माणूस जसजसा चंगळवादाच्या भोवऱ्यात फसत चाललाय तस तशी त्याची माणूस नावाच्या माणुसकीशी असलेली नाळ सैल होत चाललेय. ज्यांनी नऊ महिने पोटात वाढवला तिच्याशी असलेली अनुवंशिक नाळ सुद्धा आता मोठ्या प्रमाणात तुटत चालल्याचे हृदयद्रावक उदाहरण दररोज आजूबाजूला घडत आहेत. एका तिकीट खिडकीवर एका वयोवृद्धाची कॉलर त्या तिकीट वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी धरली. बाजूचे प्रवासी त्याच्यावरती घसरले, मात्र वयोवृद्ध मास्तर म्हणाला सोडा त्याला, चूक त्याची नाही मी मास्तर आहे काहीतरी शिकवायला कमी पडलो असेल, म्हणून ही पिढी इतकी विषारी झाली.
आज आई-वडिलांशी तुटलेली मुलांची नाल बहुदा जन्मदात्यांना त्यांची काही चूक झाली का याचं आत्मचिंतन करायला लावत आहे. तर दुसरीकडे अनेक प्रकरणांमध्ये राजरोसपणे बंद दरवाजा आड माणुसकी कुजलेली अनेक घटना उघडकीस येत आहेत.
ठाण्याच्या प्रसिद्ध मेंटल हॉस्पिटलमध्ये म्हणजे मनोरुग्णालयात अशा शेकडो केसेस एकापाठोपाठ एक तरंगताना दिसतात. जणू तो वेदनांचा हब आहे. माणसाला माणसाच्या वंशाचं किती सोयरसुतक उरले याची शेकडो उदाहरणं या मेंटल हॉस्पिटलच्या चार भिंतींमध्ये मिळतात. या भिंतींच्या आत एक उपचार वगळला तर बाकी जगणं केवळ औपचारिकच आहे. जे जगण्यासाठी सरसावलेत त्यांनाही त्यातलं काही माहीत नाही आणि जे जगतायेत तेही रामभरोसे ईश्वराच्या कृपेवर. या पलीकडे त्यांची व्याख्या नाही.

अनेक वर्ष नको असलेलं, मनोविकार असलेले मुल मेंटल म्हणून त्या हॉस्पिटलच्या दारावर सोडून द्यायचं. यापलीकडे भारतात मनोविज्ञान प्रगत नव्हतं. सगळ्याच मनोविकारांना मेंटल हा एकच शब्द असायचा. मग एक तर अशी मुलं बाळ, नागरिक गुराढोरांसारखी रस्त्यांवरती फिरायची. देव जगवेल तोवर जगायची आणि तो बोलावेल तेव्हा मरायची. अनेकांची प्रेतही पालकांना सापडत नसत. त्यांच्या आयुष्यात पालक हा केवळ नाईलाज आणि हे आमचं मुल आहे हे नाकारता येत नाही, एवढंच नातं.
अलीकडच्या काळात जगभरात विकलांगांच्या आयुष्यात अनेक बदल आलेत. मुळात त्याचा अवेयरनेस जगभरात वाढलाय. मनोरुग्णांचे वेगवेगळे गट आता देशवासीयांना समजू लागलेत. मात्र त्यात स्वमग्न, गतिमंद, मतिमंद आणि अर्थात विस्मरण या दोन मनोविकारांचे प्रचंड मोठ आव्हान आहे. अख्ख जग या दोन विकारांशी गेली अर्धशतक जीवाची बाजी लावून लढत आहे. लढणारे मोजकेच आहेत आणि हा तमाशा बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
असाच एक 45 वर्षाचा रुग्ण नाशिक वरून पालकांनी उपचारासाठी मेंटल हॉस्पिटल ला भरती केला होता. एक दीड वर्षानंतर तो बऱ्यापैकी बरा झाला, म्हणून रुग्णालयाने त्याला परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पालकांनी सुरुवातीला हो म्हटले, पण नंतर लपून बसले. रुग्णालयाची टीम घरापर्यंत पोहोचली. बाहेर मुल बघून आई-वडिलांनी दरवाजा बंद केला. पाच तास वाट बघून टीम परत मेंटल हॉस्पिटलमध्ये आली. आई वडील इतक्या संख्येने मुलं आजकाल नाकारत आहेत त्याच जातकुळीतला हा नकार असावा.
एक तर अशा मनोरुग्णांना सांभाळणं म्हणजे गोवर्धन पर्वत उचलल्यासारखा आहे. यात लपून बसणे हा मार्ग आई-वडिलांना सोपा वाटला. मात्र आई-वडिलांची एक झलक बघण्यासाठी आपल्या घराच्या दरवाजापर्यंत आलेलं 45 वर्षाचं लेकरू नाळ तुटल्यागत जेव्हा पुन्हा रुग्णालयात परतला असेल तेव्हा त्याच्या अगोदरच आजारी असलेल्या मनावर किती विचित्र परिणाम झाले असतील, याची जाणीव त्याला आणि ईश्वरालाच माहित.
तर दुसरीकडे आता म्हाताऱ्या आई-वडिलांना प्रॉपर्टी बक्षीसपत्र करून देण्याचा एक विचित्र जाच प्रचंड मोठ्या प्रमाणावर उघडकीस आला आहे. आजवर या गोष्टीकडे फारसे कुठल्या यंत्रणेचे लक्ष नव्हतं. मात्र परवा ठाण्यासारख्या नौपाड्याच्या उच्चभ्रू ब्राह्मणी संस्कारातल्या शहरात एक प्रकरण उघडकीस आलं. त्याने भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या असतील. ध्यानीमनी नसलेल्या या क्षेत्रातही यापुढे प्रचंड चौकस राहून खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल, अशी ती आकडेवारी आहे. प्रमोद ढोबळे नावाचे गृहस्थ येथे वृद्ध ज्येष्ठांना कायदेशीर सल्ला देण्याचे केंद्र चालवतात.
या केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. त्यापैकी 30 टक्के जेष्ठांना मुलं, मुली आणि उपलब्ध नातेवाईक हे इच्छापत्र करून प्रॉपर्टी देण्यासाठी दबाव आणतात. तर 70 टक्के प्रकरणात इच्छापत्र किंवा मृत्युपत्र नको बक्षीसपत्र देण्यासाठी त्यांना जाच होतो. त्यांचा शारीरिक, आर्थिक, मानसिक छळ केला जातो. अशी प्रकरण उघडकीस आली आहेत.

तसा इच्छापत्र, मृत्युपत्र हा कायदा देखील 100 वर्षाचा आहे. मात्र तो फारसा भारतीय संस्कृतीतल्या काही चांगल्या गोष्टींमुळे उघड्यावर आला नाही. काही गरजवंतांना किंवा काही दृष्टांना लोभी, हापापलेल्या नातेवाईकांना तो तारणहार ठरला खरा. मात्र भारतात या कायद्याचा फारसा उदो उदो झाला नाही. कायदा ही तसा प्रचंड कडक आहे. मृत्युपत्र करणं जितकं सोपं वाटतं तितकं ते कोर्टात टिकत नाही. मात्र तरीही ते केलं जातं. अनेक नातेवाईक जाऊदे प्रॉपर्टी त्याला त्याच्या मड्यावर घेऊन जाऊ दे, असं म्हणून बोभाटा नको म्हणून न्यायालयात आव्हान देत नाहीत.
तर अनेक प्रकरणात सहा सहा भावंड असताना देखील एकट्या दुखट्या आई किंवा म्हाताऱ्या वडिलांना कोंडीत पकडून गफलतीने त्यांच्याकडून हे मृत्युपत्र तयार करून घेतात किंवा मला आईने प्रेमाने बक्षीस दिले त्यावर इतर भावंडांचा अधिकार नाही, काही शहाणे तर इतर पाच भावंड असताना देखील आपण आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहोत असं एफिडीवीट करायला मागे पुढे पाहत नाहीत. मात्र बरीचशी इच्छापत्र आणि मृत्युपत्र कोर्टात टिकतच नाहीत. आणि खोटं मृत्युपत्र केलं म्हणून गुन्हा दाखल होतो. म्हणून आजकाल शिकलेली मंडळी विधवा म्हाताऱ्या आईला किंवा अंथरुणात पडलेल्या वडिलांचा जाच करून त्यांना बक्षीस पत्र द्यायला लावतात.
ठाण्यामधल्या एका प्रकरणात निर्मला नावाच्या वृद्ध महिलेला तिच्या मुलाने आणि सुनेने या बक्षीस पत्रासाठी कसे कसे छळले त्याची कहाणी उघडकीस आली आणि त्याचमुळे त्यानिमित्ताने हे आणखीन एक कटू सत्य जगासमोर उघड झालं. या निमित्ताने वृद्ध कुठल्या कोंडीत जगतात, जन्म दिलेली मुलं-मुली आणि जवळचे नातेवाईक टिचभर प्रॉपर्टी साठी कसे खेळतात याची एक झलक नव्या जमान्यासमोर आली आहे. अर्थात आता फार सावधपणे या क्षेत्रात एनजीओज ना काम करावे लागेल.
माणसाचा जीवनप्रवास सुसाट सुरू झाला आहे. सुख, सुविधा, राहणीमान लक्झरीस हवं यासाठी आटापिटा सुरू आहे. त्यातूनच कॉम्प्लेक्स नावाची एक आणखीन वेगळी संस्कृती भारतात जोर धरत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीची नवी मुंबई नेरूळ मधल्या एका घटनेची वेदना ही माणुसकी कुजत असल्याची आठवण करून देणारी ठरली आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये एकटे राहणार एक वयोवृद्ध दांपत्य आणि सोबत असलेला एक मनोरुग्ण पन्नाशीतला मुलगा. आई बाहेर गेली ती अपघातात मेली. अंथरुणातले वयोवृद्ध वडील दोन तीन दिवसानंतर अन्न पाण्यावाचून अंथरुणात मेले.
मनोरुग्ण मुलगा पाच सात दिवस घरातले बटाटे खाऊन जगला. प्रेताचा वास दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी पाजाऱ्यांनी लक्ष घातलं. मात्र तोवर केवळ प्रेतच नव्हे तर या घरात अशा पद्धतीची माणसं एकाकी राहत आहेत, हे माहीत असतानाही एकही दरवाजा उघडला नाही, कुणीही खबरबात घेतली नाही. कुजले ते केवळ प्रेत नव्हे तर त्या कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या माणूस नावाच्या माणसाची माणुसकी कुजली, असं त्याचं विश्लेषण झालं होतं. आजही या सर्व प्रकरणांमध्ये नाळ तुटली आणि माणुसकी कुजली असच म्हणावं लागेल.






