस्थेमार्फत डॉक्टर गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागात सातत्याने संशोधन करत आहेत. त्यांच्या विविध अभिनव प्रयोगांची आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी दखल घेतली गेलेली आहे.
'तुमच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून तुम्ही या पुस्तकाला अभिप्राय किंवा प्रस्तावना लिहून, देऊ शकाल का? (अर्थात पुस्तकातील विषय आणि मांडणी भावली तरच) असे एके दिवशी मी सरांना दबकत दबकत विचारले. कसलेही आढेवेढे न घेता सरांनी तत्काळ हस्तलिखित मागून घेतले. मध्ये काही महिने गेले. सरांना पुस्तक आवडतंय की नाही या विवंचनेत असताना एके दिवशी त्यांचा ई-मेल आला.
'अतिशय योग्य व्यक्तिबाबत एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन' असे लिहून त्यांनी प्रस्तावना पाठवली होती. त्यांची प्रस्तावना वाचून आतापर्यंत घेतलेल्या सर्व मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं, 'वैद्यक संशोधन आणि अर्थकारण कें द्रस्थानी असलेल्या या पुस्तकास त्यांच्यासारख्या दिग्गजांचे मिळालेलं हे अनुमोदन हुरूप वाढवणारं.
हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यास याची नक्कीच मदत होईल अशी आशा आहे. आयुष्यात अगणित मुखवटे घालून वावरणाऱ्या माणसाचा खरा चेहरा दिसणे तसे कठीणच. त्यामुळे पुस्तकात उभी केलेली मेरीची प्रतिमा ही माझ्या सीमित परिप्रेक्ष्यातून आलेली आहे, याची मला प्रांजळ जाणीव आहे.
तसेच ही व्यक्तिरेखा गुणांचा पुतळा न होता गुणदोष असलेली एक हाडामांसाचा सर्वसामान्य माणूस होईल याचीही दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे, हेही इथे नमूद करावेसे वाटते. तो प्रयत्न कितपत यशस्वी झाला हे वाचकच ठरवतील.
सामान्य नागरिकांच्या आजाराविषयीचे वैद्यकीय संशोधन सरकारी खर्चाने केले जावे याविषयी मोठा यशस्वी लढा मेरीने दिला तो लढा आपणा भारतीयांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. कोविड नंतरच्या काळात मेरीची कथा इथे भारतात सांगणे, समजून घेणे हे कधी नव्हे एवढं महत्त्वाचं झालंय, ही एकच बाब मला हे पुस्तक लिहिण्यास प्रेरणा देत राहिली.
मेरीची कथा सांगत असतानाच या पुस्तकात 'वैद्यक संशोधन आणि त्या भोवतालचे अर्थकारण' या बहुस्तरीय आणि बहुपदी विषयाचा व्यापक पट उलगडण्याचा एक प्रयत्न केलाय. तेव्हा या पुस्तकाचे वाचक स्वागत करतील अशी आशा धरतो आणि हे पुस्तक वाचकांच्या हाती सोपवितो.
मेरी लास्कर
लेखक - डॅनियल मस्करणीस
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन
मूल्य - 299 रु.
(साभार - समतावादी मुक्त संवाद, जुलै 2024)






