- अक्षय शारदा शरद
मनोरंजन ब्यापारी. त्यांनी आयुष्यात सगळं भोगलं, सोसलं. फाळणीनंतरच्या उलथापालथी पाहिल्यात. त्याचे भीषण अनुभवही घेतले. जातीभेदाच्या अत्याचाराचे चटके सहन केले. रोजीरोटीसाठी म्हणून अनेक शहरं पालथी घातली. ते करताना त्यांना स्वतःचीच नव्यानं ओळख झाली…
रिक्षाचालक एक वाचक झाला आणि वाचता वाचता एक संवेदनशील लेखक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचं दलित असणं अनेकवेळा या सगळ्याच्या आड येत गेलं, प्रस्थापित साहित्याची नकारघंटाही ऐकायली मिळाली. मनोरंजन ब्यापारी चालत राहिले. त्यांनी जे भोगलं, तोच त्यांच्या साहित्याचा विषय ठरला.
अनेक कथा, कादंबऱ्या लिहीत असताना त्यांनी 'स्वयंपाकी' म्हणून काम करत आपल्या रोजीरोटीची सोयही केली, त्यांचं आयुष्य स्वप्नातल्या कथेपेक्षा कमी नाही. खाचखळग्यांनी भरलेली त्यांची कथा आहे; पण या कथेत मिरची-मसाला नाही. रिक्षातलं पुस्तक वाचणं आता थेट लायब्ररीत पोहोचलं. हा प्रवास साधा सोप्पा नक्कीच नाही. त्यामागची धडपड आजही कायम आहे.
(अनेक कथा, कादंबऱ्या लिहीत असताना मनोरंजन ब्यापारी कोलकात्याच्या एका मूकबधिर शाळेत मुलांसाठी जेवण बनवायचं काम करत होते.)
तुरुंगातील कैद्यांकडून अक्षरांशी तोंडओळख करून घेतली
मनोरंजन ब्यापारी यांचा जन्म बांगलादेश म्हणजेच तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातल्या बरिसाल या भागात झाला. ते अवघे तीन वर्षाचे असताना त्यांचं कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आलं. सुरवातीच्या काळात एका छावणीत त्यांच्या कुटुंबाला विस्थापित म्हणून राहावं लागलं. तिथलं बेहाल करणारं जगणं त्यांनी अनुभवलं. त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी आपलं घर सोडलं. गुवाहाटी, वाराणसी, दार्जिलिंग, लखनी, दिल्ली आणि अलाहाबाद अशा शहरांमध्ये त्यांनी तुटपुंज्या पगारात काम केलं. पण मन काही रमत नव्हतं. शेवटी 1973 मध्ये ते पुन्हा कोलकात्यात आले.
पाटणामधल्या एका लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची चित्तरकथा सांगितली. त्यांचं बालपण चहा विकण्यात, बकऱ्या, गायी चारण्यात गेलं. लहानपणी भुकेमुळे आपल्या मोठ्या बहिणीचा जीव जाताना त्यांनी पाहिलं होतं. काही काळ ते छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे जवळपास 26 महिने त्यांना जेलची हवाही खावी लागली. जेलमधल्या आपल्या सहकाऱ्यांकडून त्यांनी बंगाली अक्षरांशी तोंडओळख करून घेतली. बाहेर आल्यावर त्यांना बऱ्यापैकी बंगाली लिहिता-वाचता येत होतं. पण पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी रिक्षा चालवली.
( ज्येष्ठ लेखिका महाश्वेता देवी यांनी मनोरंजन ब्यापारी यांना आपल्या मासिकामध्ये लिहिण्याची ऑफर दिली.)
रिक्षातलं पुस्तक वाचणं थेट लायब्ररीत पोहोचलं…
साल 1980... कोलकात्याच्या यादवपूर भागात विद्यासागर ज्योतिष रॉय नावाचं एक कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या जवळ एक रिक्षा स्टँड होतं. मनोरंजन ब्यापारी तिथेच भाडं नसलं, की रिक्षात निवांत पुस्तक वाचत बसायचे, असंच एकदा एक पुस्तक वाचत असताना ‘जिजिविषा’ या शब्दापाशी येऊन ते अडकले. त्याचा अर्थ त्यांना समजत नव्हता. आजूबाजूच्या इतर दोस्तांना त्यांनी शब्दाचा अर्थ विचारला. पण त्यांनाही काही कळेना. उलट यावरून त्यांची टिंगलटवाळी केली गेली. पण त्यांना मात्र या एका शब्दानं स्वस्थ बसू दिलं नाही.
एका शब्दाच्या अर्थाची उत्कंठा त्यांना सतावत होती. कॉलेजच्या आसपास त्यांच्या वारंवार फेऱ्या व्हायच्या. असंच एकदा कॉलेजच्या मेन गेटमधून एक मध्यम वयाची महिला त्यांना बाहेर येताना दिसली. सुती साडी नेसलेली आणि एक पिशवी खांद्यावर घेतलेली महिला काही तरुणींशी बोलत होती. ही महिला कुणीतरी प्रोफेसर असावी, असं त्यांना मनातल्या मनात वाटलं असावं,
'जिजिविषाचा म्हणजे?' रिक्षाचालकाच्या प्रश्नाने महाश्वेतादेवी आश्चर्यचकीत झाल्या
रिक्षा सुरू झाली. प्रश्न विचारावा की नाही, या विचारात ते होते. शेवटी मनाची तयारी करून 'मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो?' असे त्यांनी विचारलंच. 'जिजिविषाचा अर्थ काय?' एका रिक्षा चालकाच्या या प्रश्नानं त्या अवाक झाल्या. त्यांनी उत्तर दिलं 'जगण्याची इच्छा'. या उत्तरानं त्यांचं समाधान झालं.
('चांडाळ जीवन' या आत्मकथेसह मनोरंजन ब्यापारी यांची अमेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.)
'तुला हा शब्द कुठं मिळाला?' रिक्षात बसलेल्या त्या प्रवासी महिलेनं विचारलं, त्यानं आपल्या सीटखालच्या बॉक्समधून एक पुस्तक काढलं, ते दाखवत म्हणाला, 'मी अमिगर्भ नावाची कादंबरी वाचतोय. यामध्ये हा शब्द सापडला. या शब्दानं मला इतके अस्वस्थ केलं.' एका वृत्तपत्राच्या एका लेखात हा प्रसंग वाचायला मिळतो.
ज्या पुस्तकातल्या एका शब्दाच्या अर्थामुळे आपण अडलो, त्याचा अर्थ थेट पुस्तकाच्या लेखिकेकडून मिळेल, याची कल्पनाही रिक्षा चालक असलेल्या मनोरंजन ब्यापारी यांनी तेव्हा केली नसेल. त्या लेखिका होत्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी. कार्यकर्ती लेखिका अशी एक वेगळी ओळख त्यांची भारतीय साहित्य विश्वात कायम आहे. वंचितांच्या जगण्यामरण्याचे प्रश्न त्यांच्या कथा-कादंब-यांचे कायम विषय राहिलेत.
साहित्य, साहित्य विश्व नेमकं काय असतं, हे समजावं इतकं मनोरंजन ब्यापारी यांचं वाचनही नव्हतं. तशी परिस्थितीही नव्हती. पण एक रिक्षाचालक म्हणून मनोरंजन ब्यापारी यांच्या आयुष्यातला हा प्रसंग टर्निंग पॉईंट ठरला. महाश्वेता देवी यांनी त्यांना आपल्या मासिकामध्ये लिहिण्याची ऑफर दिली. तोपर्यंत एका मोठ्या लेखिकेची ओळख त्यांना व्हायची होती. थेट लिहायचा प्रस्ताव मिळणं ही गोष्ट त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती.
'मी अशिक्षित आहे. शाळेत गेलो नाही. आजपर्यंत वाचायला शिकलोय, ते माझ्या प्रयत्नातून, आजही शब्दांशी मोडतोड करूनच वाचतोय. अशा स्थितीत लिहायचं काम कसं करू शकतो ?' या त्यांच्या नकारात्मक उत्तरानं त्या विचलित झाल्या. आपलं मॅगजीन समाजातल्या गरीब, आदिवासी आणि मागासलेल्यांच्या कहाण्यांवर असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय तू चांगलं लिहू शकतोस, हा विश्वास त्यांनी दिला. ब्यापारींनी त्यांच्याकडे पत्ता मागितला. त्यांनी पत्ता दिला आणि निघून गेल्या, पत्त्यावरचं नाव पाहून ते चकित झाले.
आजपर्यंत तोडकंमोडकं वाचन करणाऱ्या एका सामान्य रिक्षावाल्याला लिहितं होण्याची संधी महाश्वेता देवी यांच्यामुळे मिळणार होती. ही संधी आपल्याला पश्चिम बंगालचा सर्वश्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार असलेल्या बंगाल अकादमी पुरस्कारापर्यंत पोहोचवेल, याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. त्यांनी आयुष्यातलं पहिलं मोडकतोडकं लिहिलं, तेही रिक्षावाल्यांच्या जीवनावर, 'रिक्शा चालाई' या नावाचं. 15 पानांची ही कथा होती. ही छोटी सुरवात पुढं बंगाली साहित्यात वेगळी ओळख निर्माण करणारी ठरली.
… जिजिविषा' या टोपण नावाने बंगालच्या साहित्य विश्वात स्थान निर्माण केले
1981 मध्ये लेखक म्हणून त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. 'रिक्शा चालाई' या छोट्या कथेनंतर 'जिजिविषा' या टोपण नावानं बंगालच्या साहित्य विश्वात ते ओळखले जाऊ लागले. मदन, कालिदास कथक, अरुण मित्र वा नावानं त्यांनी लेखन केलं. यात महाश्वेता देवी यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा इंग्रजीत अनुवादही झाला आहे.
2014 मध्ये त्यांना बंगाल साहित्य अकादमीने सुप्रभा मुजूमदार पुरस्कार दिला. त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने दलित वर्गाचं जीवन आणि नक्षलवाद यांचा उल्लेख विस्ताराने येत असल्याचं निरीक्षण बीबीसी हिंदीच्या एका लेखात वाचायला मिळतं. 'चांडाळ जीवन' या आत्मकथेत बंगालमधले दलित ज्या उपेक्षा आणि दडपशाहीला सामोरे गेलेत, त्या अनुभवनांची नोंद यात आहे. हे पुस्तक आल्यावर त्याची जगभर चर्चा झाली. मात्र, भारतीय साहित्य विश्वानं याकडे काहीसं दुर्लक्ष केलं. ते ज्या जात आणि वर्ग समूहातून आले, त्या समूहाच्या हालअपेष्टा आणि उपेक्षेचं जीवन त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून येतं.
हे सगळं सुरू असतानाच 1997 पासून मनोरंजन ब्यापारी हे कोलकात्याच्या एका मूकबधिर शाळेत मुलांसाठी जेवण बनवायचं काम करत होते. दोन दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी हे काम केलं. पण आता वय साथ देत नाही. तब्येतीच्या कुरबुरी आहेतच. शिवाय या वयात उभं राहून जेवण बनवणं, त्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राची दखल घेत त्यांना बंगालमधल्या विद्यानगर इथल्या जिल्हा वाचनालयात लायब्ररियन म्हणून पाठवण्यात आलं.
'ही माझ्या स्वप्नांची जागा आहे. रोज हजारो पुस्तकांनी वेढलं जाणं हे स्वप्न साकार झाल्यासारखंच आहे. जितकी हवी तितकी पुस्तक मी वाचू शकतो,' असं एका मुलाखतीत मनोरंजन व्यापारी म्हणतात,
आपली सर्वश्रेष्ठ कथा येणं अजून बाकी आहे, असं म्हणत ते आपल्या भविष्याची दिशाही स्पष्ट करतात, इतकी वर्षे किचनमध्ये रमणारे मनोरंजन ब्यापारी आता खऱ्या अथनि चोवीस तास पुस्तकांमध्ये रमतील. त्यांचं वाचण आणि जगणं आता सर्वार्थाने समृद्ध होईल.
पूर्वप्रसिद्धी - दैनिक पुढारी






