1943-44 दरम्यानची गोष्ट आहे. कोल्हापुरात एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्या वेळच्या विख्यात गायिका नूरजहाँ गाणं रेकॉर्ड करायला तिथे आल्या होत्या. त्याच चित्रपटात एक लहान मुलगी भूमिका करत होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नूरजहाँ यांच्याशी त्या मुलीची ओळख करवून देताना म्हणाले, "ही लता आहे आणि तीसुद्धा गाते."
नूरजहाँ झटकन म्हणाल्या, "बरं, काहीतरी म्हणून दाखव." यावर लता यांनी शास्त्रीय संगीताची चाल असलेलं एक गाणं म्हटलं. नूरजहाँ ऐकत राहिल्या आणि लता गात राहिल्या. मुलीचं गाणं ऐकून खूश झालेल्या नूरजहाँ म्हणाल्या, "छान गातेस, फक्त रियाज करत राहा, खूप मोठी होशील." उपजीविकेसाठी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करणारी ही मुलगी खरोखरच खूप मोठी झाली आणि गानकोकिळा लता मंगेशकर म्हणून ओळखली जाऊ लागली.
त्यानंतर मलिका ए तरन्नुम, सुरांची राणी असलेली नूरजहाँ आणि सूरसम्राज्ञी, स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्यात जी काही घट्ट मैत्री झाली ती शेवटपर्यंत… सबंध जग ज्यांच्या आवाजावर जान कुर्बान करत होतं त्या गानसम्राज्ञी लतादीदी स्वतः मात्र गायिका- अभिनेत्री "नूरजहाँ" यांच्या आवाजाच्या जबरदस्त चाहत्या होत्या.
रसिक चाहत्यांमध्ये नूरजहाँ श्रेष्ठ की लता अशा चर्चा, वादविवाद व्हायच्या. खरं तर दोघींच्या गाण्याची पोत, जातकुळी अगदी वेगळी! शिवाय नूरजहाँ लता मंगेशकर यांना थोडी सिनियर! त्याकाळी नूरजहाँ, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम अशा भारीभरकम आवाजाच्या गायिकांचा बोलबाला होता. लता दीदींचा आवात त्यामानाने पातळ! पण त्या आवाजाची धार आणि काबिलियत मास्टर गुलाम हैदर यांनी ओळखून दीदींना पहिली संधी दिली.
(नूरजहाँ आणि लतादीदी)
तर अशा या भिन्न प्रकृतीच्या दोन गायिका खूप छान मैत्रिणी होत्या. पण फाळणीनंतर नूरजहाँ आपले पती "शौकत हुसेन रिझवी" यांच्यासह पाकिस्तानामध्ये स्थायिक झाल्या. नंतर यांच्या भेटीगाठीत मात्र खंड पडला.
लदादीदी म्हणाल्या, "इतने करीब आए हैं तो नूरजहाँ को मिले बिना नहीं जाऊँगी..
1953 सालची ही गोष्ट आहे, जेव्हा निर्माते-दिग्दर्शक केदार शर्मा यांचा चित्रपट "झाँझर"च्या म्युझिक लाँचसाठी लता मंगेशकर अमृतसर मध्ये आल्या होत्या. अमृतसर पासून लाहोर खूप जवळ (50 कि मी.) म्हणजे अवघ्या दोन तासांच्या अंतरावर. साहजिकच लतादीदींना आपल्या एकेकाळच्या सखीची, नूरजहाँची प्रकर्षाने आठवण आली.
ट्रंककाॅलवर दोघींनी खूप गप्पा मारल्पा, एकमेकींना स्वतःची गाणी ऐकविली. जणू मधली सगळी वर्ष गळून पडली होती. पोटभर गप्पा तर झाल्या पण दीदींचे मन भरले नाही. नूरजहाँच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली. "इतने करीब आए हैं तो मैं नूरजहाँ को मिले बिना नहीं जाऊँगी... लतादीदी आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
पण हे शक्य नव्हते कारण पासपोर्ट-व्हिसा लगेचच मिळणे असंभव! शेवटी सी. रामचंद्र यांनी थोडे वजन वापरले आणि दोन्ही देशांच्या डिस्ट्रीक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी मिळून यावर तोडगा काढला. दोन्ही देशांच्या सीमेवरची मधली काही जागा No Man's Land म्हणून ओळखली जाते. ती जागा म्हणजे, वाघा- अटारी बाॅर्डर… तिथे भेटायचे ठरले. या भेटीसंबंधी नूरजहाँ यांना कळविले गेले.
त्यांनाही आपली मैत्रिण इतक्या वर्षांनी प्रत्यक्ष भेटणार याचा आनंद झाला. असे म्हणतात की दोन्हीकडचे दरवाजे उघडले जाताच पळत जाऊन दोघींनी एकमेकींना मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते...दोन्ही बाजूचे फौजी जवान, उपस्थित पाहुणे सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. नूरजहाँ यांनी लाहोरहून येताना स्पेशल बिर्याणी, मिठाई आणली होती..सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला.

गाताना समोर कुरुप माणसं बसलेली नूरजहाँना आवडत नसे…
भारतात जन्मलेल्या, वाढलेल्या आणि गायिका बनलेल्या नूरजहाँ फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्या. पाकिस्तानातील बड्या व्यक्तिमत्त्वांमध्ये गणल्या जाणार्या नूरजहाँचे गायन आणि सौंदर्याचे चाहते जगभरात होते. त्यांच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. वयाच्या 6 व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांची गाण्याची आवड पाहून त्यांच्या पालकांनी त्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले. नूरजहाँ या भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या स्टार होत्या. पंजाबी सिनेमाच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. त्यानंतर देशाचे दोन तुकडे झाले आणि नूरजहाँ पाकिस्तानात गेल्या.
नूरजहाँचे जीवन प्रेमगीते आणि गझलांनी भरलेले होते. त्या स्वतः कमी प्रेमळ नव्हत्या. आपल्यासमोर कुरूप माणसे बसलेली त्यांना आवडत नव्हते, असे सांगितले जाते. चांगल्या दिसणाऱ्या लोकांनी वेढलेले त्यांना आवडायचे. त्यांनी दोन लग्न केले, सहा मुलांची आई होत्या. दोन्ही पतींना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी स्वतः 6 मुलांचे संगोपन केले. दोन अफेअर्सही होते.
पाकिस्तानच्या एका कसोटी क्रिकेटपटूची कारकीर्द त्यांच्यामुळे अकाली संपली. त्या काळात त्यांचे नाव पाकिस्तानच्या हुकूमशहाशीही जोडले गेले. पाकिस्तानात नूरजहाँ इतक्या प्रसिद्ध होत्या की त्यांच्या अंत्यसंस्काराला चार लाख लोक उपस्थित होते.
वयाच्या 6 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली
नूरजहाँचा जन्म पंजाबमधील एका पंजाबी-मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे बालपणीचे नाव अल्ला राखी वसई असे होते. नूरजहाँ इमदाद अली आणि फतेह बीबी यांच्या 11 मुलांपैकी एक होत्या. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे रडणे ऐकून काकू म्हणाल्या होत्या, या मुलीच्या रडण्यात एक सूर आहे. नूरजहाँचे आई-वडील रंगभूमीशी संबंधित होते. यामुळेच त्यांचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता.

वयाच्या 6 व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली. इतक्या लहान वयातही त्या पारंपरिक लोकगीते म्हणायच्या. त्यांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना उस्ताद गुलाम मोहम्मद यांच्याकडे संगीताचे धडे घेण्यासाठी पाठवले. संगीत शिकल्यानंतर नूरजहाँने लाहोरमध्ये आपल्या बहिणीसोबत गायनाला सुरुवात केली.
लाइव्ह परफॉर्मन्स आणि चित्रपटांच्या स्क्रिनिंगच्या निमित्ताने त्या गायच्या. नूरजहाँचे वडील ज्या थिएटरमध्ये काम करायचे त्या थिएटरच्या मालकाने त्यांना कुटुंबासह कलकत्त्याला पाठवले. नूरजहाँ आणि तिच्या बहिणींचे भविष्य सुधारेल या आशेने हे कुटुंबही कलकत्त्याला आले.
पाकिस्तानच्या पहिल्या महिला दिग्दर्शक बनल्या
1947 पर्यंत नूरजहाँनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. देशाच्या फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानात जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मुंबई सोडून त्या कुटुंबासह कराचीत स्थायिक झाल्या. तिथे गेल्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या चन वे या चित्रपटात काम केले. हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला पाकिस्तानी चित्रपट होता ज्यात त्यांनी अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून काम केले.
हा 1951 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन शौकत हुसैन रिझवी यांच्यासोबत केले होते, त्यामुळे नूरजहाँ यांना पहिल्या पाकिस्तानी दिग्दर्शकाचा किताबही मिळाला होता.
दोन अयशस्वी विवाह, दुसऱ्या नवऱ्यासाठी अभिनय सोडला
नूरजहाँनी 1942 मध्ये शौकत हुसैन रिझवींशी भारतातच लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतरच त्यांच्या नात्यात कटुता सुरू झाली. परिस्थिती अशी बनली की 1953 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्यांनी त्यांच्या तीन मुलांचा ताबा त्यांच्याकडेच ठेवला. पाच वर्षांनंतर, त्यांनी चित्रपट अभिनेते एजाज दुर्रानी यांच्याशी पुनर्विवाह केला. जे त्यांच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान होते.
लग्नानंतर काही काळातच दुर्रानी यांनी त्यांच्यावर चित्रपटात काम करू नये म्हणून दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यांनीही आपल्या पतीची ही गोष्ट नाकारली नाही आणि 1961 मध्ये रिलीज झालेला गालिब हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी एक अभिनेत्री आणि गायिका म्हणून काम केले होते. 1963 मध्ये आलेल्या बाजी या चित्रपटातही ती दिसल्या होत्या, पण त्यात त्यांची भूमिका खूपच छोटी होती.

या लग्नापासून नूरजहाँला 3 मुले झाली. 6 मुलांची आई आणि एका यशस्वी अभिनेत्याची पत्नी असल्याने त्यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा पूर्णपणे त्याग करावा लागला. या लग्नासाठी त्यांनी आपलं करिअर पणाला लावलं, तरीही हे लग्न यशस्वी होऊ शकलं नाही आणि 1971 मध्ये त्यांनी दुर्राणींपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दुर्रानी यांना लंडनमध्ये ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर नूरजहाँला जामीन मिळाला होता.
नूरजहाँच्या प्रेमात पडल्यानंतर क्रिकेटरची कारकीर्द संपुष्टात आली
पाकिस्तानी क्रिकेटपटू नजर मोहम्मदची कसोटी कारकीर्द अकालीच संपुष्टात आल्याचे मानले जाते. कथा अशी आहे की एकदा नूर यांच्या पतीने (दुसरे पती दुर्राणी ज्यांच्यापासून नूरजहानने नंतर घटस्फोट घेतला) त्यांना आणि नझरला एका खोलीत एकत्र पाहिले होते. नवऱ्याच्या भीतीने नजरने पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून उडी मारली. यामुळे त्याचा हात मोडला. त्याला ठिक करण्यासाठी नंतर एका पैलवानाला बोलावण्यात आले. मात्र समस्या आणखी वाढली. हात बरा न झाल्याने नझरची कारकीर्द संपुष्टात आली.
जेव्हा पाकिस्तानच्या हुकूमशहाला नूरजहाँने फोन लावला होता
नूरजहाँच्या चाहत्यांच्या यादीत पाकिस्तानी लष्कराचे जनरल याह्या खान यांचेही नाव आहे. जे नंतर पाकिस्तानचे हुकूमशहा आणि तिसरे राष्ट्रपती झाले. ही कथा त्यावेळची आहे जेव्हा नूरजहाँ लंडनहून लाहोरला परतत होत्या आणि त्यांना कराचीत राहावे लागले होते. जेव्हा कराचीच्या रेडिओ स्टेशनला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब एक कार पाठवली आणि नूरजहाँला स्टुडिओत बोलावून तीन गाणी गाण्याची विनंती केली. ही गाणी गायल्यानंतर नूरजहाँ म्हणाल्या - माझे याह्या खानशी बोलणे करून द्या.
त्यांच्या मागणीनंतर तेथे उपस्थित असलेले सर्व लोक चिंतेत पडले आणि विचार करू लागले की, देशातील सर्वात मोठ्या जनरलसोबत नूरजहाँचे बोलणे कसे करवून द्यावे? जेव्हा कोणीच फोन करण्याची हिम्मत केली नाही तेव्हा नूरजहाँनी स्वतः हुकूमशहा जनरल याह्या खान यांना त्या रेडिओ स्टेशनवरून फोन केला. त्या फोनवर म्हणाल्या, ‘हॅलो.. हां चंदा, मैं हुने हुने तीन गीत रिकॉर्ड कराएने, आज रात आठ बजे सुन लवीं…’ म्हणजे मी इथे तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. तुम्ही रात्री 8 वाजता ऐकून घ्या.

असे म्हणत त्यांनी फोन कट केला, पण त्यांच्या या कृतीने संपूर्ण रेडिओ स्टेशनमध्ये खळबळ उडाली. त्याचे कारण असे की रात्री 8 वाजता रेडिओवर पाकिस्तानच्या बातम्या प्रसारित होत होत्या. ही गोष्ट आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण लष्कराच्या मुख्यालयापर्यंत पोहोचले. शेवटी 8 वाजता बातम्याट प्रसारित करायच्या असे ठरले, पण त्यानंतर लगेच नूरजहाँची गाणी वाजवली जातील. जनरल आणि नूरजहाँ यांच्यात अफेअर असल्याच्या बातम्याही आल्या, पण दोघांनीही ते कधीच मान्य केले नाही.
अंत्ययात्रेत चार लाख लोकं
फाळणीनंतर नूरजहाँ आपल्या मुलींसह 1983 मध्ये पहिल्यांदा आणि शेवटच्या भारतात आल्या होत्या. भारतात आल्यानंतर त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत दूरदर्शन मुंबईला मुलाखत दिली होती. यावेळी फाळणीचे दिवस आठवून त्या भावूक झाल्या होत्या. नूरजहाँनी 1992 मध्ये गाणे बंद केले. 8 वर्षांनंतर, 2000 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांचे अंत्यसंस्कार जामिया मशीद सुलतान, कराची येथे झाले. ज्यात चार लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्यावर लाहोर येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करावेत, असे सांगितले होते, परंतु त्यांच्या मुलीने ते मान्य केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कराचीत अंत्यसंस्कार करण्यात आले.






