नेमकं आठवत नाही, पण 1993-94 चा सुमार असावा. पत्रकारितेच्या अपरिचित विश्वात उडी घेऊन जेमतेम दीड-दोन वर्षंच उलटली होती. नाइट शिफ्ट संपल्यानंतर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे पत्रकार, लेखक आणि कलावंतांच्या वर्तुळात फेमस असलेल्या दादरच्या बबन चहावाल्याकडे गप्पाटप्पा हाकायला बहुधा आम्ही चाललो होतो. त्या वेळच्या हिंदी चित्रपटसृष्टीत वट असलेला 'महानगर- चंदेरी'तला स्टार पत्रकार राजू पटेल सोबत होता.
माटुंगा रोड स्टेशनात लोकल ट्रेनची वाट पाहत असताना माझं मराठी साहित्याच्या गमजा मारणं सुरू होतं. माझा तो तोरा उतरवत राजूने डोळे बारीक करून प्रश्न केला : काम्यू पढा है? काफ्का पढा है? फैज ? पाश? पहले वो पढ...
राजूच्या त्या खोचक-बोचक प्रश्नाने माझं मराठीपल्याडचं अज्ञान समोर आलं होतं. माझ्यातली अनभिज्ञता उघड झाली होती. तरीही, त्याचं म्हणणं हसण्यावारी नेत वेळ मारून नेली. मग नंतर कधीतरी गुपचूप एकेक लेखक-कवींचा शोध घेणं सुरू झालं. पण, का कोण जाणे त्यातल्या फ़ैज़ अहमद फ़ैज़ने जरा जास्तच त्रास दिला. खूप झटापट करूनही दोन-पाच लोकप्रिय (प्रेम) कवितांपलीकडे तो समजला नाही.

(फ़ैज़ अहमद फ़ैज़)
कुणी म्हणालं, बहुत छोटे हो... और नादान भी...
आयुष्य पुढे सरकत गेलं. रोजच्या झमेल्यात फ़ैज़ मागे पडला. पण फ़ैज़ आपण वाचलेला नाही, थोडाबहुत प्रयत्न करूनही आपल्याला तो कळलेला नाही, हा डंख होताच. याच प्रवासात एका टप्प्यावर मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली, तसा जगाच्या शोषित-पीडितांची वेदना स्वतःमध्ये सामावून असलेला, एकाच दमात प्रीती आणि क्रांतीची भाषा बोलणारा हेतू, त्याचे विचार थोडीबहुत लक्षात फैज़ पुन्हा खुणावू लागला, कवितेमागचे त्याचे हेतू, त्याचे विचार थोडीबहुत लक्षात येत गेले. तरीही कवितेतले अरेबिक, पर्शियन संस्कृतीतले संदर्भ, प्रतिमा-प्रतीकं, उर्दू भाषेतलं शब्दसौष्ठव असं खूप काही डोक्यात शिरलं नाही.
कुणी म्हणालं, फ़ैज़ ऐसेवैसे नहीं समझ आयेगा... जिंदगी में ठोकरें खानी पडेगी...
मग, जिवावर बेतलेलं आजारपण येऊन गेलं. कदाचित, लोक म्हणतात, तसं आयुष्यात थोड्याफार वेदना भोगून झाल्या होत्या. याच काळात बौद्ध तत्त्वज्ञान, जे. कृष्णमूर्ती, विनोबा यांच्या जोडीला फ़ैज़ही वाचावासा वाटला. त्यानंतर फ़ैज़चे हिंदीत प्रकाशित झालेले सगळे कवितासंग्रह मिळवण्याचा सपाटा लावला. जमेल तसे ते वाचून काढत गेलो. पण एवढं वाचूनही फ़ैज़ची बहुतांशी कविता, त्यातला भाव, तिची पार्श्वभूमी, कवीला अपेक्षित असलेला अर्थ यातलं बरंच निसटून जात होतं.
कुणी म्हणालं, फ़ैज़ की जिंदगी को समझो... पण कसं? कसून शोध घेतला. काही लेखसंग्रह, एखाद-दुसरं आठवणपर नोंदी असलेलं पुस्तक असं तुकड्या- तुकड्यांत काहीबाही हाती आलं; पण समग्रपणे फ़ैज़ मिळाला नाही. ऑनलाइन बरंच दिसत होतं. त्यात इंग्लिश पुस्तकांच्या किमती भरमसाट दिसत होत्या आणि उर्दूचा गंध नसल्याने जे काही आहे, त्याचा अदमास येत नव्हता.
हे स्पष्टपणे कळत होतं, जोवर फ़ैज़चं चरित्र-आत्मचरित्र रूपानं काही मिळत नाही, हा तिढा सुटणार नाही. त्याची कविता आपल्याला कळणार नाही. पण त्याने आत्मचरित्र लिहिलेलंच नाही, हेही कालांतराने समजलं आणि त्याचं एकसंध स्वरूपातलं चरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाही, याचाही अंदाज आला.
तशातच 2017 मधल्या फेब्रुवारी महिन्यात झपाटून टाकणारी एक घटना घडली. सहकारी संपादक असलेल्या प्रशांत पवारने एक मेल फॉरवर्ड केला. संवादक, जाहिरातकार, लेखक आणि उर्दूचे जाणकार जमील गुलरेज यांच्या 'कथाकथन' ग्रुपने फ़ैज़च्या कवितांवर आधारित वाचन-आस्वादनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याचीच निमंत्रण पत्रिका त्या मेलमध्ये जोडलेली होती. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. खार पश्चिमेला असलेल्या गुलरेज यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कार्यक्रम व्हायचा होता.
प्रशांत आणि त्याची बायको सविता कार्यक्रमस्थळी आधीच पोहोचले होते. उशीर मलासुद्धा झालेला नव्हता, तरीही पोहोचलो तेव्हा फ्लॅटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. कार्यक्रम सुरू झाला, तरी येणारे येतच गेले आणि एका क्षणी काहींना उभं राहून ऐकण्यावाचून पर्याय राहिला नाही. यात मुंबईतल्या कानाकोपऱ्यांतून आलेले विशी-पंचविशीतले काव्यप्रेमी (खरंतर फैज़प्रेमी) तरुण होते. तरुणी होत्या. मध्यमवयीन, वयाने ज्येष्ठ असलेले रसिकही होते. यातल्या अनेकांनी आपापल्या आवडीनिवडीनुसार एकेक करत फैज़च्या कविता वाचून-गाऊन दाखवल्या.
जणू तिथे आलेला प्रत्येक जण फ़ैज़च्या कवितांमध्ये स्वतःची अभिव्यक्ती शोधत होता. 'सुब्हे आज़ादी', 'बोल', 'इन्तिसाब', 'ग़म न कर', 'ख़्वाब बसेरा', 'हम देखेंगे', 'कुत्ते' अशा कितीतरी कविता एक खोलीभर गुंजारव करत राहिल्या. त्यात गायिका-कलावंत अनुष्का निकम यांचा 'मुझसे पहली सी मुहब्बत' ही कविता गातानाचा प्रांजळ स्वर मोहरून टाकणारा होता. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचं खणकदार सादरीकरण आठवणीत राहणारं होतं.
आयोजक गुलरेज यांनी कबूल केलं. म्हणाले, आमचा अंदाज चुकला. आजवर एवढी गर्दी आमच्या कुठच्याच बैठकीला झाली नव्हती. हे नेमकं काय होतं? स्थल- काल- देश- सीमा-धर्म-पंथ असं सारं भेदणारं फ़ैज़च्या कवितांचं हे कालातीत गारूड होतं. पण हे गारूड फ़ैज़च्या मृत्यूपश्चात चार दशकं कसं टिकून राहिलं? ग़ालिब आणि इक्बाल या दोहोंनंतर उर्दू साहित्यप्रांतात, विशेषतः कवितेच्या प्रांतात फ़ैज़चं स्थान अढळ कसं राहिलं ? भारतात अधिकारशाही मनोवृत्तीच्या सत्तेविरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा पुकारताना, उदारमतवाद्यांना 'बोल, के लब आज़ाद हैं तेरे' म्हणणारा फ़ैज़ अधिक जवळचा का वाटत राहिला?
विसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या प्रारंभाला सियालकोट (स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशशासित भारत आणि फाळणीनंतरच्या पाकिस्तानातलं शहर) इथं एका तालेवार घराण्यात जन्माला आलेल्या फ़ैज़च्या वाट्याला ऐन उमेदीच्या काळात, मुख्यतः वडिलांच्या मृत्यूनंतर, निष्कांचन अवस्था आली. इथेच कुठे तरी शोषित- उपेक्षितांच्या वाट्याला येणाऱ्या गरिबी, दारिद्र्य, भूक, अत्याचार, अनाचार, उपेक्षा या जगण्यातल्या भयाण वास्तवाशी त्याची जानपछान झाली. पुढल्या काळात यातूनच त्याचं साहित्यिक आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्व घडत-बहरत गेलं.

भारतीय उपखंडातल्या घुसळणीचा तो काळ होता. एका बाजूला ब्रिटिशांविरोधातली स्वातंत्र्याची चळवळ भारतात मूळ धरू लागली होती. गांधीजी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्याकडे चळवळीची धुरा आलेली होती. दुसरीकडे म. अली जिनांनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला धग देण्यास सुरुवात केली होती.
तर तिसरीकडे 'ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन' च्या माध्यमातून मुल्कराज आनंद, इस्मत चुगताई, सदाअत हसन मंटो, फ़ैज़ हे समकालीन लेखक-कवी पुरोगामी विचारांची कड घेत उर्दू, इंग्रजी साहित्याच्या क्षेत्रात मुशाफिरी करू पाहत होते. यातले मंटोसह अनेक गरम रक्ताचे साहित्यिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जोरकस पुकारा करत मानवी मनाशी दडलेल्या विकार-वासनांचा शोध घेत होते. तर फ़ैज़ माणसातल्या या विकार-वासनांचा स्वीकार करत त्याच्यातल्या सनातन वेदनेला हळुवारपणे हात घालू पाहत होता.
ही वेदना वियोगाची होती. अपेक्षाभंगाची होती. पिढ्यांपासून अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या शोषित वर्गांची होती. वर्चस्ववाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दुर्बळांची होती. हुकूमशाही, दडपशाही व्यवस्थेत भरडल्या गेलेल्या जनसामान्यांची होती. शेतात राबणारा शेतमजूर, कारखान्यांतून अहोरात्र मेहनत घेणारा कामगार, रस्त्यांवर ओझी वाहणारा हमाल, हातावर पोट असलेला ठेलेवाला, टांगेवाला आणि विद्वेषाच्या आगीत होरपळून निघणारे अनाम स्त्री-पुरुष, निरागस मुलं हे त्याच्या कवितांचे नायक-नायिका होते.
प्राध्यापक-कवी-लेखक-पत्रकार-संपादक, विविध संस्कृती-परंपरांचा भाष्यकार, अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, इंग्लिश, पंजाबी आदी भाषांचा जाणकार अशा बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा धनी ठरलेला फ़ैज़ हा फॅसिस्ट मनोवृत्तीच्या सक्त विरोधात होता. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि मुक्त संभाषणाचा खंदा पुरस्कर्ताही होता. किंबहुना, उदारमतवाद, पुरोगामी दृष्टिकोन आणि फॅसिस्ट शक्तींना विरोध ही फ़ैज़ने अंगीकारलेल्या विचारधारेची त्रिसूत्री होती. ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य हे सर्वोच्च ध्येय होतंच.
परंतु, वयाच्या विशी-तिशीत मार्क्सवादी विचारांशी झालेल्या परिचयामुळे नि पुढे रशियन राज्यक्रांतीच्या त्याच्यावर झालेल्या गहिऱ्या प्रभावामुळे समाजवादी समाजनिर्मितीचं स्वप्न त्याच्या डोळ्यांत वस्तीला आलं होतं. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस'शी संलग्न असलेल्या अमृतसर लेबर फेडरेशनचं सदस्यत्व स्वीकारून कामगार चळवळीत त्याने काही काळ स्वतःला झोकून दिलं होतं.
फ़ैज़ वृत्ती-प्रवृत्तीने कवी होता. त्याचा हिंसेपेक्षा अहिंसेवर आणि द्वेषापेक्षा प्रेमावर अधिक विश्वास होता. याचमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या हिंसक चळवळींनाही त्याचा उघड विरोध राहिला होता. जगाला सर्वात मोठा धोका फॅसिझमपासूनच आहे, हे ओळखून दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोविएत रशियाची साथ देत जर्मनी, इटली आदी देशांविरोधात उभ्या ठाकलेल्या ब्रिटिश लष्करात सामील होण्याचा निर्णय त्याने घेतला होता.
त्यामागचा एकमेव उद्देश, या निमित्ताने फॅसिझमविरोधात चालून आलेली जनजागृतीची संधी न सोडणं हाच होता. फाळणीची भळाळती जखम मागे ठेवून देश स्वतंत्र झाला. नव्हे, देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे पडले. तत्पूर्वी, एका क्षणी सरदार वल्लभभाई पटेलांना भेटून काँग्रेसचा कार्यकर्ता बनायला निघालेल्या फ़ैज़ने मित्राच्या आग्रहाखातर 'पाकिस्तान टाइम्स'च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. फाळणीनंतर स्वतःचा देश म्हणून पाकिस्तानची निवड केली.
पण म्हणून पाकिस्तानातल्या नेतृत्वावर आंधळा विश्वास ठेवून जे जे होईल, ते पाहत बसणं पसंत केलं नाही. कालांतराने, जेव्हा नवराष्ट्रातल्या धोरणकर्त्यांचे मनसुबे आणि जनसामान्यांनी पाहिलेली स्वप्नं यांत अंतर पडत गेलं, तेव्हा धर्मकेंद्रित राष्ट्रात काव्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजवादी विचारांचा आग्रह लावून धरण्याचं धाडस फ़ैज़ने वारंवार केलं. निर्मितीच्या वेळी दिलेली समताधिष्ठित समाजाची सारी वचनं मोडणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी-राजकीय सत्तेविरोधात आवाज उठवला. याचीच शिक्षा म्हणून त्याला अनेकदा तुरुंगात डांबण्यात आलं. त्याच्यावर कायमस्वरूपी पाळत ठेवली गेली.
आयुष्याची कितीतरी वर्ष चळवळीत, तुरुंगात तसंच देशाबाहेर विजनवासात घालवल्यामुळेच त्याचं अनुभवविश्व उत्तरोत्तर समृद्ध होत गेलं. याचाच परिणाम म्हणून सुरुवातीला प्रेमाची आळवणी करणारी त्याची कविता कालांतराने मानवी वेदनांचा पट उलगडत वैश्विक होत गेली. नव्हे, त्याच्या कवितेने जणू अवघ्या मानव जातीची वेदना स्वतःमध्ये सामावून घेतली.
निर्मितीच्या काहीच वर्षांत म्हणजेच, जिनांच्या मृत्यूनंतर पाकिस्तान हा देश लष्कराच्या ताब्यात गेला, तो आजतागायत. मुख्यतः 1970-80 च्या दशकात पाकिस्तानने टोकाचे अत्याचार अनुभवले. या कालखंडात धर्मकेंद्री राजकारणाला पाकिस्तानात बळ येत गेलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोप पावत गेलं. बुद्धिवादी लोक, डाव्या विचारांच्या संस्था-संघटना, पुरोगामी विचारांचे लेखक-कलावंत आदींना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं गेलं. अशाने उदारमतवादी, सहिष्णू राष्ट्राचं फैज़सारख्या विवेकनिष्ठ मंडळींनी पाहिलेलं स्वप्न कुठच्या कुठे विरून गेलं.
आताच्या पाकिस्तानात तोंडदेखलं जनतेनं निवडून आणलेलं सरकार असलं तरीही, लष्कराचं वर्चस्व पूर्वीसारखंच कायम आहे. देश दहशतवादाने पोखरलेला आहे. बेरोजगारी, गरिबी हे या देशाचे तातडीचे प्रश्न आहेत. कट्टरवाद्यांनी देश वेठीस धरल्यासारखा आहे. भारतात या घडीला भाजपप्रणित एनडीएचं सरकार आहे. पाकिस्तानच्या तुलनेत उद्योगधंदे, सार्वजनिक व्यवस्था आणि एकूणच अर्थस्थिती तुलनेने चांगली आहे. मात्र, 2014 नंतर सत्तेवर पक्की मांड ठोकलेल्या भाजप सरकारने उघडपणे धर्मकेंद्री बहुसंख्याकवादी राजकारणाचा विघातक मार्ग अवलंबला.
या सत्ताकाळात साधू-महंतांना महत्त्व येत गेलं. धर्मभक्ती हीच देशभक्ती बनली. स्वतंत्र विचारांच्या संस्था-संघटना आणि व्यक्तीविरोधात सूडबुद्धीच राजकारण खेळलं गेलं. देशभक्त विरुद्ध देशद्रोही, शेतकरी विरुद्ध लष्करी जवान गरीब विरुद्ध श्रीमंत, सवर्ण विरुद्ध दलित-बहुजन अशी समूहा-समूहांत जाणीवपूर्वक फूट पाडली गेली. सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थी नेत्यांविरोधात संडवळीविरोधात दाद मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या साहित्यिकः कलावंतांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
परधर्मद्वेषाने पछाडलेल्या झुंडी अल्पसंख्याकांवर हिंसक हल्ले करत सुटल्या आणि सत्ताधाऱ्यांनी झुंडीने बळी घणाऱ्यांचा हारतुरे घालून सन्मानही केला. याचमुळे कदाचित 2014 नंतर 70-80 च्या दशकातल्या पाकिस्तानची हीच पुनरावृत्ती भारतात होऊ लागल्याची भावना भारतातल्या विवेकवादी मंडळींमध्ये बळावली.
80च्या दशकात फैज़चा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्यांविरोधात जनरल झियांच्या लष्करी राजवटीने अशाच प्रकारे देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले होते. पण तेव्हासुद्धा पाकिस्तानतल्या असहमतीदारांच्या तोंडी फ़ैज़च्या विद्रोही कविता होत्या. भारतातही जेव्हा सत्ताधाऱ्यांनी विरोधी विचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, फ़ैज़चेच अर्थवाही शब्द, फ़ैज़च्याच रोमांच उभे करणाऱ्या कविता या मंडळींच्या मुखी आल्या.
म्हणजेच, पाकिस्तानच्या इतिहासाची एका पातळीवर पुनरावृत्ती होत असताना, भारतातल्या उर्दू-हिंदी भाषेतल्या अभ्यासक-समीक्षकांसाठी चिंतन-मननाचा विषय बनलेला फ़ैज़ आणि त्याच्या कविता पुन्हा एकदा एक मोलाचा आधार ठरल्या होत्या.
फाळणीनंतरच्या काळात एका द्विधा मनःस्थितीत मंटो पाकिस्तानात गेला होता, पण म्हणून भारतीय साहित्यविश्वाने त्याला कधीच बेदखल केलं नव्हतं. त्याला कधीच परका मानलं नव्हतं. त्याचप्रमाणे फ़ैज़ची राष्ट्रीय ओळख पहिल्यापासूनच 'पाकिस्तानी' होती, तरीही भारतीय चाहत्यांसाठी तो कायमच 'अपना फ़ैज़' होता.

हे तर स्पष्टच होतं, सखोल चिंतन-मननाची पक्की बैठक लाभलेल्या फ़ैज़च्या कवितेने प्रखर वास्तवापासून कधीही फारकत घेतली नव्हती. वास्तवाचं दर्शन घडवताना तिच्यात तरल स्वप्नांचाही प्रभावी मेळ साधला गेला होता. लाघवी शब्दमाधुर्य हे तर तिचं खास वैशिष्ट्यच होतं. अरबी, फारसी, उर्दू, पंजाबी आदी साहित्य आणि लोकपरंपरेतून स्फुरलेल्या प्रतिमा-प्रतीकांचा तिच्यात सुंदर मिलाफ होता.
पण म्हणून ती दुर्बोधही बनली नव्हती. किंबहुना, जाणकार-समीक्षकांपासून तळागाळातल्या वाचकांपर्यंतच्या सगळ्यांना आपलंसं करत दीर्घकाळ साथसंगत देण्याची विलक्षण क्षमता तिच्यामध्ये होती. साहजिकच त्या-त्या काळातल्या संगीतकार, गायक-गायिकांना फ़ैज़च्या कविता नि गजलांनी भुरळ घातली होती.
मेहदी हसन, नूरजहाँ, फरिदा खान, इक्बाल बानो, नय्यरा नूर, टीना सानी, डॉ. राधिका चोप्रा, शाई गील या जुन्या-नव्या पिढीतल्या आणि यासारख्या अनेकांनी 'गुलों में रंग भरे, बादे नौवहार चलें' यासारख्या गजला नि 'दश्ते तनहाई में, जाने- जहाँ, लरजाँ है' किंवा झिया राजवटीला आव्हान देणाऱ्या 'हम देखेंगे' यासारख्या आशयगर्भ कविता गाऊन फ़ैज़ला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं होतं.
याचमुळे बहुधा, फ़ैज़च्या कविता-गजला संगीतबद्ध झाल्या म्हणून तो लोकप्रिय झाला, असाही मतप्रवाह बनला होता. काही प्रमाणात आजही तो कायम आहे. परंतु, फ़ैज़च्या कवितेमध्ये वा गजलेमध्ये अंगभूत अशी लय नसती, नाद आणि ताल नसता, तर ज्या संख्येने आणि ज्या आत्मीयतेने त्या गायिल्या गेल्या, तशा त्या गायिल्या जाण्याचीही शक्यता नव्हती. ही सर्वथा लय, ताल आणि नादाचं भान असलेल्या फ़ैज़च्या कवितेची ताकद होती. पाकिस्तानातल्या दमनकारी व्यवस्थेने एकेकाळी फ़ैज़च्या कवितांना निःसंशय ठोस निमित्त पुरवलं होतं.
एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकात, गुलरेज यांच्या 'कथाकथन' बैठकीच्या निमित्ताने म्हणा वा भारतातल्या सत्ताधाऱ्यांच्या असहिष्णू वर्तनावर असहमती दर्शवताना म्हणा, तीच फ़ैज़ची कविता अनेकांना बळ देत असल्याचं मला प्रकर्षानं जाणवलं होतं.
फ़ैज़ची कविता समजून घेण्यासाठी कवितेपलीकडच्या फ़ैज़चा शोध नितांत गरजेचा आहे, हे सांगणारा, माझ्या दृष्टीने म्हटला तर हा 'ट्रिगर पॉइंट' होता. शोध जारी असताना एक दिवस 'दी ऑथराइज्ड बायोग्राफी' असा ठसठशीत उल्लेख असलेल्या रूपा पब्लिकेशन्स निर्मित अली मदिह हाश्मी यांच्या 'लव्ह अँड रेव्होल्युशन' (2016) या पुस्तकावर नजर पडली.
ताबडतोब ते ऑनलाइन मागवलं. उत्कंठेने चाळलं आणि आयुष्यभर देश नि धर्मापलीकडे जाऊन मानवतावादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या फ़ैज़च्या अभिजात कवितेपर्यंत नेणारी जादूई किल्ली हाती आल्याचा भास झाला. यथावकाश पुस्तकही वाचून झालं. पण म्हणून आता तरी फ़ैज़ समजला का?
तसा दावा करण्याची माझी अजूनही हिंमत नाही. जिथे दिलीपकुमारसारखा हिंदी
चित्रपटसृष्टीतला दर्दी अभिनयसम्राट म्हणाला होता- फ़ैज़साहब के चाहने वालों में कई कितने लोग ऐसे हैं, कोशिशे समझे और कुछ को समझ में नहीं आया, उनमें एक मैं भी हूं, क्योंकि असातिज़ा (शिक्षकांचा गुरू) है, इनके कलाम की हर पहलू तक हमारी उपज नहीं पहुंच सकती... तिथे आपली काय पत्रास ?
अर्थात, ज्यांना फ़ैज़ आकळलाय, त्यांच्या प्रगल्भतेला सलामच आहे. पण ज्यांना अजूनही तो समजून घ्यायचाय, ज्यांना त्याच्या कवितांचा संदर्भासहित आस्वाद घ्यायचाय, भारत-पाकिस्तानच्या राजकीय लष्करी शत्रुत्वापलीकडे जाऊन आजच्या एकाधिकारशाहीकेंद्री, बहुसंख्याकवादी शासनसत्तांच्या काळातलं फ़ैज़चं महत्व जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठी अली मदिह हाश्मीलिखित प्रस्तुत चरित्र हा खात्रीचा मार्ग असल्याचा माझ्झा विश्वास आहे.
याच विश्वासाच्या बळावर मराठी अनुवादाचा प्रयत्न करून पाहिला आहे. 'हिंदुस्थान हमारी महबूबा सही, मगर पाकिस्तान हमारी मन्कूह (जीवनसाथी) है' म्हणणाऱ्या फ़ैज़चे मराठी 'भाषक चाहते या अनुवादाचं मनापासून स्वागत करतील, ही आशा आहे. आताचा काळ भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. लष्करी व्यवस्थांनी एकमेकांना दुष्परिणामांची धमकी देण्याचाही आहे.
अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थानी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.
लव्ह अँड रेव्होल्युशन : फ़ैज़ अहमद फ़ैज़ : अधिकृत चरित्र
लेखक - अली मदिह हाश्मी
मराठी अनुवाद - शेखर देशमुख
प्रकाशक - लोकवाड्मय गृह
किंमत - 700 रु.






