शकील अंजुम देहलवी, जुन्या दिल्लीतील उर्दू बाजारात आपल्या ५० वर्ष जुन्या पुस्तकांच्या दुकानात रिकामटेकडे बसले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे 10 कर्मचारी होते जे उर्दू ग्राहकांच्या आवडत्या पुस्तकांची मागणी पूर्ण करायचे. आता इथल्या पुस्तकांवर धुळ साचते. जिथे एकेकाळी साहित्यिक चर्चा रंगायच्या तिथे आता कबाब, बिर्याणीचा वास दरवळतो आणि खाणाऱ्यांच्या फर्मायशी येतात.
उर्दू बाजारातील अरुंद गल्लीबोळांत अजूनही गर्दी उसळते पण पुस्तकांसाठी नाही, तर मुगलई चिकन आणि मटण बिर्याणी खाण्यासाठी… गालिब आणि मंटोची कोणाला आठवणही येत नाही. 40 वर्षांपूर्वी याच बाजारात महिन्याला लाखो रुपयांची पुस्तके विकली जायची. आता तिच दुकानं हॉटेल्स आणि ट्रॅव्हेल एजेंसीच्या बोर्डांमध्ये नाहीशी झाली आहेत. वाचक कमी होत आहेत, पुस्तक विक्री कमी होत आहे. दुकानदारांना चिंता आहे की उर्दू साहित्याची विरासत आता संकटात सापडली आहे.
65 वर्षीय देहलवी म्हणतात, “पूर्वी उर्दू बाजाराच्या गल्ल्या कवी, शायर, विद्यार्थी, पत्रकार, अध्यापक, वाचक यांनी भरलेल्या असायच्या. आता इथं लोक बिर्याणी, कबाब, खायला आणि शरबत-ए-मोहब्बत प्यायला येतात. हा आता दिल्लीचा आणखी एक खानाबाजार बनला आहे.”

उर्दू बाजारात पुस्तकांच्या दुकानाची संख्या 50 वरून पाच वर…
जामा मशिदीच्या समोर, 1 नंबरच्या प्रवेशद्वाराजवळील हा बाजार जो कधी उर्दू, फारसी, हिंदी, इंग्रजी भाषांमधील जुन्या नव्या आणि दुर्मिळ पुस्तकांसाठी प्रसिद्ध होता, आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. इथल्या 50 दुकानांची संख्या आता 5 वर आली आहे. इथलं सर्वांत जुनं व प्रसिद्ध दुकान, अंजुमन-ए-तरक्की-ए-उर्दू अजूनही सुरू आहे. पण कधीतरीच. याचे दरवाजे बहुधा बंदच असतात.
बंद दुकानासमोरील जागेवर एक फ्रुट-चाटवाला आणि एक कबाबवाला व्यवसाय करतो. उर्दू बाजारातील इतर प्रतिष्ठीत दुकानं, लाजपत खान अँड सन्स, कुतुबखाना हमीदिया, इल्मी कुतुबखाना, कुतुबखाना नजरिया आणि कुतुबखाना रशीद, आधीच बंद पडली आहेत.
शिल्लक असलेल्या 5 दुकानांपैकी कुतुबखाना रहिमिया दुकानाचे तिसऱ्या पिढीचे मालक, जहिदुल रहमान सांगतात, “जसजसे दुकानांचे साईनबोर्ड लहान आणि जुने होत आहेत, तसतसे इथे आणि देशातही उर्दू वाचकांची संख्या देखील कमी होत चालली आहे. जर कोणी म्हटलं की उर्दू बाजार नष्ट होत नाहीये तर, नष्ट झाला आहे, तर ते चुकीचं ठरणार नाही.”
आपल्या सुंदर नक्षीदार कमानी, फ्रेमयुक्त सुलेखन, दोन खोल्यांमध्ये पसरलेली पुस्तकांची कपाटे यांच्यासह, मकतबा जामिया लिमिटेड अजूनही जुन्या साहित्यिक जगाची आठवण करून देतं. पण इथली बहुसंख्य पुस्तके अजूनही अस्पर्शच आहेत. त्यांचे मुखपृष्ठ आता पिवळे पडले आहेत. बाकी पुस्तकांच्या दुकानांचीही अशीच परिस्थिती आहे. तिसऱ्या पिढीतील या दुकानांचे मालक आपली ही विरासत वाचवण्यासाठी झगडत आहेत.
मकतबा जामिया लिमिटेडचे 52 वर्षीय मोहम्मद मोईउद्दीन आपल्या फोनवर स्क्रोल करत म्हणतात, “1990 च्या दशकात आम्ही महिन्याला 50 हजार, कधी तर एक लाख पुस्तकेही छापायचो आणि विकायचो. आता ही संख्या कमी होऊन 5 हजारावर आली आहे.” वाचक नसल्याने मकतबाने 2019 मध्ये आपल्या साहित्यिक पत्रिका, कायम-ए-तालीम आणि किताबनुमा यांचं प्रकाशन बंद केलं.

उर्दू बाजार केवळ पुस्तकांसाठीच नव्हता तर त्याला उर्दू मंदिर म्हटलं जायचं…
उर्दू बाजार केवळ पुस्तकविक्रीसाठीच नाहीतर प्रिंटींग, प्रकाशन, तसंच उर्दू कवितेचाही अड्डा होता. याला किताब बाजार किंवा उर्दू मंदिर म्हणूनही ओळखलं जायचं. 1920 मध्ये काही दुकानांनी याची सुरूवात झाली होती. लवकरच ते देशातील उर्दू साहित्याचं केंद्र बनलं. देशभरातून इथं कवी, विद्वान, वाचक, गालिब वाचायला, टपरीवर बसून चहा प्यायला आणि संध्याकाळचे मुशायरे ऐकायला जमत. पंडित जवाहरलाल नेहरूही या मुशायरांमध्ये कधीतरी यायचे.
1960-70 च्या दशकात इथे पन्नासहून जास्त दुकानं होती. दुकानांच्या बाहेर वाचकांना बसायला लाकडी बेंचेस असायचे. त्यावर बसून वाचक उर्दू की हिंदी यावर वाद घालायचे. पण 1990 च्या दशकात बाजारची रौनक हरवू लागली. वाचकांची वाचण्याची सवय सुटू लागली. भरलेली दुकानं ओकीबोकी झाली. वादविवाद, चर्चा, मुशायरे यांच्या जागी आरडाओरडा सुरू झाला. खरंतर 1970 च्या दशकातच उर्दूच्या घसरणीवर लोक बोलू लागले होते. न्यूयॉर्क टाईम्सने यासाठी, उदासीनता, हिंदू कट्टरवाद, मुस्लिम विरोधी भावना यांना दोषी ठरवलं होतं. दुकान विक्रेते याचा दोष इंटरनेट, मोबाईल, डिजीटल युगाला देतात.

पुस्तकांची धुळ आणि पुस्तकांची राख…
देहलवी म्हणतात, “आता सारं काही डिजीटल स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी पुस्तकं विकत घेणं बंद केलंय. त्यामुळे आम्ही नवीन पुस्तकं आणि प्रकाशकांसोबतचा आमचा संपर्क कमी केला आहे.” पण इथल्या दुकानदारांसाठी खरं नुकसान यापेक्षा जास्त आहे आणि ते वेगळं आहे. उर्दू बाजारची उतरती कळा पाहून इथल्या विक्रेत्यांच्या थेट काळजावरच आघात होत आहे. कारण उर्दू भाषा आणि संस्कृतिलाही उतरती कळा लागली आहे. देहलवी यांना त्यांच्या वडिलांसोबत इथं लहानपणी घालवलेले दिवस आठवतात.
त्यांचे वडील त्यांना उर्दूच्या सुवर्ण काळाच्या गोष्टी सांगायचे. या तेव्हाच्या गोष्टी होत्या जेव्हा उर्दूचा धर्माशी संबंध नव्हता. ती स्वतंत्र होती. तिची मधुरता, नजाकत, देखणेपणासाठी ती प्रसिद्ध होती. सर्वांकडून आवडली जायची. देहलवी स्वतः राजकारणात आहेत. 2013 मध्ये त्यांना आम आदमी पार्टीकडून दिल्लीच्या मटिया महलसाठी विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. नंतर 2015 मध्ये भाजपकडूनही त्यांनी निवडणूक लढवली होती. उर्दूला धार्मिक भाषेची ओळख मिळायला ते राजकारणाला कारणीभूत ठरवतात.
रहमान याला सहमती देतात. ते म्हणतात, “पूर्वी उर्दू एक भाषा म्हणूनच शिकली जायची. अनेकजण ती शिकण्याचा, वाचण्याचा, लिहिण्याचा आनंद घ्यायचे. पण राजकारणामुळे जसं लोकांमध्ये फुट पडली आहे, तशीच गत भाषांचीही झाली आहे. अनेक पुस्तक विक्रेते आता ही दुकानं चालवणारी शेवटची पिढी आहेत. वाचकांची संख्या कमी झाल्यामुळे व्यवसाय चालत नाही. त्यामुळे घर चालवणं कठीण झालं आहे.”

रहमान खंत व्यक्त करत म्हणतात, “आमच्या मुलांनी व्यवसाय होत नसल्यामुळे दुकानात काम करायला नकार दिलाय.” एका दुकानाच्या मालकाच्या मुलानं कबूल केलं की या कौटुंबिक व्यवसायात आता भविष्य उरलेलं नाही. तो म्हणाला, “मला या वारशाचा सन्मान करायची इच्छा आहे. पण बदलत्या काळाच्या संघर्षांमुळे या व्यवसायासाठी सर्व वेळ देणं कठीण आहे. उर्दू आता धार्मिक भाषा म्हणून ओळखली जाते. लोकांनाही आता तिच्यात फारसा रस उरलेला नाही.” अनेकांसाठी धार्मिक ग्रंथ हाच विक्रीचा एकमेव आधार उरला आहे.
मदिना बुक डेपोचे मालक, मोहम्मद शेरवानी सांगतात, “काळ कितीही बदलला तरी लोक कुराण वाचणं बंद करणार नाहीत. आम्ही जास्ती करून कुराणच विकतो. तोच आमच्यासाठी उत्पन्नाचा विश्वसनिय स्त्रोत आहे.” आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी राहिलेल्या या पाच दुकानांना आता विविधता आणावी लागली आहे. धार्मिक ग्रंथांसोबतच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक कुराण बॉक्स, इतर लहानसहान गोष्टी ते विकू लागले आहेत. पण अनेकांना असं वाटतंय की यामुळे अटळ टळणार नाही.
देहलवी म्हणतात, “आम्हाला आमची पुस्तकं लवकरच भंगारवाल्याला विकावी लागतील. दुकानं कायमसाठी बंद करावी लागतील. सध्या आमचा बहुतेक वेळ पुस्तकांवर साचलेली धूळ साफ करण्यातच जातो. आम्ही आशा करत राहतो की आमचे काही जुने ग्राहक आम्हाला पुन्हा कॉल करतील, आमच्याकडे येतील. पण हे स्वप्नच वाटतंय.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






