- निळू दामले
इंग्लंडमधे पब नावाचं एक पवित्र स्थळ असतं. तिथं एल नावाचं एक प्राचीन पवित्र तीर्थ परवडेल अशा दरात दिलं जातं. या तीर्थाला भारतात बियर असं म्हणतात. इंग्लंडमधलं एल हे तीर्थ बियरपेक्षा जास्त घट्ट असतं, त्याची चवही काहीशी कडवट असते. कित्येक शतकांपासून पब ही मंदिरं-तीर्थस्थळं इंग्रजांनी उभारली आहेत. ही तीर्थस्थळं टिकवली पाहिजेत असं इंग्रजांना वाटतं.
पब म्हणजे पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाण. पबमधे लोक बियर किंवा इतर पेय पिण्यासाठी एकत्र जमतात. खरं म्हणजे बियर किंवा मद्य हे एक निमित्त असतं. शिळोप्याच्या गप्पा, टवाळक्या, राजकीय चर्चा आणि भांडणं, किंवा दोन घोट घेत निवांत वेळ काढणं अशा नाना उद्देशांनी माणसं पबमधे जमतात. कित्येक शतकं. पत्रकार, लेखक वगैरे मंडळींना माहिती मिळवण्यासाठीचं एक महत्वाचं ठिकाण. बीबीसी असो की टाइम्स असो, पत्रकार आधी पबमधे जाणार आणि नंतर वर ऑफिसात जाणार.

पब ही जुनी घरं असतात. विटांचं बांधकाम असतं. लाकडी दरवाजे असतात. ऊंचरूंद काचेच्या खिडक्या असतात.आतमधे लाकडी फर्निचर असतं. आतमधे काऊंटवर बियर ग्लासात ओतणारे हातपंप असतात. लाकडी तक्तपोशी असते. म्हाताऱ्या माणसांसाठी आराम खुर्च्या असतात. काऊंटरभोवती उंच खुर्च्या असतात. पब ही एक संस्था आहे. लंडनमधे जागोजागी पब असतात. प्रत्येक गावात पब असतो. इंग्लंडमधे पब टिकवून ठेवणारी चळवळ सुरु झालीय.
लंडनमधे किलबर्न टॅव्हर्न नावाचा एक पब होता. तेल अविवमधल्या एका कंपनीनं 2015 साली तो पब आणि प्लॉट विकत घेतला. पब पाडून तिथं फ्लॅट्स आणि ऑफिसं बांधायचा त्या कंपनीचा प्लॅन होता. लंडनमधे तशी साथच आलीय. पब्ज पाडायचे. नव्या इमारतीत केवळ दाखवण्यासाठी एक जागा पबसाठी ठेवायची. बाकीच्या जागी अधिक पैसे मिळतील असा जागेचा वापर.
किलबर्न टॅव्हर्न 1820 सालाच्या सुमारास बांधला गेला होता. टॅव्हर्न म्हणजे खरं म्हणजे पबच. तळ मजल्यावर पब आणि वर दोन तीन खोल्या प्रवाशाना रात्रीच्या मुक्कामासाठी ठेवलेल्या असत. त्या काळात माणसं बग्गीनं प्रवास करत. किंवा स्टेज कोचनं म्हणजे जणू आजच्या बसेस. दूरवरचा प्रवास असे. वाटेत विश्रांतीसाठी थांबावं लागे. पब ही जागा योग्य. तिथं परगावातून प्रवासासाठी आलेल्या लोकांसाठी दोन खोल्या ठेवलेल्या असत. म्हटलं तर सामाजिक सेवा, म्हटलं तर समाजाची गरज भागवणं, म्हटलं तर धंदा. 1918 साली पहिल्या महायुद्धात जर्मनीनं लंडनवर बाँब टाकले होते त्यात किलबर्न टॅव्हर्न उध्वस्थ झाला. 1921 साली त्याच जागेवर पुन्हा नव्यानं टॅवर्न सुरु करण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात लंडनवर खूप बाँबिंग झालं पण त्यात ही टॅव्हर्न वाचली.
पबच्या आसपासच्या लंडन वासियांनी चळवळ उभारली. एक फेसबुक गट उभा केला. त्यावर 3500 नागरीक गोळा झाले. त्यांनी मोर्चे काढले, वेस्टमिन्स्टर या पालिकेसमोर निदर्शनं केली. पालिकेनं कंपनीला नोटीस देऊन बांधकाम करू नये असा आदेश दिला. कंपनीवाल्यानी आदेश धुडकावला, पब पाडला. पेपर आणि लोकांनी बोंब उठवली. शेवटी पालिकेनं आणि सरकारनं बिल्डरला दंड ठोकला आणि पब पूर्वी होता तसाच बांधायला लावला. फ्लॅट्स नाहीत, ऑफिसं नाही, पब.
इंग्लंडमधले पेपर जागरूक आहेत. ते अशा बातम्या देतात, त्या बातम्यांचा पाठपुरावा करतात. त्यामुळं लंडनमधे घटना घडली की ते देशभर पोचते. देशभर माणसं जागृत होतात, सक्रीय होतात.

स्टॅफर्डशायर या परगण्यात हिमले या गावात एक पब होता. 1760 साली गावात एका माणसानं फार्म हाऊस म्हणून इमारत बांधली आणि यथावकाश तिचं रुपांतर पबमधे केलं. 1830 साली मार्स्टर्न या ब्रुअरीजनं तो पब विकत घेतला. पंचक्रोशीतला मोठ्ठा पब. 1930 च्या सुमारास या विभागात खाण उद्योग सुरु झाला. आसपास जागोजागी सुरुंग लावले जात. सुरुंगांच्या दणक्यानं पबची इमारत ढासळली, कलली. 1940 साली मालकानं इमारतीची डागडुजी केली, पण इमारत कललेल्या स्थितीतच ठेवली. परिणामी ही कललेली इमारत पहायला पर्यटक येऊ लागले, इमारत पहायचे, पबमधे बियर घ्यायचे. हा पब परिसरात फेमस झाला होता.
एटीएफ फार्म्स या कंपनीनं पब आणि आसपासची जमीन विकत घेतली. ही जागा डेवलप करून तिथं काही व्यवसाय सुरु करण्याचा कंपनीचा इरादा होता. जागा विकत घेतल्यावर 9 दिवसांनी पबला आग लागली. आग लागली नव्हती, लावण्यात आली होती. आगीनंतर ही इमारत पाडण्यात आली. गावकऱ्यांना आणि आसपासच्या लोकांना राग आला. त्यांनी मोहिम उभारली. फेसबुक गट तयार केला. 35 हजार लोक त्या गटात सामिल झाले. प्राचीन पब, सांस्कृतीक वारसा, स्थानिक संस्कृतीचा भाग. सरकारनं कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली. मोर्चे काढले, पालिकेसमोर निदर्शनं केली.
सरकारला दखल घ्यावी लागली. चौकशीत आढळून आलं की पबच्या इमारतीला आग लावण्यात आली होती. पोलिसांनी चार व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. पालिकेनं नव्या मालकाला नोटीस दिली. क्रूकेड पबची इमारत जशी कललेल्या स्थितीत होती तशीच उभारण्याचा आदेश दिला. कंपनी कोर्टात गेली. सरकारनं पटकन केस निकाली काढली. क्रूकेड पब आता पुन्हा उभा रहातोय.
अर्थात हेही लक्षात ठेवायला हवं की क्रूकेड असो की किलबर्न; पालिका किंवा सरकार काही अनुदान वगैरे देत नाहीयेत. कोणी तरी धंदा करणारा माणूस पैसे घालून पब उभा करणार आणि लोकांची गजर म्हणून लोक स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून त्या पबात जाणार.
इराणी हे केवळ हॉटेल नव्हतं, ती एक सांस्कृतीक खूण होती…
मुंबईत ग्रँट रोड स्टेशनसमोर मेरवान आहे. तिथले मावा केक खायला लोक रांग लावतात. मेरवान हा मुळात इराणी आहे. लाकडी खुर्च्या, दगडी फरशीचं टॉप असलेलं गोल टेबल, भिंतींवर आरसे, फडका खांद्यावर टाकून हाफ चड्डीत फिरणारा, दुरूनच कोणी काय खाल्लंय आणि त्याचे किती पैसे झालेत ते ओरडून सांगणारा वेटर, पाणी कम चहा आणि बनपाव मस्का, आमलेट आणि खिमा, मोठ्या बशीत ठेवलेले केक, हे सारं जिथं असतं त्याला इराणी हॉटेल म्हणतात. फिरदोस, दारयुश, स्टार ऑफ एशिया अशी या हॉटेलांची नावं.
टेबला टेबलांवर गर्दी करून गप्पा मारणारी माणसं. एका चहावर तासनतास गप्पा मारलेल्या चालत. मुंबईली स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विविध आंदोलनं याच इराण्याच्या हॉटेलमधे आकार घेत असत. लेखक, कवी, पत्रकार यांचे अड्डे इराण्याकडं जमत असत. त्या काळात बारमधे बसण्याची प्रथा नव्हती, बार नव्हते, लोकांकडं पैसेही नव्हते.

इराण्यांच्या हॉटेलात एक मेझनिन माळा असे. तिथं आतबाहेर उघडणारे दरवाजे असलेल्या खोल्या असत. तरूणांना प्रणयाराधन करण्यासाठी मुंबईत तेवढीच जागा असे. वेटरला पैसे देऊन सांगितलेलं असे की त्यानं अर्धा तास आत डोकावायचं नाही.
मुंबई वाढली, मुंबईच्या एकेक चौरस फुटाची किमत लाखोत पोचली. इराण्याच्या हॉटेलच्या जागी दुसरा व्यवसाय केला की प्रचंड पैसा मिळतो म्हटल्यावर इराणी गेले. आज मुंबईत इराणी उरलेले नाहीत.
इराणी हे केवळ हॉटेल नव्हतं, ती एक सांस्कृतीक खूण होती. ती नाहिशी झालीय. मुंबईची एक स्वतंत्र वैश्विक संस्कृती होती. इमारती, रेस्टॉरंट्स, लायब्रऱ्या, म्युझियम्स इत्यादी अनेक खुणा होत्या. गेल्या, जाताहेत. शंकरशेट यांचं नाव स्टेशनला द्यायचं, त्यांचा वाडा नाहिसा झालाय. कोणतीही सांस्कृतीक खूण नसलेली अत्यंत बटबटीत ओंगळ इमारत अंबानींनी उभारलीय, तीच मुंबईची संस्कृती व्हायचं म्हणतेय.
(साभार – niludamle.com)






